महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बालभारती या पानावरून पुनर्निर्देशित)


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत २७ जानेवारी १९६७ रोजी स्थापन केलेली संस्था आहे. महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमासंबंधी संशोधन करणे, त्यानुसार शालेय अभ्यासक्रम तयार करणे, या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करणे आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी व योग्य दरात तसेच वेळेवर पुस्तके उपलब्ध व्हावीत अशा पद्धतीने मुद्रण आणि वितरणाची व्यवस्था करणे ही कार्ये ही संस्था करते. संस्थेचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. तसेच औरंगाबाद आणि नागपूर येथे संस्थेची विभागीय कार्यालये आहेत. ‘बालभारती’ या नावानेही ती ओळखली जाते.

कार्य[संपादन]

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे बालभारती प्रकाशनाद्वारे इयत्ता पहिली ते बारावीची सर्व विषयांची मिळून जवळपास चार कोटी पाठ्यपुस्तके छापून वितरित करते.[१] पुस्तकांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्यात सध्या नऊ भांडारे आहेत. निरीक्षण, निवेदन, वर्गीकरण, तुलना, सहसंबंध, कार्यकारणभाव, उपयोजन, प्रयोगकौशल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, अनुमान काढणे, या क्षमता आत्मसात कराव्या, तसेच विज्ञानाच्या अभ्यासातून आवश्यक ते जीवन कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे, असा व्यापक दृष्टिकोन या पुस्तकनिर्मितीमागचा आहे.[२]

बालभारती[संपादन]

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ अर्थात बालभारती २७ जानेवारी रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.गेल्या पन्नास वर्षाच्या काळात नवीन शैक्षणिक विचारप्रणाली, कालसुसंगत शैक्षणिक धोरणे, नवीन अध्ययन- अध्यापन पद्धती अशा विविध बाबींचा विचार करून बालभारतीने पाठ्यपुस्तकांच्या स्वरूपात, आशयात अनेक बदल केले आहेत. कालानुरूप बदलाची ही प्रक्रिया आजही सुरु आहे.

    शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम आहे, तर पाठ्यपुस्तक हे ज्ञानप्राप्ती व शिक्षणाचा प्रसार करण्याचे प्रमुख साधन आहे. पाठ्यपुस्तके हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्या मनाचाएक कोपरा लहानपणी शिकलेल्या पाठ्यपुस्तकांसाठी कायम राखीव असतो. लहानपणी शिकलेल्या कथा, कविता, चित्रे यांचा एक विलोभनीय ठसा मनावर उमटलेला असतो. पाठ्यपुस्तकांतून भाषेचे, साहित्याचे आणि वाचनाचे संस्कार तर होतातच, शिवाय जीवनाचे, जगण्याचे अनेक संस्कारही याच पाठ्यपुस्तकांतून होत असतात.अशी ही आयुष्यभर साथसंगत करणारी, उत्तम संस्कारांची शिदोरी देणारी पाठ्यपुस्तके बालभारतीत तयार होतात.दरवर्षीअंदाजे 19 कोटी पुस्तकांची छपाई करून त्यांचे वितरणबालभारती मार्फत केले जाते. पाठ्यपुस्तकांची निर्मितीही खडतर आणि विलक्षणप्रक्रिया आहे.प्रतिवर्षी एकाचवेळी राज्यातील लाखाहूनअधिकशाळांमधील शिक्षक, कोट्यवधी विद्यार्थी आणि तितकेच पालक यांच्याशी आपुलकीच्या अतूट धाग्यांनी बालभारतीजोडली गेली आहे. 

