पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे उर्फ डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे (१९०४ - १९८५) हे मराठीतील निबंधकार व विचारवंत म्हणून ओळखले जातात. ते एम.ए. पीएच.डी होते. १९२८ ते १९६४ या कालखंडात त्यांनी प्रथम विद्यालयात शिक्षक म्हणून व नंतर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. मराठी साहित्याबरोबरच इतिहास, धर्म, संस्कृत, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इ. विषयांचा त्यांचा मोठा व्यासंग होता. एक शिक्षक म्हणून, सर्व विद्यार्थ्यांच्या मनावर बुद्धिवादाचे, ज्ञाननिष्ठेचे व राष्ट्रभक्तीचे संस्कार करावे ही त्यांच्या लेखनामागची एक प्रबळ प्रेरणा होती.[१] त्यांचे बरेचसे ग्रंथलेखन, निबंध व प्रबंधांच्या स्वरूपाचे आहे.[२] राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक प्रमुख म्हणून त्यांनी अनेक व्याख्याने दिली.[३]
चरित्र
[संपादन]श्रेष्ठ विचारवंत, निबंधकार व कथालेखक डॉक्टर पु. ग. तथा पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे यांचा जन्म १० जुलै १९०४ रोजी पुणे येथे झाला. [४] १९२४ मध्ये ते मॅट्रिक झाले. याच वर्षी त्यांचा प्रा. श्री. म. तथा बापूसाहेब माटे यांच्याशी परिचय झाला; तो त्यांच्या आयुष्याला वळण लावणारा, संस्कार करणारा ठरला. १९२८ मध्ये स. प. महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. ची पदवी प्राप्त केली व ते नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून काम करू लागले. १९२९ मध्ये वि. कृ. दातार यांच्या भगिनी द्वारकाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. १९३१ मध्ये त्यांनी एम्. ए. ची पदवी प्राप्त केली.
१९३१ मध्ये सहस्रबुद्धे यांनी 'किर्लोस्कर' मासिकातून कथालेखनाला आरंभ केला. १९३४ मध्ये त्यांच्या 'लपलेले खडक' या लघुकथासंग्रहाचे प्रकाशन झाले. १९३३ मध्ये त्यांचे पहिले नाटक 'सत्याचे वाली' हे प्रसिद्ध झाले आणि दुसरे नाटक 'वधू संशोधन' १९३७ मध्ये प्रसिद्ध झाले. मात्र त्यांचे प्रयोग झाल्याचे उल्लेख नाहीत. १९३६ मध्ये त्यांचा 'विज्ञानप्रणीत समाजरचना' हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. आधुनिक काळासाठी योग्य अशा विज्ञाननिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य विवेकनिष्ठा, विज्ञाननिष्ठा व बुद्धिस्वातंत्र्य या मूल्यांवर आधारित नव्या समाजरचनेचे चित्र यासाठी आवश्यक ते बदल करण्याची गरज. या ग्रंथाचे अभ्यासकांत स्वागत झाले. शिवाय त्यास भोरचे 'शंकराजी नारायण' हे पारितोषिकही मिळाले.[५]
१९३९ मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे पहिले पीएच.डी. झाले. १८५८ ते १९३८ या काळातील मराठी ललित साहित्यातील 'स्वभावलेखन' या विषयावर त्यांनी प्रबंध लिहिला. साहित्यसम्राट न. चिं. केळकर हे त्यांचे मार्गदर्शक होते, तर वा. म. जोशी हे परीक्षक होते.
'भारताचा उत्कर्ष' हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी ललित लेखनाकडे पाठ फिरवली आणि आपल्या समाजाचा, तसेच समाजशास्त्राचा, राजकारणाचा अभ्यास सुरू केला. १९३९ ते १९४३ या काळात ते केवळ अभ्यास, मनन आणि चिंतन करत होते. ह्या अनेक विषयांच्या व्यासंगातून आणि चिंतनातून स्वतः काढलेले निष्कर्ष समाजापुढे निर्भयपणे मांडण्याच्या हेतूने त्यांनी लेखन केले आणि मराठीतील विष्णुशास्त्री चिपळूणकर, लो. टिळक, गो. ग. आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, शं. द. जावडेकर, श्री. म. माटे ह्यांसारख्या निबंधकारांची परंपरा चालू ठेवली व समृद्ध केली.
