विजय वसंतराव पाडळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विजय पाडळकर
Vijay-padalkar.jpg
जन्म नाव विजय वसंतराव पाडळकर
जन्म ऑक्टोबर ४, इ.स. १९४८
बीड
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र आस्वादक समीक्षक, कादंबरीकार,
ललितलेखक, चित्रपट समीक्षक
साहित्य प्रकार कादंबरी, ललित वाङ्‌मय,
कुमार वाङमय, चित्रपट समीक्षण
आस्वादक समीक्षा
प्रसिद्ध साहित्यकृती कवडसे पकडणारा कलावंत
वडील वसंतराव पाडळकर
आई वासंतिका पाडळकर
पत्नी पुष्पा पाडळकर
पुरस्कार महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मिती पुरस्कार
केशवराव कोठावळे पुरस्कार
संकेतस्थळ http://www.vijaypadalkar.com/

विजय वसंतराव पाडळकर (ऑक्टोबर ४, इ.स. १९४८ - हयात) हे मराठीतील एक समीक्षक, ललित लेखक आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. अभिजात साहित्य व चित्रपट हे त्यांच्या अभ्यासाचे मुख्य विषय आहेत. विजय पाडळकर यांची २७ पुस्तके प्रकाशित असून त्यांना पाच राज्य पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

अल्प चरित्र[संपादन]

विजय पाडळकर यांचा जन्म बीड, (महाराष्ट्र) येथे एका मध्यमवर्गीय घरात झाला. त्यांचे वडील वसंतराव पाडळकर हे उप-शिक्षणाधिकारी असल्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत, म्हणून त्यांचे शिक्षण देगलूर, कंधार, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या गावी झाले. इ.स. १९७२ साली ते नांदेडच्या पीपल्स कॉलेजमधून एम.कॉमची परीक्षा प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. इ.स. १९७० साली विजय पाडळकर हे महाराष्ट्र बँकेत दाखल झाले. मात्र नोकरीचा कार्यकाल संपण्यापूर्वीच इ.स. २००१ साली त्यांनी लेखनाला पूर्ण वेळ देण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

प्रारंभिक लेखन[संपादन]

विजय पाडळकर यांनी लेखनाला सुरुवात इ.स. १९८४ साली ’मराठवाडा’ दैनिकात ’अक्षर संगत’ हे सदर लिहून केली.या सदरातील लेखांचे संकलन ’देखिला अक्षरांचा मेळावा’ या नावाने प्रकाशित झाले व त्याला वाल्मीक पुरस्कार मिळाला. या पुस्तकामुळे आस्वादक समीक्षक म्हणून पाडळकरांचे नाव सुप्रतिष्ठित झाले. इ.स. १९९० साली पाडळकरांनी महाराष्ट्र टाइम्स दैनिकाच्या रविवार पुरवणीत जागतिक कथेचा मागोवा घेणारी ’कथांच्या पायवाटा’ ही लेखमाला लिहिली. जागतिक कथा व अभिजात साहित्य या संदर्भात पाडळकरांनी यानंतर ’मृगजळाची तळी’, ’वाटेवरले सोबत’ आणि ’रानातील प्रकाश’ ही पुस्तके लिहिली. गाजलेल्या साहित्यकृती आणि त्यावर निर्माण झालेले चित्रपट या विषयांवरील पाडळकरांचे पुस्तक ’चंद्रावेगळं चांदणं’ हे इ.स. १९९५ साली प्रकाशित झाले. मराठी साहित्यात प्रथमच चित्रपट आणि साहित्य या दोन कलांचा तुलनात्मक विचार या पुस्तकाद्वारे केला गेला. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला.

द्वितीय कालखंड[संपादन]