मंडळाची स्थापना स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकात देशातील शैक्षणिक वाटचाल दिशाहीन होती. अनेक जाती, अनेक भाषा, विविध रूढी, परंपरा इत्यादींमुळे सामाजिक आणि शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी नेमके काय स्वीकारावे, काय स्वीकारू नये, याबाबत निश्चित दिशा आणि धोरण नव्हते. वेगवेगळ्या राज्यांतील भाषाविषयक धोरण, शैक्षणिक आकृतिकंध, अभ्यासक्रम यामध्ये एकसमान असे सूत्रही नव्हते. कोठारी आयोगाने शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवून आणली.पाठ्यपुस्तक मंडळाच्या स्थापनेपूर्वी शाळांमध्ये खाजगी प्रकाशकांची पुस्तके वापरात होती. या पुस्तकाचा दर्जा, किमती मधील तफावत, त्यांची उपलब्धता, शाळेत पुस्तक लावताना होणारे गैरव्यवहार याबाबींची दखल कोठारी आयोगाने घेतली. दर्जेदार आणि रास्त किमतीमधील पुस्तके मुलांना वेळेत मिळावी यासाठी राज्याने स्वायत्त संस्था निर्माण करावी अशी शिफारस करण्यात आली. शालेय पाठ्यपुस्तकांचे राष्ट्रीयीकरण झाले. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार 27 जानेवारी 1967 रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे या संस्थेची स्थापना झाली. याचे उद्‌घाटन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते 2 फेब्रुवारी 1967 रोजी झाले. मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष या नात्याने तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांचे संस्था उभारणीत आणि मंडळाचे पहिले संचालक उत्तमराव सेवलेकर आणि पहिले नियंत्रक बापूराव नाईक यांचे संस्थेच्या प्रारंभीच्या वाटचालीत मोलाचे योगदान राहिले. राज्यातील प्राथमिक स्तरावर शिक्षण घेणार्‍या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा व इतर सर्व विषयांची पाठ्यपुस्तके तयार करून वितरित करणे हे मंडळाचे मुख्य उद्‌दिष्ट आहे. मराठी बालभारती इयत्ता पहिली हे मंडळाचे पहिले पुस्तक 1968 साली प्रकाशित झाले. आजपर्यंत बालभारतीच्या पाच माला प्रकाशित झाल्या असून २०१३ पासून सहाव्या मालेचे प्रकाशन सुरु आहे. आठ भाषा माध्यमातून सर्व विषयांची पाठ्यपुस्तके तयार करणारे मंडळ हे बालभारतीचे वैशिष्ट्य आहे.1968 पासून पाठ्यपुस्तक मंडळ दर्जेदार, संस्कारक्षम आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी पाठ्यपुस्तके अल्प किमतीत उपलब्ध करून देत आहे.गेल्या पन्नास वर्षाच्या काळात नवीन शैक्षणिक विचारप्रणाली, कालसुसंगत शैक्षणिक धोरणे, नवीन अध्ययन- अध्यापन पद्धती अशा विविध बाबींचा विचार करून पुस्तकांच्या स्वरूपात, आशयात अनेक बदल करण्यात आले आहेत. कालानुरूप बदलाची हीप्रक्रिया आजही सुरु आहे.

    संस्थेचे नाव महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ असे असले, तरी `बालभारती' या नावाने प्रकाशित होणारी भाषेची पाठ्यपुस्तके अल्पावधीतच इतकी लोकप्रिय झाली, की मंडळ `बालभारती' याच नावाने ओळखू लागले.पाठ्यपुस्तक प्रकाशन क्षेत्रातील एक पायाभूत स्वायत्त संस्था असा मंडळाचा उल्लेख करावा लागेल. मंडळाने स्थापनेपासूनच संस्कारक्षम , आकर्षक व दर्जेदार पाठ्यपुस्तक तयार करण्याचे व्रत घेतले. अनेक अडचणींवर मात करून शिक्षण क्षेत्रातील पाठ्यपुस्तक प्रकाशनाचा पाया मजबूत केला. निव्वळ मुलांवरील प्रेमापोटी राज्यातल्या अनेक ख्यातनाम लेखक, कलावंत आणि विचारवंतानी बालभारतीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. कल्पना कार्यक्षमता व कर्तृत्व यांचा एक सुंदर त्रिवेणी संगम मंडळाच्या आजवरच्या प्रवासात दिसून येतो.   
                   पाठ्यपुस्तक मंडळाची रचना

पाठ्यपुस्तक मंडळ हे राज्यशासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. राज्याचे शिक्षणमंत्री हे या संस्थेचे पदसिद्‌ध अध्यक्ष असतात. संस्थेचे सर्व धोरणात्मक निर्णय नियामक मंडळात घेतले जातात.पाठ्यपुस्तके तयार करण्याचे मुख्य कामविद्याविभागात चालते. विद्याविभागांतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती या आठ भाषा आणि इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण असे एकूण 14 विभाग आहेत.

