प्लेग
प्लेग हा एक संसर्गजन्य रोग आहे. जगाच्या इतिहासातला या रोगामुळे मोठी जीवितहानी झाली आहे .
विषाणू
[संपादन]यर्सिनिया पेस्टिस, (Bacterium Yersinia pestis) या जंतूंमुळे हा रोग होतो. प्लेग : सामान्यतः वन्य व घरगुती कृंतक (भक्ष्य कुरतडून खाणाऱ्या) प्राण्यांत आढळणाऱ्या यर्सिनिया पेस्टिस नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गित पिसूद्वारे मानवात संसर्ग होणाऱ्या, तीव्र व गंभीर संसर्गजन्य रोगाला ‘प्लेग’ म्हणतात. प्लेगाच्या सूक्ष्मजंतूला पूर्वी पाश्चुरेला पेस्टिस किंवा बॅसिलस पेस्टिस अशी नावे होती. फ्रेंच सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ ए. ई.जे. येर्सॅं (यर्सिन) यांनी १८९४ मध्ये या सूक्ष्मजंतूचा शोध लावल्यामुळे नव्या वर्गीकरणात त्याला यर्सिनिया असे संबोधण्यात येते. शिबासाबुरो किटाझाटो या जपानी सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञांनी त्याच वर्षी स्वतंत्र रीत्या हे सूक्ष्मजंतू ओळखले होते.
पूर्वी ‘प्लेग’ ही संज्ञा कोणत्याही व्यापक फैलाव व मोठे मृत्युप्रमाण असलेल्या गंभीर रोगाला लावीत. मूळ लॅटिन शब्द ‘Plaga’ यावरून इंग्रजी भाषेत आलेला Plague हा शब्द ‘संकट’, ‘अनर्थ’, ‘अरिष्ट’, ‘पीडा’, ‘उपाधी’ अशा अर्थांनी रूढ झाला आहे. आज वैद्यकात वर उल्लेखिलेल्या सूक्ष्मजंतूमुळे उद्भवणाऱ्या आणि अतिज्वर, तीव्र विषरक्तता (सूक्ष्मजंतूंपासून तयार होणारी विषे रक्तात मिसळली जाऊन रक्ताभिसरणाबरोबर शरीराच्या सर्व भागांत पसरल्यामुळे निर्माण होणारी अवस्था), शक्तिक्षीणता, लसीका ग्रंथीचा [⟶ लसीका तंत्र] शोथ (दाहयुक्त सूज) व कधीकधी फुप्फुसात पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगाला ही संज्ञा लावतात. या विकृतीला ‘काळा मृत्यू’ आणि ‘पेस्ट’ (पीडक) अशीही दुसरी नावे आहेत.
इतिहास : ⇨ हिवतापाने (मलेरियाने) काही प्राचीन संस्कृतींचा नाश केला असला, तसेच ⇨ प्रलापक सन्निपात ज्वराने (टायफस ज्वराने) मोठमोठा फौजफाटा धुळीस मिळविला असला, तरी प्लेगामुळे ऐतिहासिक काळात झालेली मानवी हानी इतर कोणत्याही रोगांपेक्षा महाभंयकरच ठरते. तिसऱ्या शतकापासूनच प्लेगाच्या जगद्व्यापी साथींचा डंका वाजत आला आहे. प्लेगाच्या साथीचा पहिला उल्लेख बायबलातील (जुन्या करारातील) बुक ऑफ सॅम्युएलच्या पहिल्या व सहाव्या प्रकरणांत आढळतो. यामध्ये जांघेतील गाठींचा व अती गंभीर अशा साथीच्या रोगाचा उल्लेख आहे. त्यामध्ये त्याच सुमारास घुशींची भरमसाट वाढ झाल्याचाही उल्लेख आहे. यावरून या रोगाचा व घुशींचा संबंध असल्याची पुसटशी कल्पना आलेली असावी. भारतात इ.स.पू. दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात (?) होऊन गेलेल्या सुश्रुत या आयुर्वेदाचार्यांना प्लेगाचा व घुशींचा संबंध असल्याची कल्पना असावी.
