सरोजिनी नायडू
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
सरोजिनी नायडू | |
कार्यकाळ इ.स. १९४७ – इ.स. १९४९ | |
जन्म | १३ फेब्रुवारी, इ.स. १८७९ हैद्राबाद, आंध्र प्रदेश |
---|---|
मृत्यू | २ मार्च, इ.स. १९४९ अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पती | श्री.मुत्तयला गोविंदराजुलु नायडु |
अपत्ये | जयसूर्य, पद्मजा, रणधीर, लीलामणी |
धर्म | हिंदू |
सरोजिनी नायडू (१३ फेब्रुवारी १८७९—२ मार्च १९४९). भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री. त्यांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी). अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील व गाव ब्रह्मनगर. अघोरनाथ १८७८ मध्ये हैदराबादला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. ते शिक्षणतज्ज्ञ व कळकळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. सरोजिनींच्या आई वरदासुंदरीदेवी मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले. यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगीरीत्या झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या मद्रास प्रदेशात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या (१८९२). त्यानंतर सुमारे तीन वर्षे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या. निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (१८९५). लंडन आणि केंब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या; पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले. द गोल्डन थ्रेशहोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले.
सरोजिनी नायडू भारतात परत आल्यानंतर १८९८ मध्ये त्यांनी डॉ. गोविंदराजुलू नायडू या निजामच्या संस्थानी विधुर डॉक्टरशी ब्राह्मोसमाजाच्या रीतिरिवाजानुसार लग्न केले. हा विवाह बंगाल व मद्रास असा आंतरप्रांतीय व आंतरजातीय होता. त्यामुळे त्या वेळी तो फार गाजला व येथूनच सरोजिनींच्या सामाजिक कार्यास सुरुवात झाली. त्यांना चार मुले झाली : जयसूर्या, पद्मजा, रणधीर आणि लैलामणी. रणधीर पुढे हैदराबादच्या राजकीय चळवळीत प्रसिद्धीस आला, तर पद्मजा बंगालच्या राज्यपाल झाल्या.
सरोजिनींनी द गोल्डन थ्रेशहोल्डनंतर द बर्ड ऑफ टाईम (१९१२) व द ब्रोकन विंग (१९१७) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. हिंदी महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता स्वरमाधुर्य, राष्ट्रीय दृष्टिकोण, प्रेमाचा पुरस्कार व क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार इ. वैशिष्ट्यांनी लोकप्रिय झाल्या. पाश्चात्त्य तसेच पौर्वात्य देशांत त्यांस कीर्ती लाभली आणि कवयित्री म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला.‘भारतीय कोकिळा’ म्हणून त्यांचा सर्वत्र उल्लेख होऊ लागला. मात्र त्यांच्या गीतरचनेचा सूर एलियटच्या नव्या काव्यप्रवाहाशी जुळला नाही व ती थांबली.
त्यानंतर सरोजिनी नायडू देशसेवा, समाजसेवा इत्यादी गोष्टींकडे वळल्या. याचे दुसरेही कारण असे होते की, १९०३ ते १९१७ च्या दरम्यान त्यांचा {{मोहंमद अली जीना]], गोपाळ कृष्ण गोखले, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट, सी. पी. रामस्वामी अय्यर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी अशा एक एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तींशी या ना त्या निमित्ताने परिचय झाला. या व्यक्तींच्या विचारा-आचारांकडे त्या आकृष्ट झाल्या. त्यांनी होमरूल लीगसाठी ॲनी बेझंट आणि सी. पी. रामस्वामी अय्यर यांच्या बरोबर हिंदुस्थानभर दौरा काढला. आपल्या भाषणांतून त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रमप्रतिष्ठा, स्त्रीस्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला. सरोजिनी नायडूंनी गोखल्यांना गुरुस्थानी मानले आणि महात्मा गांधींचे नेतृत्व पूर्णतः स्वीकारले. हैदराबाद येथील प्लेगच्या साथीत त्यांनी फार परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. त्याबद्दल त्यांना कैसर– इ– हिंद हे सुवर्णपदक देण्यात आले; पण ते त्यांनी जालियनवाला बाग येथील हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केले. रौलट कायदा, माँटेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार वगैरे विविध चळवळींत त्यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांनुसार प्रसार आणि प्रचार केला, मोहिमा काढल्या आणि गांधींच्या असहकार चळवळीत हिरिरीने भाग घेतला. सरोजिनींनी हिंदु – मुसलमान ऐक्य, स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि स्वातंत्र्य हेच आपले जीवनकार्य मानले. होमरूल लीगच्या निमित्ताने त्यांनी देशभर असंख्य व्याख्याने दिली. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने गोखल्यांसारखी श्रेष्ठ माणसेही भारावून गेली.
टिळकांच्या मृत्यूनंतर सरोजिनी नायडू पूर्णतः गांधीवादी झाल्या आणि पेहराव व राहणीमान यांत त्यांनी आमूलाग्र बदल केले. त्यांनी आपले वास्तव्य हैदराबादमधून मुंबईत हलविले. त्या मुंबई महानगरपालिकेत सभासद म्हणून निवडून आल्या आणि पुढे प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या (१९२१). पुढे कानपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या (१९२५) व काँग्रेस कार्यकारिणीच्या सभासद झाल्या. काँग्रेसच्या सर्व धोरणांत त्या हिरिरीने भाग घेत. कलकत्ता येथे भरलेल्या १९०७ च्या बंगालच्या फाळणी विरोधी सभेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली. १९०८ मध्ये विधवाविवाह परिषदेत त्यांनी स्त्रियांच्या चळवळीचा पाया घातला आणि येथूनच त्यांच्या स्त्रीविषयक चळवळीस खरा प्रारंभ झाला.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
बाह्य दुवे
- See images at Commons: commons:Category:Sarojini Naidu
- Biography and Poems of Sarojini Naidu
- Letter written by Sarojini Naidu
- Biography of Sarojini Naidu
- First Biography of Muhammad Ali Jinnah by Sarojini Naidu (1917)
- Biography of Aghornath Chattopadhyaya
- [http://books.google.ae/books?id=h6v8HsRUBucC&pg=PA85&lpg=PA85&dq=Bazaars+of+hyderabad,+sarojini+naidu&source=bl&ots=qL_crAYUQA&sig=7mjqfu2M8AJ-