                      विषय समित्या 

पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी विषयवार समित्याअसतात. मंडळातील त्या त्या विषयाचे अधिकारी विषय समित्यांमध्ये सदस्य-सचिव म्हणून काम करतात. जुन्या अभ्यासक्रमाच्या जागी नवीन अभ्यासक्रम येऊन पाठ्यपुस्तके बदलली जात नाहीत, तोपर्यंत या समित्या कार्यरत असतात.पाठ्यपुस्तके तयार करणे ही जटील प्रक्रिया आहे.. मुलांचा वयोगट, त्याचं भावविश्व, त्यांची आकलन क्षमता, मजकुराची काठिण्यपातळी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पाठ्यविषयांची निवड करणे आणि सोप्या भाषेत त्यांचे लेखन करणे हे एक प्रकारचे दिव्यच असते.

                      अमराठी पुस्तके

राज्यात मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबरच अमराठी माध्यमांच्या शाळांची संख्या लक्षणीय आहे. उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू इत्यादी मातृभाषा असणारे अनेक अमराठी भाषक महाराष्ट्रात राहतात. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून शासनाने अमराठी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यास राज्यात परवानगी दिली आहे. या मुलांसाठी त्यांच्या मातृभाषेतील पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारतीच करते. इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित इत्यादी विषयांची पुस्तके मराठीतून तयार झाल्यानंतर ती अन्य अमराठी भाषांत अनुवादित केली जातात. हीच पुस्तके या शाळांमध्ये अभ्यासली जातात.

                     पाठ्येतर प्रकाशने 

पाठ्यपुस्तकांची निर्मिती व वितरण हे पाठ्यपुस्तक मंडळाचे मुख्य कार्य असले, तरी मंडळाने शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी अन्य उपयुक्त साहित्याचीही निर्मिती केली आहे. आदर्श शिक्षकांची आत्मचरित्रे, उत्तम संस्कारकथा, ग्रामगीता, गांधीजींची आत्मकथा-माझे सत्याचे प्रयोग, कथा स्वातंत्र्याची, शिल्पकार स्वातंत्र्याचे, स्फूर्तिगीते, माहीत आहे का तुला?, मराठी शब्दार्थकोश, गोष्ट स्वातंत्र्यलढ्याची, बालगोष्टी, बालगीते इत्यादी पाठ्येतर प्रकाशनांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद आहे.

                    किशोर (मुलांचे मासिक)

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी (14 नोव्हेंबर 1971 रोजी) 8 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी `किशोर' हे मासिक मंडळाने सुरू केले. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्‌दिष्टे ठेवून किशोर मासिक चालवले जाते. गेल्या 44 वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे ज्ञान-विज्ञाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक चित्रकार, कवी लेखक यांना मासिकाने घडवले आहे. 40 वर्षांतील किशोरमधील उत्तम निवडक साहित्य 14 खंडांत प्रकाशित झाले आहे.

