राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rashtriya Swayamsewak Sangh drill.jpg

संस्थापक डॉ. केशव बळिराम हेडगेवार
प्रकार स्वयंसेवी ,निःस्वार्थ राष्ट्रभक्ति [१][२]
स्थान नागपूर


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही एक सामाजिक संघटना आहे. सामाजिक व सांस्कृतिक संस्था या स्वरूपात ही संघटना काम करीत होती. इ. स. १९९० च्या दशकापर्यंत या संस्थेने आपल्या विचारसरणीच्या प्रसारासाठी अनेक शाळा, धर्मार्थ संस्था आणि क्लब स्थापन केले होते.[३]नैसर्गिक आपत्तींच्या काळातील मदतकार्यासाठी आणि पुनर्वसनातील भूमिकेसाठी या संस्थेचे स्वयंसेवक खूप मदत करतात. राष्ट्रीय पातळीवरच्या पदांवर प्रचारक निवडणूक पद्धतीने निवडून येतात.[४]

स्थापना[संपादन]

डॉo केशव बळीरामपंत हेडगेवार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर इ.स. १९२५ रोजी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी त्यांच्या "शुक्रवारी" या नागपूर येथील निवासस्थानी केली.[५] १९२५ पासून हळूहळू संघाला महत्त्व प्राप्त होत गेले. अगदी स्थापनादिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे.

संघटनेचा मूळ उद्देश संघटित सांस्कृतिक राष्ट्रवाद असला तरी संघटनेच्या निर्मितीमागे, इतिहास काळात हिंदूधर्मीयात संघटनात्मकतेचा अभाव असल्याबद्दलचे कारण, मुख्यत्वे मुस्लिम आणि ख्रिश्चन मिशनरींकडून झालेल्या/करविल्या गेलेले धर्मांतर, पुरोगामी आणि वैश्वीकरणामुळे येणार्‍या पाश्चात्य जीवनशैलीच्या विघातक प्रभावांबद्दल नकार आणि संशयवाद, स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधीवादाच्या जहालवादास नकार, अल्पसंख्याकांचे काँग्रेस/महात्मा गांधी यांच्याकडून होणारे नको तेवढे लाड आणि यांचा लोकानुनय ही प्रमुख कारणे होती.

कार्यतत्त्व[संपादन]

भारताला आपली मातृभूमी मानणारे हे सगळे हिंदू आहेत. या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे.[६] त्यामुळे भारतीय म्हणजे हिंदू ही संघाची व्यापक भूमिका आहे.[७] हिंदू समाज हा पुरातन काळापासूनच अनेक वर्ण, जाती, पंथ यांत विभागला गेला आहे. प्रत्येक जात स्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजते. कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेष तसेच जातिभेदाला थारा नसलेल्या व तमाम जातीपंथांमध्ये एकोपा असलेला हिंदू समाज असणे हे संघाला अपेक्षित आहे.[ संदर्भ हवा ] हे साध्य करताना अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करून उरलेल्या हिंदू परंपरांचे संवर्धन व्हावे असे संघाचे धोरण आहे. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व या गोष्टींचा सर्वसामान्यांमध्ये अभिमान जागृत करणे व भारत देशाला परम वैभवाकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे असे संघकार्यकर्ते समजतात. फाळणीनंतर तुकडे झालेल्या हिंदुस्थानचे एकत्रीकरण होऊन परत अखंड भारताची निर्मिती व्हावी अशी संघाची मनीषा आहे. .[८]

राजकीय विचार[संपादन]

संघ स्वतःला सांस्कृतिक संघटन म्हणवून घेते. आणि स्वतःच्या ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजेच (परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं) या राष्ट्राला पुन्हा परम वैभवाकडे घेऊन जाण्यासाठी संघाच्या अनेक विविध क्षेत्रात काम करणार‍या संघटना आहेत. वनवासी क्षेत्रासाठी वनवासी कल्याण आश्रम, विद्यार्थी हितासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महिला शाखा राष्ट्र सेविका समिती, पूर्वीचा जनसंघ आणि आत्ताचा भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष इत्यादी.

