चांगदेव खैरमोडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चांगदेव भवानराव खैरमोडे या पानावरून पुनर्निर्देशित)
चांगदेव खैरमोडे
जन्म नाव चांगदेव भवानराव खैरमोडे
जन्म १५ जुलै, इ.स. १९०४
पाचवड (तालुका खटाव) जिल्हा सातारा
मृत्यू १८ नोव्हेंबर, इ.स. १९७१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चरित्रकार, कवि, लेखक, अनुवादक
साहित्य प्रकार चरित्र लेखन, कविता
चळवळ दलित बौद्ध चळवळ
प्रसिद्ध साहित्यकृती डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (समग्र चरित्र, खंड १ ते १२)
प्रभाव भीमराव रामजी आंबेडकर
वडील भवानराव खैरमोडे
पत्नी द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे (गायकवाड)

चांगदेव भवानराव खैरमोडे (१५ जुलै, इ.स. १९०४ ते १८ नोव्हेंबर, इ.स. १९७१ ) हे मराठी चरित्रकार, लेखक, अनुवादक आणि कवी होते.[१] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सानिध्यात राहुन त्यांचा आयुष्य क्रम, जीवन चरित्र आणि लेखनाची सविस्तर नोंद ठेवून 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर' या नावाने १२ चरित्रखंड प्रकाशित चरित्र लेखनासाठी विशेष परिचीत होते.[१]

व्यक्तिगत जीवन[संपादन]

१५ जुलै, इ.स. १९०४ रोजी पाचवड (तालुका खटाव) जिल्हा सातारा येथे त्यांचा जन्म झाला. साताऱ्याची न्यू इंग्लिश स्कूल आणि मुंबईची एलफिस्टन हायस्कूल येथून त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पार पाडले.[१] कलाशाखेतून त्यांनी पदवी प्राप्त करून मुंबई येथे तत्कालीन ब्रिटीश सचिवालयात ते नौकरीस होते. द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे (गायकवाड) त्यांच्या पत्नी होत्या.[१]

'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र' लेखन[संपादन]

चांगदेव खैरमोडे यांनी लिहीलेल्या चरित्राचा पहिला खंड १९५२ साली बाबासाहेबांच्या हयातीतच प्रकाशीत झाला. चार खंड १९७१ च्या आधी चांगदेव खैरमोडे यांच्या हयातीत प्रकाशित झाले तर उर्वरीत दहा खंडांचे प्रकाशन त्यांच्या पत्नी द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे (गायकवाड) यांनी चांगदेव खैरमोडे यांच्या पश्चात प्रकाशित केले.[१]

इतर लेखन[संपादन]

चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी त्यांच्या शालेय जीवनात शार्दूल विक्रडीत वृत्तात खादीचे महत्त्व सांगणारी १२ कडव्यांची रचना केली. या कवितेसाठी नारायण कृष्णाजी आठल्ये 'केरळ कोकिळा'चे त्या वेळचे संपादक नारायण कृष्णाजी आठल्ये यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.[१]

'पाटील प्रताप' (१९२८) आणि 'अमृतनाक' (१९२९) ही दोन सामाजिक खंडकाव्यं त्यांनी लिहिली. नंतरच्या काळात समाजप्रबोधन, अस्पृश्यतानिवारण, हिंदू धर्म, हिंदू समाज अशा विविध विषयांवरचे त्यांचे वैचारिक लेख महाराष्ट्रातल्या विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. 'शूद्र पूर्वी कोण होते?'(१९५१), 'हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती' (१९६१), 'घटनेवरील तीन भाषणे' हे लेखन त्यांनी केले.[१]

आंबेडकरांवरील मालिका[संपादन]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा (२०१९ पासून) स्टार प्रवाह दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी मराठी मालिका खैरमोडे यांच्या "डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" या चरित्रग्रंथाच्या भाग १ ते १२ वर आधारित आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c d e f g महेंद्र मुंजाळ यांचे. "चांगदेव भवानराव खैरमोडे". युनिक फीचर्सवरील 'चांगदेव भवानराव खैरमोडे' -महेंद्र मुंजाळ यांचा लेख दिनांक ११ जानेवारी २०१७ भाप्रवे रात्रौ २१.५५ वाजता रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)