तिसरे इंग्रज-मराठा युद्ध
| दिनांक | नोव्हेंबर ५ १८१७ - १८१९ |
|---|---|
| स्थान | मध्य आणि पश्चिम भारत |
| सद्यस्थिती | सगळा प्रदेश भारतीय प्रजासत्ताकाचा भाग |
| प्रादेशिक बदल | पेशवाईचा अंत, मराठा संस्थानिक आणि राजपुतान्यातील राजे ब्रिटिशांचे मांडलिक, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात अनिर्बंध सत्ता |
| युद्धमान पक्ष | |
|---|---|
| * |
* |
| सेनापती | |
| * |
- |
| सैन्यबळ | |
| १८,००० घोडदळ ८,००० पायदळ सैनिक |
२,८०० घोडदळ |
तिसरे इंग्रज-मराठा युद्ध हे इ.स. १८१७-१८मध्ये मराठे व इंग्रजांच्यात झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवले.
या आधी झालेल्या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर मराठ्यांना आणि ब्रिटिशांना उसंत मिळाली. त्या दरम्यान ब्रिटिशांनी भारतातील स्वतःची शक्ती वाढवली परंतु मराठ्यांनी एकोपा टिकवला नाही आणि ते ब्रिटिशांच्या तुलनेत मराठे राजनैतिक आणि लष्करीदृष्ट्या कमी पडत गेले. अशा पार्श्वभूमीवर गव्हर्नर जनरल लॉर्ड हेस्टिंग्सची नियुक्ती झाली.[१]. त्याने आपल्या कारकिर्दीत आक्रमक धोरणाचा अवलंब केला. नेपाळ युद्धाच्या समाप्तीनंतर पेंढारी लोकांशी संघर्ष सुरू करून अप्रत्यक्षरीत्या मराठ्यांनाच आव्हान दिले.[२] या व इतर अनेक कारणांमुळे इंग्रज आणि मराठ्यांमध्ये पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पडली. अखेर पेशव्याने अंतिम युद्ध करण्याचा निर्णय घेतला.त्याला अप्पासाहेब भोसले आणि मल्हारराव होळकर (यशवंतराव होळकरांचा पुत्र) यांनी साथ दिली.पण युद्धात पेशवा,भोसले आणि होळकरांना एकत्र येऊ न देता त्यांना इंग्रजांनी वेगवेगळे पराभूत केले. सीताबर्डीच्या लढाईत भोसल्यांचा, महिदपुरच्या लढाईत होळकरांचा आणि खडकी[३], कोरेगाव व आष्टा येथील लढाईत पेशव्यांचा पराभव झाला. अशा प्रकारे एक एक करीत मराठे इंग्रजांसमोर हरले व सर्वांनी शरणागती पत्करली. हेस्टिंग्सने भोसले, पेशवा बाजीराव दुसरा आणि शिंदे यांना अपमानजनक तह स्वीकारण्यास भाग पडले. बाजीरावाला पेशवेपद सोडावे लागले आणि त्याचा प्रदेश इंग्रजांनी आपल्या साम्राज्यात विलीन केला. छत्रपतींचे सातारा राज्य व इतर मराठा सरदारांच्या प्रदेशावर ब्रिटिश नियंत्रण प्रस्थापित झाले आणि खऱ्या अर्थाने मराठा सत्तेची समाप्ती झाली.
नागपूरच्या मुधोजी भोसले दुसरे आणि इंदूरचे मल्हारराव होळकर तिसरे यांच्या पाठिंब्याने पेशवा बाजीराव दुसऱ्याच्या सैन्याने ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध जोरदार हल्ला केला. ग्वाल्हेरचे चौथे मोठे मराठा नेते दौलतराव शिंदे यांनी राजस्थानवरील नियंत्रण गमावले असले तरीही त्यांनी राजस्थानला दबाव आणि मुत्सद्देगिरीने तटस्थ राहण्याचे पटवून दिले. ब्रिटिशांच्या निर्णायक विजयाने मराठा साम्राज्य फुटले आणि स्वराज्याचा अंत झाला. पेशवेच्या सैन्याने शक्य तितका प्रतिकार करीत इंग्रजांना रोखण्यासाठी अनेक लहान लढाया लढल्या. शेवटी इंग्रजांनी पेशवाई ताब्यात घेतली आणि दुसऱ्या बाजीरावाला कानपूरजवळील बिठूर येथे एका लहान जहागिरीला तडीपार करण्यात आले आले. पेशवाईचा बहुतांश प्रदेश मुंबई प्रेसिडेंसीमध्ये विलीन केला गेला. साताराच्या महाराजांना त्यांच्या संस्थानावर कायम ठेवले गेले. १८४८ मध्ये लॉर्ड डलहौसीच्या डॉक्ट्रीन ऑफ लॅप्सच्या बनावाखाली बॉम्बे प्रेसिडेन्सीने सातारा संस्थानसुद्धा खालसा केले. नागपूर व भोवतालच्या राजवटीचा उरलेला भाग, तसेच बुंदेलखंडमधील पेशव्याचे प्रदेश ब्रिटिश भारताचे सौगोर आणि नेरबुद्दा प्रांत म्हणून जोडले गेले. ब्रिटिशांनी होळकरांचे इंदूर शिंद्यांचे ग्वाल्हेर व पेशव्यांच्या हुकुमतीतील झांसी ही संस्थाने आपल्या अंमलात आणली.
मराठे आणि इंग्रज
[संपादन]
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याने विजापूर, हैदराबाद आणि दिल्लीच्या मुस्लिस सल्तनतींच्या नाकावर टिच्चून स्वराज्य राखले होते. स्थापनेनंतर काही दशकांतच मराठा साम्राज्य भारतातील एक प्रमुख सत्ता झाले. रायगड किल्ल्यावर राजधानी असलेल्या या साम्राज्याचे व्यवस्थापन आठ मंत्र्यांच्या मंडळाद्वारे (अष्टप्रधान) केले जात असे. त्यांतील पंतप्रधान पदावर असलेल्या मंत्र्याला पेशवे हा खिताब होता. कालांतराने मराठा साम्राज्याची सत्ता पेशव्यांच्या हातात आली व छत्रपती हे नाममात्र राजे उरले.
ब्रिटिशांचा वाढता प्रभाव
[संपादन]
अठराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मराठे आणि मोगलांमध्ये भारतावरील वर्चस्वासाठी सतत लढाया होत होत्या. या दरम्यान ब्रिटिशांनी मुंबई, मद्रास आणि कोलकाता येथे छोट्या छोट्या वखारी स्थापल्या व तेथून व्यापार व पुढे राजकारण करणे सुरू केले. मे १७३९ मध्ये मुंबईजवळील वसई येथे मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केल्याचे पाहून ब्रिटिशांनी मुंबईतील आपली आरमारी शिबंदी मजबूत केली. मराठ्यांना मुंबईपासून दूर ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी मराठ्यांशी तहाची बोलणी करण्यासाठी दूत पाठवले. या वाटाघाटींमधून आणि १२ जुलै, १७३९ रोजी एक करार मंजूर झाला, ज्याकरवे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मराठ्यांच्या प्रदेशात मुक्त व्यापार करण्याचे अधिकार मिळाले. इंग्रज आणि मराठ्यांच्यातील करार पाहून दक्षिणेस हैदराबादच्या निजामने मराठ्यांविरूद्धच्या युद्धासाठी फ्रेंच लोकांची मदत घेतली. यामुळे पुन्हा पेशव्यांनी इंग्रजांकडून मदत मागितली परंतु इंग्रजांनी त्याला नकार दिला. तरीसुद्धा मराठ्यांनी पुढील पाच वर्षांत निझामाचा पराभव करण्यास यश मिळविले.
