गुंडाचा गणपती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

पुणे शहरातील कसबा पेठेत शिंपी आळीच्या शेवटाला गुंडाचा गणपती नावाचे पेशवेकालीन देऊळ आहे.

पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणीस यांचा नागोजी गुंड नावाचा सहकारी होता. ‘त्याच्या घराजवळील गणपती’ असा जो दुसरे बाजीराव पेशवे यांच्या १८१०-११ सालामधील रोजनिशीमध्ये उल्लेख आहे, तोच गणपती आज "गुंडाचा गणपती‘ म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्यातले कसबा गणपतीप्रमाणेच कसब्यातील गणपतीचे दुसरे जागृत स्थान म्हणजे गुंडाचा गणपती होय. या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर मूर्तीवरील नजर हटत नाही आणि दर्शनाचा परिणाम दीर्घ काळ मनावर राहतो. दर्शनातच आनंद देणारी ही मूर्ती आहे. हत्तीचे शिर मानवी शरीरावर ठेवल्यावर तंतोतंत दिसेल अशी ही मूर्ती आहे. हत्तीच्या शिरोभागातील गंडस्थळे, मोठे कान आणि प्रशस्तपणा या मूर्तीमध्ये पूर्णपणे उतरला आहे. सुमारे साडेचार-पाच फूट उंचीची ही मूर्ती पूर्णपणे दगडाची असून शेंदरी रंगात आहे. चतुर्भुज, दोन्ही पाय खाली सोडून बसलेला गजानन, अशी ही मूर्ती आहे. डाव्या खालील हातात मोदक, वरच्या दोन्ही हातांत पाशांकुश आणि उजवा खालील हात अभयहस्त असे मनमोहक रूप आहे. नागयज्ञोपवित, तसेच अंगभर पीतांबर असलेली मूर्ती दगडी बैठकीवर असून, अत्यंत प्रभावी अशा नजरेने पाहत असल्याचे दिसते. ३ एप्रिल १९७५ रोजी जुन्या मूर्तीचे कवच निघाले, तेव्हा आत अतिप्राचीन सुंदर मूर्ती भंगलेल्या अवस्थेत मिळाली. त्या वेळी या मूर्तीची पाहणी भारत इतिहास संशोधन मंडळ आणि डेक्कन पुरातत्त्व महाविद्यालयातील तज्ज्ञांनी केली होती. तेव्हा ही मूर्ती चौदाव्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे नवीन मूर्तीची स्थापना करण्यासाठी काका वडके यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची स्थापना करण्यात आली होती. गणेश मूर्तीवरील थर काढून ४ फेब्रुवारी १९७६ रोजी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मूर्तीच्या कवचाचा एक साचा केळकर संग्रहालयाला भेट देण्यात आला. त्यानंतर केशव रघुनाथ देशपांडे यांनी पाषाणातून हुबेहूब मूर्ती तयार केली. या मूर्तीसाठी वारजे येथील गणपती माळावरून दोन टन वजनाचा दगड निवडण्यात आला होता. त्याच नवीन मूर्तीची आज पूजा केली जाते (१८७६पासून). मूळ मूर्ती गाभार्‍याच्या मागे ठेवलेली आहे.

लोकमान्य टिळकांचे गुरू महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या मातुःश्रींनी पुत्रप्राप्तीसाठी येथेच कडक उपासना आणि नवस केला होता.

पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये या गणपतीचा उल्लेख आहे. ही उजव्या सोंडेची श्रींची मूर्ती असून हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या देवस्थानची वहिवाट सन १८५२ ते १९१० पर्यंत चित्राव घराण्याकडे होती. मंदिरातील मूर्ती शिलाहार कालानंतरची पण शिवकालाच्या आधीची असावी, असा अंदाज आहे.

२०१६ साली या मंदिराची देखभाल चंद्रशेखर मधुकर बाभळे, भालचंद्र यशवंत बाभळे व दीपक प्रभाकर बाभळे यांच्याकडे आहे. गणपतीच्या मूर्तीवरील कवच सन १९७५ साली निघाले.

या मंदिरात पौष मासात गणेश पुराण व माघ महिन्यात गणेशजन्मानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

जीर्णोद्धार[संपादन]

उत्तर पेशवाईत बांधलेले हे गुंडाच्या गणपतीचे हे देऊळ अजूनही चांगल्या स्थितीत आहे. तरीही त्याचे लाकडी छत, कळस, सभामंडप यांची डागडुजी करण्यात येणार आहे. मंदिराच्या मूळ रचनेला कोठेही धक्का न पोहोचविता हा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.

चतुःशृंगी येथील पार्वतीनंदन गणपती मंदिराचा जीर्णोद्धार ज्या किमया नावाच्या वास्तुविशारद संस्थेने केला होता आणि त्याची दखल युनेस्कोने घेतली होती, ती संस्था या गुंडाच्या गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करील.(२६-१-२०१६ ची बातमी).[ संदर्भ हवा ] ’किमया’ला सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी दिला जाणारा युनेस्को एशिया पॅसेफिक हेरिटेज ॲवॉर्ड मिळाले आहे.

मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी येणारा खर्च भाविकांच्या देणगीतून करण्यात येणार आहे.


Unbalanced scales.svg
या लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे.
कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा.