सदानंद देशमुख
सदानंद नामदेवराव देशमुख | |
---|---|
जन्म | अमडापूर |
वडील | नामदेवराव |
आई | पार्वती |
पत्नी | वनिता |
अपत्ये | संदीप, अभिजित |
डॉ. सदानंद नामदेव देशमुख हे मराठी भाषेत लिहिणारे भारतीय कवी, कादंबरीकार व कथाकार आहेत. त्यांच्या बारोमास या कादंबरीला भारत सरकारकडून २००४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. (या लेखाचे चर्चापान पहा). ह्या कादंबरीवरून बारोमास नावाचा हिंदी चित्रपट बनला आहे.
डॉ. देशमुख यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील अमडापूर या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. मराठी विषयात त्यांनी एम.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर आचार्य ही पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये कादंबरी, ललित साहित्य, कविता, कथालेखन या सर्वांचा समावेश होतो.. त्यांच्या ‘बारोमास’ या कादंबरीचा हिंदी, व इंग्रजी भाषेत अनुवादही झाला आहे. त्यांच्या साहित्यावर संशोधनही करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठात विशेष ग्रंथकार म्हणून त्यांची पुस्तके पदव्युत्तर पदवीसाठी अभ्यासक्रमात आहेत.
डॉ. सदानंद देशमुख हे चंद्रपूर येथे भरलेल्या ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते.
लेखक सदानंद देशमुख यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]
- अंधारवड (कथासंग्रह)
- अमृतफळ (कादंबरी).
- उठावण (कथासंग्रह)
- खुंदळघास (कथासंग्रह)
- गाभूळगाभा (कथासंग्रह)
- गावकळा (कवितासंग्रह)
- चारीमेरा (कादंबरी)
- जमीनजुमला
- तहान (कादंबरी)
- बारोमास (कादंबरी)
- भुईरिंगणी (ललितगद्य)
- महालूट (कथासंग्रह)
- मेळवण (कथासंग्रह)
- बळ घेऊन भुईचं
- रगडा (कथासंग्रह)
- लचांड (कथासंग्रह)
पुरस्कार[संपादन]
- ‘बारोमास’ कादंबरीला २००४ चा साहित्य अकादमी पुरस्कार
- सेवादास साहित्य गौरव पुरस्कार
- राज्य शासनाचे पुरस्कार
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह.ना. आपटे पुरस्कार
- मॅजेस्टिक प्रकाशनाचा जयवंत दळवी पुरस्कार
- विदर्भ साहित्य संघाचा पु.य. देशपांडे स्मृती कादंबरी पुरस्कार
- संस्मरणीय सकस लेखनासाठीचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार
- सहकारहर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार (२००९)
- यशवंतराव दाते संस्थेचा सहकार पुरस्कार
- शिक्षणमहर्षी बाबूराव देशमुख पुरस्कार
- भंवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशनचा पुरस्कार
- निसर्गकवी ना.धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्य लेखन पुरस्कार (जळगाव)
- सोलापूरच्या सुशील फोरमने दिलेला सुशीलकुमार शिंदे साहित्य पुरस्कार.