                      अद्ययावत ग्रंथालय

पाठ्यपुस्तकांची निर्मिती करताना अनेक संदर्भग्रंथांची आवश्यकता भासते. यासाठी बालभारतीने स्वतःचे समृद्‌ध असे ग्रंथालय विकसित केले आहे. अद्ययावत आणि अत्यंत दुर्मिळ असे अनेक संदर्भग्रंथ इथे उपलब्ध आहेत. बालभारतीत आठ भाषांमध्ये पाठ्यपुस्तके तयार होत असल्यामुळे ग्रंथायात आठही भाषांमधील विपुल ग्रंथसंपदा आहे. प्रतिवर्षी नवनवीन ग्रंथांची यात भर पडत असते. ग्रंथांबरोबरच आठ भाषांमधील व अन्य विदेशी भाषांमधील असंख्य नियतकालिकेही मागवली जातात. संपूर्ण देशात बालभारतीची रचना आणि कार्यपद्‌धती आदर्शवत आहे.गुणवत्ता व दर्जा याबाबतीतसुद्‌धा मंडळाची पाठ्यपुस्तके मागे नाहीत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मंडळनिर्मित पाठ्यपुस्तकाची गणुवत्ता व दर्जा उत्कृष्ट असल्याबाबतची प्रमाणपत्रे मिळाली आहेत. किशोर या मासिकालाही भारत सरकारचे गुणवत्ता प्रमाणपत्र व मुद्रण स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त झाले आहे. आजही देश-विदेशातील मंडळे बालभारतीला भेट देण्यासाठी येतात आणि येथील रचना आणि कार्यपद्‌धती त्यांच्याकडे सुरू करण्याच्या दृष्टीने विचार करतात, यातच बालभारतीचे यश दडलेले आहे. बदलत्या काळानुसार आता बालभारतीही बदलते आहे. आधुनिक ज्ञान-तंत्रज्ञान यामुळे पारंपरिक पाठ्यपुस्तकांचे स्वरूप बदलण्यासाठी व नवी आव्हाने पेलण्यासाठी बालभारती आता सज्ज झाली आहे.

    पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी विषयवार समित्या असतात. मंडळातील त्या त्या विषयाचे अधिकारी विषय समित्यांमध्ये सदस्य-सचिव म्हणून काम करतात. जुन्या अभ्यासक्रमाच्या जागी नवीन अभ्यासक्रम येऊन पाठ्यपुस्तके बदलली जात नाहीत, तोपर्यंत या समित्या कार्यरत असतात.पाठ्यपुस्तके तयार करणे ही जटील प्रक्रिया आहे.. मुलांचा वयोगट, त्याचं भावविश्व, त्यांची आकलन क्षमता, मजकुराची काठिण्यपातळी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पाठ्यविषयांची निवड करणे आणि सोप्या भाषेत त्यांचे लेखन करणे हे एक प्रकारचे दिव्यच असते. अमराठी पुस्तके राज्यात मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबरच अमराठी माध्यमांच्या शाळांची संख्या लक्षणीय आहे. उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू इत्यादी मातृभाषा असणारे अनेक अमराठी भाषक महाराष्ट्रात राहतात. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून शासनाने अमराठी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यास राज्यात परवानगी दिली आहे. या मुलांसाठी त्यांच्या मातृभाषेतील पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारतीच करते. इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित इत्यादी विषयांची पुस्तके मराठीतून तयार झाल्यानंतर ती अन्य अमराठी भाषांत अनुवादित केली जातात. हीच पुस्तके या शाळांमध्ये अभ्यासली जातात.

किशोर[संपादन]

किशोर (मासिक) किशोर (मुलांचे मासिक) पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी (14 नोव्हेंबर 1971 रोजी) 8 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी `किशोर' हे मासिक मंडळाने सुरू केले. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्‌दिष्टे ठेवून किशोर मासिक चालवले जाते. गेल्या 44 वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे ज्ञान-विज्ञाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक चित्रकार, कवी लेखक यांना मासिकाने घडवले आहे. 40 वर्षांतील किशोरमधील उत्तम निवडक साहित्य 14 खंडांत प्रकाशित झाले आहे. सदयाच्या काळातील किशोर मासिक कालानुरूप संस्कार घडवत आहे.