संरचना[संपादन]

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक शाखांमध्ये स्वयंसेवक दैनंदिन हजेरी लावतात. सरसंघचालक हे या सर्व शाखांचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करतात. संघाच्या शाखा दररोज भरतात. त्याच प्रमाणे साप्ताहिक मिलन, आयटी मिलन (इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी) अशी आठवड्यातून एकदा भेट असते. संघाचे शिक्षा वर्ग चालतात. प्रथम, द्वितीय, तृतीय शिक्षा वर्ग. प्रथम वर्ग हा प्रत्येक प्रांतात होतो. द्वितीय वर्ग हा क्षेत्रात होतो. आणि तृतीय वर्ग हा सर्व भारताचा नागपूर येथे होतो. त्याचप्रमाणे अनेक शिबिरे संघातर्फे आयोजित केली जातात. सध्या संपूर्ण भारतात साधारणत: ५,००,००० शाखा चालतात, असे सांगितले जाते. या शाखा संघाच्या बांधणीचा मूळ पाया आहेत.

शाखा[संपादन]

वर नमूद केल्याप्रमाणे शाखा ही संघाच्या रचनेतील महत्त्वाचे अंग आहे. शाखा मोकळ्या पटांगणांवर, शाळेच्या मैदानांवर, मंदिरांबाहेरील मोकळ्या जागेत वा वस्तीतील मोकळ्या जागेत भरतात. सकाळी भरणार्‍या शाखेस प्रभातशाखा तर सायंकाळी भरणार्‍या शाखेस सायंशाखा असे म्हणतात. प्रभात शाखेत मुख्यत्वे प्रौढ लोकांचा भरणा जास्त असतो, तर सायंशाखेत लहान मुले, बाल व तरुण असतात. शाखेची नियमित वेळ एक तासाची असते. सायंशाखेची वेळ बहुतकरून ५ ते ६, ६ ते ७ किंवा ६.३० ते ७.३० अशी असते. प्रत्येक भागातील शाळांच्या वेळा विचारात घेऊन सोईची वेळ ठेवतात. शाखेची सुरुवात भगवा ध्वज उभारून त्याला प्रणाम करून होते. या नंतर विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळले जातात. याचबरोबर दंड आणि प्राचीन भारतीय युद्ध कला म्हणजेच नियुद्ध यांचे प्राथमिक शिक्षण दिले जाते. शाखेत योगासने योग, कसरतीचे खेळ वगैरे असतातच पण याशिवाय, ज्यात विविध सामाजिक विषयांची माहिती देऊन चर्चा करता येईल अशी बौद्धिके असतात. शैक्षणिक बौद्धिकांमध्ये बहुधा भारताचा इतिहास, भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती तसेच चालू घडामोडी इत्यादि विषय हाताळले जातात. यानंतर पद्य म्हणले जाते. शेवटी भारतमातेची प्रार्थना म्हणून ध्वज उतरवला जातो व त्या दिवसाच्या शाखेच्या बैठकीची सांगता होते. संघाच्या शाखेला स्वतःचा वाद्यवृंद असतो. त्याला 'घोष' म्हणतात. त्यामध्ये अनेक दले असतात. स्वयंसेवकांचे जेव्हा मोठ्या संख्येने संचलन होते तेव्हा ‘आनक दल' सर्वात पुढे असते. त्यानंतर क्रमाने 'पणव दल’, 'त्रिभुज दल', 'जल्लरी दल, 'वंशी दल’, 'शृंग दल, ही दले असतात आणि सर्वात शेवटी 'शंख दल'. प्रत्येक दलात एक दलप्रमुख असतो. संचलनात अग्रभागी एक स्वयंसेवक असतो. त्याच्या हातात घोषदंड असतो. त्याला 'घोषप्रमुख' म्हणतात.

