Jump to content

सुबोध जावडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुबोध जावडेकर
जन्म १६ सप्टेंबर १९४८
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, लेखन, व्याख्याता
साहित्य प्रकार विज्ञान कथा
प्रसिद्ध साहित्यकृती आकांत, मेंदूतला माणूस, कुरुक्षेत्र, चाहूल उद्याची, आपले बुद्धिमान सोयरे
वडील प्रभाकर जावडेकर
पुरस्कार महाराष्ट्र सरकारचे तीन पुरस्कार, केशवराव कोठावळे पुरस्कार, अ.वा. वर्टी पुरस्कार, महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार इत्यादी

सुबोध प्रभाकर जावडेकर (इ.स. १९४८:इस्लामपूर, महाराष्ट्र - ) हे मराठी भाषेत लिहिणारे एक विज्ञान कथा लेखक आहेत.

जावडेकरांची आईवडील शिक्षक होते. त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे जावडेकरांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर येथे आणि त्यानंतरचे कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीला झाले. ते चिकुर्डे गावातून मॅट्रिक झाले.[१] पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून इंटर झाल्यावर त्यांनी मुंबई आयआयटी मधून १९७१ साली रसायन अभियांत्रिकीची पदवी मिळवली.

त्यांनतर एसीसी, हिंदुस्तान लिव्हर, स्टँडर्ड अल्कली व जेकब्स या कंपन्यांमध्ये सदतीस वर्षे नोकरी करून २००८ साली जनरल मॅनेजर या पदावरून ते निवृत्त झाले.[२]

जावडेकरांनी पहिली विज्ञानकथा १९८२ साली लिहिली. या रचनेस मराठी विज्ञान परिषदेतर्फे (मविप) दरवर्षी भरत असलेल्या विज्ञान रंजन कथा स्पर्धेमध्ये दुसरे बक्षिस मिळाले.[३] त्यानंतर त्यांनी सुमारे शंभरएक विज्ञानकथा लिहिल्या आहेत.

जावडेकरांच्या विज्ञानकथा विज्ञानाच्या भक्कम पायावर उभ्या असतात आणि तरीही रूढ विज्ञानकथांपेक्षा वेगळ्या असतात. त्या माणसांच्या कथा असतात.[४] अरुण साधूंच्या शब्दांत ‘त्यांत विज्ञान, तंत्रज्ञानाने प्रगत झालेल्या परिसरातील व्यक्तींमधील नातेसंबंधाला नव्याने दिलेल्या परिमाणांचे चित्रण असते.’[५] तर प्रसिद्ध लेखिका कमल देसाई यांच्या मते, ‘या नुसत्या विज्ञानकथा नाहीत तर मानव आणि विज्ञान हे दोन्ही मिळून जे रसायन घडतं त्याच्या कथा आहेत.’[६] आपल्या कथांमधून भोवतालच्या वास्तवाचे नेमके पण भेदक दर्शन घडवत असतानाच जावडेकर भविष्याचा, येणाऱ्या घटनांचा अचूक वेध घेतात. नवकथा आणि विज्ञानकथा यांच्या संकरातून साकार झालेली सुबोध जावडेकरांची वेगळा मार्ग शोधणारी कथा आहे, असं निरीक्षण दत्तप्रसाद दाभोळकर यांनी नोंदवले आहे.[७]

त्यांच्या काही कथांमध्ये संगणकांचे आक्रमण मानवी जीवनावर कसे होत आहे त्याचे कल्पकतापूर्ण चित्र येते. त्यातून निर्माण होणाऱ्या नैतिक समस्याही ते हाताळतात. 'आकांत Archived 2020-10-09 at the Wayback Machine.' ही त्यांची कादंबरी भोपाळ येथे झालेल्या वायू दुर्घटनेवर आधारित आहे. पण तिला राजकीय रंग न देता ती त्यांनी सामान्यांच्या जीवनसंघर्षाला घेऊन भिडवली आहे. सर्वसामान्य वाचकाला सोप्या व रंजक भाषेत विज्ञान समजावून सांगणारी काही पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. त्यांचा विज्ञान विषयक व्यासंग आणि सामान्यांना त्याचा खुसखुशीत पद्धतीने परिचय करून देण्याची हातोटी यांचे दर्शन या पुस्तकांतून घडते.[८] अचूक वैज्ञानिक माहिती आणि प्रभावी कल्पनाशक्ती ह्यांचा उत्तम मेळ त्यांच्या लेखनात घातलेला असतो.[९][१]

‘हसरं विज्ञान’ हा त्यांचा विज्ञानावर विनोदी अंगाने लिहिलेला लेखसंग्रह आहे. प्लॅस्टिक या विषयावर त्यांनी चार माहितीपूर्ण पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे लेखन नेटके व संयत असते. विज्ञानविषयक लेखन असूनही शैली ललित अंगाने जाते, त्यामुळे वाचताना औत्सुक्य वाटत राहते. जीवनातील भावपूर्ण नाट्यात्मतेचे त्यांना भान आहे. शिवाय त्याला नर्म विनोदाचा एक हलकासा अंतःस्तर असतो.[४][१०]

‘मेंदूतला माणूस’ (डॉ. आनंद जोशींसह)[११] व ‘मेंदूच्या मनात’[१२] ही त्यांची दोन पुस्तकं गेल्या दहावीस वर्षांत मेंदूवर झालेल्या संशोधनामुळे माणसाच्या वागण्यावर कसा प्रकाश पडतो आहे ते रंजक पद्धतीने दाखवून देतात. ‘आपले बुद्धिमान सोयरे’ हे पुस्तक प्राण्यांच्या बुद्धिमत्तेवर अलीकडे झालेल्या संशोधनाबद्दल माहिती देते. 

