लोकमान्य टिळक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बाळ गंगाधर टिळक या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


जन्मगाव:चिखली,तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी हे आहे.

बाळ गंगाधर टिळक
Bal G. Tilak.jpg
इ.स. १९१० च्या सुमारास घेतलेले लोकमान्य टिळकांचे प्रकाशचित्र
जन्म: जुलै २३,इ.स. १८५६
रत्‍नागिरी(टिळक आळी), रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
मृत्यू: ऑगस्ट १, इ.स. १९२०
पुणे, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
पत्रकारिता/ लेखन: केसरी
मराठा
प्रमुख स्मारके: मुंबई, दिल्ली, पुणे
धर्म: हिंदू
प्रभाव: शिवाजी महाराज, तात्या टोपे, महाराणा प्रताप
प्रभावित: महात्मा गांधी, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर
वडील: गंगाधर रामचंद्र टिळक
आई: पार्वतीबाई टिळक
पत्नी: सत्यभामाबाई
अपत्ये: श्रीधर बळवंत टिळक
तळटिपा: "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच."

बाळ गंगाधर टिळक (जुलै २३,इ.स. १८५६ - ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, संपादक आणि लेखक होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.

बालपण

लोकमान्य टिळकांच्या पत्‍नी सत्यभामाबाई उर्फ तापीबाई आणि मुली व नातवंडे यांच्याबरोबर

टिळकांचा जन्म २३ जुलै, इ.स. १८५६ मध्ये रत्‍नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव होय.[१]

प्लेगविरोधी फवारणीस विरोध

इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली तेव्हा पुणेकरांनी विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वॉल्टर चार्लस रँड याने लष्कराची मदत घेतली. व त्यांचे जवान पुण्यात आरोग्य विभागाच्या मदतीला आले, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करवून घेऊ लागले. आणि साथीचा फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे-लत्ते सर्रास जाळून टाकू लागले, यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला. रँडसाहेब मुद्दाम आमची घरे जाळीत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा टिळकांनी अग्रलेख याच संदर्भातील आहे. टिळक लिहितात :"रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहोचला आहे. रँडसाहेबांचे लाडके सोल्जर पायातल्या खेटरांसकट फवारणीचे धोटे घेऊन आमच्या घरात घुसतात. घरातले सामान रस्त्यावर फेकून देतात, जाळून टाकतात, हे कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरांबरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे."[१]

टिळक-आगरकर मैत्री व वाद

डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. आगरकरांकडे केसरीच्या संपादकपदाची धुरा टिळकांनी दिली होती. पण नंतर दोघांत बिनसले. टिळकांचे संस्थेतील एकंदर धोरणासंबंधी मतभेद झाले. आपल्या चाळीस पानी राजीनाम्यात टिळकांनी ‘निर्वाहापुरते वेतन’ या तत्त्वाऐवजी ‘सांपत्तिक स्थितीनुसार वेतन’ तसेच ‘राष्ट्रीय शिक्षण संस्थे’च्या उद्दिष्टाविरुद्ध ‘सरकारच्या मदतीवर चालणारी संस्था’ हे धोरण संस्थेच्या मूळ धोरणाला धक्के देणारे आहे, असे आग्रहाने सांगितले. या प्रश्नावर त्यांचा आगरकरांशी वाद झाला. याशिवाय दुसरा वाद "आधी कोण? राजकीय की सामाजिक?" या विषयावर झाला होता. जातिभेद नष्ट झाले पाहिजेत, असे ते निकराने मांडीत. परकीय सरकारने लोकमताची पर्वा न करता सुधारणेसाठी योग्य ते कायदे करावेत, असे आगरकरांचे मत होते. टिळकांचे म्हणणे असे होते की, आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक वा धार्मिक बाबतीत होऊ नये. मात्र लोकमत अनुकूल असेल आणि धर्मवचनांच्या बाबतींत तडजोड होत असेल, तर असा कायदा करण्यास आमची काही हरकत नाही.[२]

न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्युकेशन सोसायटी

विष्णुशास्त्री चिपळूणकर हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते. निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना भेटले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. विष्णुशास्त्री १८८२ मध्ये मरण पावले तथापि १८८४ मध्ये वेडरबर्न, वर्ड्‌स्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर वगैरे प्रभृतींच्या मदतीने टिळक–आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. टिळक गणित व संस्कृत विषय शिकवीत.[३]