संचालक[संपादन]

संचालक महिना वर्ष महिना वर्ष
सु. ना. पवार महिना वर्ष महिना वर्ष

विवाद[संपादन]


आपल्या छपाई यंत्रणेत आमूलाग्र बदल करण्यासाठी पाठ्यपुस्तकांची छपाई (राज्याबाहेरील) खासगी प्रकाशकांकडे सोपविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने घेतला असून त्यामुळे राज्यातील सुमारे ४०० मुद्रक-प्रकाशकांवर उपासमारीची वेळ आली आहे.[३]

सदर महामंडळाच्या घटनेमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर पुस्तके छपाईसाठी द्यावयाची नाहीत, असा उल्लेख असल्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर पुस्तके छपाईसाठी दिली जात नव्हती. तसेच पुस्तके छपाई करून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे ४०० मुद्रक व बांधणीकारांची नोंदणी झालेली आहे. महामंडळाने प्रत्येक मुद्रकाकडून किमान १ लाख ते ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कायम ठेव अनामत म्हणून ठेवून घेतलेली आहे. त्याशिवाय हमीसाठी लाखो रुपयांची बँक हमी प्रत्येक मुद्रकाकडून घेतलेली आहे. त्यांमध्ये मुद्रण करणारे व बांधणी करणारे असे दोन विभाग पाडलेले आहेत व त्यावर विभागीय मंडळाद्वारे देखरेख ठेवली जाते. सुमारे १० वर्षांपूर्वी बालभारतीने नवीन तंत्रज्ञान म्हणजे वेब मशीनवर मुद्रण करणे व पुस्तके परफेक्ट बायंडिंग करून घेण्याचे ठरविले. त्यामुळे काही मुद्रकांनी बालभारतीच्या भरवशावर नवीन वेब मशीन व परफेक्ट बायंडिंग यंत्रे खरेदी केली व लाखो रुपये गुंतवले.

पूर्वी खिळ्याच्या छपाई (ट्रेडल) मशीनचा काळ होता. हळूहळू ती पद्धत मागे पडून ऑफसेटचा जमाना आला. शीटफीड मशीनवर ८ तासांमध्ये २५ ते ३० हजार इंप्रेशन्सची एक बाजू छपाई होते. परंतु आता नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे ज्या वेब मशीन आल्या आहेत, त्यावर आठ तासांमध्ये जवळजवळ ६० ते ८० हजार इंप्रेशन्सची पाठपोट छपाई होते. मात्र आर्थिक गुंतवणूक दोघांनाही सारखीच असते. त्यामुळे शीटफीडपेक्षा २५ ते ४० टक्के कमी दराने वेब मशीनवाले काम करू शकतात. मात्र त्यासाठी वेब मशीनवाल्यांना किमान सहा महिने सारखे काम मिळण्याची खात्री असणे आवश्यक असते. परंतु त्यादृष्टीने बालभारती, एस.एस.सी. बोर्ड, विद्यापीठ इत्यादी संस्थांना वेब तंत्रज्ञानाचे महत्त्व पटलेले नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये वेब मशीनची व्याप्‍ती वाढू शकली नाही. सध्या बालभारतीकडे जे मुद्रक नोंदलेले आहेत, त्या सर्वांकडे ६१० बाय ४३० कटऑफची यंत्रे आहेत. त्यामुळे बालभारतीने पुस्तकांचा साईज बदलल्यास सध्याची वेबमशीने निरुपयोगी ठरतील व ५७८ कटऑफची मशीने खरेदी करावी लागतील. त्यामुळे कोणत्या कटऑफसाठी बालभारती कागद देणार आहे, याचा निर्णय होणे आवश्यक आहे. फक्त बाहेरच्या मोठ्या उद्योगपतींना काम देण्यासाठी पुस्तकाची साईज तडकाफडकी बदलणे कितपत योग्य आहे, याचाही विचार होणे आवश्यक आहे. बालभारती स्वतः कागद खरेदी करून सर्व मुद्रकांना त्याचा पुरवठा करते. बालभारती कागदाची खरेदी निविदा पद्धतीने करते. निविदेमध्ये कोणत्या मिलचा कागद पाहिजे याचा उल्लेख नसतो. त्यामुळे बऱ्याच वेळा कमी दर्जाच्या कागदाचे दर काही व्यापारी भरतात व कमी दराची निविदा मंजूर केली जाते, त्या कारणाने कागद उत्तम क्वालिटीचा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. इतर राज्यांमध्ये उत्कृष्ट दर्जाची पुस्तके छपाई केली जातात, असे शिक्षण खात्याच्या शिष्टमंडळाच्या निदर्शनास आले आहे. परंतु त्यासाठी आताचा जो पर्याय सुचविला आहे तो कितपत योग्य आहे, हा मूळ प्रश्न आहे. कारण जर उत्तम प्रकारच्या कागदावर छपाई करून पाहिजे असेल तर बालभारतीने उत्तम प्रकारचा कागद खरेदी करून मुद्रकांना दिला पाहिजे. तरच ते चांगली छपाई करू शकतील.

