नाथ पै
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | इ.स. १९२२ | ||||
|---|---|---|---|---|---|
| |||||
बॅरिस्टर नाथ बापू पै (जन्म : वेंगुर्ला, २५ सप्टेंबर १९२२; - १८ जानेवारी १९७१) हे एक मराठी स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ होते. भारतीय लोकसभेचे ते सभासद होते. ते एक फर्डे वक्ते होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांच्या वक्तृत्वाने सभेची रंगत वाढत असे.
नाथ पै हे मराठी-इंग्रजीखेरीज फ्रेंच-जर्मन बोलत. त्यांची पत्नी ऑस्ट्रियन होती.त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल डॉकयार्ड रोड सिग्नल ते गोपाळ महादेव नाईक चौक ह्या रस्त्याला बँरिस्टर नाथ पै मार्ग हे नाव दिलेले आहे.
बालपण व शिक्षण
[संपादन]बँ.नाथ पै ह्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे दिनांक २५ सप्टेंबर १९२२ रोजी झाला.त्यांचे पाळण्यातील नाव पंढरीनाथ होते.त्यांच्या वडिलांचे नाव अनंतराव होते.ते पोस्टात नोकरी करीत होते.परंतु पोस्ट खात्यातील एकसारख्या होणाऱ्या बदलीला कंटाळून त्यांनी नंतर शिक्षकी पेशा पकडला. नाथ पै ह्यांचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ला येथे झाले. माध्यमिक शिक्षण त्यांनी बेळगाव येथे घेतले. ते अत्यंत हुशार असल्याने त्यांनी एकाच वर्षात तीन इयत्तांच्या परीक्षा दिल्या होत्या. इसवी सन १९४० साली ते मँट्रिक झाले. त्यांनी पुढील शिक्षणासाठी बेळगाव येथील लिंगराज महाविद्यालयात प्रवेश घेतला. नंतर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी इंटरमिजिएट साठी प्रवेश घेतला. पुढे स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी त्यांनी शिक्षण बाजूला ठेवून इसवी सन १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनात भाग घेतला. त्यांना अकरा महिने अंधार कोठडी आणि काही काळ तुरुंगवास अशी शिक्षा भोगावी लागली. पुढे त्यांनी इसवी सन १९४७ साली शिक्षण पुन्हा चालू करून ते बी.ए.झाले. नंतर ते इंग्लंडमध्ये गेले व त्यांनी बँरिस्टर ही पदवी प्राप्त केली. तेव्हा त्यांनी युरोपातील अनेक देशांना भेटी दिल्या. युरोपियन देशात फिरत असताना त्यांची व्हिएन्ना येथे क्रिस्टल मुशेल हिच्याशी मैत्री झाली आणि नंतर त्यांनी तिच्याबरोबर लग्न केले.
कारकीर्द
[संपादन]भारतात त्यांनी गोवा मुक्ती, संयुक्त महाराष्ट्र व बेळगाव सीमाप्रश्न ह्या विषयांवर लक्ष केंद्रित केले. इसवी सन १९५७ साली ते लोकसभा निवडणुकीत मोरोपंत जोशी ह्यांचा पराभव करून रत्नागिरी मतदारसंघातून (तत्कालीनराजापूर) खासदार म्हणून निवडून आले.त्यांनी केंद्रीय सरकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष असताना कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवून घेतला. कोकण रेल्वे हे नाथ पै ह्यांचे स्वप्न त्यांच्या हयातीत पूर्ण झाले नाही. ते स्वप्न मधु दंडवते व जॉर्ज फर्नांडिस ह्यांनी ते केंद्रीय सत्तेत असताना पूर्ण केले. नाथ पै उत्कृष्ट संसदपटू होते आणि त्यांनी मॉस्को येथे जागतिक पार्लमेंटरी परिषद मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. इसवी सन १९६२ मध्ये ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी पोर्तुगीज करीत असलेल्या गोवा येथील दडपशाहीबद्दल केंद्र सरकारला नियमितपणे माहिती दिली.इसवी सन १९६७ मध्ये ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. राज्यघटनेत असलेले ३५९ कलम हे लोकशाहीची दडपशाही असल्याने ते रद्द करण्यासाठी त्यांनी सुचवले होते. [१]
स्मारक
[संपादन]पुणे शहरात राष्ट्र सेवा दलातर्फे साने गुरुजी स्मारक येथे नाथ पै यांच्या स्मरणार्थ ’बॅ. नाथ पै रंगमंच’ नावाचे छोटे नाट्यगृह उभारले आहे. त्याचे उद्घाटन मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी २ एप्रिल २०१३ रोजी केले.
नाथांच्या कर्मभुमित म्हणजे तत्कालीन राजापूर मतदारसंघातील मालवण तालुक्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून ४०वर्षां पूर्वी ‘बॅ.नाथ पै सेवांगण ही सेवाभावी संस्था उभारून नाथांच्या विचारांचे उचित स्मारक निर्मिले आहे.सेवांगणच्या अंतर्गत साथी दादा शिखरे सभागृह,एस् एम् जोशी संकुल,मधुबन अतिथी गृह,कृष्णाई भोजनकक्ष अश्या वास्तू उभारण्यात आल्या असून कौटुंबिक सल्ला केंद्र,साने गुरुजी वाचन मंदिर,साथी ज्ञानेश देऊलकर जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र,बाल विकास प्रकल्प,प्रा.मधु दंडवते सेवानिधी,साथी बबन डिसोजा शिक्षण निधी, साथी मधु वालावलकर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार ,बॅ.नाथ पै पुरस्कार,मालवणी बोली भाषा संरक्षण,संगोपन,संवर्धन केंद्र,मोफत अन्नछत्र हे आणि असे अनेकविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
लिहिलेली पुस्तके
[संपादन]- लोकशाहीची आराधना
चरित्रग्रंथ
[संपादन]- महाराष्ट्राचे शिल्पकार बॅ.नाथ पै. (लेखक : जयानंद मठकर) (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)
संदर्भ व नोंदी
[संपादन]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ↑ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, मंगळवार,१९ नोव्हेंबर २०२४