इ.स. १०० च्या सुमारास होऊन गेलेल्या रूफस ऑफ एफिसस या वैद्यांनी गाठी उत्पन्न होणाऱ्या अतिमारक रोगाच्या ईजिप्त, लिबिया व सिरिया या देशांतील साथींचे वर्णन केले आहे. पहिली जगद्व्यापी साथ रोमन सम्राट पहिले जस्टिनियन यांच्या राजवटीत ५४२ च्या सुमारास उद्भवली होती. दुसरी जगद्व्यापी साथ चौदाव्या शतकात उद्भवली व १३४७-५० या काळात तिचा जोर होता. ही साथ ‘काळा मृत्यू’ या नावाने महशूर झाली व तीमध्ये यूरोपातील एकचतुर्थांश लोक मृत्युमुखी पडले. या साथीमुळे आध्यात्मिक, सामाजिक व आर्थिक खोल परिणाम घडले. या भयंकर साथीतूनच ⇨विलग्नवासाची (क्वारंटाइनची) कल्पना व्हेनिसमध्ये उदयास आली. पौर्वात्य देशांकडून येणाऱ्या जहाजांचे ते प्रमुख बंदर असल्यामुळे व जहाजावरून येणाऱ्या संसर्गित मालामुळे प्लेग उद्भवतो अशा कल्पनेने व्हेनिशियन लोकांनी संशयित जहाजे, त्यांवरील माल व माणसे अलग ठेवण्यासाठी व सर्वसाधारण दळणवळणात मिसळू न देण्याची खबरदारी घेण्यास सुरुवात केली. १३७४ मध्ये बेर्नाबॉ व्हिसकोंटी या मिलनच्या ड्यूकनी प्लेग फैलाव प्रतिबंधक हुकूम काढला. त्यामध्ये प्लेगाचे रोगी गावाबाहेर शेतात नेऊन ठेवणे, तसेच प्लेगाच्या रोग्याची शुश्रुषा केलेल्या व्यक्तीने किंवा रोग झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तीने १४ दिवस विलग्नवासात राहण्याचा आदेश होता. हे कालमान इतरत्र हळूहळू ४० दिवसांपर्यंत वाढविण्यात आले. पुढे इटली, द. फ्रान्स व आजूबाजूच्या देशांतूनही विलग्नवासाच्या कल्पनेचा प्रसार झाला.
यानंतरची मोठी साथ १६६५ मध्ये लंडन शहरापुरतीच मर्यादित होती व ती ‘द ग्रेट प्लेग’ म्हणून प्रसिद्धी पावली. अशाच प्रकारची गंभीर साथ १७२० मध्ये मार्से बंदरापुरतीच मर्यादित स्वरूपात होती. तिसरी जगद्व्यापी साथ १८९४ मध्ये चीनमध्ये सुरू झाली. व तेथून ती भारतात पसरली. तत्पूर्वी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षांत भारतात काही भागांत प्लेग उद्भवला होता. भयकंर दुष्काळानंतर गुजरात, काठेवाड आणि कच्छमध्ये १८१५ मध्ये साथ उद्भवली. १८३६ मध्ये राजपुतान्यातील पाली या गावी जोरदार लागण झाली आणि तेथून हा रोग अजमीर—मारवाडात पसरला; परंतु १८३७ च्या कडक उन्हाळ्यात साथ पूर्णपणे मंदावली. १८४९, १८५० आणि १८५२ या वर्षी साथीचा प्रसार दक्षिणेकडे झाला. १८७६-७७ मध्ये प्लेगाची लक्षणे असलेला जोरदार रोग उद्भवला. ‘ग्रंथिक सन्निपात’ आणि ‘गाठीचा ताप’ अशी नावेही या रोगाला होती. १८९६—१९१७ या काळात एकट्या भारतात ९८,४१,३९६ लोक या साथीच्या रोगाला बळी पडले. १९०७ मध्ये एकूण मृत्युसंख्या १३,१५,८९२ होती, ती १९५२ मध्ये १,००७ वर आली.
प्लेगाच्या साथीने मध्यपूर्व देश, हवाई बेटे व दक्षिण अमेरिकेचा पूर्व किनारा १८९९ मध्ये पछाडला किनाऱ्यावर ती १९०० मध्ये पसरली. १९५० पर्यंत अधूनमधून साथ सौम्य प्रमाणात उद्भवत होती. या तिन्ही जगद्व्यापी साथींचे वैशिष्ट्य असे की, पहिल्या व दुसऱ्या साथींत ८०० वर्षांचे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या साथींत ६०० वर्षांचे मध्यंतर होते.
आज भारताच्या काही भागांतून प्लेग प्रदेशनिष्ठ गणला जातो. बिहार, महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या राज्यांतील काही क्षेत्रे व पश्चिम बंगालातील कलकत्ता शहरातून तुरळक रोगी आढळतात. यांशिवाय इराक, इराण, श्रीलंका, ब्रह्मदेश, दक्षिण चीन, इंडोनेशिया, यूरोप व आफ्रिकेतील काही क्षेत्रे या प्रदेशांचा प्रदेशनिष्ठ भागात समावेश केला जातो. काही प्रदेशांतून विशेषेकरून इराण, आग्नेय रशिया, मंगोलिया, दक्षिण आफ्रिकेतील काही भाग या ठिकाणी प्लेग प्रथम वन्य प्राण्यांत उद्भवतो व मानवात त्याचा त्याच वेळी फुप्फुसदाहक [प्लेगाच्या सूक्ष्मजंतूमुळे शरीरात प्राथमिक वा दुय्यम न्यूमोनिया उत्पन्न होणाऱ्या; ⟶ न्यूमोनिया] प्रकारात प्रादुर्भाव होतो.
व्हिएटनाममध्ये प्लेग प्राणि-प्रदेशनिष्ठ (विशिष्ट प्रदेशातील प्राण्यांत उद्भवणारा) असून तेथील युद्धामुळे शहरे व खेडी उद्ध्वस्त झाल्यामुळे केरकचरा वाढून घुशींची संख्या भरमसाट वाढली व प्लेग मानवात पसरला. १९६५-६६ मध्ये प्लेगच्या ४,५०० रोग्यांची तेथे नोंद झाली होती.
