गिरिजा कीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गिरिजा कीर
जन्म धारवाड, कर्नाटक, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी

गिरिजा कीर (१९३३ - हयात) या मराठी भाषेतील लेखिका आणि कथाकथनकार आहेत.

बालपण[संपादन]

कीर यांचा जन्म ५ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी धारवाड येथे झाला. पूर्वाश्रमीच्या त्या रमा नारायणराव मुदवेडकर. मुंबई विद्यापीठाची बी. ए. ची पदवी मिळविल्यानंतर गिरिजाबाईंच्या लेखनाला सुरुवात झाली.

लेखन[संपादन]

किर्लोस्कर, प्रपंच, ललना इ. मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. गिरिजाबाईंनी विविध वाङ्मय प्रकारांत आपले लेखन केले. त्यांची एकूण ८५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य इत्यादी विविधता आहे. १९६८ ते १९७८ या काळात अनुराधा मासिकाची साहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केले. हे काम करीत असताना सामाजिक प्रश्नांसंबंधीच्या प्रेमापोटी कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात जाऊन त्यांनी त्यांच्या जीवनाचा जवळून अभ्यास केला. त्यांनी त्यांचे पुष्कळसे लिखाण या अनुभवातूनच लिहिले आहे.

गिरिजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, चंद्रलिंपी, चक्रवेद, स्वप्नात चंद्र ज्याच्या, आभाळमाया, आत्मभाग, झपाटलेला इ. त्यांच्या कादंबऱ्याही लोकप्रिय आहेत. गाभाऱ्यातील माणसं, जगावेगळी माणसं, कलावंत, साहित्य सहवास ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके आहेत. त्यांनी बालसाहित्यावरही बरेच लेखन केले आहे. त्यांच्यातील लेखिका ही शृंगारिक तशीच गंभीर आणि अंतर्मुखही दिसते. तसेच त्या उत्कृष्ट कथाकथनही करीत असत.

त्यांचे अलीकडे प्रकाशित झालेले "जन्मठेप" हे पुस्तक त्यांनी ६ वर्षे येरवडा तुरुंगातील कैद्यांवर संशोधन करून लिहिले आहे.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
साहित्य सहवास दिलीपराज प्रकाशन १९९७
इथं दिवा लावायला हवा सुयोग १९९६
आभाळ भरून आलंय दिलीपराज १९९३
आत्मभान दिलीपराज १९९०
गाभाऱ्यातली माणसं दिलीपराज १९९२
माझ्या आयुष्याची गोष्ट ह. ना. आपटे सहकार्याधारित प्रकाशन २००१
प्रियजन ह. ना. आपटे सहकार्याधारित प्रकाशन २०००
जगावेगळी माणसं इंद्रायणी साहित्य १९७९
दर्शन हेमचंद्र प्रकाशन १९८०
यात्रिक साहित्य चिंतामणी १९७४
चंदनाच्या झाडा साहित्य वसंत १९७८
माहेरचा आहेर १९६८
गिरिजाघर १९७४
राखेतली पाखरं १९७७
चक्रवेध राधेय प्रकाशन १९७७
तरी जगावसं वाटतं मनमोहिनी प्रकाशन १९७५
माझं कुंकू सावित्रीचं आहे सुनंदा प्रकाशन १९७०
गिरकी सुनंदा प्रकाशन १९७७
पूर्ण पुरुष दिलीपराज प्रकाशन
दीपस्तंभ दिलीपराज प्रकाशन
कवडसे
अनिकेत दिलीपराज प्रकाशन
पश्चिमगंध दिलीपराज प्रकाशन