लक्ष्मण देशपांडे
प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे | |
---|---|
टोपणनाव | वऱ्हाडकार |
जन्म | ५ डिसेंबर १९४३ |
मृत्यू | २२ फेब्रुवारी, २००९ (वय ६५) |
राष्ट्रीयत्व | भारत |
भाषा | मराठी |
कार्यकाळ | १९७९ - २००९ |
प्रसिद्ध साहित्यकृती | वऱ्हाड निघालंय लंडनला |
डॉ. लक्ष्मण देशपांडे (डिसेंबर ५, इ.स. १९४३ - फेब्रुवारी २२, इ.स. २००९) एक बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते होते. मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांना त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी इ.स. १९७९ मध्ये केला होता. तेव्हापासून या नाटकाचे १,९६० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. ह्या तीन तासांच्या एकपात्री प्रयोगात ते ५२ पात्र सादर करायचे. त्यामुळे लोक त्यांना वऱ्हाडकर म्हणायचे.
लक्षमण देशपांडे लहानप गणपती उत्सवात होणाऱ्या मेळा नावाच्या करमणुकीच्या कार्यक्रमांत भाग घेत. तेथेच त्यांच्यातील कलावंताची जडणघडण झाली. घरची परिस्थिती प्रतिकूल असूनही त्यांनी एम.ए. व त्यानंतर एमडी (मास्टर इन ड्रॅमॅटिक्स)चे शिक्षण घेतले. मौलाना आझाद, सरस्वती भुवन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यावर १९८० साली ते औरंगाबाद विद्यापीठात शाखाप्रमुख म्हणून कार्यरत झाले. याच दरम्यान त्यांनी 'वऱ्हाड निघालंंय लंडनला'ची निर्मिती केली. या नाटकाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हजारोंच्या संख्येने लोक प्रयोगांना हजर रहात. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, मस्कत, ऑस्ट्रेलिया, कतार, कुवेत, सिंगापूर, थायलंड, नायजेरिया येथेही वऱ्हाडचे प्रयोग झाले. एकाच व्यक्तीने ५२ व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम केल्याबद्दल डॉ. देशपांडे यांची २००४मध्ये गिनीज बुकातही नोंद झाली. रेशमगाठी, पैंजण या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले. याशिवाय त्यांनी द्विपात्री 'नटसम्राट' या नाटकातही काम केले. इ.स. २०००मध्ये वऱ्हाडकारांनी औरंगाबाद विद्यापीठातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. याच वर्षी त्यांची परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
लेखन
[संपादन]प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी "वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाचे पुस्तक प्रकाशित केले. त्याच्या दोन आवृत्त्या निघाल्या. प्रतिकार हे त्यांनी लिहिलेल्या एकांकिकांचे पुस्तकही रसिकांना भावले. 'मौलाना आझाद-पुर्नमूल्यांकन' या पुस्तकाचे, तसेच महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अक्षरनाद या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले होते.
प्रा. लक्ष्मण देशपांडे यांना मिळालेले काही पुरस्कार
[संपादन]- २००३ : महाराष्ट्र शासनाचा कलावंत पुरस्कार.
- २००४ : विष्णूदास भावे पुरस्कार.
- याशिवाय छत्रपती शाहू महाराज, बेंडे स्मृती, राम श्रीधर, अल्फा टीव्ही, पुरुषोत्तम करंडक, वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठान, सयाजीराव महाराज यांच्या नावाचे पुरस्कार.
- अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे साहित्यसम्राट आचार्य अत्रे पुरस्कार.
बाह्य दुवे
[संपादन]- एकपात्री नाटककार लक्ष्मण देशपांडे यांचे निधन Archived 2009-03-18 at the Wayback Machine.