प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे
Pralhad E Sonkamble
जन्म नाव प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे
जन्म १९४३
सुल्लाळी, उस्मानाबाद
मृत्यू जानेवारी ६, २०१०
[अनुभूती निवास, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद], औरंगाबाद
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र नाटक, साहित्य
चळवळ दलित साहित्य, मराठी साहित्य
प्रसिद्ध साहित्यकृती आठवणींचे पक्षी
वडील ईरबाजी सोनकांबळे
पत्नी कुमुदिनी सोनकांबळे
अपत्ये

मुलगे = डॉ. अश्‍विन , प्रेशीत , मनोज

मुलगी = डॉ. चेतना
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार(१९८३)
आदर्श शिक्षक पुरस्कार(१९९७)
'बेस्ट सिटिझन'
औरंगाबादमधील तिसऱ्या दलित साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष
मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

प्रा. प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे (१९४३ - जानेवारी ६, २०१०) हे मराठी भाषेमधील लेखक होते.प्राध्यापक, लेखक, मराठी भाषेतील साहित्यिक, दलित साहित्यिक म्हणून त्यांची ख्याती देशभर आहे.

जीवन[संपादन]

प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म १९४३ सालामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील सुल्लाळी (आता हे गाव लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात आहे) या बिनचेहऱ्याच्या गावी झाला. लहानपणी डोईवरचे माता-पित्याचे छत्र हरवले असले तरी, बहिणीने त्यांचा सांभाळ केला. गुरे-ढोरे वळतच त्यांची शाळा चालू होती. महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयात झाले. त्यानंतर ते मराठवाडा विद्यापीठातून इंग्रजी विषय घेऊन एम.ए. झाले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून त्यांनी एलए‌ल.बी.चे शिक्षण पूर्ण केले.

कारकीर्द[संपादन]

प्रा. सोनकांबळे सुरुवातीला गल्ले बोरगाव येथे शिक्षक म्हणून नोकरीला लागले. इ.स. १९६६ मध्ये ते डॉ. आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. व पुढे त्याच विभागाचे प्रमुख झाले. महाविद्यालयाचे उपप्राचार्यपद आणि इ.स. १९८८ मध्ये प्राचार्यपदही त्यांनी भूषविले. तेथूनच ते निवृत्त झाले.

ग्रंथसंपदा[संपादन]

"अस्मितादर्श" नावाच्या त्रैमासिकामधून त्यांच्या लिखाणाचा प्रारंभ झाला. 'आठवणींचे पक्षी' हे त्यांचे आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्राचे अकरा भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले. याशिवाय "असं हे सगळं', "पोत आणि पदर' ही त्यांची ग्रंथसंपदा आहे.

व्यक्तिविशेष[संपादन]

साहित्य व सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. कोणत्याही कार्यक्रमाला प्रा. सोनकांबळे गेले की ते तेथील व्यक्तींना आपल्या खिशातली फुले व खडीसाखर देत. एक सहृदयी आणि प्रेमळ साहित्यिक अशी त्यांची ओळख होती.

संमेलन[संपादन]

मराठवाडा साहित्य परिषदेच्या आखाडा बाळापूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इ.स. १९७९ मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या तिसऱ्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. इ.स. १९८१मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या ऑल इंडिया बुद्धिस्ट टीचर्स कॉन्फरन्सचेदेखील ते स्वागताध्यक्ष होते. १९८२मध्ये झालेल्या पहिल्या दलित नाट्यमहोत्सवाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली.

पुरस्कार[संपादन]

  • प्रा. सोनकांबळे यांना साहित्य अकादमीचा १९८३मध्ये पुरस्कार मिळाला.
  • राज्य शासनानेदेखील पुरस्कार देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला आहे.
  • लातूर नगरपरिषदेने प्रा. प्र. ई. सोनकांबळे यांचा भूमिपुत्र म्हणून विशेष सत्कार केला होता.
  • अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार प्रा. सोनकांबळे यांना प्रदान करण्यात आला होता.
  • रयत शिक्षणसंस्थेचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
  • राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार (१९९७)

बाह्य दुवे[संपादन]