१७५० ते १७६१ च्या काळात ब्रिटिशांनी भारतात फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव केला आणि १७९३ पर्यंत त्यांनी पूर्वेकडील बंगाल व दक्षिणेत मद्रासमध्ये आपली सत्ता ठाम केली. इकडे पश्चिमेकडे मराठ्यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांच्या महत्त्वाकांक्षेला आळा बसला होता. परंतु ते समुद्रामार्गे पश्चिम किनाऱ्यावरील सुरतमध्ये दाखल झाले. त्यांचे साम्राज्य वाढत असताना मराठ्यांनी सिंधूच्या पलीकडे कूच केले. उत्तरेकडील विस्तारित मराठा साम्राज्याची जबाबदारी पेशव्यांनी शिंदे आणि होळकराकडे सोपवली होती. पुढे जाता या दोन्ही संस्थानांनी मराठा साम्राज्याऐवजी स्वतःचे स्वार्थ पुढे करणे पसंत केले. त्यांनी साम्राज्याचा राजपूत, जाट आणि रोहिला व इतर हिंदू राज्यकर्त्यांपासून बचाव केला असला तरी मुस्लिम आक्रमकांविरुद्ध ते निष्प्रभ होते. १४ जानेवारी, १७६१ रोजी पानिपत येथे अफगाण अहमद शाह अब्दालीविरुद्ध मराठा साम्राज्याचा सडकून पराभव झाला. त्यात मराठा सरदारांची एक संपूर्ण पिढी कापून काढली गेली व साम्राज्य मोडकळीस आले. त्यानंतर माधवराव पेशव्यांच्या अंमलात १७६१ ते १७७३ दरम्यान मराठ्यांनी उत्तरेकडील घालवलेला मोठा प्रदेश परत मिळवला.
आंग्ल-मराठा संबंध
[संपादन]१९७७मध्ये पेशव्यांच्या कौटुंबिक कलह आणि सत्तासंघर्षातून नारायणराव पेशव्यांची हत्या झाल्यावर पेशव्यांचे लक्ष उत्तर आणि मध्य भारताकडे नव्हते. त्यातच होळकर आणि शिंदे यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे पुण्याची सत्ता मध्य भारतात नाममात्रच होती. नारायणरावानंतर पेशवेपदी आलेल्या रघुनाथरावाला वाटले की शिंदे-होळकर थेट पेशव्यांच्या सत्तेलाच आव्हान देतील. याला शह देण्यासाठी त्याने इंग्रजांकडून मदत मागितली. यासाठी इंग्रजांनी सुरतेला करार मान्य करून घेतला. यानुसार साळशेत बेट (आताच्या मुंबईचा मोठा भाग) आणि वसईचा किल्ला इंग्रजांच्या हवाली केले गेले आणि इंग्रजांनी पेशव्यांना पाठिंबा जाहीर केला. या कराराचा भारत आणि इंग्लंडमधील ब्रिटिश सत्तावर्तुळांमध्ये खळबळ माजली. ब्रिटिश राजतंत्राने ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करण्याचा मक्ता दिलेला होता परंतु तेथील सार्वभौम राजांशी इंग्लंडच्या वतीने असे करार करणे हे कायदेबाह्य होते. या कराराच्या अटींवरून पहिले इंग्रज-मराठा युद्ध पेटले. दोन्ही बाजू तुल्यबळ असल्याने हे युद्ध अनेक वर्षे रखडले. शेवटी महादजी शिंद्यांनी मध्यस्थी करून १७८२मध्ये सालबाईचा करार घडवून हे युद्ध थांबवले. यात इंग्रजांची जरी थेट सरशी झाली नसली तरी वॉरेन हेस्टिंग्सने दूरदृष्टी वापरून शिंदे, भोसले आणि पेशवे यांच्यात दुही निर्माण केली.
१७८६मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने लॉर्ड कॉर्नवॉलिस याला भारतातील प्रदेशांचा गव्हर्नर जनरल म्हणून नेमले. त्यावेळी मराठा साम्राज्य मजबूत स्थितीतच होते. सालबाईच्या तहानंतर ब्रिटिशांनी उत्तर भारतात कुरापती न काढता मराठ्यांच्या बरोबरीने राहण्याचे धोरण अवलंबिले. पुण्यात या वेळी ११ वर्षांचा सवाई माधवराव पेशवेपदावर होता व त्याच्या मंत्री नाना फडणवीसांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश, निजाम, फ्रेंच, पोर्तुगीज, शिंदे, होळकर व इतर सत्तांशी समतोल साधून ठेवलेला होते. १८०० साली फडणवीसांच्या मृत्यूनंतर पेशवाईत अनागोंदी माजली. शिंदे-होळकर संघर्षात पेशव्यांनी शिंद्यांची बाजू घेतल्याचे वाटून होळकरांनी १८०१मध्ये थेट पुण्यावर हल्ला केला. पेशवा दुसऱ्या बाजीरावाने पुण्यातून ब्रिटिश आरमाराच्या मदतीने पलायन केले. आपली पेशवाई आणि सत्ता गमावण्याची भीती वाटून बाजीरावाने वसईच्या तहावर शिक्कामोर्तब केले. यानुसार पेशवे आता खुद्द शासक न राहता इंग्रजधार्जिणे झाले. याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे आणि भोसल्यांनी इंग्रजांनी हल्ला केला व १८०३मध्ये दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. यात इंग्रजांनी मराठा सरदारांचा सडकून पराभव केला व मराठ्यांनी आपला बव्हंश प्रदेश इंग्रजांच्या स्वाधीन केला.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी
[संपादन]हजारो मैलांवरून आलेल्या ब्रिटिशांनी भारतीय भूगोलाचा अभ्यास केलेला होता आणि स्थानिक लोकांशी व्यापार करण्यासाठी आणि नंतर त्यांच्यावर सत्ता गाजविण्यासाठी येथील भाषा शिकून घेतलेल्या होत्या. त्यांच्याकडील त्याकाळील अद्ययावत असे तंत्रज्ञान होते आणि भारतातील परिस्थितीत प्रभावीपणे वापरण्यासाठीची शस्त्रे त्यांनी आणलेली होती. काही संशोधकांच्या मते जरी ब्रिटिशांकडे अद्ययावत तंत्रज्ञान नसते तरीही त्यांच्यातील शिस्त व संघटनेच्या जोरावर त्यांनी भारतीयांविरुद्धची बव्हंश युद्धे जिंकली असती. त्याचबरोबर त्यांचा मुत्सद्दीपणा आणि संधिसाधूपणाही त्यांच्या यशाला कारणीभूत होते. पहिल्या इंग्रज-मराठा युद्धानंतर वॉरेन हेस्टिंग्सने जाहीर केले की मराठ्यांबरोबरचा तह अनेक वर्ष अबाधित राहील. परंतु त्याचबरोबर त्याने पुण्यातील पेशव्यांच्या दरबारात चार्ल्स मॅलेट या स्थानिक रीतीरिवाज माहिती असलेल्या व्यापाऱ्याला राजदूत म्हणून नेमले. यायोगे हेस्टिंग्सला पेशव्यांशी सतत संपर्क ठेवायचा होता तसेच तेथील बितंबातमीही काढून आणायची होती.
