Jump to content

शंकर श्रीकृष्ण देव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शंकरराव देव या पानावरून पुनर्निर्देशित)
शंकर श्रीकृष्ण देव

शंकरराव देव
टोपणनाव: शंकरराव देव
जन्म: जानेवारी २८, इ.स. १८९५
धुळे,
मृत्यू: डिसेंबर ३०,इ.स. १९७४
शिक्षण: बी.ए. एलएल.बी.
कार्यक्षेत्र: सर्वोदयी कार्य, साहित्य,
पत्रकारिता/ लेखन: समाज प्रबोधन पत्रिका
प्रभाव: गांधीजी
वडील: श्रीकृष्ण
आई: गंगुबाई

शंकरराव देव म्हणून प्रसिद्ध असलेले शंकर श्रीकृष्ण देव (जानेवारी २८, १८९५ - डिसेंबर ३०, १९७४), हे समर्थभक्त, रामदासी संप्रदाय व साहित्य ह्यांचे संशोधक–अभ्यासक–प्रकाशक व सामाजिक–राजकीय कार्येकर्ते होते.

पुण्यास राहून बी. ए. एल्एल्. बी. झाल्यानंतर (१८९३, १८९८) धुळ्याला वकिली करू लागले. पुण्यास असताना चिपळूणकर, टिळक, आगरकर, गोखले आदींच्या विचारांचा प्रभाव पडून त्यांच्यातील देशभक्तीची भावना चेतली होती.

तिच्याच प्रेरणेतून ते समर्थ रामदासांच्या जीवनाकडे आणि साहित्याकडे आकृष्ट झाले. १८९३ मध्ये धुळ्यास त्यांनी ‘सत्कार्योत्तेजक सभे’ची स्थापना केली. मराठ्यांच्या इतिहासाचे आणि जुन्या मराठी साहित्याचे–विशेषतः रामदासी साहित्याचे संशोधन–प्रकाशन करणे, हे ह्या संस्थेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते. ह्या संस्थेच्या ‘रामदास आणि रामदासी’ ह्या ग्रंथमालेने समर्थांचे दासबोधादी ग्रंथ तसेच रामदासी संशोधनपर लेखनही प्रकाशित केले. शेकडो रामदासी आणि इतर हस्तलिखित बाडांची वर्णनात्मक सूची उपलब्ध करून दिली. श्री रामदासींची ऐतिहासिक कागदपत्रेही प्रसिद्ध केली (१९३०). ह्या संस्थेने जमविलेली हस्तलिखित बाडे आणि ऐतिहासिक कागदपत्रे सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी देवांनी धुळ्यात श्रीसमर्थवाग्देवता मंदिर उभे केले आणि तेथे ती ठेवली. श्रीसमर्थसंप्रदायातील ग्रंथांचे प्रकाशन व विचारांचे विवेचन करण्यासाठी रामदास आणि रामदासी ह्या नावाचे एक मासिक ‘सत्कार्योत्तेजक सभे’तर्फे त्यांनी १९१५ मध्ये काढले. ह्याच नावाची उपर्युक्त ग्रंथमाला १९०५ मध्ये सुरू केलेली होती. तिला ह्या मासिकाची जोड देण्यात आली. इतिहास आणि ऐतिहासिक हे सत्कार्योत्तेजक सभेतर्फे देवांनी चालविलेले आणखी एक मासिक. उपलब्ध झालेल्या मूळ ऐतिहासिक कागदपत्रांचे प्रकाशन करणे आणि विविध ऐतिहासिक विषयांचे विवेचन करणे, हे हेतू हे मासिक काढण्यामागे होते. समर्थांचे मराठवाड्यातील जन्मग्राम जांब येथे समर्थांचे एक सुंदर मंदिर त्यांनी पुढाकार घेऊन उभारले. अनेक रामदासी मठांच्या वास्तूंचा त्यांनी जीर्णोद्धार केला. देवांनी लिहिलेले तीन खंडांचे श्रीसमर्थचरित्रही (श्रीसमर्थावतार १९४९ श्रीसमर्थ हृदय १९४२, श्रीसमर्थसंप्रदाय १९४५) प्रसिद्ध आहे. राजकीय चळवळींतही त्यांनी भाग घेतला ब्रिटिश सरकारच्या अन्याय्य धोरणांविरुद्ध आंदोलने केली. स्वातंत्र्यप्रेमी क्रांतिकारकांच्या ‘अभिवनभारत’ ह्या संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर खटला भरण्यात आला होता तथापि त्यातून ते निर्दोष मुक्त झाले. धुळे नगरपालिकेचे सदस्य, त्या नगरपालिकेच्या ‘स्कूल बोर्डाचे’ अध्यक्ष (१९१३–१५) आदी नात्यांनी त्यांनी धुळे शहराची सेवा केली. मुंबई कायदे मंडळाचे (बाँबे लेजिस्लेटिव्ह कौन्सिल) सदस्य (१९१८–२७) म्हणूनही त्यांनी काम केले. राजकारणात आरंभी ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. टिळकांच्या ‘होमरूल लीग’ ला जनतेचा पाठिंबा मिळवून देण्यासाठी त्यांनी खानदेशात दौरा केला होता. १९२० नंतर मात्र त्यांच्यावर गांधीवादाचा प्रभाव पडला. १९२८ नंतर रामदासांचे जीवन आणि साहित्य ह्यांसंबंधीच्या संशोधनाला त्यांनी सर्वस्वी वाहून घेतले. श्रीसमर्थसंघ ही समर्थभक्तांची एक संघटनाही त्यांनी स्थापन केली होती. त्यांच्या वृद्धापकाळी त्यांचा एकुलता एक मुलगा निधन पावला. त्या दुःखाचा धक्का असह्य होऊन धुळे येथे ते निधन पावले.