विजय पाडळकर यांनी इ.स. २००१ साली महाराष्ट्र बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. मे, इ.स. २००१ मध्ये त्यांनी फिल्म इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (Film Institute of India) च्या वतीने घेण्यात येणारा चित्रपट रसास्वादाचा कोर्स (फिल्म ॲप्रिसिएशन कोर्स) केला. या कोर्सदरम्यानचे अनुभव शब्दबद्ध करणारे त्यांचे पुस्तक, ’सिनेमाचे दिवस पुन्हा’ हे इ.स. २००५ साली प्रकाशित झाले. यानंतर पाडळकरांनी साहित्य आणि चित्रपट या विषयाचा सखोल अभ्यास करणे चालू केले. या विषयावर त्यांची "नाव आहे चाललेली" (विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या दोन कादंबऱ्या व त्यावर सत्यजित राय यांनी केलेले तीन चित्रपट यांचा अभ्यास) व ’गर्द रानात भर दुपारी’ (जपानी लेखक अकुतागावा याच्या दोन कथा व त्यांवरील अकिरा कुरोसावाने तयार केलेला चित्रपट राशोमोन) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्रख्यात हिंदी चित्रपट दिग्दर्शक गुलजार यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीचा आढावा घेणारे "गंगा आए कहाँ से" हे त्यांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गुलजार म्हणतात, मुझे लगता है, हिंदुस्तान की हर जुबान में, सिनिमा पर लिखने के लिए एक विजय पाडलकर की जरूरत हैं।[१]

’कवडसे पकडणारा कलावंत’ हे श्रेष्ठ रशियन कथाकार आंतोन चेखव याचे जीवन व त्याच्या कथा यांचा अभ्यास करणारे पाडळकरांचे हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. या पुस्तकाला प्रतिष्ठेच्या केशवराव कोठावळे पुरस्कारासोबत अनेक चांगले पुरस्कार मिळाले आहेत. आस्वादक समीक्षात्मक लेखन करीत असतांनाच पाडळकरांनी काही स्वतंत्र कथाही लिहिल्या. या कथांचा संग्रह ’पाखराची वाट’ या नावाने प्रकाशित झाला आहे. याशिवाय व्यक्ती, समाज व राष्ट्र यांचा परस्परसंबंध शोधणारी ’अल्पसंख्य’ ही कादंबरीही त्यांनी लिहिली आहे. इ.स. २००८ साली लोकसत्ता दैनिकाच्या रविवार पुरवणीत पाडळकरांनी ’सिनेमाटोग्राफ’ या नावाने एक सदर लिहिले, ज्यातून जगातील महान चित्रपट दिग्दर्शकांच्या कार्याची माहिती देत त्यांनी चित्रपट कलेचा इतिहास सादर केला.या सदरातील लेखांचे पुस्तक सिनेमायाचे जादूगार या नावाने लवकरच प्रकाशित होत आहे.

हिंदी चित्रपट आणि सिनेसंगीत हे देखील विजय पाडळकरांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. हिंदी सिनेमात गीतकारांना योग्य तो मान दिला जात नाही ही खंत मनात असल्यामुळे त्यांनी नव्वद गीतकारांच्या जीवनाची व कार्याची माहिती देणारे ‘बखर गीतकारांची’ हे पुस्तक परिश्रमपूर्वक सिद्ध केले. ते ‘मैत्रेय प्रकाशन, मुंबई’ तर्फे २०१४ साली प्रकाशित झाले. याच प्रकाशनातर्फे ‘देवदास ते भुवन शोम’ हा हिंदी सिनेमाच्या इतिहासाचा प्रथम खंड २०१५ साली प्रकाशित झाला.

भ्रम आणि भ्रमनिरास या वर्तुळात मानवी जीवन फिरत असते या आशय सूत्राभोवती गुंफलेली ‘कवीची मस्ती’ ही पाडळकर यांची कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई तर्फे प्रकाशित झाली असून तिला ‘द. ता. भोसले साहित्य पुरस्कार’ मिळाला आहे.

साहित्य आणि चित्रपट यांच्या तुलनात्मक अभ्यासाचा पुढला टप्पा असे ‘शेक्सपिअर आणि सिनेमा’ हा पाडळकरांचा ग्रंथ २३ एप्रिल २०१६ रोजी, शेक्सपिअरच्या चारशेव्या पुण्यतिथीस प्रकाशित झाला. या पुस्तकाच्या पूर्वार्धात नाटक आणि सिनेमा या कलांचा तौलनिक अभ्यास मांडलेला असून उत्तरार्धात ‘मॅकबेथ’ आणि ‘किंग लिअर’ ही नाटके व त्यांवर आधारित चित्रपट यांची चर्चा केली आहे.