दुष्काळ

अभ्यासिकेत टिळक

इ.स. १८९६ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकर्‍यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच सरकारच्या 'Famine Relief Code' नुसार दुष्काळ पडला असतांना शेतकऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले. त्यांच्या स्वयंसेवकांनी महाराष्ट्रभर गावागावात फिरून लोकांना 'Famine Relief Code' बद्दल माहिती देणारी पत्रके वाटली. याबरोबरच धनिकांनी व दुकानदारांनी अन्न व पैसा दान करावे असे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी चालवल्या गेल्या.[ संदर्भ हवा ]

जहालवाद विरुद्ध मवाळवाद

तत्कालीन भारतीय नेतृत्त्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. इंग्रजांशी जुळवून घेउन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो तर इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करुन वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते.[ संदर्भ हवा ]

लाल-बाल-पाल

लाल बाल पाल

लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले.[ संदर्भ हवा ]

बंगालच्या फाळणीविरुद्धचा लढा

८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्‍न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.[१]

टिळकांच्या बाबतीमध्ये राम गणेश गडकरी असे म्हणाले होते की, बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून या पुणे शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विझवावी, या लायकीचे कोणी राहिलेले नाहीत.

पत्रकारिता

केसरीतील अग्रलेख
मराठातील अग्रलेख

चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला. टिळकांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इ.स. १८८१ साली केसरीमराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठा चे संपादक होते. अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी सुरू झाले. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.[ संदर्भ हवा ]

सुरुवातीला आगरकरांकडे ' केसरी ' चे संपादकपद तर टिळकांकडे ' मराठा ' या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही 'केसरी' त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ' केसरी ' चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ' केसरी ' चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' ' टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', ' टोणग्याचे आचळ ', 'हे आमचे गुरूच नव्हेत ’, ' बादशहाब्राह्मण झाले ' हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.[४]

साहित्य आणि संशोधन

टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) ही त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. त्यांचे इतर लिखाण :-

सामाजिक सुधारणांबाबत टिळकांची भूमिका

टिळकांच्या काळात, महिला आणि जातीच्या प्रश्नावर काँग्रेसमध्ये दोन गट होते - सुधारणावादी आणि पुराणमतवादी. जातीय भेदभाव दूर करणे, बालविवाहावर बंदी घालणे, विधवा विवाहाचे समर्थन करणे आणि महिला शिक्षण हे सुधारणावादी विचारधारेचे चार मुख्य आधार होते. महादेव गोविंद रानडे, डब्ल्यू.सी. बॅनर्जी, विष्णू हरी पंडित आणि नंतर गोपाळ गणेश आगरकर तसेच गोपाळ कृष्ण गोखले आदी या पक्षात होते. दुसरीकडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि टिळक हे रूढीवादी विचारांचे नेतृत्व करीत होते.[५][६]

महिला शिक्षणाबद्दल टिळकांचे विचार

टिळकांनी पूर्ण क्षमतेने स्त्री शिक्षणाला विरोध केला. परिमला व्ही. राव यांनी आपल्या शोधपेपरमध्ये मुख्यत्वे टिळकांच्या मराठा वर्तमानपत्राचा हवाला देत सांगितले की विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि टिळक यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कट्टरपंथी गटाने १८८१ ते १९२०च्या दरम्यान कशाप्रकारे मुलींसाठी शाळा सुरु करण्याला आणि प्रत्येक समुदायाला शिक्षण देण्याच्या प्रयत्नांना विरोध केला. या गटाच्या विरोधामुळे महाराष्ट्रातील ११ पैकी ९ नगरपालिकांमध्ये प्रत्येकाला शिक्षण देण्याच्या प्रस्तावाला पराभवाला सामोरे जावे लागले. या गटाने राष्ट्रवादी शिक्षणाचा पुरस्कार केला, ज्यामध्ये धर्मशास्त्रांचे अध्यापन व त्याच्या कौशल्यांचा अभ्यास करण्यावर भर देण्यात आला.[७]

