मारुती चितमपल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मारुती चितमपल्ली
जन्म नाव मारुती चितमपल्ली
जन्म नोव्हेंबर ५, १९३२
सोलापूर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र वन्यजीवाभ्यास, लेखन
भाषा मराठी
साहित्य प्रकार निसर्गाविषयी, ललित, तसेच माहितीपूर्ण लेखन
विषय निसर्ग, वन्यजीवन
चळवळ वन्यजीवन संवर्धन
प्रसिद्ध साहित्यकृती पक्षी जाय दिगंतरा
प्रभाव मराठी साहित्यात निसर्ग विषयक लिखाणाची सुरुवात
पुरस्कार इ.स.२००६ सोलापूरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

मारुती चितमपल्ली (नोव्हेंबर ५, १९३२ - हयात) हे मराठी वन्यजीव अभ्यासक,लेखक आहेत.

वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ म्हणजे ३६ वर्षे नोकरी. नोकरीदरम्यान आणि त्यानंतरही अशी एकूण ६५ वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणीजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे लेखन अतिशय ओघवत्या शैलीत करतात. त्यांचे वाचनही प्रचंड आहे आणि त्यांना पुस्तकांचीही आवड आहे. पक्षीतज्‍ज्ञ डॉ. सलीम अली, लेखक व्यंकटेश माडगूळकर प्रसिद्ध चित्रकार ए. ए. आलमेरकर यांच्याशी त्यांचा स्नेह होता.

बालपण[संपादन]

चिवतमपल्ली यांचा जन्म सोलापुरातला. त्यांचे वास्तव्य गुजराथीमिश्रित मराठी बोलणाऱ्यांच्या वाड्यात होते. त्यांचे आजोबा सोलापुरातल्या बुधवार पेठेत राहत. तेथे तेलुगू बोलणाऱ्यांची वस्ती होती. मुस्लिमबहुल वस्तीही जवळच होती. त्यामुळे आई वडील आणि मुले मराठी, गुजराती, तेलुगू आणि उर्दूमिश्रित हिंदी बोलू लागल

पाचव्या इयत्तेतील स्कॉलरशिपमुळे अकरावीपर्यंत महिना दहा रुपये मिळत असल्याने मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मोफत झाले. भर तापात परीक्षा देऊनसुद्धा मारुती चितमपल्ली वर्गात पहिल्या नंबराने पास झाले.

महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर चितमपल्लींनी त्यांची वही मराठीच्या प्राध्यापकांना दाखवली, आणि तिच्यातली एक कथा महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रकाशित झाली.

त्यांच्या वडिलांना वाचण्याची आवड तर आईला अरण्यवाटांची. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता मारुती चितमपल्लींना जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागले. ’क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे उडे बापडी’ ह्या कवितेतील कारुण्य शाळेत असताना जाणवले, आणि जंगलांतील पक्ष्यांविषयी प्रेम वाटू लागले. आयुष्यभर हरणाची शिकार करणाऱ्या भीमाचा मृत्यू हरणासारखा तडफडत झाला,ही आईने सांगितलेली गोष्ट आयुष्यभर विसरता येण्यासारखी नव्हती. आईला पशुपक्ष्यांची खूप माहिती होती. चंडोल ऊर्फ माळचिमणी, कोकिळा ऊर्फ कोयाळ, सातबहिणी ऊर्फ बोलांड्या, लावा ऊर्फ भुरगुंज्या अशी कितीतरी नावे चितमपल्लींना आईकडून ऐकायला मिळाली. हरणाच्या नराला काळवीट आणि लांडग्याच्या मादीला लासी असा नर-मादीतला फरक तिनेच शिकविला. माळढोक हे नाव पहिल्यांदा आईनेच ऐकवले. तिने दिलेले रंगांच्या छटांचे ज्ञान पाखरांच्या आणि फुलपाखरांचे वर्णन करताना मारुती चितमपल्लींच्या उपयोगी पडले.

