अरविंद गोखले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


अरविंद गोखले
जन्म १९१९
मृत्यू ऑक्टोबर २४, १९९२
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा

अरविंद गोखले (जन्म : १९१९ - मृत्यू : ऑक्टोबर २४, १९९२) हे एक मराठी लघुकथा लेखक होते. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे. शिक्षण पुणे व मुंबई येथे बी.एस्‌सी.पर्यंत (१९४०). १९४१ मध्ये ‘दक्षिणा फेलो’ होण्याचा बहुमान त्यांस प्राप्त झाला. पुढे त्यांनी दिल्लीच्या ‘इंपीरिअल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट’मधून सायटोजेनिटिक्सचा अभ्यासक्रम पुरा केला. अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात तांत्रिक वृत्तपत्रविद्येचा अभ्यास करून त्यांनी एम.एस. ही पदवी त्यांनी मिळविली. १९४३ पासून त्यांनी पुण्याच्या शासकीय कृषी महाविद्यालयात संशोधन आणि अध्यापन केले. १९६३ नंतर ते मुंबईच्या धरमसी कंपनीत नोकरी करीत होते.

लेखन[संपादन]

‘हेअर कटिंग सलून’ ही त्यांची पहिली कथा पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या नियतकालिकात इ.स. १९३५मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी साडेतीनशेहून अधिक कथा लिहिल्या. त्यांच्या बर्‍याच कथा, नजराणा (१९४४) ते दागिना (१९७२) पर्यंत प्रसिद्ध झालेल्या पंचवीस कथासंग्रहांत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. ‘कातरखेळ’, ‘मंजुळा’, ‘रिक्ता’, ‘कॅक्टस’, ‘विघ्नहर्ती’ ह्या त्यांच्या काही विशेष उल्लेखनीय कथा होत.

अरविंद गोखले यांच्या अनेक कथांचे यूरोपीय व भारतीय भाषांतून अनुवाद झालेले आहेत. स्वतंत्र कथालेखनाखेरीज काही वेचक अमेरिकन कथांचे अनुवाद त्यांनी केले आहेत; तसेच ना.सी. फडके, वामन चोरघडे, व्यंकटेश माडगूळकर ह्यांच्या निवडक कथांचे संपादन केले आहे. त्यांनी मराठीतील १९५९ ते १९६३ मधील निवडक कथांची वार्षिके प्रसिद्ध केली आहेत. ’अमेरिकेस पहावे जाऊन’ हे अरविंद गोखले यांचे प्रवासवर्णनपर पुस्तक आहे.

अरविंद गोखले यांच्या लघुकथांचे ’अरविंद गोखले यांची कथा’ या नावाने संकलन करून ते भालचंद्र फडके यांनी संपादित करून प्रकाशित केले आहे.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अनवांच्छित काँटिनेंटल प्रकाशन
अनामिका १९६१
अमेरिकेस पहावे जाऊन प्रवासवर्णन
अरविंद गोखले यांची कथा काँटिनेंटल प्रकाशन
कथाई काँटिनेंटल प्रकाशन
कथांतर पॉप्युलर प्रकाशन
कथाष्टके काँटिनेंटल प्रकाशन
केळफूल मेनका प्रकाशन
चाहूल काँटिनेंटल प्रकाशन
जन्मखुणा काँटिनेंटल प्रकाशन
दागिना १९७२
देशांतर पॉप्युलर प्रकाशन
नजराणा १९४४
निर्वाण मेनका प्रकाशन
मंजु़ळा पॉप्युलर प्रकाशन
मिथिला १९५९
शकुंत काँटिनेंटल प्रकाशन
शपथ काँटिनेंटल प्रकाशन
शुभा काँटिनेंटल प्रकाशन १९६०

पुरस्कार[संपादन]

  • अरविंद गोखले यांच्या अनामिका, मिथिला आणि शुभा या तीन कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली आहेत.
  • त्यांच्या ’गंधवार्ता’ ह्या कथेस एन्‌काउंटर ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंग्रजी मासिकाचे आशियाई-अरबी-आफ्रिका कथास्पर्धेचे पारितोषिक मिळाले होते.