मेंदूविज्ञान आणि मानवी वर्तन या विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने[१३] [१४][१५]दिली आहेत.

सुबोध जावडेकरांची २०१८ सालापर्यंत १९ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.[१६][ संदर्भ हवा ]

पुस्तके

[संपादन]

जावडेकर यांची पुस्तके खालीलप्रमाणे आहेत:

 • अचंब्याच्या गोष्टी (सहलेखक मधुकर धर्मापुरीकर)
 • आकांत (भोपाळ दुर्घटनेवर आधारित कादंबरी)
 • आकाशभाकिते (विज्ञानकथा संग्रह)
 • आपले बुद्धिमान सोयरे
 • कुरुक्षेत्र (कथासंग्रह)
 • गुगली (विज्ञानकथा संग्रह)
 • चाहूल उद्याची (कथासंग्रह)
 • चिंतामणी हा नव्या युगाचा
 • पुढल्या हाका (विज्ञानकथा संग्रह)
 • मेंदूच्या मनात
 • प्लॅस्टिकची मेजवानी
 • मेंदूतला माणूस (सहलेखक डॉ. आनंद जोशी)
 • यंत्रमानव (सहलेखक अ.पां. देशपांडे)
 • वामनाचे चौथे पाऊल (विज्ञानकथा संग्रह)
 • विज्ञानाच्या नव्या वाटा
 • विज्ञानाची नवी क्षितिजे
 • संगणकाची सावली (विज्ञानकथा संग्रह)
 • हसरं विज्ञान (विज्ञानावर ललित अंगाने)
 • प्लॅस्टिक फीस्ट (इंग्रजी व दहा भारतीय भाषांतून)[१७]