भारतीय कृषक जीवनाच्या व्यथेची कथा –‘बारोमास ‘[संपादन]
‘बारोमास’ ही शेतकरी कुटुंबाचीच नव्हे तर ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांचीही व्यथा मांडणारी कादंबरी आहे. ही व्यथा व्यक्त करताना एकविसाव्या शतकातील शेतकऱ्यांच्या जीवनाचे हुबेहुब चित्र रेखाटण्यात सदानंद देशमुख यशस्वी झाले आहेत. विदारक सामाजिक, आर्थिक परिस्थितीतून वाटचाल करणारे कादंबरीतील सुभानरावांचे कुटुंब शेतकरी वर्गाचे प्रातिनिधिक रूप आहे. सामाजिक, आर्थिक ,राजकीय, कृषिविषयक वास्तवाच्या चोथऱ्यावर उभी असलेली ही कादंबरी, तिला तिच्या श्रेष्ठत्वामुळे साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. शेतकऱ्यांचे जीवन, त्यांच्या समस्या, दारिद्ऱ्य, अज्ञान, शोषण हा कादंबरीचा विषय आहे. आजचा शेतकरी नवनवीन बी-बियाणे, खते, जंतुनाशके वापरू लागल्याने त्याचे शेतीवर काय परिणाम होत आहेत हे सांगताना नानूआजा म्हणतो,“ आरे पीक व्हते म्हणता बदबद पण त्यो नुसता भपका.सम्द उत्पन्न खर्चातच आटून जाते नं. तुमचं.दांडातलं पाणी दांडातच आटून जाते. वाफा कोल्डा फटांग. हे बर्कतीचं असतं त पैसा जाते कुठी तुमचा? पटाच्या बैलाले त्यानं पहिला नंबर आणावा म्हणून रसायन पाजतो, त्यो बैल काही दिवस तकतक दिसते अन् अंगातलं रसायन सरलं की गळण धावून मरते. तसंच भुईचबी. पोटी पिकायची ताकदच उरणार नाई तिच्यात.” (बारोमास -पृ.क्र.२)नानूआजाने सांगितलेली अशी तथ्ये आणि शेतकऱ्यांच्या हलाखीच्या जगण्याला कारणीभूत असलेले विविध घटक इत्यादींचा विस्तृत परामर्श कादंबरीत घेतला असून त्यावरील उपाययोजनांची चर्चाही करण्यात आली आहे. अस्सल ग्रामजीवनाचा अनुभव देणारी ही कादंबरी आहे. –डॉ. रेखा वडिखाये
आधार ग्रंथ – (बारोमास-सदानंद देशमुख, कॉन्टिनेन्टल प्रकाशन (पुणे,२००७, तृतीयावृत्ती )
बारोमास ही सदानंद देशमुख यांची विदर्भातील शेतकरी कुटुंबाच्या तीन पिढ्यांचे चित्रण करणारी, त्यांच्या हालअपेष्टांची, काबाड कष्टांची, आणि दुःखीकष्टी जीवनाची करूण कहाणी आहे. दोन पिढ्यांचे मरण आणि शिकूनही नोकरी लागत नाही म्हणून तिसऱ्या पिढीचे खच्चीकरण प्रकट करणारी; शेतकऱ्यांच्या दुःखाची ही कर्मकथा आहे. बारोमास मधील जीवनसंघर्ष हा पितापुत्र यामधील विचारांचा संघर्ष आहे. तो दोन भावातील, दोन भिन्न प्रवृत्तीतील विचारांचा संघर्ष आहे. या संघर्षाला ग्रामीण नागरी जीवनशैलीतील तसेच सुशिक्षित-अशिक्षित यांच्या मानसिकतेतील अंतर्विरोधाची किनार आहे. या संघर्षाला पुरुषी वर्चस्व आणि स्त्रीचे स्वातंत्र्य यांच्यातील झुंजवेदनेचे कंगोरे आहेत. पण त्याच वेळी शेती आणि शेतकरी या भोवतालच्या नियत परिस्थितीचे म्हणजे लहरी व नुकसानकारक पाऊस, शासकीय कचेऱ्यातील भ्रष्टाचार , सुशिक्षित बेकारांची समस्या, सावकाराकडून होणारे शोषण, खेड्यावर शहरी संस्कृतीचे होणारे आक्रमण, याविषयीचे वास्तव एकजिनसीपणे या कादंबरीत मांडले आहे. बारोमास ही नियत परिस्थितीसमोर हतबल झालेल्या शेतकऱ्याचे जीवनदर्शन केंद्रस्थानी असलेली वास्तववादी आणि समस्याप्रधान ग्रामीण कादंबरी आहे.
( संदर्भ: डॉ. रवींद्र कानडजे, लेख, स्वातंत्र्योत्तर ग्रामीण कादंबरीतील शेतकरी जीवन संघर्ष, अक्षर वैदर्भी. )