बालपण

[संपादन]

शंकरराव देवांचे मूळ गाव सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातले बावधन आहे. तेथे त्यांचे आजोबा शेती करीत, तर वडील हे पुण्याला आचाऱ्याचा व्यवसाय करीत असत. आई गंगूबाई, शंकरराव अडीच वर्षांचे असताना वारल्या.[ संदर्भ हवा ]

शिक्षण

[संपादन]

त्यांचे प्राथमिक शिक्षण भोर येथील त्यांच्या आजीच्या काकूने केले. पुढील शिक्षण बावधन, पुणे, बडोदे आणि मुंबई येथे होऊन शंकरराव देव १९१८ साली बी.ए. झाले.

स्वातंत्र्य चळवळीत सहभाग

[संपादन]

कॉलेजमध्ये असताना शंकरराव देवांचा न.वि. गाडगीळ, विनोबा भावे यांच्याशी संबंध आला. बिहारमध्ये महात्मा गांधी खंडाने घेऊन शेत कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी चळवळ करीत होते (१९१७), तेथे जाऊन आले. गंगाधरराव देशपांडे यांनी शंकररावांचा परिचय महात्मा गांधींशी करून दिला, आणि शंकरराव असहकाराच्या चळवळीत सहभागी झाले.[ संदर्भ हवा ]

सत्याग्रह आणि तुरुंगवास

[संपादन]

सेनापती बापटांबरोबर शंकरराव देवांनी पुण्याजवळील मुळशी सत्याग्रहात भाग घेतला (१९२३). त्याकरिता त्यांना तुरुंगवास व फटक्यांची शिक्षा भोगावी लागली. त्यांनी आपल्या संघटनचातुर्याने व ओजस्वी वक्तृत्वाने सारा महाराष्ट्र जागृत केला. महाराष्ट्रात प्रांतिक काँग्रेस समिती सुरू केली. ब्रिटिशांच्या फोडा व झोडा या धोरणासंबंधी स्वराज्या’मधील त्यांनी लिहिलेल्या लेखांबाबत त्यांना पुन्हा दीड वर्षाची शिक्षा झाली. त्यांनी मिठाच्या सत्याग्रहातही भाग घेतला (१९३०). त्याबद्दलही त्यांना दीड वर्षाची शिक्षा झाली. १९४१ सालातील वैयक्तिक सत्याग्रहात त्यांना दीड वर्षाची शिक्षा झाली.