प्लेगाचे रोगपरिस्थितिविज्ञान
जागतिक आरोग्य संघटनेच्या १९७१ च्या वृत्तांतामध्ये बोलिव्हिया, ब्राझील, ब्रह्मदेश, एक्वादोर, मॅलॅगॅसी (मादागास्कर), पेरू, व्हिएटनाम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व झाईरे या प्रदेशांतून प्लेगाचे रोगी आढळल्याची नोंद आहे. १९७० मध्ये प्लेगाचे निश्चित रोगी एकूण ८५२ आढळले होते, तर १९७१ मध्ये ७९७ आढळले. १९७० मध्ये संशियत व निश्चित मिळून रोग्यांची संख्या ४,४८७ होती व हीच संख्या १९७१ मध्ये ३,४३२ होती. १९६१—७१ या दहा वर्षांच्या काळात प्रतिवार्षिक आकड्यांवरून या रोगाची एकूण संख्या कमी होण्याकडे कल झाल्याचे आढळत नाही. सध्या या रोगाचा जो सुप्तावस्था काल चालू आहे तो संधी मिळताच संपुष्टात येऊन लहान मोठ्या साथींचा धोका कायमच आहे. जागतिक आरोग्य संघटना या प्रश्नाकडे सतत लक्ष पुरवीत आहे.
संप्राप्ती : (रोगाच्या कारणा संबंधीची मीमांसा ). हा रोग यर्सिनिया पेस्टिसया ग्रॅम-रंजक-अव्यक्त (एच्. सी. जे. ग्रॅम यांनी शोधून काढलेल्या रंजनक्रियेत निर्माण होणाऱ्या जांभळटसर रंग टिकून न राहणाऱ्या) दंडाणूमुळे (दंडाकार सूक्ष्मजंतूमुळे ) होतो. हे दंडाणू अचल, बीजाणू-अनुत्पादक (सुप्तावस्थेतील प्रजोत्पादक अवस्था निर्माण न होणारे ). ऑक्सीजीवी आणि अनॉक्सिजीवी (ऑक्सिजनाच्या उपस्थितीत, तसेच अभावातही वाढू शकणारे), विशिष्ट रंजनक्रियेने रंगविल्यास सूक्ष्मदर्शकाखाली द्विध्रुवी (दोन टोके असणारे) व दोन्ही टोकांकडे बंद सुरक्षित टाचणीचा (सेफ्टी पिनचा) मोठा भाग असल्याप्रमाणे दिसतात. सूर्यप्रकाश व नेहमीच्या वापरातील पूतिरोधके (पू तयार होण्यास विरोध करणारी द्रव्ये) त्यांचा नाश करतात. पिसूची शुष्क विष्टा व मानवी थुंकी यांमध्ये ते काही आठवडे जिवंत राहू शकतात. निर्जंतुक मातीत ते १६ महिन्यांपर्यंत व सूक्ष्मजंतुमुक्त मातीत ७ महिन्यांपर्यंत जिवंत राहू शकतात. यावरून ते कृंतक प्राण्यांच्या बिळातून हे प्राणी आणि पिसवा नसतानाही जिवंत राहत असावेत.
रोगपरिस्थिति विज्ञान : (सांसर्गिक रोगाची वारंवारता व वितरण ज्यांवर अवलंबून असते अशा घटकांतील परस्परसंबंधां विषयीचे विवरण). प्लेग हा रोग जवळजवळ २०० जातींच्या निरनिराळ्या कृंतक प्राण्यांत प्राणि-प्रदेशनिष्ठ म्हणून कायम घर करून बसला आहे. त्याचे परिस्थिति विज्ञान निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे असते. प्राण्यातील रोगाचा माणसावर होणारा परिणाम हा माणूस व घूस यांच्या वसतिस्थानांच्या नजीकतेवर आणि घुशींवर उपजीविका करणाऱ्या पिसवांसारख्या प्राण्यांच्या जीवनमानावर अवलंबून असतो. गोचीड, ऊ व ढेकूण हे परजीवी (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणारे) देखील प्लेगाच्या प्रसारास कधीकधी कारणीभूत असतात; परंतु पिसू (भारतात झेनोप्सायला केओपिस या जातीची आणि युरोप व उत्तर अमेरिकेत नोसोप्सायलस फॅसिएटस या जातीची) हाच परजीवी प्रमुख रोगवाहक असतो. वन्य प्लेगाचा प्रवेशनिष्ठ संचय वन्य घूस, खार, घरगुती व वन्य उंदीर, मार्मोट, घुबड, गोफर, बिजू, ससा व गवताळ रानातील कुत्रा या प्राण्यांतून विखुरलेला असतो. यांपैकी घरगुती घुशी (रॅटस रॅटस व रॅटस नॉर्वेजिकस या जातींच्या; यांचा उल्लेख चुकीने ‘उंदीर’असाही केला जातो) प्रमुख पोषक (रोगवाहक परजीवींना आश्रय देणाऱ्या) असतात व त्या जगभर आढळतात.