पुरस्कार

[संपादन]
 • गुगली ह्या पहिल्याच कथा संग्रहाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार[१८][ संदर्भ हवा ]
 • ‘हसरं विज्ञान’ ह्या पुस्तकास राज्यपारितोषिक व 'र. धो. कर्वे पुरस्कार'[१९] [ संदर्भ हवा ]
 • सार्वजनिक वाचनालय, नाशिक तर्फे 'डॉ. आ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार'[१८][ संदर्भ हवा ]
 • मेंदूतला माणूस या पुस्तकास सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) या संस्थेचा पुरस्कार [२]
 • महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे तर्फे 'प्रा. गो. रा. परांजपे पुरस्कार'[ संदर्भ हवा ]
 • ‘आकाशभाकिते’ ह्या विज्ञानकथासंग्रहास राज्यपारितोषिक[१८][ संदर्भ हवा ]
 • ‘कुरुक्षेत्र’ ह्या कथासंग्रहास 'केशवराव कोठावळे पुरस्कार[२०][२१]'[ संदर्भ हवा ]
 • ‘पुढल्या हाका’ कथासंग्रहास यशवंतराव दाते, वर्धा संस्थेचा 'शिक्षणमहर्षी देशमुख पुरस्कार'[२२] [ संदर्भ हवा ]
 • महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेचा 'सु. ल. गद्रे साहित्त्यिक पुरस्कार' [२३][ संदर्भ हवा ]
 • ‘चाहूल उद्याची’ या कथासंग्रहास मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या संस्थेचा राज्यस्तरीय ‘श्रीस्थानक साहित्य पुरस्कार[२४][ संदर्भ हवा ]
 • महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांचा साहित्य पुरस्कार –‘विज्ञानकथा’ या वाङ्मय प्रकारासाठी [२५][२६]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
 1. ^ मेहेंदळे, उज्वला (2019). 1. तिसऱ्या पिढीचे आत्मकथन (२) - तिसऱ्या पिढीतील पंचवीस नामवंत मराठी लेखकांची आत्मकथने. डॉ. भालेराव मार्ग, मुंबई 400004: मुंबई मराठी साहित्य संघ. pp. 213–224.CS1 maint: location (link)
 2. ^ "संवाद सुबोध जावडेकरांशी | Maayboli". vishesh.maayboli.com. 2020-07-28 रोजी पाहिले.
 3. ^ "विज्ञान कथा पुरस्कार – मराठी विज्ञान परिषद (मुंबई)" (इंग्रजी भाषेत). 2020-07-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-28 रोजी पाहिले.
 4. ^ a b घारे, दीपक (जुलै 2000). "दशकातील साहित्यिक – सुबोध जावडेकर". ललित मासिक (मॅजेस्टिक): 11–20.
 5. ^ साधू, अरुण (1994). वामनाचे चौथे पाऊल. पुणे 30: मेहता पब्लिशिंग हाऊस. pp. प्रस्तावना. ISBN 81-7161-389-6.CS1 maint: location (link)
 6. ^ देसाई, कमल (2011). 'जावडेकरांच्या कथांच्या निमित्ताने' (परिशिष्ट - पुढल्या हाका). ठाणे (प.) 400602: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस. pp. 159–181.CS1 maint: location (link)
 7. ^ दाभोळकर, दत्तप्रसाद (21 जुलै 2018). "चक्रव्यूहात घेऊन जाणारे पुस्तक 'चाहूल उद्याची'". साधना: 40–43 – पुस्तक परीक्षण द्वारे.
 8. ^ गणोरकर, प्रभा व इतर (2004). संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (१९२० पासून २००३ पर्यंतचा कालखंड). मुंबई: ग. रा. भटकळ फाउंडेशन. p. 284.
 9. ^ फोंडके, बाळ व अ. र. कुलकर्णी. मराठी विश्वकोश (विकासपिडीया) – विज्ञानकथा (सायन्स फिक्शन). वेब पोर्टल: भारत सरकार इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय.
 10. ^ पुंडलिक, रागिणी (नोंद लेखिका). महाराष्ट्र नायक : ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश’ (लेखक- साहित्य विभाग). मुंबई: विवेक.
 11. ^ "मेंदुतला माणुस- ग्रंथ परिचय | मिसळपाव". www.misalpav.com. 2020-07-28 रोजी पाहिले.
 12. ^ "मेंदूचे अंतरंग | ऐसीअक्षरे". aisiakshare.com. 2020-07-28 रोजी पाहिले.
 13. ^ author/lokmat-news-network (2019-10-19). "सुबोध जावडेकर यांनी मानवी मेंदूच्या तऱ्हेवाईक वागणुकीवर टाकला प्रकाश". Lokmat. 2020-07-28 रोजी पाहिले.
 14. ^ "मेंदूची स्पर्धा जगाच्या वेगाशी | श्री. सुबोध जावडेकर | Shri. Subodh Jawdekar - YouTube". www.youtube.com. 2020-07-28 रोजी पाहिले.
 15. ^ "Apale Vartan, Apala Mendu | Part 1 | Majestic Gappa 2019 | आपले वर्तन, आपला मेंदू | SMP - YouTube". www.youtube.com. 2020-07-28 रोजी पाहिले.
 16. ^ "Marathi Books by सुबोध जावडेकर subodha jAvaDekar". www.rasik.com. 2022-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-29 रोजी पाहिले.
 17. ^ "प्लास्टिक की घुसपैठ". www.eklavya.in. 2020-07-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-29 रोजी पाहिले.
 18. ^ a b c बागुल, प्रा. डॉ. फुला (2013). मराठी विज्ञान साहित्य : समीक्षा व संशोधन (विशेष संदर्भ : सुबोध जावडेकर). जळगाव: अथर्व पब्लिकेशन्स. pp. 47–48. ISBN 978-93-82795-27-8.
 19. ^ लोकसत्ता (१४ नोव्हेंबर २००१) मधील पहिल्या पानावरील बातमी मुंबई, १३ नोव्हेंबर : मराठी भाषेतले उत्कृष्ट वाङमयनिर्मितीसाठी देण्यात येणारे राज्यपुरस्कार आज जाहीर करण्यात आले. ........ललित विज्ञान या विभागातील र. धों. कर्वे पुरस्कार अशोक कोठावळे यांनी प्रकाशित केलेल्या प्रसिद्ध विज्ञान कथालेखक सुबोध जावडेकर यांना त्यांच्या 'हसरं विज्ञान' या पुस्तकास जाहीर झाला आहे. .....
 20. ^ खोले, विलास (२००९). केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ. मुंबई 400004: मॅजेस्टिक प्रकाशन. pp. 197–203. ISBN 978-81-7432-042-1.CS1 maint: location (link)
 21. ^ "loksatta.com". www.loksatta.com. 2007-06-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-29 रोजी पाहिले.
 22. ^ Jan 26, TNN | Updated:; 2012; Ist, 03:49. "Lectures on literature | Nagpur News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-07-30 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
 23. ^ IIT Newsletter - March 2019 Alumni in News IITB alumni awarded prestigious SL Gadre Award for Literature Alumnus Subodh Jawadekar (B.Tech. Chem. Engg. '71 H4) was awarded the prestigious SL Gadre Award for Literature by Maharashtra Seva Sangh Mulund, Mumbai on 17 February. This award consists of a citation and a cash prize. The award is bestowed upon renowned writers in Marathi.
 24. ^ "श्रीस्थानक पुरस्काराने साहित्यिकांचा गौरव". Maharashtra Times. 2020-07-29 रोजी पाहिले.
 25. ^ "Loksatta loksatta mumbai epaper dated Thu, 24 Dec 20". epaper.loksatta.com. 2020-12-30 रोजी पाहिले.
 26. ^ "महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका पुरस्कार". www.facebook.com. 2020-12-30 रोजी पाहिले.