आईनंतरचे गुरू[संपादन]

लिंबामामा हा मारुती चितमपल्लींचा अरण्यविद्येतला दुसरा गुरू. प्राणी, पक्षी, वनस्पती तो न बोलता नजरेने दाखवी. वीण झाल्यानंतर सोडून दिलेली सुगरण पक्षाची घरटी त्यानेच दाखविली. त्याच्याबरोबर रानातून चालताना रुई, धोतरा, निवडुंगाची माजलेली झुडपे आणि बोरी, बाभळी, निंबाची काटेरी झुडपे चुकवत चालावे लागे. त्या झाडाखालून चितमपल्लींनी होल्यांची घरटीही शोधली. फुलपाखरांच्या मागे जात गवतामधील कीटकांचे संगीत ऐकायला ते तिथेच शिकले.

अरण्यवाटेवर आणखी एकाने, हणमंतामामाने, चितमपल्लींना जंगलाचे न्यारे जग शिकवले पाखरांची नावे त्यानेच सांगितली. तळ्याकाठी पाखरांची पिसे सापडायची. पारी, पोपटी व उदी रंगाची पिसे पाहून हणमंतामामा पाखरांची नावे सांगायचा. मामा खांद्यावर कुदळ घेऊन उंच वारूळ शोधत चालायचा. या वारुळांना ते टेकराज म्हणत, पण हे वारूळ म्हणजेच सापांचे घर कधी दिसले नाही. हणमंतामामाजवळ सापांविषयी खूप ज्ञान होते. विषारी, बिनविषारी सापांपासून तर सापांच्या जाती ओळखण्यापर्यंत आणि सापांची अंडी असे सारे काही चितमपल्लींना हणमंतामामाकडूनच शिकायला मिळाले.

हणमंतामामांनी चितमपल्लींना वन्यप्राण्यांच्या असंख्य लोककथा सागितल्या, आणि तेच ज्ञान पुढे वनखात्याच्या नोकरीत कामी पडले. मामाची अंधश्रद्धाच चितमपल्लींना पशुपक्ष्यांविषयीच्या संशोधनासाठी कारणीभूत ठरली. काय खरे आणि काय खोटे हे ओळखता येऊ लागले.

मारुती चितमपल्लींचे रानाविषयीचे माझे प्रेम आई, माळकरीण आत्या, लिंबामामा आणि हणमंतमामा यांनी जोपासले. त्यांच्यामुळे चितमपल्लींना वन्यजीवशास्त्र उलगडले.

कॉलेजात अपयशी[संपादन]

पारंपरिक कॉलेज शिक्षणात अपयशी ठरल्यानंतर मारुती चितमपल्ली यांनी वानिकी महाविद्यालयाची वाट धरली. पुण्यातील विभागीय वनाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला. सोलापूरचे राहणारे वनक्षेत्रपाल एम.डी. गाडगीळ यांची पुण्यातील वनसंशोधन केंद्रात भेट घेतली. त्यांनी वनक्षेत्रपालाच्या निवडीसाठी होणारी लेखी परीक्षा, त्याची पूर्वतयारी याविषयी वितमपल्लींना मार्गदर्शन केले. विद्यापीठ परीक्षेचा निकाल वाईट लागणार होता. तरीही वानिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी सर्व परीक्षा गंभीरपणे देण्याचा निर्धार त्यांनी केला. मुलाखतीला कशी उत्तरे द्यायची हे गाडगीळ यांनी सांगितले होते. सोळा मैल चालण्याच्या परीक्षेचा सरावही केला. त्यासाठी आई, मामांसोबत लहानपणी केलेली रानभटकंती उपयोगी ठरली. एकीकडे विद्यापीठ परीक्षा सुरू असतानाच मुख्य वनसंरक्षकांकडून मुलाखतीकरिता बोलावणे आले. जे.ए. सिंग यांनी त्या वेळी मुलाखत घेतली होती. मुलाखतीत यश मिळाले आणि सोळा मैल चालण्याची परीक्षाही यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यामुळे वानिकी महाविद्यालयातील प्रवेशाची निश्चिती मिळाली. अपेक्षित होते तेच झाले आणि वनखात्याकडून अपेक्षित पत्र आले. मारुती चितमपल्लींची कोईमतूरच्या सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज या वानिकी महाविद्यालयात दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली.

या वानिकी महाविद्यालयात प्रवेश झाला आणि मारुती चितमपल्ली यांचे आयुष्य एका वेगळ्या वाटेने पुढे जाऊ लागले.