कधीकधी प्लेगाने मेलेली घूस हाताळतानाही तीवरील संसर्गित पिसवा चावून मानवात प्लेग उद्भवतो. साथ प्रामुख्याने संसर्गित घरगुती घुशींपासून सुरू होते. संसर्गित वन्य प्राण्यांवरील पिसवा मानवी वस्तीत येऊन घरगुती घुशींत रोगाचा फैलाव करू शकतात. पिसूनिर्मित प्लेग मुख्यतः गाठीच्या (वंक्षण अथवा जांघ, काख व मान या शरीरभागांत लसीका ग्रंथिशोथाने गाठ येणाऱ्या) प्रकारचा असतो. या प्रकाराचा फैलाव फक्त पिसवा चावण्यामुळे होत असल्याने इतरांना त्याचा फारसा धोका नसतो. याउलट फुप्फुसदाहक प्रकारात रोग्याच्या कफातून बिंदुक संसर्ग (कफातील छोटे थेंब हवेत लोंबकळत्या स्थितीत राहून होणारा संसर्ग) पसरण्याचा गंभीर धोका असतो व ग्रहणशील समाजात साथ झपाट्याने पसरते. घरगुती घुशींमुळे उत्पन्न झालेली साथ सर्व वयांतील स्त्री-पुरुषांत सारख्याच प्रमाणात पसरते. वन्य प्राण्यामुळे उत्पन्न झालेली साथ रानात काम करणाऱ्या लोकांपुरती मर्यादित राहू शकते. दाट लोकवस्ती व घुशींची भरमसाट वाढ यांच्या जोडीला जेव्हा सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव उत्पन्न होतो तेव्हा घुशींवरील पिसवांना मानवांना चावण्याची संधी मिळते. वन्य प्लेग समूळ नष्ट करणे अशक्य असल्यामुळे त्याचा नागरी भागात पसरण्याचा धोका कायम असतो.
रोगजनन : संसर्गित घुशींच्या रक्तातील सूक्ष्मजंतू चाव्यामुळे पिसूच्या शरीरात शिरतात व तिच्या जठरात वाढतात. या वाढीमुळे तिच्या अन्नमार्गाचा पुढचा भाग बंद होतो. पिसू नव्या रक्तशोषणाकरिता जेव्हा चावा घेते तेव्हा पूर्वी शोषिलेले काही रक्त व सूक्ष्मजंतू चाव्याच्या जागी ओकते आणि चाव्याच्या जखमेतून सूक्ष्मजंतू मानवी शरीरात शिरतात. असे सूक्ष्मजंतू जवळच्या लसीका ग्रंथीकडे नेले जातात आणि तीमध्ये शोथ उत्पन्न होऊन गाठ तयार होते.
पिसूच्या आंत्रमार्गात (आतड्यात) शिरलेले सूक्ष्मजंतू ३ ते ६ आठवड्यांपर्यंत आपली तीव्रता टिकवून धरतात व या कालावधीनंतर ते तिच्या विष्टेतून बाहेर पडतात. विष्ठादेखील चाव्याच्या जागी सूक्ष्मजंतू प्रवेशास कारणीभूत होते. संसर्गित पिसू योग्य परिस्थितीत दोन महिन्यांपर्यंत जिवंत राहू शकते. प्लेगाने घूस मरताच तीवरील पिसवा नव्या जिवंत घुशी पोषणाकरिता शोधतात व अशा प्रकारे रोग घुशींतून पसरतो पोषणाकरिता घुशींची संख्या कमी पडताच पिसवा मानवी रक्त पोषणाकरिता शोधतात व रोग मानवात पसरतो.
गाठ बनल्यानंतर किंवा तत्पूर्वीही जंतुविषरक्तता (सूक्ष्मजंतू व त्यांची विषे यांचा रक्ताला मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाल्यामुळे निर्माण होणारी मारक अवस्था) उत्पन्न होते. अतिशय गंभीर रोग्यात रक्तातील सूक्ष्मजंतूंचे प्रमाण भरमसाट वाढते. फुप्फुसदाहक प्रकारात अश्वसनमार्गातील स्त्राव खोकल्यातून उत्सर्जित होताना बिंदुक संसर्गाने रोग प्रसार होतो.
मानवी प्लेग उद्भवण्यास मूषकवर्गीय व वन्य कृंतक प्राण्यांतील सूक्ष्मजंतु-संचय नेहमी कारणीभूत असतात. मानवी फुप्फुसदाहक साथीचा प्रकार संसर्गित माणसापासून निरोगी माणसात पिसू न चावताही पसरू शकतो.
मानवी शरीरात शिरल्यानंतर प्लेगाचे सूक्ष्मजंतू एक प्रकारचे प्रथिन अंतर्विष (शरीरात तयार होणारे विष) तयार करतात. याशिवाय इतर विषारी पदार्थही तयार असावेत. हे सर्व विषारी पदार्थ गंभीर ऊतकनाश (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहाचा नाश) कसा करतात याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.