काँग्रेसपक्षामध्ये भूषविलेली पदे

[संपादन]
  • महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्षपद (१९३०).
  • काँग्रेस कार्यकारिणीचे सभासदत्व (१९३६).
  • महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे भरलेल्या ५०व्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद (१९३६).
  • अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीसपद (१९४६–५०).
  • घटनासमितीचे सदस्यत्व.
  • हंगामी संसद सदस्यत्व.
  • निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे ठरविणाऱ्या समितीचे सदस्यत्व.
  • गांधी स्मारक निधीचे अध्यक्षपद

शेवटची निवडणूक आणि राजकारण निवृत्ती

[संपादन]

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक ते १९५० मध्ये हरले व त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून जवळजवळ संन्यास घेतला. उरुळी कांचन येथे त्यांनी एक आश्रम बांधला आणि ते तेथे राहू लागले. शंकरराव देवांच्या प्रोत्साहनाने व त्यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे समाज प्रबोधन संस्था स्थापन झाली. त्या संस्थेतर्फे समाज प्रबोधन पत्रिका नावाचे द्वैमासिक नियमित निघत असते.

निवृत्तीनंतर

[संपादन]

पुढे ते आचार्य विनोबा भाव्यांच्या भूदान चळवळीत सहभागी झाले. त्यांनी तमिळनाडू व केरळ या राज्यांत पदयात्रा काढली. त्यांची वृत्ती आध्यात्मिक होती. ज्ञानेश्वरी, गीता, उपनिषदे यांचा सखोल व्यासंग त्यांनी केला होता. विनोबांच्या सर्व सेवासंघात असताना १९६२ च्या चीनच्या भारतावरील आक्रमणानंतर शंकररावांनी काही सहकाऱ्यांसोबत पेकिंगची पदयात्रा काढली. पण पूर्व पाकिस्तान व ब्रह्मदेश या देशांनी त्यांना प्रवेश नाकारला. चीनला जाता न आल्याने निरूपायाने त्यांनी हिमालयाच्या पायथ्याशीच पायी दीर्घ प्रवास केला. या प्रवासामुळे त्यांची प्रकृती ढासळली, ती अखेरपर्यंत सुधारली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी अग्रभागी रहाण्याचा प्रयत्न केला, पण ते काँग्रेस श्रेष्ठींची संयुक्त महाराष्ट्र न देण्याची कारणे महाराष्ट्रातील जनतेला पटवून देऊ शकले नाहीत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीस हिंसक स्वरूप येईल असे वाटू लागल्यावर शंकरराव देवांनी उरुळी कांचन येथे ३० दिवसाचे उपोषण केले.

गांधीवादी शंकरराव देव

[संपादन]

शंकरराव देव हे खरेखुरे गांधीवादी होते. त्यांनी आजन्म ब्रह्मचर्यव्रत पाळले आणि महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार केला. गांधीजी व काँग्रेस यांकरिता त्यांनी लक्षावधी रुपयांचा फंड गोळा केला. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात ते सासवड येथे त्यांनीच सुरू केलेल्या आश्रमात रहात होते.

शं.श्री. देवांचे कार्य

[संपादन]

नानासाहेब देव यांनी समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव, जांब याचा पूर्ण विकास घडवून आणला आणि तेथे समर्थांची एक मूर्ती स्थापन करून एक उत्तम मंदिर उभारले. त्याचप्रमाणे धुळे येथे १९३५ मध्ये श्री समर्थ वाग्देवता मंदिर उभारले. हे तर समर्थ सांप्रदायिकांचे विद्यापीठच म्हणावे लागेल. तेथे समर्थांनी आणि त्यांच्या शिष्यांनी लिहिलेले अफाट साहित्य उत्तम प्रकारे जतन केले आहे. त्यात आपल्याला रामदासी गाथा, बखर, बाडे, विविध ग्रंथ, संदर्भ ग्रंथ इत्यादी अफाट साहित्य बघायला मिळते. हे सर्व प्रकाशनाचे काम देवांनी उत्तम प्रकारे केले. शंकरराव देव म्हणत असत "शिव-समर्थांचे स्मरण हे महाराष्ट्राचे जीवन तर त्यांचे विस्मरण हे महाराष्ट्राचे मरण".[ संदर्भ हवा ]