१९२८ ते १९४६ पर्यंत त्यांनी पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून काम केले. शिल्पकार चरित्रकोश खंड २ [६] मधे, श्री. जयंत वष्ट यांनी लिहिलेल्या लेखामध्ये खालील वर्णन केलेले आहे.
शाळेत त्यांचा पांढरा पोलो कॉलरचा शर्ट, काळा कोट, काळी टोपी, धोतर व वहाणा असा वेश असे; आणि त्यातूनही त्यांचे व्यायामाने कमावलेले शरीर लक्षात येई. ताठ मानेने झपझप चालण्याची त्यांची सवय प्रारंभापासून होती. ते शाळेत मुलांच्या शिस्तबद्ध सहली काढत. मुलांबरोबरीने व्हॉलीबॉल, बास्केट बॉल हे मैदानी खेळ खेळत; पण त्यांचे विशेष प्रेम धसमुसळ्या रग्बीवर होते. इतके की, त्यासाठी त्यांनी 'गेंडा क्लब' स्थापन केला होता. मैदानी खेळातून शिस्त येते असे त्यांचे मत होते. १९४६ पासून ते १९६४ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते सर परशुरामभाऊ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून अध्यापन करत होते. विद्यार्थ्यांविषयी मनात ममता असली, तरी बाह्यतः ते कठोर होते. १९४६ च्या प्रारंभीच्या काळात समाजजागृती करणारे लेखक- वक्ते विद्यार्थ्यांमधून निर्माण व्हावेत, या हेतूने ते विद्यार्थी मंडळही चालवत होते. त्यांनी १९४९ पर्यंत हा प्रयोग केला.
एक शिक्षक म्हणून, सर्व विद्यार्थ्यांच्या मनावर बुद्धिवादाचे, ज्ञाननिष्ठेचे व राष्ट्रभक्तीचे संस्कार करावे ही त्यांच्या लेखनामागची एक प्रबळ प्रेरणा होती.[१]
चार मार्च १९८५ रोजी त्यांचं निधन झालं.[७]
क्र. | ग्रंथाचे नाव | प्रकाशन वर्ष | |
१ | सत्याचे वाली (नाटक) | १९३३ | |
२ | लपलेले खडक (लघुकथा) | १९३४ | |
३ | वधू संशोधन (नाटक) | १९३४ | |
४ | विज्ञानप्रणीत समाजरचना,
मधुवन ग्रंथ प्रकाशन, अंधेरी (पूर्व), मुंबई ६९ |
१९३६, १९८८ | हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी विज्ञानाच्या आधारे नवसमाजरचना करण्याविषयी त्यांनी या पुस्तकात विवेचन केले आहे. स्मृतिकारांचे समाजशास्त्र यशस्वी ठरलेले नाही; ते आमूलाग्र बदलावयास पाहिजे असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. विवेकनिष्ठा, विज्ञाननिष्ठा व बुद्धिस्वातंत्र्य या नव्या तत्त्वांच्या आधारे समाजरचना करावी, असे या ग्रंथात सांगितले आहे. |
५ | स्वभाव - लेखन | १९३९ | |
६ | भारतीय लोकसत्ता | १९५४ | भारताच्या प्राचीन इतिहासांतील इ. स. पू. ८०० ते इ. स. ६०० हा काळ अत्यंत वैभवाचा होता व हाच काळ लोकसत्ताकांच्याहि उत्कर्षांचा काळ होता. परंतु भरतभूमींत सध्यां जी लोकसत्ता प्रस्थापित होत आहे, ती प्राचीन परंपरेंतून उद्भवलेली नाहीं. अर्वाचीन भारतातील नेतृत्वाने ब्रिटिश लोकसत्तेचा आदर्श पुढे ठेवून, नवीन रचना करण्यास सुरुवात केली. जगाच्या दृष्टीने भारतासारख्या खंडप्राय देशाने, स्वातंत्र्य- प्रस्थापनेनंतर लोकसत्तेचा यशस्वी अंगिकार करणे हे आश्चर्यकारक व दिशादर्शक आहे. भारताला यशस्वी लोकसत्तेसाठी समाजातील सर्व क्षेत्रात- धर्म, नीति, शिक्षण, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था- आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. नव्या संस्था व नवीन समाजरचना उभे करण्यास नव्याच माणसांची आवश्यकता असते. हा नवा माणूस गेल्या शतकांत कसा निर्माण झाला; मानवत्वाची प्रतिष्ठा, समतेचा महामंत्र, धर्मनिरपेक्ष शासन, विज्ञानप्रणीत समाजरचना ही तत्वे येथे रुजण्यासाठी काय प्रयत्न झाले व ते कितपत यशस्वी झाले. पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी कोणती आव्हाने आहेत- राजकीय पुनर्घटना, कृषिपुनर्घटना, औद्योगिक पुनर्घटना, सामाजिक पुनर्घटना (ब्राह्मणब्राह्मणेतर वाद, अस्पृश्य व आदिवासी, हिंदू व मुसलमान), मानवपुनर्घटना या विषयांची विस्तृत चर्चा या पुस्तकात केली आहे.