विवाहाचे वय व टिळकांचे विचार

त्यावेळी मुलींचे लग्न अगदी लहान वयात होते, त्यामुळे त्यांना असह्य छळ व यातना सहन करावा लागला. पेशव्यांच्या राज्यात ब्राह्मण कुटुंबांयांसाठी हे अनिवार्य होते की आपल्या मुलीचे लग्न ९ वर्षांपेक्षा कमी वयात केले गेले पाहिजे. एका प्रसिद्ध प्रकरणात, मुलगी फूलमणीचे ११व्या वर्षीच लग्न केले होते, तिच्या ३५ वर्षीय पतीने तिच्याशी जबरदस्तीने संभोग (लैंगिक अत्याचार) केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. ब्रिटिश भारतात अशा अनेक घटना घडल्या होत्या ज्यामध्ये अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध ठेवल्याने त्या अपंग झाल्या. विवाह आणि संमतीने लैंगिक संबंध यासाठीचे वय वाढविण्याची मागणी भारतातील समाजसुधारकांकडून करण्यात येत होती. म्हणूनच ब्रिटिश सरकारने १८९१ साली एक कायदा "एज ऑफ कॉन्सेन्ट ॲक्ट १८९१" तयार केला आहे ज्यानुसार १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या विवाहित किंवा अविवाहित मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे बलात्काराच्या प्रकारात येईल. काँग्रेसचे सुधारवादी लोकांचे या विधेयकाला समर्थन होते, परंतु टिळकांनी या प्रकरणात ब्रिटीश सरकारच्या हस्तक्षेपाला विरोध केला. ते म्हणाले - 'हा सरकारचा कायदा योग्य आणि उपयुक्त असू शकेल, परंतु तरीही सरकारने आमच्या सामाजिक परंपरा आणि जीवनशैलीत हस्तक्षेप करावा अशी आमची इच्छा नाही.'[८]

जातीचे निर्मूलन व गैर-ब्राम्हणांबद्दल टिळकांचे विचार

टिळकांनी जातीव्यवस्थेचे (द प्रॉस्पेक्ट्स ऑफ हिंदू कास्ट, मराठा, 10 जुलै 1881) समर्थन केले. टिळकांचा वर्ण व्यवस्थेवर ठाम विश्वास होता. त्यांचा असा विश्वास होता की ब्राह्मण जात सर्वात शुद्ध आहे आणि जातीव्यवस्थेला टिकवून ठेवणे देश व समाजाच्या हिताचे आहे. त्यांचे म्हणणे होते की जातींचे निर्मूलन होणे म्हणजे राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास होणे होय. त्यांच्या मते, जात हा हिंदू समाजाचा आधार आहे आणि जातीचा नाश म्हणजे हिंदू समाजाचा नाश.[९]

जेव्हा ज्योतिबा फुले यांनी अनिवार्य शिक्षणाचे अभियान सुरू केले तेव्हा टिळकांनी त्याला विरोध केला. टिळकांचा असे म्हणणे होते की, प्रत्येक बालकाला इतिहास, भूगोल, गणित शिकवण्यास काही अर्थ नाही, कारण त्यांचा उपयोग त्यांच्या आयुष्यात होत नाही. कुणबी जातीच्या मुलांना इतिहास, भूगोल किंवा गणिताचे शिक्षण दिल्यास त्यांचे नुकसान होईल कारण ते त्यांचे वांशिक कौशल्य विसरतील. ते पुढे म्हणाले की, कुणबी जातीच्या मुलांनी आपला पारंपरिक शेती व्यवसाय करावा आणि शिक्षणापासून दूर रहावे. टिळक हे विचार मांडत असताना, त्याच वेळी ब्रिटिश सरकार शाळा उघडत होती, आणि त्यात सर्व जातींच्या मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार देत होती. टिळकांनी यास ब्रिटिश सरकारची गंभीर चूक म्हटली. सार्वजनिक शाळेत महार आणि मांग जातीच्या मुलांना प्रवेश देण्याबद्दल टिळकांनी ब्रिटीश सरकारला इशारा दिला की, महार-मांग मुले ब्राह्मण मुलांबरोबर बसल्याने हिंदू धर्म सुरक्षित राहणार नाही.[१०]