डिसेंबर २०१६ मध्ये पाडळकरांचे ‘गगन समुद्री बिंबले’ हे पुस्तक ‘राजहंस प्रकाशन पुणे’ यांच्याकडून प्रकाशित झाले असून या पुस्तकात गाजलेल्या साहित्यकृतींवर आधारित सत्यजित राय यांच्या ९ चित्रपटांची आस्वादक समीक्षा त्यांनी सादर केली आहे.

प्रकाशित पुस्तके[संपादन]

क्र. पुस्तकाचे नाव प्रकाशक वर्ष (इ.स.) पुरस्कार
देखिला अक्षरांचा मेळावा स्वयंप्रभा प्रकाशन १९८६ वाल्मीक पारितोषिक
कथांच्या पायवाटा संगत प्रकाशन १९९४ -
चंद्रावेगळं चांदणं मॅजेस्टिक प्रकाशन १९९५ महाराष्ट्र राज्य पुरस्कार
नरहर कुरुंदकर पुरस्कार
गाण्याचे कडवे संगत प्रकाशन १९९८ महाराष्ट्र राज्य पुरस्कार
रानातील प्रकाश मेहता प्रकाशन १९९९ -
मृगजळाची तळी मॅजेस्टिक प्रकाशन २००० -
वाटेवरले सोबती मॅजेस्टिक प्रकाशन २००१ -
पाखराची वाट मौज वितरण २००३ -
नाव आहे चाललेली राजहंस प्रकाशन २००४ -
१० कवडसे पकडणारा कलावंत मॅजेस्टिक प्रकाशन महाराष्ट्र राज्य पुरस्कार
बी. रघुनाथ पुरस्कार
आपटे वाचन मंदिर पुरस्कार
केशवराव कोठावळे पुरस्कार
११ सिनेमाचे दिवस पुन्हा मौज प्रकाशन २००५ -
१२ गर्द रानात भर दुपारी मौज वितरण २००७ -
१३ येरझारा स्वरूप प्रकाशन २००७ -
१४ अल्पसंख्य राजहंस प्रकाशन २००७ महाराष्ट्र राज्य पुरस्कार
१५ गंगा आए कहाँ से मॅजेस्टिक प्रकाशन २००८ महाराष्ट्र राज्य पुरस्कार
१६ सिनेमायाचे जादूगार मॅजेस्टिक वितरण २०१० -
१७ मोरखुणा मॅजेस्टिक प्रकाशन २०११
१८ बखर गीतकारांची मैत्रेय प्रकाशन २०१४ -
१९ कवीची मस्ती मॅजेस्टिक प्रकाशन २०१४ -
२० 'देवदास ते भुवन शोम' मैत्रेय प्रकाशन २०१५ -
२१ शेक्सपिअर आणि सिनेमा मौज प्रकाशन २०१६
२२ गगन समुद्री बिंबले राजहंस प्रकाशन २०१६

अनुवादित पुस्तके[संपादन]

१. आँधी
२. उमराव जान
३. एक स्वप्न पुन्हा पुन्हा (गुलजारांच्या कवितांचा मराठी अनुवाद)-पॉप्युलर प्रकाशन
४. भुवनशोम
५. रावीपार


पुरस्कार[संपादन]

  • ’चंद्रावेगळं चांदणं’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार.
  • केशवराव कोठावळे पुरस्कार ((’कवडसे पकडणारा कलावंत’ या श्रेष्ठ रशियन कथाकार आंतोन चेखव याचे जीवन व त्याच्या कथा यांचा अभ्यास करणार्‍या पुस्तकास)
  • द.ता. भोसले पुरस्कार
  • नरहर कुरुंदकर पुरस्कार
  • वाल्मीक पुरस्कार (’देखिला अक्षरांचा मेळावा’ या पुस्तकाला)

इतर[संपादन]

१. अध्यक्ष लातूर जिल्हा साहित्य संमेलन’ (इ.स. १९९६)
२.’यक्ष’ दिवाळी अंकाचे संपादन (इ.स. २००२ - इ.स. २००४), संपादनासाठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा रत्नाकर पुरस्कार (इ.स. २००२).
३. संस्थापक, अध्यक्ष, ”मॅजिक लँटर्न फिल्म सोयायटी, नांदेड.

संदर्भ[संपादन]

  1. ’गंगा आए कहाँ से” (इ.स. २००८), मॅजेस्टिक प्रकाशन, प्रस्तावना


बाह्य दुवे[संपादन]