विकृतिविज्ञान : गाठीच्या प्लेगामध्ये सूक्ष्मजंतूंनी प्रवेश केल्याजागी त्वचेवर सहसा विकृती आढळत नाही; परंतु क्वचितच त्या ठिकाणी फोड येतो. प्लेगाची गाठ मुख्यतः जांघेत किंवा काखेत आढळते. ती फार मोठी नसली, तरी वेदनामय असून भोवती सूज असते. गाठीतील वृद्धिंगत लसीका ग्रंथीतून तीव्र रक्तस्त्रावी शोथ प्रक्रिया आढळते. बहुरुपकेंद्रक प्रकारच्या (ज्यांच्या केंद्रकाचे-कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल गोलसर पुंजाचे-अनेक केंद्रके असल्यासारखे भासणारे खंड पडले आहेत अशा) प्रकारच्या कोशिका मोठ्या प्रमाणात गोळा होतात. शोथ जसा वाढतो तसा गाठीत ऊतक मृत्यू व पू तयार होतो. रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. शरीराच्या इतर भागांतील रोगजन्य विकृती तेथील रक्तवाहिन्यांतील विकृतीमुळे उत्पन्न होतात. लसी-कला (शरीरातील पोकळ्यांचे–उदा., वक्ष, उदर यांचे –पातळ अस्तर) व जठरांत्रमार्गातील (जठर, लहान आतडे व मोठे आतडे यांनी मिळून होणाऱ्या अन्नमार्गातील) श्लेष्मकलेतून (बुळबुळीत अस्तरातून) सूक्ष्म रक्तस्त्राव आढळतात. मूत्रपिंडातील मूत्रनलिकांच्या अंतःस्तरात व यकृत कोशिकांत विघटनात्मक बदल घडतात. यकृत व प्लीहा (पानथरी) आकारमानाने काहीशी वाढतात. मस्तिष्कावरणशोथ (मेंदूच्या आवरणाची दाहयुक्त सूज) उत्पन्न होतो.
फुप्फुसदाह दोन प्रकारांनी उद्भवू शकतो. श्वसनमार्गाच्या प्रत्यक्ष बिंदुक संसर्गामुळे न्यूमोनिया उत्पन्न होतो व या प्रकाराला ‘प्राथमिक प्लेगजन्य न्यूमोनिया’ म्हणतात. दुसऱ्या प्रकारात गाठीच्या रोग्यात संसर्गित अंतर्कील (रक्ताची गुठळी किंवा अन्य बाह्य पदार्थ) रक्तप्रवाहाद्वारे फुप्फुसात पोहोचतो व तेथील रक्तवाहिन्यांत अडकून न्यूमोनियाची लक्षणे उत्पन्न होतात. याला ‘दुय्यम अथवा अंतर्कीलजन्य न्यूमोनिया’ म्हणतात. दोन्हीमध्ये न्यूमोनियाच्या खंडकीय ते खंडीय (छोट्या श्वासनलिका व वायुकोश यांना होणाऱ्या शोथापासून ते फुप्फुसाच्या एका वा अधिक खंडांचा होणारा शोथ) यांच्या दरम्यानच्या सर्व अवस्था दिसतात. न्यूमोनिया नेहमीच तीव्र स्वरूपाचा असतो व २४ ते ४८ तासांतच फुप्फुसाचा मोठा भाग व्यापला जातो.
लक्षणे : रोगाची सुरुवात बहुधा खूप ताप येऊन होते. कसकस, अस्वस्थता व व्याकुळता, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजणे यांबरोबरच ताप ३९०.५ से. ते ४०० से.पर्यंत चढतो. काही तासांतच लालबुंद चेहरा, चिंताग्रस्तता व इतर गंभीर आजाराची लक्षणे दिसतात. वाढत्या आजाराबरोबरच संभ्रमावस्था, मुग्धभ्रांती (भ्रम, शारीरिक अस्वस्थता, असंबद्धता इ. लक्षणे असलेली व सापेक्षतः अल्पकाळ टिकणारी मानसिक क्षोभावस्था) व मनोदौर्बल्य उत्पन्न होतात. चिंतेची जागा विषण्णता घेते. रोगाचे अनेक प्रकार ओळखले जातात. त्यांपैकी (१) गाठीचा प्लेग, (२) फुप्फुसदाहक अथवा प्लेगजन्य न्यूमोनिया आणि (३) जंतुविषरक्तता या तीन प्रमुख प्रकारांविषयीच येथे माहिती दिली आहे.
गाठीचा प्लेग: याचा परिपाककाल (सूक्ष्मजंतू शरीरात शिरल्यापासून प्रत्यक्ष रोगलक्षणे दिसू लागेपर्यंतचा कालावधी) १ ते ६ दिवसांचा असतो व गंभीर आजारात रोगी ३ ते ५ दिवसांतच मृत्युमुखी पडतो. अनुपचारित रुग्णात मृत्युप्रमाण ६० ते ९०% असते. निरनिराळ्या शरीरभागांतील लसीका ग्रंथिशोथाचे प्रमाण सर्वसाधारणपणे असे आढळते : जांघ ६०% ते ७०%, काख १५% ते २०% आणि मान व खालच्या जबड्याजवळील जागा १०%. पिसवा शरीराच्या गुडघ्याखालील भागांना अधिक प्रमाणात चावा घेतात म्हणून जांघेतील गाठींचे प्रमाण अधिक असते. लहान मुलांना झोपेत चेहरा आणि हात येथे चावल्यामुळे काख व मान येथे गाठी येतात. गाठ आकारमानाने फार मोठी नसली, तरी (सर्वसाधारणपणे कोंबडीच्या अंड्याच्या आकारमानाएवढी) दुखते व ज्या बाजूस गाठ असेल तो पाय पोटाजवळ आखडून धरला जातो कारण पाय सरळ ठेवल्यास वेदना वाढतात. गाठ बसते किंवा पू होऊन फुटते. रोग सौम्य असल्यास सर्व लक्षणे हळूहळू कमी होतात. गंभीर प्रकारात लक्षणांची तीव्रता वाढते. दुय्यम न्यूमोनिया उद्भवतो, विषरक्तता वाढून रोगी हृद् निष्फलतेने (हृदयक्रिया बंद पडल्याने) दगावतो.