प्रचारक[संपादन]

पूर्णवेळ संघकार्य करणार्‍या आणि राष्ट्रीयत्वाचा प्रचार करणार्यांना प्रचारक म्हणतात. देशहितासाठी घरदार सोडून संघाची कामे करणारे आज अनेक प्रचारक आहेत. प्रत्येक प्रचाराकाकडे वेगळी जबाबदारी असते. अनेक जण आजीवन प्रचारक देखील असतात.[९] राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व पदांवर हेच प्रचारक निवडणूक पद्धतीने निवडून येतात.[१०] सरसंघचालकाचे पद हे नियुक्तीने भरले जाते. जुने सरसंघचालकच आपला उत्तराधिकारी निवडतात. सरसंघचालकांची निवड ही लोकशाही मार्गाने होत नसली तरी बाकी सर्व पदे ही लोकशाही मार्गाने निवडली जातात. सरसंघचालक हे केवळ मार्गदर्शन करू शकतात. निर्णय हे लोकशाही पद्धतीने आणि सरकार्यवाह यांच्या नेतृवाखाली होतात.

शिस्त[संपादन]

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाखाणण्यासारखी शिस्त असते. संघाचे कार्यक्रम ठरलेल्या वेळी सुरू होतात आणि ठरलेल्या वेळीच संपतात.

टीका[संपादन]

इ.स. १९४८ मध्ये संघावर गांधीहत्या प्रकरणामुळे बंदी घालण्यात आली होती.. महात्मा गांधींवर हल्ला करणारा नथुराम गोडसे हा संघाचा जुना स्वयंसेवक असल्यामुळे असे करण्यात आले. जुलै १९४९ मध्ये ही बंदी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी घातलेल्या अटी संघाने मान्य केल्यानंतर उठविण्यात आली. या अटी अशा होत्या : रा. स्व. संघ लिखित व प्रकाशित घटना स्वीकारेल, आपले कार्यविधी सांस्कृतिक क्षेत्रापुरतेच मर्यादित ठेवेल व राजकारणात पडणार नाही, हिंसा व गोपनीयतेचा त्याग करेल, भारतीय ध्वज व संविधानाप्रती निष्ठा बाळगेल आणि लोकशाही पद्धतीने संघटनेची बांधणी करेल. [११]

याचबरोबर संघ केवळ ब्राह्मणी हितासाठीच कार्यरत असल्याची टीकाही केली जाते. संघाची सर्व धोरणे आणि कार्यपद्धती ब्राह्मणी हिताची आहेत. संघाचे आजपर्यंतचे सर्व सरसंघचालक ब्राह्मणच झालेले आहेत. या टीकेला उत्तर देणे संघाला जमले नाही.

संघ समर्थक[संपादन]

काही टीकाकार संघाच्या विचारसरणीवर हिंदू हुकूमशाही म्हणून टीका करतात. तर संघाच्या समर्थकांची मुख्य मागणी सरकारने अल्पसंख्यकांचे लाड थांबवावेत अशी आहे उदाहरणार्थ:

 • हिंदू मंदिरे सरकारच्या ताब्यात पण मशिदींवर आणि चर्चवर कोणतीही बंधने नाहीत,
 • शाह बानो खटल्याची गैरहाताळणी,
 • कोणत्याही भारतीय नागरिकाला काश्मीरमध्ये वसण्याला बंदी करणारे घटनेतील ३७०वे कलम,
 • सर्वधर्मीयांसाठी समान नागरी कायदा न आणणे,
 • हज यात्रेला दिलेली अवाजवी सूट आणि
 • मुस्लिम मतदार दुखावतील म्हणून लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम न चालवणे इत्यादी गोष्टींवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आक्षेप आहे.