खुल्या दराने निविदा मागविण्याबाबतची जी योजना पुढे आलेली आहे त्या एकमेव कारणाने वर्षानुवर्षे जे ४०० मुद्रक काम करीत आहेत, त्यांना रस्त्यावर सोडणे योग्य नाही. कारण ४०० लोकांना आपण रस्त्यावर सोडल्यास ज्या रितीने गिरणी कामगार बेकार झाले त्याचप्रमाणे या ४०० मुद्रकांवरही तशीच पाळी येईल. एका प्रेसमध्ये ५० कामगार गृहीत धरले तर २०,००० पेक्षा जास्त कुटुंबे रोजीरोटीविना बेकार होतील. या गोष्टींचाही शासनाने विचार करणे आवश्यक आहे. कारण जे व्यापारी लाखो रुपयांची गुंतवणूक करून बालभारतीचे इमानेइतबारे काम करीत आहेत, त्यांचे एका आदेशाने परवाने रद्द करणे योग्य नाही. तसेच बालभारतीने त्यांना त्यांची नोंदणी करून कामाची खात्री दिलेली आहे. या परिस्थितीमध्ये नवीन योजना राबविताना जुने मुद्रक व बांधणीकार बेकार होणार नाहीत, याचाही विचार शासनाने केला पाहिजे व त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजे.