फुप्फुसदाहक अथवा प्लेगजन्य न्यूमोनिया: प्रत्यक्ष श्वसनमार्गातून सूक्ष्मजंतू शिरल्यामुळे उत्पन्न होणारा हा प्रकार सर्व प्रकारांत गंभीर असून अनुपचारित रोगी सर्वसाधारणपणे तीन दिवसांतच दगावतो. सार्वदेहिक लक्षणांची सुरुवात एकाएकीच होते व खोकला, छातीत वेदना व रक्तमिश्रित पातळ पुष्कळसा कफ उत्सारित होतो. तपासणीत कष्टश्वसन, नीलविवर्णता (रक्तातील ऑक्सिजनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्वचेला निळसर रंग येणे), अस्वस्थता इ. लक्षणे दिसतात. न्यूमोनिया दुय्यम असल्यासच लसीका ग्रंथींची वाढ आढळते; प्राथमिक असल्यास गाठी आढळत नाहीत. लवकर निदान व ताबडतोब केलेले इलाज आणि कधीकधी प्रयोगशालीय तपासण्यांची वाट न बघताच सुरू केलेले इलाज फलदायी ठरण्याची शक्यता असते.
जंतुविषरक्तता : या प्रकारात विषरक्ततेची सर्व लक्षणे (उदा., एकाएकी थंडी वाजणे, अंगदुखी, अती शारीरिक तापमान, डोकेदुखी वगैरे) जोरदार प्रमाणात आढळतात; परंतु शरीरात गाठी आढळत नाहीत. रक्तामध्ये प्लेगाच्या सूक्ष्मजंतूंची अव्याहत वाढ होते. ⇨ आंत्रज्वर (टायफॉइड ज्वर), ⇨ हिवताप किंवा इतर विषरक्ताजन्य रोगांशी लक्षणांचे साम्य असल्यामुळे व प्लेगाची शंका न आल्यास, निदानास विलंब होण्याची शक्यता असते. त्वरित व योग्य इलाजाशिवाय रोगी ३-४ दिवसांतच मरण पावतो.
निदान : निदान शक्य तेवढे लवकर होणे या रोगात फार महत्त्वाचे असते. प्रदेशनिष्ठ प्रदेशातून प्लेगाची शंका येताच घुशींतील वाढती मृत्युसंख्या व इतर कोणतेही कारण नसताना आढळणारी सार्वदेहिक लक्षणांसहित असलेली लसीका ग्रंथींची वाढ या गोष्टी लक्षात येताच गाठीतील स्त्राव अंतःक्षेपण (इंजेक्शन) पिचकारीने ओढून घेऊन ताबडतोब तपासण्याकरिता पाठवणे जरूर असते. सूक्ष्मदर्शकाखाली या स्त्रावात प्लेगाचे द्विध्रृवी सूक्ष्मजंतू मिथिलीन ब्ल्यू या रंजकाने रंगविल्यास स्पष्ट दिसतात. न्यूमोनियातील उत्सारित कफात पुष्कळ सूक्ष्मजंतू ग्रॅम-रंजनक्रियेने रंगविल्यास दिसतात. रक्ततपासणीत श्वेत कोशिका संख्या १२,००० ते १५,००० पर्यंत वाढते (सामान्य परिस्थितीत ही संख्या ४,८०० ते १०,८०० असते). ही वाढ प्रामुख्याने बहुरूपकेंद्रक प्रकारच्या कोशिकांची असते.
प्रयोगशाळेत कफ व गाठीतील पू रक्तमिश्रित आगर (प्रयोगिक रीत्या सूक्ष्मजंतू वाढविण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या द्रवाचे घनात रूपांतर करणारा पदार्थ) घातलेल्या तबकड्यांतून ठेवल्यास प्लेगजंतूंचे संवर्धन करता येते. गिनीपिगच्या शरीरात सूक्ष्मजंतू टोचून त्याच्या शरीरातील विशिष्ठ बदल व ऊतकांची सूक्ष्मदर्शकीय तपासणी प्लेगाच्या निदानास पूरक असते. अती जंतुविषरक्तता असल्यास नीलेतील रक्त काचपट्टीवर घेऊन मिथिलीन ब्ल्यूने रंगविल्यास सूक्ष्मजंतू दिसू शकतात.