या पुस्तकास मुंबई विद्यापीठाचे तर्खडकर पारितोषिक मिळाले (१९५४)[९] |
७ | माझे चिंतन
कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे ३० |
१९५५, १९७०, १९७३ | आपल्या समाजाचे अवलोकन व अभ्यास करताना ध्यानात आलेल्या उणीवा, त्यांचे मूळ कारण, त्यावरील उपाय; असा सर्वांगीण अभ्यास करून सिद्ध झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे. यामध्ये खालील उणिवांची चर्चा आहे- भारतात शास्त्रीय पद्धतीने सांगोपांग अभ्यास करून त्यांवर मोठे ग्रंथ लिहिणे ही प्रथा फारशी नाही; भारतीय मनात रुजलेले कर्मकांडाचे महत्त्व व त्याचेच परिवर्तन आधुनिक काळात शिक्षण, नियोजन इ. सर्वच क्षेत्रांत आपला कारभार कर्मकांडात्मक होणे; संघटित जीवन, सामूहिक कार्यशक्ती यांचा आपल्या समाजातील अभाव; भौतिक समृद्धी येऊनही वाढणारे सामाजिक रोग; तत्त्वासाठी एकट्याने विश्वाविरुद्ध एकाकी उभे राहण्याच्या धैर्याची जोपासना भारतीय इतिहासात फारशी झाली नाही; आपल्या समाजाने केलेले कायदे स्वतःहून, खुषीने, निष्ठेने पाळणे- या वृत्तीचा अभाव; रेखीवपणा, काटेकोरी, सूक्ष्म अभ्यास, कातीव हिशेब इ. गुणांचा अभाव. या बरोबरच भगवान श्रीकृष्णाचे असामान्य, अलौकिक, अद्वितीय पण मानवी रूप दाखवणार लेख या पुस्तकात आहे. |
८ | राजविद्या | १९५९ | |
९ | पराधीन सरस्वती | १९६२ | |
१० | वैयक्तिक व सामाजिक | १९६३ | वैयक्तिक आणि सामाजिक याविषयीची अनेक तत्त्वे, अनेक सिद्धान्त व अनेक वाद यांचा परामर्श या निबंधसंग्रहात घेतलेला आहे. आपल्या समाजात वैयक्तिक पुण्य, वैयक्तिक धर्म यांकडेच सर्वांनी लक्ष दिले व सामाजिक पुण्याकडे लक्ष दिले नाही. या पार्श्वभूमीवर शिवछत्रपतींनी स्वराज्यस्थापना करताना, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सर्व प्रकारची क्रान्ती येथे कशी केली याचे विवेचन केले आहे. मार्क्सवादातील अशास्त्रीयता स्पष्ट करणारे दोन लेख या संग्रहात आहेत. भ्रष्टता हे लोकशाहीवरचे फार मोठे संकट आहे. भारत व अमेरिका या दोन लोकसत्ता याचा सामना कसा करत आहेत हे उलगडून दाखवणारे दोन लेख या संग्रहात आहेत. राजकारण व समाजकारण दोन्ही परस्परपोषक आहेत. एकावाचून दुसरे पंगूच राहणार. हे सांगणारा लेख या संग्रहात आहे. |
११ | लोकहितवादींची शतपत्रे (संपादन)
कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे ३० |
१९६०, १९६३, १९७२, १९७७, १९८५, २००४, २००७ | १८४८-४९ च्या सुमारास लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची ही पत्रे प्रसिद्ध झाली. त्यांचे अल्पचरित्र या पुस्तकाच्या सुरुवातीला दिलेले आहे. शतपत्रात चर्चिलेल्या प्रमुख विषयानुसार या पत्रांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केलेले आहे- विद्या, हिंदूंचे धार्मिक जीवन, आमचे धर्मगुरू, स्त्रीजीवन, जातिभेद, हिंदूंचे आर्थिक जीवन, आमचे राजकारण व राज्यकर्ते. पुस्तकाच्या प्रस्तावनेत या प्रत्येक विषयाचा गोषवारा दिलेला आहे तसेच लोकहितवादींची लेखनशैली व तत्कालीन परिस्थिति यावर भाष्य केले आहे. |