वानिकी महाविद्यालयातील मारुती चितमपल्ली यांचे अनुभव[संपादन]

शिस्त काय असते हे त्यांना या महाविद्यालयाने शिकवले. पहाटे उठणे, ठरलेल्या वेळेनुसार सर्व काही करणे सुरू झाले. वानिकी महाविद्यालयात असताना पहिल्यांदा त्यांनी वनातला अभ्यास दौरा केला. जंगलात राहायचे म्हणजे तंबूत, महिनाभर लागणारे सारे सामान सोबत, असे सारे काही कुतूहलमिश्रित होते. प्रवेश घेताना १६ मैलांची अट जशी कायम होती, तशी मॅरेथॉन रेसमधून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना १६ मैलांचे अंतर धावत धावत चार तासांत पूर्ण करावे लागे. वनाधिकारी म्हणून तंदुरुस्त आहात की नाही याची ती चाचणी होती. मात्र, पहिल्याच वर्षी मॅरेथान रेसमध्ये धावताना मेंदूतील रक्तस्रावामुळे एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंबीय वेळेत पोहोचू न शकल्याने महाविद्यालयातर्फे विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून अंत्यविधी पार पाडला. भविष्यात वनाधिकाऱ्याला कशा प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागू शकते, याचे दाहक वास्तव मारुती चितमपल्लींनी विद्यार्थिदशेतच अनुभवले.

वनखात्याची नोकरी आणि पक्षिनिरीक्षण[संपादन]

मारुती चितमपल्लींना वनखात्यातील नोकरीत ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अलींचा सहवास खूप काही शिकवून गेला. वनखात्यातील नोकरीच्या निमित्ताने चितमपल्लींनी अनेक ठिकाणचे जंगल पिंजून काढले. पश्चिम महाराष्ट्रात १५ वर्षे नोकरी केल्यानंतर ते विदर्भात नवेगाव बांधला आले. त्यानंतर नागझिरा, नागपूर, मेळघाट येथली जंगले अनुभवली. मात्र त्यांना नवेगाव बांधचे जंगल अधिक आवडले. शिकारासाठी येणारे माधवराव पाटील त्यांनी तेथेच भेटले. शिकारीच्या निमित्ताने आपल्या सोबत्यांकडून माधवराव वनविद्या शिक्ले आणि ही वनविद्या त्यांच्याकडून चितमपल्लींना शिकता आली. मात्र, ही वनविद्या साध्य करायला त्यांना अनेक वर्षे लागली.

संस्कृतचा अभ्यास[संपादन]

मारुती चितमपल्ली यांनी परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केले आणि त्यानंतर जर्मन आणि रशियन भाषांचा अभ्यास केला.

रामटेकच्या कालिदास संस्कृत विद्यापीठाच्यावतीने प्राचीन भारतीय साहित्यातील पर्यावरण असा एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविला जातो. चितमपल्ली यांनी ८४व्या वर्षी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि तो अभ्यासक्रम पूर्णही केला.

मराठी भाषेला शब्दांची देणगी[संपादन]

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठीत दिलेले पर्यायी शब्द आज रुळलेत. तसेच कार्य जंगलाच्या बाबतीत मारुती चितमपल्ली यांनीही करून ठेवले आहे. अरण्य आणि त्याभोवताल विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चितमपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे. पक्षी असोत ‌की वनस्पती, कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली आहेत. या मूळ तेलगू भाषिक माणसाने मराठीला सुमारे एक लाख शब्दांचा ‌खजिना उपलब्ध करून दिला आहे.चितमपल्लींनी पक्षिशास्त्रातील अनेक संज्ञांचे मराठी नामकरण केले आहे.जसे कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत रूकरी असा शब्द आहे.चितमपल्लींनी त्यासाठी काकागार हा शब्द योजला. तसेच हेरॉनरी (बगळे,ढोकरी ह्या पक्ष्यांची वीण वसाहत)ला सारंगागार असा समर्पक शब्द मराठीत तयार केला आहे. रूस्टिंग प्लेससाठी रातनिवारा हा शब्द वापरला आहे. टणटणी (घाणेरी)चे रायमुनिआ तर बहाव्याचे अमलताश हे नाव चितमपल्लींमुळे नागरी वाचकांस माहित झाले.