तिसऱ्या युद्धाची पार्श्वभूमी
[संपादन]दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर पेशव्यांची सत्ता मुख्यत्वे महाराष्ट्रात देशावर पसरलेली होती. कृष्णा आणि गोदावरी नद्यांची खोरी आणि त्यांमधील सह्याद्रीच्या पठारावरील प्रदेश हा त्यांच्या थेट अंमलाचा प्रदेश होता. त्यांचे सरदार असलेले होळकर इंदूरात असून त्यांची सत्ता नर्मदा खोऱ्यात होती. शिंदे ग्वाल्हेर आणि बुंदेलखंड, गंगेच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडील टेकड्या आणि सुपीक मैदाने तसेच आसपासच्या प्रदेशावर हुकुमत गाजवत होते.
चंबळच्या दऱ्या, जंगले, विंध्य पर्वतरांगेच्या उत्तरेस आणि आत्ताच्या मध्य प्रदेशच्या वायव्य भागातील प्रदेश, माळवा पठार या भागांतून पेंढाऱ्यांचे राज्य होते.
खिळखिळे होत चाललेले मराठा सैन्य
[संपादन]दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर मराठा साम्राज्याचा प्रभाव आणि शक्ती काही अंशाने कमी झाली होती.[४] युद्धानंतर त्यांनी आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण करण्याकडे दुर्लक्ष केले आणि नवीन तंत्रज्ञान न अजमावता त्याच त्याच जुन्या, कालबाह्य युद्धनीतींवर भर दिला.[४] मराठ्यांचा तोफखाना जुन्यापुराण्या तोफांवर भर देउन होता. यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे म्हणजे कठीण काम होते. याउलट युरोपीयनांचा तोफखाना गतिशील आणि भेदक होता. जरी काही प्रमाणात मराठ्यांनी नवीन शस्त्रे अंगिकारली असली तरी ती सगळी आयात केलेली होती. ही हाताळणारे कुशल लोक परदेशी होते. एतद्देशीयांनी ही शस्त्रे स्वतः तयार करण्याचा कधी प्रयत्न केला नाही किंवा त्यांचे तंत्रज्ञानही आत्मसात केले नाही. मराठ्यांचे गुप्तहेर खाते कुशल नव्हते आणि नाना फडणवीसांचा काळ सोडता त्यांच्याकडील मुत्सद्दी देशातील संपूर्ण चित्र पाहण्यास असमर्थ होते. मराठ्यांची घातक पथके पेंढारी व इतर भाडोत्री सैनिकांनी भरलेली होते. या साम्राज्याला एक वाली नव्हता. खुद्द छत्रपतींच्याही दोन गाद्या होत्या -- सातारा आणि कोल्हापूर. पश्चिम महाराष्ट्र सोडता इतर सगळे प्रदेश तेथील सरदारांच्या अंमलात होते आणि त्यांवर एकसूत्र थेट कारभार अशक्य होता. शिवाजी महाराजांचे एकछत्री मराठा साम्राज्य आता कॉन्फेडरसी[मराठी शब्द सुचवा]मध्ये परिवर्तित झाले होते आणि एकजुटीने परकीय शत्रूशी युद्ध करण्यासाठीची एकता नष्ट झालेली होती.[४]
ब्रिटिशांची कारस्थाने
[संपादन]
मराठा साम्राज्य ढासळत असताना ईस्ट इंडिया कंपनी आपली शक्ती वाढवत होती. दुसऱ्या युद्धातील आपल्या विजयाचा पुरेपूर उपयोग करून घेत त्यांनी मराठ्यांना आपल्या टाचेखाली ठेवले होते. जरी दुसरा बाजीराव साम्राज्याचा पेशवा असला तरी पेशव्यांच्या बाजूने असलेले अनेक सरदार, जहागिरदार आणि संस्थानिक ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली किंवा संरक्षणाखाली गेलेले होते. याचा फायदा घेत ब्रिटिशांनी बडोद्याच्या गायकवाडांबरोबर करार करून त्यांच्या संस्थानातील महसूलाचा भाग पेशवाईपर्यंत पोचू नये अशी व्यवस्था केली. यामुळे भडकलेल्या पेशव्यांशी बोलणी करण्यासाठी गायकवाडांनी गंगाधर शास्त्री यांना आपले दूत म्हणून पुण्याला पाठवले. तेथे असताना त्यांची हत्या झाली. या हत्येमागे पेशवाईतील मंत्री त्र्यंबक डेंगळे असल्याचा संशय गायकवाड आणि ब्रिटिशांनी व्यक्त केला.
या प्रकरणाला उचलून धरत ब्रिटिशांनी बाजीरावाला एक करार करणे भाग पाडले.[५] १३ जून, १८८७ रोजी शिक्कामोर्तब झालेल्या या करारानुसार बाजीरावाला गायकवाडांवरील वादावर पडदा टाकणे, त्र्यंबक डेंगळे यांनी गुन्हा कबूल करणे आणि बडोद्याच्या महसूलीवर पाणी सोडणे भाग पडले. याशिवाय पेशवाईने मोठा प्रदेश ब्रिटिशांच्या स्वाधीन केला. यात महाराष्ट्रातील अनेक बेलाग किल्ले आणि कोंकणातील किनारपट्टी ब्रिटिशांच्या घशात गेली आणि नर्मदेच्या उत्तरेस आणि तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील पेशवाईचा सगळा प्रदेश ब्रिटिश आधिपत्याखाली आला. आणि पेशव्यांनी भारतातील इतर कोणत्याही संस्थानाशी वाटाघाटी करू नये असेही मान्य करून घेतले.[६] इतकेच नव्हे तर पेशवाईतील ब्रिटिश रेसिडेंट माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टनने पेशव्यांना आपले घोडदळ बरखास्त करणे भाग पाडून मराठा सैन्याचे कंबरडेच मोडले.[६][५]
पेंढारी
[संपादन]- हे सुद्धा पहा: पेंढारी

पेंढारी किंवा पिंडारी या भारतात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत रयतेची लूटमार व वाटमारी करणाऱ्या संघटित टोळ्या होत्या, ज्यात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाचे लोक होते. यांपैकी पेंढाऱ्यांच्या सशस्त्र संघटित टोळ्या राजकीय सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने उदयास आल्या.[७] घोड्यांवरून आपल्या कारवाया करणारे पेंढारी शिंदेशाही किंवा होळकरशाही असत. अंदाजे ३३,००० शिबंदी असलेल्या[८] पेंढाऱ्यांच्या सरदारांमध्ये चिटू, तुलसी, इमाम बक्ष, साहिब खान, कादिर बक्ष, नाथू आणि बापू हे होळकरशाही तर करीम खान, दोस्त मोहम्मद हे शिंदेशाही होते.
दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर शिंदे व होळकर यांनी आपले बरेचसे प्रांत ब्रिटिशांच्या स्वाधीन केले. त्याचा वचपा म्हणून शिंदे आणि होळकरांनी पेंढाऱ्यांना ब्रिटिश प्रांतावर आक्रमण करण्यास उद्युक्त केले. यांच्या धाडींमुळे त्रस्त झालेल्या रयतेला आपले गुजराण करणे अशक्य झाले.[९] उपासमारी किंवा पेंढाऱ्यांना जाउन मिळणे असे दोनच पर्याय त्यांना उरले. १८१५मध्ये सुमारे २५,००० पेंढाऱ्यांची टोळधाड मद्रास प्रेसिडेन्सीमधील कोरोमांडल किनाऱ्यालगतच्या प्रदेशावर चालून गेली आणि तेथील ३०० गावे लुटून मारली. अजून एक धाड निजामाच्या हद्दीत तर तिसरी मलबारवर पडली व तेथेही त्यांनी अशीच जाळपोळ केली. १८१७ पर्यंत पेंढाऱ्यांनी ब्रिटिश प्रदेशात छापेमारी सुरू ठेवली. पेंढाऱ्यांचा नायनाट करणे हाच एक उपाय ब्रिटिशांना होता.