संघाची ऐतिहासिक भूमिका अशी आहे की हिंदूंवर त्यांच्याच भूमीवर अन्याय होत आला आहे आणि संघ केवळ हिंदूंच्या नैसर्गिक हक्कांची मागणी करत आहे. टीकाकार म्हणतात की संघ भारताचा निधर्मवादी पाया बदलू पाहतो आहे. या गोष्टीशी बाबरी मशिदीचा मुद्दा संबंधित होता. बाबराने मशीद बांधण्याआधी त्या ठिकाणचे मंदिर तोडले होते. ती जागा रामजन्मभूमी होती. तर टीकाकार असे म्हणतात की संघ केवळ वाद निर्माण करू पाहतो आहे, कारण अयोध्येत अशी बरीच मंदिरे आहेत जी रामजन्मभूमी म्हणून ओळखली जातात. इ.स. २००३ मध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाने केलेल्या विवादास्पद अभ्यासात असे निष्पन्न झाले की मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिरासारखी इमारत होती.

संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था[संपादन]

आजवरचे सरसंघचालक[संपादन]

प्रार्थना[संपादन]

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्‌ ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्‌
त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्‌
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिम्‌
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्‌
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गम्‌
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत्‌ ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रम्‌
परं साधनं नाम वीरव्रतम्‌
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम्‌ ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम्‌ ।
परं वैभवं नेतुमेतत्‌ स्वराष्ट्रम्‌
समर्था भवत्वाशिषा ते भृशम्‌ ।।३।।

।। भारत माता की जय ।।
अर्थ : हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो.

हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, हिंदुराष्ट्राचे आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला तू शुभाशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही, असे शुद्ध चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल.

उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृद्धी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटित कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो.

।। भारत माता की जय ।।

==संघाच्या कार्यपद्धतीवर उलट-सुलट टीका टिप्पणी करणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :-

 • आरएसएस (लेखक जयदेव डोळे)
 • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (लेखक नानाजी देशमुख)
 • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की 'पहली अग्नि परीक्षा (हिंदी, लेखक - ?)
 • संघ कार्यपद्धति का विकास (बापूराव वर्‍हाडपांडे)
 • वी ऑर अवर नेशनहुड डिफाइण्ड (इंग्रजी, मा.स. गोळवलकर)
 • बंच ऑफ थॉट्स (इंग्रजी, मा.स. गोळवलकर)

हे पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. Andersen, Walter K.; Shridhar D. Damle (1987). The Brotherhood in Saffron: The Rashtriya Swayamsevak Sangh and Hindu Revivalism. Boulder: Westview Press. पान क्रमांक 111. आय.एस.बी.एन. 0-8133-7358-1. 
 2. McLeod, John (2002). The history of India. Greenwood Publishing Group. pp. 209–. आय.एस.बी.एन. 978-0-313-31459-9. 11 June 2010 रोजी पाहिले. 
 3. Atkins, Stephen E. (2004). Encyclopedia of modern worldwide extremists and extremist groups. Greenwood Publishing Group. p. 264. ISBN 978-0-313-32485-7. Retrieved 31 Oct. 2012. Link [१]
 4. http://books.google.com.au/books/about/K_S_Sudarshan.html?id=IBZyXwAACAAJ&redir_esc=y
 5. http://rssonnet.org/index.php?option=com_timeline&Itemid=56
 6. http://books.google.com.au/books?id=iUFalxUFFWkC&pg=PA44&source=gbs_toc_r&cad=2#v=onepage&q=RSS&f=false
 7. http://press.princeton.edu/chapters/i8560.html
 8. [२]
 9. http://books.google.com.au/books/about/The_RSS_Story.html?id=s0RAAAAAMAAJ&redir_esc=y
 10. http://books.google.com.au/books/about/K_S_Sudarshan.html?id=IBZyXwAACAAJ&redir_esc=y
 11. इंडिया सिन्स इंडिपेंडंस, लेखक बिपन चंद्रा व इतर, पेंग्विन बुक्स, बारावे पुनर्मुद्रण पृष्ठ क्र. १०१, ISBN 9780143104094