टिळकांबद्दल डॉ. आंबेडकरांचे विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असा विश्वास होता की टिळकांमुळे काँग्रेसने समाज सुधारणेचे काम थांबवले. यामुळे भारतातील सामाजिक परिवर्तनाचा मार्ग बंद झाला आणि राजकीय सुधारणाही थांबल्या. ज्या काळात महादेव गोविंद रानडे आणि गोपाळ कृष्ण गोखले ते ज्योतिबा फुले सामाजिक सुधारणेसाठी कार्यरत होते, त्या काळात टिळक पारंपरिक नेत्यांचे नेतृत्व करीत होते. आणि या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी टिळकांबद्दल सातत्याने टीकात्मक लेखन केलेले आहे.[११]

टिळक त्यावेळी काँग्रेस पक्षात कार्यरत होते. काँग्रेसमध्येच एक संस्था होती - सोशल कॉन्फरन्स ज्याने समाज सुधारणेसाठी काम केले. १९९५ मध्ये जेव्हा काँग्रेसचे अधिवेशन चालू होते, तेव्हा काही लोक म्हणाले की जर काँग्रेसच्या अंतर्गत सोशल कॉन्फरन्सने समाज सुधारणेचे काम केले तर आम्ही काँग्रेसचा पंडाल जाळून टाकू. अशा लोकांचे वैचारिक नेतृत्व टिळक करीत होते. शेवटी निर्णय घेण्यात आला की काँग्रेसचा समाजसुधारणाच्या कोणत्याही कार्यक्रमाशी संबंध राहणार नाही, मग ते कितीही महत्वाचे असले तरीही. काँग्रेस केवळ एक राजकीय व्यासपीठ बनले, त्यांनी समाज सुधारणेचे कार्यक्रम थांबविले. याचे वर्णन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या "गांधींनी आणि काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले?" पुस्तकात तपशीलवार केले आहे. "रानडे, गांधी आणि जिन्ना" या आपल्या दुसऱ्या पुस्तकात आंबेडकर लिहितात - "विचारवंतांचा एक गट कट्टरपंथी आणि अराजकीय आहे आणि दुसरा गट पुरोगामी आणि राजकीय आहे." पहिल्या गटाचे नेतृत्व आधी चिपळूणकर आणि नंतर टिळक यांनी केले. या दोघांमुळे रानडे यांना विविध प्रकारचे त्रास झाले. यामुळे केवळ सामाजिक सुधारणांच्या कामांचेच नुकसान झाले नाही तर राजकीय सुधारणांनाही सर्वाधिक फटका बसल्याचे अनुभवावरून दिसून येते.'[१२]

टिळक आणि रानडे यांची तुलना करताना बाबासाहेब आंबेडकर हेही लिहितात की निःसंशयपणे टिळक तुरुंगात राहिले, परंतु रानडे यांची लढाई अधिक कठीण होती. ज्या व्यक्तीने राजकीय लढा दिला त्याला समाज डोक्यावर घेतो, तर समाज सुधारणेसाठी संघर्ष करणारी व्यक्ती बऱ्याचदा एकटी असते आणि तिला सर्व प्रकारच्या अपमानांना सामोरे जावे लागते.[१३]

टिळकांचे स्पष्ट मत होते की शेतकरी आणि कारागीर जातींनी राजकारणात प्रवेश करू नये. १९१८ मध्ये या जातींनी राजकीय प्रतिनिधित्त्व मागितले असता टिळकांनी सोलापुरातील एका सभेत असे म्हटले होते की 'तेली-तामोली-कुणबी विधानसभेत जाऊन काय करणार?' बाबासाहेबांच्या मते, टिळकांच्या मते या जातींतील लोकांचे कार्य कायद्यांचे अनुसरण करणे आहे आणि त्यांना कायदे करण्याचा अधिकार असू नये.[१४]

सार्वजनिक उत्सवांची सुरुवात

राजकीय जनजागृतीसाठी इ.स. १८९३ साली टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला आणि महात्मा फुलेंनी सुरु केलेल्या शिवाजी जयंतीला व्यापक स्वरुपात साजरी केले.[१५] शिवजयंती आणि गणेशोत्सव या सार्वजनिक सणांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणे हे टिळकांचे उद्दिष्ट होते.[१६]