आज मुद्रण व बांधणी व्यवसायाची वस्तुस्थिती अशी आहे की, वर्षामध्ये सहा-सात महिने काम असते व इतर चार ते पाच महिने बसून राहावे लागते. त्याशिवाय कामगारांची जबाबदारी, नवीन कर व कायदे या सर्वांमधून मुद्रक पुढे येऊ शकत नाहीत व नवीन तंत्रज्ञानामुळे जुनी मशीने मागे पडतात. ती मशीने विकायची झाली तर भंगारमध्ये विकावी लागतात. छपाई क्षेत्रामध्ये छपाई दर गेल्या दहा वर्षांत न वाढता तो स्पर्धेमुळे कमी कमी होत गेला आहे. त्यामुळे छपाई मशीनांना री-सेल व्हॅल्यू मिळत नाही. या सर्व परिस्थितीमधून मुद्रकांना छपाईचा व्यवसाय बंद करावयाचा म्हटला, तरी सोपे नाही. सध्या जागतिक मंदी असून स्पर्धात्मक युग चालू आहे. तरी जुनी नोंदणी झालेल्या मुद्रकांना त्यांची नोंदणी एकदम रद्द न करता त्यामधून काहीतरी तोडगा काढणे आवश्यक आहे. बालभारतीने १० वर्षांपूर्वी ज्या वेळी वेबमशीनवर काम देण्याचे चालू केले त्या वेळी हळूहळू नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे कामाची व्याप्‍ती वाढविली असती व वेबमशीनसाठी वेगळे दर निश्चित केले असते तर ही वेळ आली नसती. परंतु बालभारतीने नेहमी वेबमशीनकडे दुर्लक्ष केले व त्यांना नावापुरते काम दिले गेले. आजसुद्धा बालभारतीकडे काही वेबमशीनवाले आहेत व त्यांची क्षमताही मोठी आहे. प्रत्येक वेबमशीनची दरवर्षी २५ लाख ते एक कोटी पुस्तके छपाई करून देण्याची क्षमता असल्याने बालभारतीने आपले काम महाराष्ट्रातच करून घेतले पाहिजे व त्यासाठी त्या वेबमशीनवाल्यांना एकत्र बोलावून चर्चा केल्यास कमी दरात ते काम करायला तयार होऊ शकतील. कारण वेबमशीनवाल्यांना कमी दर परवडू शकेल. मात्र शीटफीड मशीनवाल्यांना कमी दर परवडणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. या पुस्तकांच्या कामासाठी खुल्या निविदा मागविण्यात येणार असल्याने महाराष्ट्राबाहेरील लोकही यात सहभागी होतील असा अंदाज आहे, परंतु आर्थिकदृष्ट्या विचार केला तर ज्या दराने महाराष्ट्राबाहेरील लोक काम करून देणार आहेत, त्याच दराने व त्याच प्रतीचे काम ठरलेल्या मुदतीत देण्याची क्षमता महाराष्ट्रातील मुद्रक व बांधणीकारांमध्ये आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान इत्यादी राज्यांमध्ये खुल्या पद्धतीने निविदा काढण्यात येतात. कागद महामंडळ पुरविते व निविदा उघडून दर महामंडळ ठरविते. त्यानंतर ज्याची क्षमता असेल त्याप्रमाणे त्याला कामाची ऑर्डर दिली जाते. परंतु बालभारतीने महाराष्ट्रामध्ये सर्व मुद्रक व बांधणीकारांची पुनर्नोंदणी केली असून बँक गॅरंटीही मागून घेतलेली आहे. त्यामुळे या नोंदणीकृत मुद्रक व बांधणीकारांची नोंदणी रद्द न करता त्यामध्ये सुवर्णमध्य शोधून काढणे आवश्यक आहे. याबाबतीत नोंदणी झालेल्या सर्व मुद्रक व बांधणीकारांकडून दरपत्रक मागवावे, तसेच खुल्या निविदांप्रमाणेही दरपत्रक मागवावे व त्यानंतर बालभारतीने दर ठरवावेत व त्या दरामध्ये नोंदणीकृत मुद्रक व बांधणीकारांना काम करण्याची संधी द्यावी. अशा रितीने नोंदणी झालेल्या मुद्रकांकडून बालभारतीला पुरेशी पुस्तके उपलब्ध झाल्यास महाराष्ट्राबाहेर काम देण्याचा प्रश्नच उद्‌भवणार नाही.

बालभारतीकडे ज्या मुद्रक व बांधणीकारांची नोंदणी झालेली आहे, त्यापैकी बहुतेक लहान व्यापारी असून महाराष्ट्र राज्याकडून लघुउद्योगाखाली नोंदणी झालेले आहेत. त्यापैकी बरेच मुद्रक व बांधणीकार बँकेकडून कर्ज घेऊन आपला व्यवसाय चालवीत आहेत. जर त्यांचे परवाने रद्द केले तर ते कर्जबाजारी होऊन आयुष्यातून उठण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या नोंदणी झालेल्या उद्योजकांना काम देताना अग्रक्रम दिला पाहिजे. शासनाने आर्थिक फायद्याच्या दृष्टिकोनातून अवश्य पहावे व बालभारतीचा फायदा अवश्य करून द्यावा, परंतु त्यासोबत नोंदणी झालेल्या मुद्रक व बांधणीकार तसेच त्यांच्या कामगारांच्या पोटावर पाय येणार नाही याची काळजी घेणेही गरजेचे आहे.

हेसुद्धा पहा[संपादन]

पत्ता[संपादन]

BALBHARATI Senapati Bapat Marg Pune 4.

अधिकृत संकेतस्थळ[संपादन]

www.ebalbharati.in

संदर्भ[संपादन]

 1. http://origin.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3107939.cms ची कॅश आहे. 3 Sep 2009 04:43:05 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
 2. http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=NagpurEdition-2-1-31-08-2009-26444&ndate=2009-08-31&editionname=nagpur ची कॅश आहे. 13 Oct 2009 16:28:29 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
 3. http://www.loksatta.com/old/daily/20031107/extra.htm[मृत दुवा]ची कॅश आहे. 19 Aug 2009 23:22:35 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.