शंकर वासुदेव किर्लोस्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शंकर वासुदेव किर्लोस्कर (८ ऑक्टोबर, इ.स. १८९१; सोलापूर[१] - इ.स. १९७५) ऊर्फ ’शंवाकि’ हे मराठी संपादक, लेखक व व्यंगचित्रकार होते. ते किर्लोस्कर मासिकाचे संस्थापक-संपादक होते[१]. किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे यांचे चुलते होत.

जीवन[संपादन]

शंकरराव किर्लोस्करांचा जन्म ८ ऑक्टोबर, इ.स. १८९१ रोजी सोलापूर येथे झाला. त्यांचे वडील वासुदेव किर्लोस्कर सोलापुरातील पहिले पदवीधर डॉक्टर होते. किर्लोस्कर कुटुंबीयांचे स्नेही असणाऱ्या चित्रकार श्रीपाद दामोदर सातवळेकरांमुळे लहानग्या शंकरासही चित्रकलेची गोडी लागली. पुढे त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात दाखला घेतला. चित्रकलेच्या आवडीमुळे त्यांनी लाहोरास श्रीपाद दामोदर सातवळेकरांकडे जाऊन रीतसर चित्रकला शिकायला सुरुवात केली व कालांतराने त्यांना मुंबईच्या सर जे.जे. कलाविद्यालयात वरच्या वर्गात प्रवेशही मिळाला[१].

शिक्षणानंतर ते किर्लोस्करवाडीस आले. तेथे त्यांचे चुलते लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी स्थापलेल्या किर्लोस्कर कारखान्यात जाहिरातीची सूत्रे ते सांभाळू लागले. कारखान्याच्या उत्पादनांची जाहिरात करण्याच्या हेतूने इ.स. १९२० साली त्यांनी किर्लोस्कर खबर नावाने वृत्तपत्रिका सुरू केली. किर्लोस्कर कारखान्याच्या उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडामोडींचे वार्तांकन आणि गावातील लोकांनी लिहिलेल्या कथा-कविता असे या वृत्तपत्रिकेचे तत्कालीन स्वरूप होते. इ.स. १९२९ साली विनायक दामोदर सावरकरांच्या सूचनेवरून किर्लोस्कर खबर हे नाव बदलून या नियतकालिकाचे नाव किर्लोस्कर असे ठेवण्यात आले[१]

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • यात्रिकाची यात्रा

संदर्भ[संपादन]

  1. १.० १.१ १.२ १.३ राजाध्यक्ष,मं.गो. (१७ मार्च, इ.स. २०१०). शंवाकिचे किर्लोस्कर[मृत दुवा]. लोकसत्ता. २२ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)