१२ | लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान
कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे ३० |
१९६२, २०१० | स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने लोकसत्तेचा अंगिकार केला, परंतु भारतात हे स्वातंत्र्य व लोकसत्ता अबाधित ठेवण्याची कुवत आहे काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिति दिसत आहे. याच वेळी, सोव्हिएट रशिया व नवचीन या दोन प्रबळ दण्डसत्तांनी अल्पावधीत अमेरिकेसारख्या अत्यंत बलाढ्य व प्रौढ लोकसत्तेला व इंग्लड, फ्रान्स, पश्चिम जर्मनी यांच्या संघटित सामर्थ्याला आव्हान द्यावें इतके सामर्थ्य प्राप्त करून घेतले आहे. दण्डसत्तेचे हे आव्हान स्वीकारायची ताकद लोकसत्तेला येण्यासाठी कुठल्या सामर्थ्याची गरज आहे, याचा ऊहापोह या ग्रंथात केला आहे. भारतातील अंतर्गत राष्ट्रीय प्रपंचांत अत्यंत हीन, अधम असा स्वार्थ आणि परराष्ट्रकारणांत अतिरेकी, बेगडी उदात्तता या दोन घातक प्रवृत्तींमुळे आपला नाश होत आहे असे येथे प्रतिपादले आहे. राष्ट्रनिष्ठा व धर्मनिष्ठा या महाशक्तींच्या आश्रयानेच सध्या सर्व राष्ट्र आपापला उत्कर्ष साधीत आहेत. दुर्दैवाने भारताने मात्र या महाप्रेरणांची अवहेलना, विटंबना चालविली आहे, असे स्पष्ट केले आहे. अशा अवस्थेत, चारित्र्यसंपन्न, राष्ट्रनिष्ठ, धर्मनिष्ठ, निःस्वार्थी व विज्ञाननिष्ठ अशा लाखो तरुणांची संघटना उभी राहून तिने लोकशिक्षणाचे कार्य शिरावर घेतलें पाहिजे. भारतीय तरुणांना काळाचें आव्हान आहे तें हें आहे. तें आव्हान त्यांनी स्वीकारले तर लोकसत्ता की दण्डसत्ता हा प्रश्न पुढे त्यांनाच सोडवितां येईल. नाही तर भारताचें स्वातंत्र्यहि आपल्याला टिकवितां येणार नाही. |
१३ | भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे ३० |
१९६५ | महाभारतातील भारतीय तत्वज्ञान विषद करणारी तो लेखमाला आहे. धर्म हे साध्य नसून समाजाच्या उत्कर्षाचे साधन आहे, मनुष्याची योग्यता जन्मावरून ठरविण्यापेक्षा त्याच्या गुणांवरून ठरवावी, कृतयुग वा कलियुग हे राजसत्ताधाऱ्यांच्या कर्तृत्वावर अवलंबून असते आणि मोक्ष हे अंतिम साध्य असले तरी ऐहिक राष्ट्रीय प्रपंचाच्या वैभवाकडे कदापि दुर्लक्ष होता कामा नये, हे ते सिद्धांत आहेत |
१४ | हिंदुसमाज संघटना आणि विघटना
कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे ३० |
१९६७ | भारताचा अर्वाचीन इतिहास, म्हणजे इ. स. १००० पासूनचा इतिहास, हा भारतीयांना मोठा लाजिरवाणा आणि दुःखास्पद आहे. हिंदूंच्या दीर्घकालीन पारतंत्र्यास आणि त्यांच्या सर्वांगीण अधःपातास या अर्वाचीन काळात येथल्या समाज धुरीणांनी सनातन हिंदुधर्माला जे हीन व विकृत रूप दिले होते तेच प्रामुख्याने कारणीभूत आहे, असा या प्रबंधाचा मुख्य सिद्धान्त आहे. सर्व प्रकारे धर्म अधोगामी झाला असताना विजयनगरचे सम्राट, मराठे, रजपूत व शीख यांना हिंदुधर्म व हिंदुसंस्कृती यांचे रक्षण करता आले कारण त्यांनी काही अंशी तरी धर्मक्रान्ती केली, प्राचीन धर्मातील काही उत्कर्षकारक