प्लेग सातत्याने असलेल्या ठिकाणी अकस्मात मरण पावलेल्या व्यक्तींच्या मृतदेहाची तपासणी करताना प्लेगाने मृत्यू झालेला आहे किंवा नाही, हे ठरवण्याकरिता विशिष्ठ रंजनक्रिया व सूक्ष्मजंतू–संवर्धन याकडे लक्ष देणे जरूरीचे असते. यामुळे साथ आटोक्यात आणण्यास व प्रतिबंधात्मक उपाय योजण्यास मदत होते. प्लेगापासून बरे होत असणाऱ्या रोग्याच्या शरीरात विशिष्ट ⇨प्रतिपिंडे तयार होतात व ती विशिष्ट प्रयोगशालीय परीक्षांद्वारे रोगांच्या उताराच्या दुसऱ्या आठवड्यात दाखवून देता येतात.
उपचार : स्ट्रेप्टोमायसीन, टेट्रासायक्लीन व क्लोरोमायसेटीन यांपैकी कोणतेही एक प्रतिजैव (ॲंटिबायॉटिक) औषध ताबडतोब सुरू केल्यास गुणकारी असते. पूर्ण विश्रांती, हलके व पोषक अन्न व उत्तम शुश्रूषा आवश्यक असतात. गाठ फार दुखत असल्यास शेकणे आणि इक्थायॉल, बेलाडोना व ग्लिसरीनमिश्रित लेप तीवर लावण्याने आराम मिळतो. गाठीत पू झाल्याची खात्री झाल्यासच तीवर छेदन शस्त्रक्रिया करून पू काढून टाकतात.
फलानुमान : (रोगाच्या संभवनीय परिणामांसंबंधीचे पूर्वानुमान). प्लेगजन्य न्यूमोनिया व जंतूविषरक्तता या प्रकारांत फलानुमान). प्लेगजन्य न्यूमोनिया व जंतुविषरक्तता या प्रकारांत फलानुमान गंभीर असते. गाठीच्या प्लेगाच्या सौम्य साथीत मृत्युप्रमाण १० ते ३०% असते. प्रतिजैव औषधांच्या वापरामुळे फलानुमानात मोठा बदल घडून आला आहे.
प्रतिबंध व नियंत्रण : वैयक्तिक प्रतिबंधात्मक उपायांमध्ये प्रतिबंधात्मक लस टोचणे महत्त्वाचे असते. दोन प्रकारची लस याकरिता वापरतात : (१) मृतजंतूंपासून बनविलेली आणि (२) हतप्रभ (जिवंत परंतु रोगोत्पादकता क्षीण बनविलेल्या) सूक्ष्मजंतूंपासून बनविलेली. पहिल्या प्रकारची लस भारतात ‘हाफकीन लस’ म्हणून ओळखली जाते व तिच्या एक मिली. मध्ये एक अब्ज मृत जंतू असतात. ती दोन मात्रांमध्ये आठवड्याच्या अंतराने १ मिलि. मात्रेत टोचतात. जरूरीप्रमाणे व वेळ कमी असल्यास एकाच मात्रेत दोन्ही भाग म्हणजे एकाच वेळी २ मिलि. मात्रा टोचतात. ही लस टोचल्यानंतर काहीशी सौम्य प्रतिक्रिया (ज्वर येणे वगैरे) निश्चितपणे उत्पन्न होते व टोचून घेणाऱ्या सर्व व्यक्तींना तशी पूर्वसूचना देणे जरूर असते. मूळ हाफकीन लसीमुळे जेवढी जोरदार प्रतिक्रिया येईल तेवढी एस्. एस्. सोखी या शास्त्रज्ञांनी रूपांतरित केलेल्या लसीमुळे येत नाही. जिवंत सूक्ष्मजंतू असलेली लस एकाच मात्रेत टोचतात व तीमुळे ५ ते १० दिवस टिकणारा ज्वर येतो. लसीच्या दोन प्रकारांपैकी पहिला प्रकार अधिक वापरात असून दोन्हीमुळे उत्पन्न होणारी प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षमता) ६ ते ८ महिने टिकते.
रोग्यावर इलाज करणाऱ्या वैद्याने, परिचारिकेने व इतर संपर्क येणारांनी संरक्षणात्मक टोप्या, मुखाच्छादने, पायघोळ अंगरखे व हातमोजे वापरणे जरूर असते. संपर्क झालेल्या नातेवाईकांना व इतरांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दररोज ६ ग्रॅ. सल्फाडायाझीन विभाजित मात्रेत दररोज ३ ते ७ दिवसपर्यंत तोंडाने किंवा १ ग्रॅ. स्ट्रेप्टोमायसीन अंतःक्षेपणाने दररोज पाच दिवस देतात.