संशोधन आणि संस्थांमधील सहभाग[संपादन]

मारुती चितमपल्ली यांनी वने, वन्यप्राणी, वन्यजीव व्यवस्थापन, आणि पक्षिजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले; आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि निबंधवाचन केले. सेवाकाळात आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था, समित्या यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती (औरंगाबाद)चे ते सदस्य होते. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचेही ते संचालक होते.

लेखन[संपादन]

मारुती चितमपल्ली यांना त्यांच्या निसर्ग क्षेत्रातील अभ्यासामुळेच पक्षितज्ज्ञ व निसर्गलेखक ही ओळख मिळाली, आणि त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली.

मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

आगामी[संपादन]

  • मत्स्यकोश, वृक्षकोश, वृक्षायुर्वेद, वगैरे

मारुती चितमपल्ली यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • मारुती चितमपल्ली यांना भारती विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार मिळाला आहे.
  • नागपूरच्या सिटिझन्स फोरमचा नागभूषण पुरस्कार (२००८)
  • एस.डी. पाटील ट्रस्टचा ’खासदार एस.डी. पाटील समाजसेवक पुरस्कार’ (२०१२)
  • त्यांना सहकारमहर्षी (कै) शंकराव मोहिते पाटील प्रतिष्ठानचा ’सहकार महर्षी साहित्य पुरकार’ही मिळाला आहे.
  • रानवाटा (१९९१) - ह्या पुस्तकाला ९१-९२ सालचा उत्कृष्ट साहित्यानिर्मितीचा राज्य पुरस्कार, भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार व मृण्मयी साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत. १९९३ साली या पुस्तकाची आकाशवाणी पुणे केंद्रावर वाचण्यासाठी निवड झाली होती तसेच पाठ्यपुस्तकात देखील यातील अरणी ही कथा होती.
  • पुण्याची ॲड-व्हेंचर फाउंडेशन ही संस्था २००६पासून निसर्ग संशोधनाचे किंवा निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या व्यक्तीला 'मारुती चितमपल्ली' यांच्या नावाचा निसर्गमित्र पुरस्कार देते.
  • इ.स.२००६ मध्ये सोलापूरला झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • महाराष्ट्र राज्याच्या मराठी विभागाकडून दिलेला विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (२०१७)
  • १२व्या किर्लोस्कर चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार (८-१-२०१८)

मारुती चितमपल्ली यांच्याविषयीची पुस्तके[संपादन]

  • सुहास पुजारी, रानावनातला माणूस, प्रथमावृत्ती,पद्मगंधा प्रकाशन, पुणे, जानेवारी २००६
  • सुहास पुजारी (संपादक), मारुती चितमपल्ली:व्यष्टी आणि सृष्टी, प्रथमावृत्ती, साहित्य प्रसार केंद्र, नागपूर, डिसेंबर २०१२

मारुती चितमपल्ली यांच्या नावाचे पुरस्कार[संपादन]

  • पुण्याची ॲड-व्हेंचर ही गिर्यारोहण संस्थेचा ’मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार’ या नावाचा पुरस्कार देते. २०१५सालचा पुरस्कार अतुल देऊळगावकर यांना मिळाला.
  • ॲड-व्हेंचर फाउंडेशनचा मारुती चितमपल्ली तिसरा निसर्गमित्र पुरस्कार(२००८) : डॉ. सतीश पांडे यांना मिळाला होता.
  • ॲड-व्हेंचर फाउंडेशनचा मारुती चितमपल्ली पाचवा निसर्गमित्र पुरस्कार(२०१०) : डॉ. रमेश गोडबोले यांना मिळाला होता.
  • ॲड-व्हेंचर फाउंडेशनचा मारुती चितमपल्ली सातवा निसर्गमित्र पुरस्कार(२०१२) : लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते सोलापूर जिल्ह्यातील अंकोली येथील : अरुण व सुमंगला देशपांडे यांना.
  • ॲड-व्हेंचर फाउंडेशनचा आठवा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार(२०१३) : डॉ. कृष्णमेघ कुंटे यांना प्रदान झाला.
  • ॲड-व्हेंचर फाउंडेशनचा नववा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार (२०१४) : पक्षितज्ज्ञ बी. एस. कुलकर्णी (२०१४)यांना