कौटुंबिक जीवन

कौटुंबिक स्तरावर १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. पत्‍नीचा देहान्त ...साली झाला. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात पत्‍नीच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांची जबाबदारी ...नी सांभाळली. पण त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळकबंधू म्हणून ओळखली जात, आणि ती आगरकरांच्या विचारांशी जवळीक ठेवणारी होती.[ संदर्भ हवा ]

टिळकांवर लिहिलेली पुस्तके[१७]

 • टिळक आणि आगरकर - तीन अंकी नाटक, लेखक विश्राम बेडेकर
 • टिळक भारत, लेखक शि.ल. करंदीकर
 • टिळकांची पत्रे, संपादक : एम. धोंडोपंत विद्वांस
 • मंडालेचा राजबंदी, लेखक अरविंद व्यं. गोखले
 • लोकमान्य टिळक चरित्र व आठवणी (भाग १ ते ६), लेखक प्रा.वामन शिवराम आपटे
 • लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भालचंद्र दत्तात्रेय खेर
 • लोकमान्य टिळक, लेखक : पु.ग. सहस्रबुद्धे
 • लोकमान्य टिळक यांचे चरित्र (३ खंड), लेखक न.चिं. केळकर
 • लोकमान्यांची सिंहगर्जना, लेखक गिरीश दाबके
 • लोकमान्य ते महात्मा लेखक सदानंद मोरे
 • लोकमान्य व लोकराजा लेख लेखक इंद्रजित नाझरे
 • लाल,बाल,पाल लेख लेखक इंद्रजित नाझरे
 • लोकमान्य टिळकांच्या जीवनावर "दुर्दम्य" नावाची चरित्रात्मक कादंबरी प्रा.गंगाधर गाडगीळ यांनी लिहिली आहे.

चित्रपट

 • "लोकमान्य : एक युगपुरुष" (दिग्दर्शक - ओम राऊत, टिळकांच्या भूमिकेत सुबोध भावे) - इ.स. २०१५.

टिळकांवर न निघालेला चित्रपट

चित्रपट निर्माते विनय धुमाळे यांनी टिळकांवर चित्रपट बनवण्यासाठी १९९८मध्ये केंद्र सरकारकडून अडीच कोटी रुपयांचे, तर राज्य सरकारकडून पन्नास लाख रुपयांचे अनुदान घेतले होते. मात्र तेव्हापासून आजपर्यंत हा चित्रपट बनलेला नाही. त्याबद्दल पुण्यातील विष्णू रामचंद्र कमळापूरकर यांनी माहिती अधिकाराचा वापर करून पाठपुरावा केला होता. अनुदान घेतल्यानंतर तब्बल सोळा वर्षे हा चित्रपट अपेक्षेनुसार बनविण्यात धुमाळे यांना अपयश आल्याचा निष्कर्ष राज्याच्या सांस्कृतिक विभागाने काढला असून, या अनुदानाची व्याजासकट वसुली करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

विनय धुमाळे यांनी शासकीय अर्थसाहाय्यातून निर्माण केलेला 'लोकमान्य' चित्रपट (डीव्हीडी स्वरूपातील) हा अतिशय सुमार दर्जाचा असून राष्ट्रपुरुषांवर चित्रपट बनविण्याचा उद्देश या चित्रपटातून सफल झालेला नाही, असे स्पष्ट मत राज्य सरकारच्या चित्रपट परीक्षण समितीने नोंदविले आहे. या समितीमध्ये संजीव कोलते, भक्ती मायाळू, प्रकाश जाधव, बाळासाहेब गोरे, विजय कोंडके, मधु कांबीकर, ललिता ताम्हाणे, महेश लिमये व सदस्य सचिव म्हणून मंगेश मोहिते यांचा समावेश होता. या चित्रपटाच्या सर्वच अंगांची समितीने चिरफाड केली आहे. हा चित्रपट नसून अडीच तासांचा माहितीपट असल्याचे समितीने नमूद केले असून सरकारचा या बाबतचा हेतू सफल झालेला नसल्याचेही त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