व्यूहरचना आणि नियोजन
[संपादन]मराठा साम्राज्य
[संपादन]
पुणे तहांतर्गत पेशव्यांनी आपले घोडदळ बरखास्त केले होते परंतु गुप्तपणे त्यांना सात महिन्यांचे आगाऊ वेतन देउन पेशवाईच्या दिमतीस येण्यास फर्मावले.[१०] बाजीरावने बापू गोखले यांच्यावर येऊ घातलेल्या युद्धाच्या तयारीची जबाबदारी सोपविली.[११] गोखल्यांनी घोडदळाबरोबरच गुप्ततेतच पायदळाची सुद्ध भरती सुरू केली. यांत भिल्ल आणि रामोशी सैनिकांचा भरणा होता.[१२] अगदी पेंढाऱ्यांनाही भाडोत्री सैनिक होण्याचा प्रयत्न केला गेला.[१२] ऑगस्ट १८७१मध्ये त्यांनी सिंहगड, पुरंदर आणि रायगड किल्ल्यांची डागडुजी करून ते भांडते केले.[१२]
लष्करी तयारीबरोबरच काही मुत्सद्देगिरीचे ही प्रयत्न झाले. पेशव्यांनी भोसले, शिंदे आणि होळकर यांना पुन्हा आपल्या गोटात येण्याचे आवाहन केले. जसवंतराव घोरपडे सारख्या एल्फिन्स्टनच्या नोकरीतील नाराज एतद्देशीय लोकांचा माग काढून त्यांना गुप्तपणे भरती केले गेले. अशा इतर काही शिपायांनी पेशव्यांना नकार दिला आणि उलट आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पेशव्यांची आगळीक उघड केली.[१३][१४]
पेशव्यांनी थेट युरोपीयांच्यात फूट पाडणेही अजमावले परंतु ते मात्र शक्य झाले नाही.[१४]
पेशवा बाजीराव दुसऱ्याने १९ ऑक्टोबर, १८१७ रोजी दसऱ्याच्या उत्सवात मोठे सैन्य जमा केले.[१०] कवायतीदरम्यान घोड्यावर स्वार असलेल्या सैनिकांनी एल्फिन्स्टनच्या दिशेने एल्गार केला परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी मोर्चा वळवला.[१५] एल्फिन्स्टनला धाक दाखवणे आणि त्याच्या नोकरीत असलेल्या एतद्देशीय शिपायांना पेशव्यांच्या बाजूने लढण्यासाठी मनोबळ देणे हा या हिकमतीचा उद्देश होता.[१५][१५] पेशव्यांनी एल्फिन्स्टनची हत्या करण्याचाही कट रचला होता. गोखल्यांचा याला विरोध होता परंतु ही योजना पुढे चालली पण उघडकीला येण्याचा संशय आल्यावर उधळून टाकण्यात आली.[१०]
१८१७ च्या सुमारास मराठा साम्राज्याच्या सैन्यदलाचा अंदाज १ बर्टन यांच्या मते असा होता -- पायदळ: अंदाजे ८१,०००. घोडदळ: १,०६०००. तोफा: ५८९. पुण्यामध्ये पेशव्यांकडे १४,००० शिपाई, २८,००० घोडेस्वार आणि ३७ तोफा होत्या. होळकरांकडे ८,००० सैनिक, २०,००० घोडेस्वार आणि १०७ तोफा होत्या. ग्वाल्हेरमध्ये शिंदे आणि इंदूरात होळकरांकडे अनुक्रमे १६,००० आणि १८,००० सैनिक; १५,००० आणि १६,००० घोडेस्वार आणि एकूण सुमारे २०० तोफा होत्या.
यांशिवाय अफगाण सरदार आमिर खानकडे राजपुतान्यातील टोंक येथे १०,००० सैनिक, १२,००० घोडेस्वार आणि २०० तोफा होत्या[१६][१६][१७][१८] चंबळ आणि माळवा तसेच नर्मदा खोऱ्यांतील शिंदेशाही पेंढारी सरदार चिटू, करीम खान आणि दोस्त मोहम्मद यांच्याकडे अनुक्रमे १०,०००, ६,००० आणि ४,००० सैनिक होते परंतु यांच्याकडे शस्त्रे म्हणजे फक्त भाले होते. होळकरशाही पेंढारी सरदार तुळशी, इमाम बक्ष, साहिब खान, कादिर बक्ष, नथू आणि बापू यांच्यात मिळून २१,५०० सैनिक आणि सुमारे ४,००० घोडेस्वार होते.[७]
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी
[संपादन]गायकवाडांच्या राजदूत गंगाधर शास्त्री यांची हत्या म्हणजे पेशव्यांनी भारतातील ब्रिटिश सत्तेला दिलेले आव्हान समजून त्यांचे साम्राज्य गिळण्यासाठी रॉडोन-हेस्टिंग्सने भारतात मोठ्या सैन्याची जमवाजमव सुरू केली.[१९] ब्रिटिशांची भारतातील तोपर्यंतची ही सगळ्यात मोठी फौज होती. १,२०,००० शिबंदी असलेल्या या सैन्याची रचना रॉडोन-हेस्टिंग्सच्या हाताखालील ग्रँड आर्मी तथा बेंगाल आर्मी आणि जनरल थॉमस हिस्लॉपच्या हाताखालील आर्मी ऑफ द डेक्कन या दोन सैन्यांची मिळवणी होती.[२०] यात एतद्देशीय सैनिकांच्या ६० बटालियन, ब्रिटिश सैन्याच्या रेजिमेंटमधून रचलेल्या अनेक बटालियन, घोडदळ आणि ड्रगूनच्या अनेक तुकड्या, तोफखाना, इ.चा समावेश होता. ग्रँड आर्मीच्या ४०,००० सैनिकांच्या या फौजेचे तीन विभाग आणि एक अतिरिक्त राखीव विभाग केले गेले. यांतील डाव्या विभागाचे नेतृत्त्व मेजर जनरल मार्शल, मध्य विभाग रॉडोन-हेस्टिंग्स कडे होेते. सैनिक, आर्मी ऑफ द डेक्कनचे ७०,००० सैनिक पाच विभागांत होते. यांचे नेतृत्त्व ब्रिगेडियर जनरल डव्हजन, जनरल हिस्लॉप, जनरल माल्कम ब्रिगेडियर जनरल स्मिथ आणि लेफ्टनंट कर्नल अॅडम्स यांच्याकडे असल्याची नोंद आहे. याव्यतिरिक्त मद्रास आणि पुणे येथे दोन बटालियन आणि तोफखान्याच्या तुकड्याही तैनात होत्या. मद्रास रेसिडेन्सीमध्ये ६ व्या बंगाल घोडदळातील अतिरिक्त तीन तुकड्याही तयारीत होत्या. या सगळ्या सैन्याकडे अद्ययावत शस्त्रे होती तसेच त्यांचे रसदमार्ग उत्तमपणे आखलेले होते.