  • जांब येथे समर्थ मंदिराची स्थापना
  • भारतभरातील विविध समर्थ-मठांत तसेच अन्य ठिकाणी फिरून समर्थ संप्रदायाच्या साहित्याचा संग्रह.
  • समर्थ रामदास स्वामींनी जेथे दासबोध लिहिला, त्या शिवथरघळ या ठिकाणाचा शोध १९३०मध्ये लावला.
  • धुळे येथे समर्थ संप्रदायाचे साहित्याचा संग्रह जतन व प्रसार करणे यासाठी समर्थ वाग्देवता मंदिर व सत्कार्योत्तेजक सभा यांची स्थापना.
  • धुळे येथे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या साहित्याचा संग्रह, जतन व प्रसार करणे यासाठी राजवाडे संशोधन मंदिराची स्थापना.
  • ’रामदास व रामदासी’ या मासिकाद्वारे समर्थ साहित्याचे प्रकाशन.

ग्रंथलेखन

[संपादन]
  • पहिला सुमनहार
  • शं.श्री. देवांनी लिहिलेले तीन खंडांचे श्री समर्थचरित्र (श्रीसमर्थावतार, श्रीसमर्थहृदय, श्रीसमर्थ संप्रदाय) प्रसिद्ध आहे.
  • श्री दास विश्रामधाम. खंड १ ते ४
  • श्री दिनकरांची स्फुट कविता
  • श्रीमत् दासबोधाची किल्ली
  • श्रीमत् दासबोधांतर्गत श्री समर्थ चरित्र
  • श्री निवृत्तीराम
  • श्री रामदास पंथ क्रमसार
  • श्री रामदासांची कविता
  • श्रीराम सोहळा
  • श्री संप्रदायाची कागदपत्रे
  • श्री समर्थकृत करुणाष्टके, धाटया, सवाया
  • श्री समर्थ प्रताप
  • श्री समर्थ मंदिर-जांब
  • श्रीसमर्थशिष्य उद्धवस्वामी (चरित्र)
  • श्री समर्थ्रशिष्य कल्याण (चरित्र)
  • श्री समर्थांची दोन जुनी चरित्रे
  • श्री समर्थांची लघुकाव्ये
  • श्री समर्थांची शिकवण
  • श्री सीता स्वयंवर
  • श्री स्वानुभव दिनकर
  • सुवर्ण महोत्सव ग्रंथ (२००४)

इतर लेखनकार्य

[संपादन]
  • त्यांनी सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला काढून तीतून उत्तम वैचारिक पुस्तके प्रसिद्ध केली. उपनिषत्सार व भगवान बुद्ध ही त्यांची पुस्तके विशेष गाजली.
  • गांधीजींच्या अनेक पुस्तकांचे अनुवाद केले.
  • वर्तमानपत्रांतून विपुल स्फुटलेखन.
  • त्यांनी नवभारत (मासिक) हे वैचारिक मासिक त्यांनी सुरू केले.(१९४७). त्याचे ते १९५६पर्यंत संचालक होते.
  • स्वराज्य नावाचे साप्ताहिक काढले (१९२५).
  • लोकशक्ती नावाचे दैनिक सुरू केले (१९३८).[ संदर्भ हवा ]

आत्मचरित्र

[संपादन]

शंकरराव देवांनी 'दैव देते पण कर्म नेते' या नावाचे आत्मचरित्र लिहिले. ते त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले.

गौरव

[संपादन]

समाज प्रबोधनाच्या कार्यकर्त्यांनी १९७३ मध्ये शंकररावांच्या ७८व्या वाढदिवसानिमित्त भारतीय प्रबोधन नावाचा अभिनंदनग्रंथ त्यांना अर्पण केला.

बाह्य दुवे

[संपादन]