तत्त्वांचा अवलंब केला म्हणून त्यांना यश आले. या ग्रंथात हा इतिहास उलगडून दाखवलेला आहे. पुढे स्वातंत्र्य चळवळीत या भूमीत अपूर्व अशी धर्मक्रान्ती झाली आणि बुद्धिप्रामाण्य, प्रवृत्तिवाद, समता, गुणनिष्ठा, समसंधी या प्राचीन धर्मतत्त्वांचा येथल्या धुरीणांनी अवलंब केला. यामुळेच भारतीय समाजाला स्वातंत्र्यलढा जिंकण्याइतके सामर्थ्यं प्राप्त झाले. हेच उन्नतिकारक तत्त्वज्ञान स्वातंत्र्योत्तरकाळात प्रभावी होऊन आपली लोकसत्ता दृढ व बलाढ्य होईल अशी साहजिकच सर्वांची अपेक्षा होती. पण त्या अपेक्षेचा भंग झाला आणि पुन्हा आपली लोकशाही, आपले स्वातंत्र्य, आपली संस्कृती, आपली अस्मिता यांचे रक्षण करण्यास आपण अजूनही असमर्थच आहो, असे घोर दृष्य दिसू लागले. ही भयानक आपत्ती टाळण्यासाठी भारतातील तरुणांनी कोणत्या उपायांचा अवलंब केला पाहिजे, कोणत्या मार्गांनी गेले पाहिजे याचे विवेचन शेवटी केले आहे. पाश्चात्त्य मिशनऱ्यांच्या पद्धतीने भारतीय बहुजनात मिसळून राहून प्रथम विकृत धर्माचे संस्कार जनतेच्या मनावरून पुसून टाकले पाहिजेत व सर्वागीण क्रान्ती पूर्ण केली पाहिजे हा एकच मार्ग आहे. |
१५ | इहवादी शासन
केसरी प्रकाशन, पुणे ३० |
१९७२ | १९४७ सालीं भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि नंतर येथे इहवादी शासन- सेक्युलर गव्हर्मेंट- निधर्मी शासन-स्थापन झाले. इहवादाचा अर्थ यापेक्षा फार व्यापक आहे, इहलोक व परलोक हीं भिन्न क्षेत्रे आहेत आणि त्यांवर भिन्न सत्ता चालाव्या, एकाच सत्तेखाली दोन्ही क्षेत्र असू नयेत, असा त्याचा भावार्थ आहे. खिश्चन धर्माच्या उदयाच्या वेळचा हा विचार आहे. सृष्टिघटनांविषयी लोकांत अज्ञान असतें, कार्यकारणभाव त्यांना ज्ञात नसतो, अशा काळी अद्भुतावर, चमत्कारावर, दैवी शक्तीवर त्यांची अंध श्रद्धा असते. त्यामुळे ऐहिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांत- राजकारण, अर्थ, समाजरचना, शिक्षण- तो त्या श्रद्धेच्या वर्चस्वानेच निर्णय घेत असतो. हें वर्चस्व नष्ट होऊन प्रत्येक क्षेत्रांत बुद्धि, विज्ञान, अवलोकन, प्रयोग, इतिहास यांच्या साह्याने निर्णय घेणें हा इहवादाचा खरा अर्थ आहे. या ग्रंथात, कम्युनिस्ट, मुस्लिम व पाश्चात्य देशांनी इहवादाची जोपासना कशाप्रकारे केली आहे, याचे विवेचन केले आहे. प्राचीन काळी भारतातील समाजावर इहवादाचा संस्कार होता परंतु कलौघात तो पुसला गेला. स्वातंत्र्य लढ्यात त्याचे पुनरुज्जीवन झाल्यामुळेच भारताची सर्वांगीण प्रगति होऊन आपल्याला राष्ट्र संघटना, स्वातंत्र्यप्राप्ति व लोकशासनाची स्थापना यांत यश आले असे विवेचन या ग्रंथात केले आहे. या ग्रंथात पुढे भारतातील इहवाद विरोधी शक्तींचे- जमातवाद, साम्यवाद किंवा कम्युनिझम, व निवडणूकनिष्ठ राजकीयपक्ष- यांचेही रूपदर्शन केले आहे. |
१६ | केसरीची त्रिमूर्ति
जयंत श्रीधर टिळक, पुणे ३० |
१९७४ | विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर व लो. बाळ गंगाधर टिळक यांचे अल्पचरित्र, तत्वज्ञान व त्यांच्या कार्याविषयी विवेचन. भारताच्या नवीन युगासाठी 'नागरिक' तयार करण्याच्या कार्यात या तिघांचे योगदान व कलप्रवाह बदलवून टाकण्यासाठी यांनी केलेले कार्य यावर विस्तृत भाष्य. |