इकडे सैन्य गोळा करीत असताना ब्रिटिशांनी शिंदे, होळकर आणि आमिर खान यांच्याशी बोलणी सुरू केली. या तिन्ही संस्थानातील पेंढारी ब्रिटिश प्रदेशात धुमाकूळ घालत होते आणि या तिघांनीही नेपाळच्या राजाबरोबर संधान साधून ब्रिटिशांविरुद्ध युती करण्याची बोलणी सुरू केलेली होती.[२१] याबाबतचा गुप्त पत्रव्यवहार ब्रिटिशांनी पकडला. यावरून त्यांनी संस्थानिकांना पेचात पाडले आणि पेंढाऱ्यांविरुद्ध ब्रिटिशांना मदत करणे आणि पेंढाऱ्यांच्या नवीन टोळ्या उभ्या न होऊ देणे यासाठी ब्रिटिशांनी संस्थानिकांना वचन देणे भाग पाडले. हा करार, प्रचंड मोठे सैन्याचा दबाव आणि मुत्सद्दीगिरी वापरून ब्रिटिशांनी शिंदे आणि होळकरांना युद्ध सुरू होण्याआधीच बाजूला केले. राजपुतान्यातील आमिर खानला त्याची टोंकची रियासत अबाधित ठेवण्याचे वचन देउन ब्रिटिशांनी त्यालाही परस्पर दूर केले. आमिर खानने ब्रिटिशांवर विश्वास ठेवून आपली सेना बरखास्त केली तोफा ब्रिटिशांना विकून टाकल्या. याशिवाय आपल्या प्रदेशातून पेंढाऱ्यांना हाकलून देण्याचेही कबूल केले.[२१]
ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीस ब्रिटिशांनी ग्रँड आर्मीचा एक विभाग सिंध, दुसरा चंबळ आणि तिसरा नर्मदेच्या खोऱ्याच्या पूर्व भागात पाठवला. यांचे काम शिंदे आणि होळकर तसेच पेशव्यांच्या मध्ये राखून त्यांची हातमिळवणी रोखणे हा होता. राखीव विभागाने राजपुतान्यात आमिर खानच्या हालचालींवर नजर ठेवलेली होती. आर्मी ऑफ द डेक्कनचा पहिला आणि तिसरा विभाग हरदा येथे ठाण मांडून होता. तेथून ही फौज आसपासच्या किल्ल्यांना शह देउन होती. दुसरा विभाग मलारपूर येथून बेरार घाटावर लक्ष ठेवून होता तर चौथा विभाग पुणे आणि अमरावतीच्या आसपासच्या प्रदेशांवर जरब ठेवीत होता. पाचवा विभाग होशंगाबाद येथे तैनात करण्यात आला. राखीव विभाग भीमा आणि कृष्णा नद्यांच्या दोआबात दबा धरून बसला होता. अशा प्रकारे ब्रिटिशांनी मराठ्यांची पूर्णपणे नाकेबंदी करून ठेवलेली होती.
युद्धातील प्रमुख लढाया
[संपादन]
काही इतिहासकारांच्या मते तिसरे युद्ध हे दुसऱ्या युद्धाचे खरकटे काढण्यासाठीचे होते. ब्रिटिशांना ते पूर्वीच संपवता आले नाही कारण त्यांचे पैसे आणि मनुष्यबळ त्या युद्धाच्या शेवटी कमी पडले.[२२] परंतु हे सुद्ध लक्षात घेण्याजोगे आहे की ब्रिटिशांनी तिसऱ्या युद्धासाठी कसून तयारी केली होती. त्यासाठी त्यांनी प्रचंड मनुष्यबळ, शस्त्रे, पैसे आणि व्यूहरचना खर्ची घातलेले होते.
तिसऱ्या युद्धाची सुरुवात ब्रिटिशांनी पेंढाऱ्यांचा नायनाट करायचा या कथित उद्देशाने केली.
पेंढाऱ्यांवरील हल्ला
[संपादन]१८१७ च्या उन्हाळा व पावसाळ्यात मजबूत नाकेबंदी केल्यावर ब्रिटिश फौजांनी वर्ष संपताना पेंढाऱ्यांच्या प्रदेशात आक्रमण केले. जंगलातून आणि खेड्यापाड्यातून राहणाऱ्या पेंढाऱ्यांशी समोरासमोर दोन हात करणे शक्य नाही हे ब्रिटिशांना कळून चुकले होते व त्यांनी व्यूहात्मक हालचाली करीत पेंढाऱ्यांना पश्चिम आणि दक्षिणेकडून दाबण्यास सुरुवात केली. पेंढाऱ्यांची लूटमार व जाळपोळ करण्याची पद्धत पाहून ब्रिटिशांना वाटले होते की या प्रदेशात रसद मिळणे अशक्य आहे म्हणून त्यांनी आपले रसदमार्ग भक्कम केलेले होते. पेंढारी प्रदेशात आल्यावर त्यांना येथे मुबलक प्रमाणात अन्नसाठा आणि इतर रसद मिळून आली व त्यामुळे त्यांची बाजू अधिकच भक्कम झाली.[१९]
पेंढाऱ्यांच्या एकेका गाव, वस्ती आणि अड्ड्यांना घेरा घालत जनरल हिस्लॉप दक्षिणेकडून चालून आला आणि त्याने पेंढाऱ्यांना नर्मदेपलीकडे हुसकावून लावले. रॉडोन-हेस्टिंग्स त्याच्या सैन्यासह येथे दबा धरून बसलेला होता.[२३] या कचाट्यात सापडलेले करीम खानचे टोळके बेचिराख झाले. ब्रिटिशांनी मोक्याच्या ठिकाणी आपले सैन्य लावलेले असल्यामुळे पेंढाऱ्यांना त्यांच्याच प्रदेशत मुक्त संचार करणे अशक्य झाले व एकमेकांच्या मदतील ते येऊ शकले नाहीत. मुख्य रस्ते बंद झाल्याने त्यांच्या टोळधाडीही बंद झाल्या आणि ते विखुरले. फक्त भाल्यानिशी असलेल्या पेंढाऱ्यांचा प्रशिक्षित ब्रिटिश सैन्याच्या रायफली आणि तोफांसमोर टिकाव लागला नाही. त्यांचे छोट्या छोट्या टोळ्या करून ब्रिटिशांचा वेढा फोडण्याचे प्रयत्न सुद्धा फसले. आता ते पूर्णपणे कोपऱ्यात अडकलेले होते.[ संदर्भ हवा ]
यापुढे ब्रिटिशांनी हा वेढा आवळायला सुरुवात केली आणि पेंढाऱ्यांच्या टोळ्यांना एक एक करून चेचणे सुरू केले. जरी त्यांचे २३,००० सैनिक उरले असले तरी त्यांच्याकडून एकसंध हल्ला होत नव्हता व केलेले हल्ले ब्रिटिश सैन्य लीलया परतवून लावत होते. पेंढाऱ्यांनी गावागावातून आश्रय घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या पूर्वीच्या क्रुरतेची आठवण ठेवून गावकऱ्यांनी त्यांना थारा दिला नाही. अनेक ठिकाणी त्यांनी पेंढाऱ्यांना पकडून ठार मारले.[२३] पेंढाऱ्यांनी जंगलाकडे पळ काढला पण तरीही त्यांच्यामागचा ससेमिरा चुकला नाही. त्यांना अपेक्षित मराठ्यांची मदतही आली नाही कारण शिंदे आणि होळकरांना ब्रिटिशांनी ग्वाल्हेरच्या तहाने शह दिलेला होता.
