अभय बंग
| अभय बंग | |
|---|---|
|
| |
| जन्म |
अभय ठाकुरदास बंग २३ सप्टेंबर, १९५० वर्धा, महाराष्ट्र |
| निवासस्थान | शोधग्राम, गडचिरोली |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| शिक्षण | एम.बी.बी.एस., एम.डी., एम.पी.एच. |
| प्रशिक्षणसंस्था | जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, बाल्टिमोर, अमेरिका |
| पेशा | वैद्यकीय संशोधक, सामाजिक कार्यकर्ते |
| कारकिर्दीचा काळ | १९८५ पासून |
| जोडीदार | राणी बंग |
| अपत्ये | आनंद, अमृत |
| वडील | ठाकुरदास बंग |
| आई | सुमन बंग |
| पुरस्कार | महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२००३), पद्मश्री पुरस्कार (२०१८) |
|
संकेतस्थळ http://www.searchgadchiroli.org/ | |
अभय बंग (जन्म: २३ सप्टेंबर १९५०) हे मराठी वैद्यकीय संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते सर्च या संस्थेमार्फत गडचिरोली येथे ग्रामीण आणि आदिवासी भागात वैद्यकीय सेवा, संशोधन आणि सामाजिक कार्य करतात. त्यांच्या बालमृत्यू नियंत्रणावरील संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली असून, भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश आणि अनेक आफ्रिकन देशांमध्ये त्यांचे मॉडेल वापरले जाते. त्यांचे लेख वैद्यकीय नियतकालिक द लॅन्सेट मध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तकही प्रसिद्ध आहे.
बालपण
[संपादन]अभय बंग यांचा जन्म वर्धा येथे गांधीवादी कार्यकर्ते ठाकुरदास बंग आणि सुमन बंग यांच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील गांधीजींच्या प्रेरणेने खेड्यांमध्ये कार्यरत होते. अभय यांचे शिक्षण वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात नयी तालीम पद्धतीने झाले.
शिक्षण
[संपादन]त्यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. पदवी तीन सुवर्णपदकांसह मिळवली. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (पी.जी.आय.) येथे काम केले. सार्वजनिक आरोग्याचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, अमेरिका येथून १९८४ मध्ये मास्टर्स इन पब्लिक हेल्थ (एम.पी.एच.) पदवी ९९ टक्के गुणांसह प्रथम क्रमांकाने मिळवली.
वैयक्तिक आयुष्य
[संपादन]अभय बंग यांनी राणी बंग यांच्याशी प्रेमविवाह केला. दोघेही नागपूर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी होते. त्यांना आनंद आणि अमृत ही दोन मुले आहेत. अभय यांचा शांत आणि विचारी स्वभाव, तर राणी यांचा कार्यतत्पर स्वभाव त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी गडचिरोलीसारख्या मागास भागात कार्य करण्याचा निर्णय घेतला आणि शहरी सुखसोयी नाकारल्या.
कार्य
[संपादन]- दारूबंदी चळवळ: अभय बंग यांनी १९८८ मध्ये गडचिरोलीत दारूबंदी चळवळ यशस्वी केली. महिलांच्या जागरण यात्रेतून दारूच्या समस्येवर प्रकाश पडला. १०४ गावांमधील अभ्यासानंतर स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नेत्यांच्या सहकार्याने त्यांनी दारूबंदी लागू केली.
- बालमृत्यू नियंत्रण: त्यांनी नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करून उपाययोजना सुचवल्या. त्यांचे संशोधन लॅन्सेटमध्ये प्रकाशित झाले आणि जागतिक आरोग्य संघटनेने त्याचा स्वीकार केला.
- स्त्री आरोग्य: गडचिरोलीतील दोन गावांमधील संशोधनातून त्यांनी सिद्ध केले की ९२% स्त्रियांना गायनॅकॉलॉजिकल आजार आहेत. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने "मदर अँड चाईल्ड हेल्थ" ऐवजी "वूमन अँड चाईल्ड हेल्थ" ही घोषणा स्वीकारली.
- सिकल सेल रोग: आदिवासींमधील सिकल सेल रोगावर त्यांनी संशोधन केले.
- सर्च संस्था: १९८८ मध्ये स्थापन केलेल्या सर्च संस्थेमार्फत त्यांनी ५८ गावांतील ४८,००० लोकांना वैद्यकीय सेवा पुरवल्या. अशिक्षित महिलांना प्रशिक्षण देऊन आरोग्यदूत म्हणून कार्यरत केले.
संशोधन
[संपादन]अभय बंग यांनी रोजगार हमी योजनेतील किमान मजुरीचा शास्त्रीय अभ्यास करून मजुरी ४ वरून १२ रुपये करण्याचा प्रस्ताव मांडला, जो सरकारने मान्य केला. त्यांचे संशोधन "लोकांसोबत" करण्यावर त्यांचा भर आहे. त्यांनी न्युमोनियाचे बालमृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे सिद्ध केले.
ब्रेथ काउंटर
[संपादन]अभय बंग यांनी विकसित केलेल्या ब्रेथ काउंटर उपकरणामुळे ग्रामीण महिलांना नवजात बालकांच्या न्युमोनियाचे निदान करणे शक्य झाले. यावर त्यांचा शोधनिबंध लॅन्सेटमध्ये प्रकाशित झाला.
कोवळी पानगळ
[संपादन]गडचिरोलीतील कुपोषण आणि नवजात मृत्यूंवरील "कोवळी पानगळ" हा शोधप्रबंध लॅन्सेटमध्ये प्रकाशित झाला. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेला आपले धोरण बदलावे लागले.
प्रभाव
[संपादन]अभय बंग यांच्यावर महात्मा गांधी, लोक आणि विज्ञान यांचा प्रभाव आहे. त्यांचे शिक्षक कार्ल टेलर यांनी "लोकांचे प्रश्न समजून त्यावर काम करा" हा विचार दिला. बंग दांपत्याची लोकांशी संवाद साधण्याची आणि साध्या उदाहरणांतून विषय समजावण्याची पद्धत प्रभावी आहे.
प्रकाशित साहित्य
[संपादन]माझा साक्षात्कारी हृदयरोग (राजहंस प्रकाशन, २००२)
पुरस्कार
[संपादन]- महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२००३)
- पद्मश्री पुरस्कार (२०१८)
- टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची डी.लिट. सन्माननीय पदवी
संदर्भ
[संपादन]- शोध आरोग्याचा - कार्यरत, मॅजेस्टिक प्रकाशन, १९९७ - अनिल अवचट
- माझा साक्षात्कारी हृदयरोग, राजहंस प्रकाशन, २००२ - अभय बंग
- खरेखुरे, युनिक फीचर्स, २००६ - संपादक: सुहास कुलकर्णी, लेख: श्रुती पानसे