पुतळे

महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांचे बरेच पुतळे आहेत, त्या पुतळ्यापैकी काहींना विशेष इतिहास आहे. टिळकांचे पुतळे असलेल्या काही शहरांची आणि तेथील लोकमान्य टिळकांच्या काही पुतळ्यांची यादी पुढे दिली आहे :-

पुण्याच्या भाजी मंडईतील पुतळा

पुण्याच्या महात्मा फुले मंडईत पांढऱ्या शुभ्र मेघडंबरीत असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे २२ जुलै १९२४ रोजी अनावरण झाले. लोकमान्यांच्या निधनानंतर लगेचच म्हणजे १७ ऑगस्ट १९२० रोजीच्या पुणे नगरपालिकेच्या सभेत या पुतळ्याचा ठराव मांडण्यात आला व त्यासाठी पंधरा हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली. त्यानंतर वर्षभराने झालेल्या सभेत शिल्पकार विनायक व्यंकट वाघ यांना आगाऊ सहा हजार रुपये देण्यात यावेत, असे ठरले. नगरपालिकेच्या अकाउंटंटने मात्र या खर्चासाठी प्रांतिक सरकारची म्हणजे मुंबई सरकारची परवानगी घ्यावी असे सुचविले. ९ जून १९२२ रोजी नगरपालिकेचे लोकनियुक्त अध्यक्ष न.चिं. केळकर अध्यक्षस्थानी असलेल्या पालिकेच्या सभेत अकाउंटंटचा आक्षेप चर्चेला आला असता, ‘या खर्चासाठी अन्य कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही,’ असे मत व्यक्त झाले.

१९२२-२३ मध्ये सरकारी हिशेब तपासनिसाने पुतळा आणि शिल्पकाराचा खर्च करण्यास मनाई केली. जिल्हाधिकाऱ्यांनीतर ६ हजार रुपये वसूल करण्यासाठी भारतमंत्री (Secretary of State for India) यांच्या वतीने जिल्हा कोर्टात दावा दाखल केला. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात अशा प्रकारचा दावा झालेला हा पहिलाच पुतळा असावा. टिळक हयात असताना सरकार त्यांच्यावर खटले भरतच होते, आता पुतळ्यावर खटला सुरू झाला. सरकार आणि कोर्ट या दोघांचेही दडपण पुणे नगरपालिकेच्या अध्यक्षांवर आले. शिल्पकार वाघांना या कशाचीच गंधवार्ता नव्हती.

कोर्टाने पुतळा उभारण्याच्या खर्चाला बंदी घातली होती. अखेर केसरी मराठा ट्रस्टने खर्चाची बाजू उचलण्याची तयारी दाखवली. न्यायालयात विरुद्ध निकाल गेल्यास हे पैसे ट्रस्ट परत मागणार नाही, असे सांगितल्याने २२ जुलै १९२४ रोजी पंडित मोतीलाल नेहरू यांच्या हस्ते पुतळा बसविण्यात आला. मात्र न्यायालयाने सरकारविरुद्ध निर्णय दिला आणि पुणे नगरपालिकेची भूमिकाच योग्य ठरली.

बाह्य दुवे

विकिक्वोट
लोकमान्य टिळक हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.

संदर्भ

 1. ^ a b c देशपांडे, सु. र. "टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर". मराठी विश्वकोश. २२ जुलै २०१९ रोजी पाहिले.
 2. ^ "टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-09-07 रोजी पाहिले.
 3. ^ "टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-09-07 रोजी पाहिले.
 4. ^ "तिखट व धारदार शस्त्र!". Maharashtra Times. 31 जुलै, 2008. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 5. ^ https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/
 6. ^ "टिळक महिलांना आणि ब्राह्मणेतरांना शिक्षण देण्याच्या विरोधात होते का? BBC News मराठी".
 7. ^ https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/
 8. ^ https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/
 9. ^ https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/
 10. ^ https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/
 11. ^ https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/
 12. ^ https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/
 13. ^ https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/
 14. ^ https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/
 15. ^ Kesarī, 1881-1981: vaicārika, sandarbha, āṇi vāṭacāla. Kesarī Mudraṇālaya. 1981.
 16. ^ "BBC News मराठी".
 17. ^ "लोकमान्य टिळकांवरील पुस्तके". http://www.lokmanyatilak.org. २२ जुलै २०१९ रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)