एकेकाळी बलाढ्य आणि दहशत पसरवणारे पेंढारी सरदारांचा आता शिकार सुरू झाला. फेब्रुवारी १८१८पर्यंत जवळजवळ सगळ्या मुख्य सरदारांची वासलात लावली गेली. करीम खानने रॉडोन-हेस्टिंग्ससमोर आत्मसमर्पण केले. त्याला गोरखपूर येथे छोटी जमीन देउन तडीपार करण्यात आले. वासिल खानने लढा सुरू ठेवला परंतु ब्रिटिशांच्या हातील लागण्याआधीच त्याने विष घेउन आत्महत्या करून घेतली.[२४] जॉन माल्कमने सेतूचा पिच्छा पुरवला व एक-एक करीत त्याचे साथीदार टिपून मारले. एकटा पडलेल्या सेतूने जंगलात आश्रय घेतला आणि तेथे तो एका नरभक्षी वाघाचा शिकार झाला.[२५][२६][२७]
मध्य भारतातील गावकऱ्यांमध्ये दहशत पसरवणाऱ्या या पेंढाऱ्यांचा नायनाट केल्यामुळे त्यांच्याकडून ब्रिटिशांना सहानुभूती मिळाली.
खडकीची लढाई
[संपादन]

ब्रिटिश आपली फौज मध्य भारतात पेंढाऱ्यांच्या मागावर लावत असल्याने त्यांची दक्षिणेतील कुमक कमी झाली होती. ही संधी साधत पेशव्यांनी पुण्याजवळ त्यांच्यावर असावध असताना हल्ला करण्याचे ठरवले. या सुमारास ब्रिटिशांचे फक्त १,००० पायदळ सैनिक आणि २,००० घोडेस्वार तसेच ८ तोफा पुण्याजवळ दापोडी व बोपोडी येथे तैनात होते. पेशव्यांनी २०,००० घोडेस्वार आणि ८,००० पायदळ सैनिक पुण्यात जमा केले व दिमतीला २० तोफाही होत्या.[२८]
ही सगळी हालचाल पेशवे पर्वती टेकडीवरून दुर्बिणीतून पहात होते. त्यांच्यासोबत हुजुरातीतील ५,००० घोडेस्वार आणि १,००० सैनिक होते. खडकीच्या टेकडीवर ब्रिटिशांचे टेहळे होते. चतुःश्रृंगी टेकडी आणि खडकी टेकडी यांच्यामधील गणेशखिंडीतून मराठ्यांची चाल होणार होती. अनेक ठिकाणी उथळ असलेली मुळा नदी ओलांडून तेथील ओढे व नाल्यांमधून पुढे सरकत ब्रिटिशांना मागून घेरण्याचा मराठ्यांचा व्यूह होता.
५ नोव्हेंबर, १८१७ रोजी संध्याकाळी ४ वाजता सरदार विंचूरकरांनी ब्रिटिश रेसिडेंट माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टनच्या बंगल्यावर हल्ला केला. हा बंगला आत्ताच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात होता. तोफांचा मारा सुरू होताच एल्फिन्स्टन पळून दापोडीकडे गेला. त्यानंतर लगेचच मराठे आवारात घुसले व नासधूस करून ते पेटवून दिले. एल्फिन्स्टन दापोडीला पोचताच त्याने बोपोडी येथील सैन्याला ताबडतोब कूच करून दापोडीला यायचा हुकुम दिला. ही फौज तेथून पुढे सरकली. मराठ्यांनी गणेशखिंडीजवळून ब्रिटिशांच्या उजव्या अंगावर चाल केली. मराठ्यांना वाटले होते की इतकी प्रचंड (दहापट) सेना अचानक चाल करून येताना पाहून ब्रिटिश गांगरतील पण तसे न होता ब्रिटिश सैनिकांनी ठिय्या मारला आणि प्रतिकार सुरू केला. मराठ्यांनी हल्ला करायच्या सुरुवातीलाच त्यांचा जरी पटक्याचे निशाण मोडले होते. हा अपशकुन मनात होता म्हणून किंवा ब्रिटिशांचा आवेश पाहून मराठ्यांनी स्वतःच कच खाल्ली. हे पाहून सेनापती बापू गोखले स्वतः घोड्यावरून लढणाऱ्या तुकड्यांमधून फिरू लागले. त्यांनी सैनिकांना प्रोत्साहन देउन आणि प्रसंगी टोमणे मारून आपली फळी पुढ सरकावयचा प्रयत्न केला. ब्रिटिशांच्या उजव्या बाजूने पुढे सरकत त्यांना घेरण्याचा गोखल्यांचा बेत फसला. घोडेस्वारांचा हा एल्गार ब्रिटिशांसमोरच्या दलदलीत अडकला आणि शत्रूच्या रायफलांनी त्यांच्यावर निशाणबाजी सुरू केली. त्यातूनही सुटून काही मराठा स्वारांनी शत्रूवर धडक मारली परंतु तेथे ते संगीनींनी कापले गेले. उरलेल्या मराठ्यांनी पळ काढला. या गर्दीत गोखल्यांच्या घोड्याला गोळी लागली व त्यांना पायउतार व्हावे लागले. मोरोपंत दिक्षीत आणि सरदार रास्ते यांनी शत्रूच्या डाव्या फळीवर हल्ला चढवला पण तेथे आता ब्रिटिशांच्या रायफली सज्ज होत्या. मोरोपंत दिक्षीतांना रणांगणावर गोळ्या घालून मारण्यात आले. नेतृत्त्वहीन मराठ्यांनी तेथूनही माघार घेतली.
संध्याकाळी ४ वाजता सुरू झालेली ही लढाई चार तासांत संपली. यात मराठ्यांचे सुमारे ५०० सैनिक आणि घोडेस्वार धारातीर्थी पडले तर ८६ ब्रिटिश सैनिक कामी आले.[२९][३०] ब्रिटिशांनी ही संधी न दवडता लगेच पुण्यावर चाल करून शहराला वेढा घातला.
पेशव्यांचे पलायन
[संपादन]ब्रिटिशांनी पुण्याकडे चाल केलेली पाहून बाजीरावाने हुजुरत घेउन पुरंदरकडे पलायन केले.[३१] १३ नोव्हेंबरला जनरल स्मिथ सध्याच्या डेक्कन कॉलेजच्या जवळील आपल्या छावणीतून मुळा नदी ओलांडून घोरपडी येथे आला. पेशव्यांच्या पाठलाग रोखण्यासाठी बापू गोखल्यांनी त्याच्याशी झटापटी सुरू ठेवल्या. विंचूरकरांची ५,०००ची फौज मुळा-मुठेच्या फौजेला संगमावर थांबलेली होती. त्याला न जुमानता स्मिथ पुण्यात शिरला. पुण्यात त्याला काहीही प्रतिकार झाला नाही. १७ नोव्हेंबर, १८१७ रोजी ब्रिटिशांनी शनिवार वाड्यात प्रवेश करून त्यावर युनियन जॅक फडकाविला. इकडे पेशवे पुरंदरावरून साताऱ्याकडे आणि नंतर कोरेगांव भीमा येथे गेले. कोतवाली चावडीवरील भगवे झेंडे तसेच ठेवले गेले. ते आष्टीच्या लढाईनंतर उतरवण्यात आले. १ जानेवारी, १८१८ रोजी ब्रिटिशांनी मराठ्यांना कोरेगावला गाठले. कॅप्टन स्टाँटन ५,००० शिपाई, २०० भाडोत्री घोडेस्वार आणि ३ किलोचे गोळे फेकणाऱ्या २ तोफा घेउन पुण्याच्या वायव्येस भीमा नदीच्या काठावरील या गावाजवळ आला. स्टाँटनच्या सैन्यात फक्त २४ युरोपियन होते ते सुद्धा तोफा चालवणारे होते. इतर सगळे एतद्देशीय सैनिक होती.[३२] मराठ्यांनी गावाभोवती तटबंदी उभारून मोर्चेबांधणी केली होती. थंडीच्या मोसमात भीमा नदीत फारसे पाणी नव्हते आणि उथळ पाण्यातून ती सहज पार करता येत होती.