१७ | महाराष्ट्र संस्कृती
कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे ३० |
१९७९ | या ग्रंथात इ. पू. २३५ ते इ. स. १९४७ या सुमारे बावीसशे वर्षांच्या काळातील महाराष्ट्राच्या संस्कृतीचे विवेचन केले आहे. धर्म, राजकारण, समाजरचना, अर्थकारण, विज्ञान, कला, साहित्य व शिक्षण अशी संस्कृतीची आठ प्रधान अंगे आहेत. या आठही अंगांचे विवेचन उपलब्ध माहितीच्या आधारे या ग्रंथात केलेले आहे. |
१८ | काव्यगंगा (प्राचीन व अर्वाचीन काव्यांचा संग्रह) (संपादन) | ||
२० | सौंदर्यरस
नूतन प्रकाशन पुणे |
१९८० |
गौरवग्रंथ
[संपादन]सहस्रबुद्धे यांच्या षष्ट्यब्दीला, म्हणजे १९६४ साली, ’डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे : व्यक्तिदर्शन आणि साहित्यविवेचन’ नावाचा दोन-खंडी ग्रंथ डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे सत्कार समितीने प्रसिद्ध केला. [१०]त्याचे संपादन प्रा. व.दि. कुलकर्णी, प्रा. भी. ब. कुलकर्णी, प्रा. स. ह. देशपांडे आणि प्रा. गं. म. साठे यांनी केले होते. या ग्रंथात सहस्रबुद्धे यांचा ‘वाणी आणि लेखणी’[११] हा एक छोटा आत्मचरित्रवजा लेख आहे.
'वादसभा'[१२]- स. प. महाविद्यालय, पुणे, दरवर्षी कै. पु. ग. सहस्रबुद्धे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा [१३]आयोजित करते. [१४] हा उपक्रम २००२-०३, पासून चालू आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ a b देशपांडे स. ह (१९८४). "डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे - विचार दर्शन".
- ^ कुलकर्णी, अ. र. "सहस्त्रबुद्घे, पुरुषोत्तम गणेश".
- ^ वष्ट जयंत. "सहस्रबुद्धे, पुरुषोत्तम गणेश".
- ^ वष्ट जयंत. "सहस्रबुद्धे, पुरुषोत्तम गणेश".
- ^ सहस्रबुद्धे पु. ग. (१९८८). विज्ञान -प्रणीत समाजरचना. मुंबई: मधुवन ग्रंथ प्रकाशन.
- ^ वष्ट, जयंत (2009). डॉ. सुभाष भेण्डे, डॉ. चंद्रकांत वर्तक (ed.). शिल्पकार चरित्रकोश खंड २. मुंबई: हिंदुस्थान प्रकाशन संस्था. pp. 627, 628, 629, 630.
- ^ "पु. ग. सहस्रबुद्धे".
- ^ "डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे विचारमंच".
- ^ कुलकर्णी, अ. र. "सहस्त्रबुद्घे, पुरुषोत्तम गणेश".
- ^ कुलकर्णी व. दि., देशपांडे स. ह., कुलकर्णी भी. ब., साठे गं. म. (ed.). "डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे: व्यक्तिदर्शन आणि साहित्यविवेचन (संपादित)". डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे विचारमंच.CS1 maint: multiple names: editors list (link)
- ^ सहस्रबुद्धे पु. ग. "वाणी आणि लेखणी". डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे विचारमंच.
- ^ "EXTRA CURRICULAR DEBATING UNION".
- ^ "Late Dr. P. G. Sahasrabuddhe Elocution Competition" (PDF).
- ^ "स. प. महाविद्यालयातपु. ग. सहस्रबुद्धे व्याख्यान".