इतर उपाय : संसर्गित घुशी, संसर्गित पिसू व मानव यांच्या एकत्र येण्यानंतरच मानवात साथ पसरते हे निश्चित आहे म्हणून घुशींचा व पिसवांचा नाश करणे अत्यावश्यक आहे. प्लेग नियंत्रण घूस, पिसू व मानव या त्रिकोणाशी निगडित आहे. पिसवांच्या नाशाकरिता कीटकनाशके व घुशींच्या नाशाकरिता कृंतकनाशके वापरतात. कीटकनाशकांचा उपयोग प्रथम करावा व नंतर कृंतकनाशके वापरावी. १०% डीडीटी भुकटी किंवा ५% डीडीटी विद्रावाचा फवारा कीटकनाशक म्हणून उपयुक्त असतो. अलीकडे पिसवा डीडीटी प्रतिरोधक बनल्याचे आढळले आहे म्हणून साथीच्या भागातील पिसवांची कीटकनाशक सुग्राह्यता प्रथम अजमावून मगच योग्य ते कीटकनाशक वापरावे लागते. १.५% डिल्ड्रीन किंवा २% अल्ड्रिन असलेली भुकटी घुशींच्या बिळांतून व घरांच्या जमिनीवर फवारण्याने सर्व पिसवा मरतात व तिचा परिणाम १ ते १२ आठवडे टिकतो. कृंतकनाशक म्हणून सोडियम फ्ल्युओरोअसिटेट (१,०८०), आर्सेनिक ट्राय-ऑक्साइड, आल्फानॅप्थील, थायोयूरिया (ॲंटू) व वारफेरीन यांसारखी क्लथनरोधके (रक्तसाखळण्यास रोध करणारी वा विलंब लावणारी द्रव्ये) वापरतात.
साथीच्या वेळी वरील उपायांशिवाय रोग्याला अलग ठेवणे, प्रतिबंधात्मक औषधे सूक्ष्मजंतु-प्रतिरोधक बनली आहेत किंवा कसे हे ठरविणे व त्यानुसार औषध योजना करणे, रोग लक्षात येताच योग्य त्या आरोग्याधिकाऱ्यांना सूचना देणे (आंतरराष्ट्रीय सार्वजनिक स्वच्छता कायद्याप्रमाणे प्लेग हा रोग अधिसूचनीय आहे) या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. रशियामध्ये हतप्रभ सूक्ष्मजंतूंपासून बनविलेली लस फवाऱ्याच्या स्वरूपात नाक व घसा या ठिकाणी वापरून प्लेगजन्य न्यूमोनियास प्रतिबंध करण्यात यश आले आहे.
साथीच्या संभाव्य धोक्याच्या वेळी लस टोचणे हा उपाय जरी उपयुक्त असली, तरी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्याचा उपयोग काहीसा मंद फलदायीच असतो. अशा वेळी सर्व प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय एकाच वेळी सुरू करणे योग्य व हितावह असते. कुलकर्णी, श्यामकांत; भालेराव, य. त्र्यं.
आयुर्वेदीय चिकित्सा : हा साथीचा रोग असून ह्यात काख इ. संघींमध्ये गाठ उत्पन्न होऊन ज्वर येत असतो. गाठ दिसू लागताच जळवा लावून रक्त काढावे व दशांग लेप लावावा. पोटात त्रिभुवन कीर्ती द्यावी. वेदना असल्यास महायोगराज गुग्गुळू किंवा महावात विध्वंस आल्याच्या रसाबरोबर द्यावा. जर गाठ कमी झाली नाही, तर ती पिकण्याचा प्रयत्न करावा. त्याकरिता पोटीस बांधावे. पिकल्यानंतर फोडून तीळ आणि कडूनिंबाचा पाला ह्यांची चटणी मध व तूप घालून त्याच्यावर बांधावी म्हणजे गाठीतला पू वगैरे निघून जाऊन जखम स्वच्छ होईल. जखम स्वच्छ झाल्यानंतर जात्यादि तेलाची वात ठेवून तो व्रण भरून आणावा. गुग्गुळू, अगरू राळ, वेखंड, पांढऱ्या मोहऱ्या, मीठ किंवा सैंधव आणि कडूनिंबाचा पाला ह्यांची धुरी सकाळ संध्याकाळ सर्व घरात द्यावी. रोग्याच्या संपर्कांत घरातील माणसांनी येऊ नये म्हणजे हा रोग इतर व्यक्तींना होणार नाही.
प्लेगाची साथ येत आहे असे वाटल्यास गावातील सर्व व्यक्तींनी वांतीकारक किंवा रेचक किंवा दोन्ही जरूरीप्रमाणे घेऊन शरीर शुद्ध करावे. नियमित हलका आहार घ्यावा व महायोगराज गुग्गुळाचे सेवन सर्वांनी दररोज करावे. वरील धूप सकाळ-संध्याकाळ घरामध्ये करीत असावा म्हणजे घरी साथ येणार नाही.
फैलाव/परिणाम
[संपादन]हा तीन प्रकारांनी लोकांच्यात फैलावू शकतो. न्यूमॉनिक प्लेग (Pneumonic Plague) हे या जंतूंचे सर्वात भयानक रूप आहे. कारण हवेतून, रोग्याच्या शिंकण्या-खोकण्यामुळे या रोगाचा प्रसार होऊ शकतो. चीनमधील झिकेटान गावातला प्लेग याच स्वरूपाचा होता.
या रोगाची लागण झालेल्यांपैकी ७०% लोक तरी दगावतातच असा अनुभव आहे.
उपचार
[संपादन]स्ट्रेप्टोमायसीन किंवा टेट्रॅसायक्लीन या सारख्या औषधांचा रोगाच्या प्राथमिक अवस्थेत उपयोग केला तर ८५% रोगी तरी बरे होऊ शकतात.