स्टाँटनने लगेचच गावाचा ताबा घेतला पण मराठ्यांची तटबंदी त्याला सहजासहजी भेदता आली नाही. त्याने गावाचे व मराठ्यांचे पाणी तोडले. मराठ्यांनी तटबंदीतून बाहेर येउन लढाई सुरू केली. गल्ली-बोळांतून चाललेल्या या हातघाईच्या लढाईत प्रत्येक गल्ली दोन्ही पक्षांच्या हातात अनेकदा आली आणि निसटली. मराठ्यांनी ब्रिटिश तोफांचाही ताबा घेतला पण तो त्यांना राखता आला नाही. मराठा सरदार त्र्यंबकजीने लेफ्टनंट चिशोमला ठार मारले व चिशोमने बापू गोखल्यांचा एकुलता एक मुलगा गोविंदच्या मृत्यूचा वचपा काढला. मराठ्यांनी रातोरात गावातून पाय काढला आणि ते पसार झाले. दुसऱ्या ठिकाणी जाउन तेथे पुन्हा झुंजायचा गनिमी कावा त्यांनी अवलंबलिला होता. या लढाईत मराठ्यांचे ५००-६०० सैनिक कामी आले. जनरल स्टाँटनने आपली फौज घेउन पुण्याकडे कूच केली पण तेथ न जाता तो शिरुर येथेच थांबला. जरी या लढाईत ब्रिटिशांचा विजय झालेला दिसत असला तरी प्रत्यक्षात हा निसटताच होता असे त्यांच्या पत्रव्यवहारात दिसून येते. जानेवारी १८१८मधील नोंदींनुसार बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या दुसऱ्या बटालियनच्या १ल्या रेजिमेंटचा कमांडर स्टाँटन सुदैवाने आपला मोर्चा परत सेरूरमध्ये परतू शकला आहे. १२५ जखमी, गोरेगाव येथे ५० पुरले आणि तेथे १२ किंवा १५ सोडले, ते गंभीरपणे जखमी झाले; पेशवे दक्षिणेकडे पळत आहेत. जनरल स्मिथ त्यांच्या मागे लागला आहे, यामुळे कदाचित बटालियन वाचली. असे दिसते.
लढाईनंतर पळालेले पेशवे साताऱ्याकडे गेले.[३३] ब्रिटिशांनी पाठपुरावा केल्यावर[३३] ते तसेच दक्षिणेकडे जात राहिले. मैसूरच्या राजाने थारा न दिल्याने ते परत फिरले.[३४][३५] पाठलाग करणाऱ्या ब्रिटिशांना बगल देत ते परत सोलापूरकडे आले.[३५] २९ जानेवारीपर्यंत हा उंदीर-मांजराचा खेळ सुरू होता. ब्रिटिश पेशव्यांच्या जवळ आले की लगेच गोखल्यांची फिरती शिबंदी त्यांच्यावर बाहेरून हल्ले करीत त्यांना झुलवत नेत असे.[३६] अशा अनेक झटापटींनंतरही पेशवे ब्रिटिशांच्या हातील लागलेले नव्हते.
साताऱ्यात ब्रिटिश
[संपादन]७ फेब्रुवारी रोजी जनरल स्मिथने साताऱ्यात प्रवेश केला आणि छत्रपतींचा राजवाडा ताब्यात घेतला व तेथे आपल्या विजय जगाला दाखविण्यासाठी राजवाड्यावर युनियन जॅक चढविला.[३६] तेथील जनतेने भडकू नये म्हणून त्याने जाहीर केले की तो कोणत्याही धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. याशिवाय त्याने जाहीर केले की सर्व वतने, इनाम, निवृत्तीवेतन आणि वार्षिक भत्ते आधीप्रमाणेच सुरू ठेवण्यात येतील. हे ऐकून पेशव्यांच्या सेवेत असलेल्या व त्यांच्या बाजूने अद्यापही असलेल्यांनी ही माघार घेतली आणि ब्रिटिशांविरुद्ध कारवाया करणे बंद केले.
आष्टीची लढाई
[संपादन]पेशव्यांचा पाठलाग करणाऱ्या जनरल स्मिथला १९ फेब्रुवारी रोजी कळले की पेशवे पंढरपूरकडे निघाले आहेत. त्याने या फौजेला वाटेत आष्टी गावाजवळ गाठले आणि निकराचा हल्ला केला. पेशवाईने झुंज घेतलेली ही शेवटची लढाई होती. या लढाईत पेशव्यांच्या बचाव करताना सेनापती बापू गोखले मृत्यू पावले. खुद्द पेशवे तेथून निसटले पण साताऱ्याचे छत्रपती आणि त्यांच्या आई यांना स्मिथने बंदी केले. परागंदा झालेले पेशवे आणि ब्रिटिश बंदी झालेल्या छत्रपतींमागे एप्रिल १८१८पर्यंत मराठा साम्राज्य नेतृत्त्वहीन झालेले होते. ब्रिटिशांनी याचा फायदा घेत सिंहगड आणि पुरंदर किल्ले जिंकून घेतले.[३७] यातील सिंहगडाचा पाडाव अगदी केविलवाणा होता. १३ फेब्रुवारी, १८१८ रोजी माउंस्टुअर्ट एल्फिन्स्टनने आपल्या रोजनिशीत केलेल्या नोंदीनुसार सिंहगडावर एकही मराठा शिबंदी नव्हती. त्यांऐवजी किल्ल्याचा बचाव करण्यासाठी १०० अरब, ६०० गोसावी आणि ४०० कोंकणी सैनिक होती. कोणी एक ११ वर्षांचा पोरगा किल्लेदार होता. किल्ला जिंकून घेतल्यावर तेथील शिबंदीला ब्रिटिशांनी मानाने वागवले. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात खजिना आणि संपत्ती होती आणि किल्लेदाराने जे आपले म्हणले ते त्याला देउन टाकण्यात आले.[३७]
नागपुरातील झटापट
[संपादन]नागपूरचे नाममात्र राजे परसोजी भोसले यांच्या हत्येनंतर त्यांचा चुलतभाउ मुधोजी भोसले तथा अप्पासाहेब यांनी गादी बळकावली व आपली सत्ता मजबूत केली. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी २७ मे, १८१६ रोजी ब्रिटिशांशी तह केला.[३८] त्यातील बाजीरावाशी संपर्क न साधण्याचे कलम धुडकावून भोसल्यांनी पेशवाईशी वाटाघाटी सुरू केल्या. यात व्यत्यय आणण्यासाठी रेसिडेन्ट जेंकिन्सने अप्पासाहेबांना रेसिडेन्सीमध्ये बोलावून घेतले. अप्पासाहेबांनी त्याला नकार देउन उघडपणे पेशवाईला आपला पाठिंबा जाहीर केला. आता नागपूरकरांशी लढाई अटळ असल्याचे दिसत असल्याने जेंकिन्सने ईस्ट इंडिया कंपनीच्या आसपासच्या ठाण्यांकडून मदत मागवली. त्याच्याकडे सुमारे १,५०० सैनिक होते[३९] व आता कर्नल अॅडम्स त्याची फौज घेउन नागपूरकडे निघाला.[३८] नागपूरकरांकडे सुमारे १८,००० सैनिक होते.[४०] त्यातील काही तुकड्या अरब होत्या. हे त्यांच्या शूरतेसाठी प्रसिद्ध असले तरी त्यांच्यात शिस्त नव्हती व त्यांच्याकडे फक्त तलवारी आणि जुन्यापुराण्या बंदुका होत्या.
