ताराबाई शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ताराबाई शिंदे यांचा जन्म इ.स.१८५० व मृत्यू इ.स.१९१० मध्ये झाला. ह्या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत. १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकाच्या त्या लेखिका होत्या.

व्यक्तिगत माहिती[संपादन]

ताराबाई ह्या बुलढाणा येथील रहिवासी होत्या. त्यांचे वडील बापुजी हरी शिंदे हे एक जमीनदार होते. ते सत्यशोधक समाजाचे सभासद होते. ताराबाई शिंदे यांचे भाऊ, रामचंद्र हरी शिंदे जोतिबांच्या कॉन्ट्रक्टिंग कंपनीत भागीदार होते. त्यामुळे ताराबाईंच्या घरात सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे वातावरण होते. [१]

शिक्षणाने त्यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. त्या मराठी, संस्कृत तसेच इंग्रजी शिकल्या. शिक्षणामुळे त्यांना वाचनाची फार आवड होती. स्त्री असूनही घोडा चालवायला शिकल्या. ताराबाई शेतीच्या कामात लक्ष घालीत तसेच कोर्टाचीही कामे करत. ताराबाई स्वभावाने तापट होत्या. ताराबाईना लग्न करण्याची इच्छा नव्हती. पण १९व्या शतकात मराठा समाजातील, शेतकरी कुटुंबातील स्त्रीला लग्न न करता जीवन जगणे शक्य नव्हते आणि विवाहसुद्धा वडील माणसाच्या सांगण्यानुसार करावा लागे. त्यांचे लग्न एका सर्व सामान्य माणसाबरोबर झाले. परंतु त्यांचा संसार सुखाचा झाला नाही. मुलबाळ होऊनही त्या संसारात रमल्या नाही.[२]

स्त्रीपुरुष तुलना[संपादन]

ताराबाईंनी आपल्या पुस्तकात विधवा-विवाहास उच्चवर्णीयांनी केलेली मनाई, तिचे हाल, शिक्षण नसल्याने स्त्रीची होणारी कुचंबणा त्यांच्या भोवताच्या परिस्थितीत त्या बघत होत्या. परंपरेने रूढी संस्कृतीने स्त्रियांना कुटुंबात दिलेले गौण स्थान, सर्व बंधने स्त्रीवर घालण्याची पद्धत, पुरुषांना गरजेपेक्षा दिलेले महत्त्व ताराबाईना पटत नव्हते. त्या काळात घडलेल्या महत्त्वाच्या घटनेने त्यांना प्रेरणा मिळाली. विजयालक्ष्मी या तरुण विधवेवर खटला भरला गेला होता. तिला शिक्षा झाली होती. खटल्याविषयी ताराबाईनी वृत्तातून वाचले. एका स्त्रीची केशवपनासारख्या दुष्ट रूढी, तसेच पुरुषांना अनेक लग्न करण्याची असलेली मुभा या सर्व प्रश्नांवर टीका केलेली दिसते. तत्कालीन महाराष्ट्रातील स्त्री समाजसुधारक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत देखील सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात योगदान दिले. त्यानी स्त्रियांच्या शोषणाविरोधात दिलेला लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेस चालना देणारा होता.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ स्त्रीमुक्तीचा पहिला हुंकार ताराबाई शिंदे -दैनिक नवशक्ती -मुखपृष्ठ महिला दिन विशेष संकेतस्थळ पान दिनांक १३ ऑगस्ट २०१३ भाप्रवे सायं ४ वाजता जसे अभ्यासले
  2. ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तुत्वान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. ४७. ISBN 978-81-7425-310-1.
  3. ^ संपा. फडके य. दि. (१९९१). महात्मा फुले समग्र वाङ्मय. मुंबई: महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ. pp. ७५२.