ब्रिटिश रेसिडेन्सी सीताबर्डी किल्ल्याच्या पश्चिमेस साधारण २५०-३०० मीटर अंतरावर होती. ब्रिटिशांनी लढाईच्या सुरुवातीस टेकडीच्या उत्तर टोका वर ताबा मिळवला.[४१] मराठे व अरबांनी त्यांना तेथून दक्षिणेकडे हुसकावून लावले. यानंतर ब्रिटिशांची कुमक येण्यास सुरुवात झाली. आपल्या सर्व शक्तीनिशी ब्रिटिशांनी मराठ्यांवर हल्ला चढवला आणि मराठ्यांचा पराभव केला. यात ब्रिटिशांनी आपल्या २४ युरोपियन आणि एकूण सुमारे ३०० सैनिक गमावले. मराठ्यांचेही तितकेच नुकसान झाले. अप्पासाहेबांनी ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली. ९ जानेवारी रोजी ब्रिटिश आणि नागपूरकरांनी तह केला. त्यानुसार ब्रिटिशांनी भोसल्यांचा बहुतांश प्रदेश आणि किल्ले हिसकावून घेतले आणि त्यांना नाममात्र प्रदेशावर राज्य करण्याची, ते सुद्धा अनेक निर्बंध घालून, परवानगी दिली. ब्रिटिशांनी सीताबर्डी किल्ल्याजवळ अधिक तटबंदी उभारली. काही दिवसांनी काहीतरी कारण काढून अप्पासाहेबांना अटक करण्यात आली. त्यांनी तेथून पलायन केले.
काही दिवसांनी आप्पासाहेबांना अटक करण्यात आली व त्यांना अलाहाबाद येथे नेण्यात आले. तेथे जात असताना त्यांनी पलायन केले आणि पंजाबमधील शीखांकडे आश्रय मागण्यासाठी त्या दिशेने निघाले. शीखांनी अप्पासाहेबांना थारा दिला नाही आणि ते जोधपूरजवळ पुन्हा ब्रिटिशांच्या हाती लागले. जोधपूरच्या राजा मान सिंग याने ब्रिटिशांना अप्पासाहेबांची हमी दिली व त्यांना आपल्या आश्रयास ठेवले. अप्पासाहेब वयाच्या ४४व्या वर्षी १५ जुलै, १८४९ रोजी मृत्यू पावले.
होळकरांचा पाडाव
[संपादन]
- हे सुद्धा पहा: महिदपूरची लढाई
या सुमारास इंदूरच्या होळकरांचा दरबार रफादफा झालेला होता. ११ वर्षांचे तिसरे मल्हारराव होळकर आपल्या वडिलांच्या उपवस्त्र असलेल्या तुळशीबाई होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य करीत होते. तुळशीबाईने मल्हाररावांना ब्रिटिशांच्या आधीन होण्याचा सल्ला दिल्याने तिच्याच सैनिकांनी तिची हत्या केली. यानंतर ब्रिटिशांनी होळकरांवर चाल केली व इंदूरच्या उत्तरेस ४० किमी अंतरावर महिदपूर येथे होळकर सैन्याला गाठले.
२१ डिसेंबर १८१७ रोजी सकाळी ९ वाजता ब्रिटिश आणि होळकर एकमेकांच्या पल्ल्यात आले.[४२] ब्रिटिशांचे नेतृत्त्व स्वतः लेफ्टनंट जनरल थॉमस हिस्लॉपकडे होते. या निकराच्या लढाईत होळकरांचे ३,००० सैनिक ठार किंवा जखमी झाले.[२४] ब्रिटिशांनी ८०० सैनिक गमावले.[४३] यात होळकांच्या सैन्याचा नाश झाला.[४४] त्यातील उरल्यासुरल्या तुकड्यांचा ब्रिटिशांनी दूरवर पाठलाग करून नायनाट केला. मल्हाररावांना अटक करण्यात आली. त्यांच्या मंत्र्यांनी तहाची बोलणी करून त्यांना सोडवायचा प्रयत्न केला. ६ जानेवारी, १८१८ रोजी होळकरांनी मंदेश्वरचा तह केला[२३] आणि त्यात ब्रिटिशांची पूर्णपणे शरणागती मागितली.[४४] ब्रिटिशांनी होळकरांचा खजिना लुटून नेला आणि मल्हाररावांना नाममात्र राजा म्हणून सत्तेवर ठेवले.[२३]
किल्लेदारांचा प्रतिकार
[संपादन]
युद्ध संपताना १८१८ आणि १८१९मध्ये ब्रिटिशांनी जवळजवळ सगळ्या मराठा संस्थानिक आणि जहागिरदारांचा पाडाव केलेला होता परंतु किल्ल्या-किल्ल्यांमधून अद्यापही स्वातंत्र्याचे भगवे झेंडे फडकत होते. संस्थानिक आणि पेशव्यांनी शरणागती पत्करली असली तरी या किल्ल्यांचे किल्लेदार ब्रिटिशांच्या आधीन झालेले नव्हते. २७ फेब्रुवारी, १८१८ रोजी जनरल हिस्लॉप थळनेरच्या किल्ल्याजवळ आला. त्याला वाटले होते की तेथील किल्लेदार मान तुकवून पुढे येईल परंतु थळनेरचे किल्लेदार तुळशीराम मामा यांनी आपल्या शिबंदीला ब्रिटिशांवर मारा करण्यास फर्मावले. संतापलेल्या हिस्लॉपने किल्ल्याला वेढा घातला व तोफांनी तो भाजून काढला. नंतर तो स्वतः किल्ल्यावर चालून गेला तेथील अरब आणि मराठा सैनिकांना हरवून किल्ला काबीज केला. मामांना विश्वासघात केल्याच्या आरोपाखाली एका झाडावर फाशी देण्यात आले.[४५] त्यानंतर या प्रदेशातील नराळा आणि मालेगावचे किल्लेही ब्रिटिशांनी जिंकून घेतले. त्यातल्या त्यात मालेगावने त्यांना झुंजवले.
१८१९ च्या मार्चमध्ये असिरगढचा किल्ला हे एकमेव स्वतंत्र ठिकाण होते. तेथील किल्लेदार जसवंत राव लारने ब्रिटिशांना थोपवून धरलेले होते. मार्च्या मध्यावर ब्रिटिशांनी भलीथोरली फौज जमवून किल्ल्याला वेढा घातला आणि शेजारील शहरात ठाण मांडले. किल्ल्यात फक्त १,२०० सैनिक होते. त्यांच्यावर सतत तोफांचा मारा करूनही ते बाहेर येत नाहीत हे पाहून ब्रिटिशांनी शेवटी ९ एप्रिल, १८१९ रोजी एल्गार केला आणि मराठा साम्राज्याचे शेवटचे ठाणे परास्त केले. या विजयानिशी ब्रिटिशांनी मोहीम संपवली आणि युद्धाचा अंत झाला[४६][१९]
युद्धाचा अंत आणि त्याचे परिणाम
[संपादन]
असिरगढच्या पाडावानंतर मराठ्यांचा सगळा प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात आला. साताऱ्याच्या छत्रपतींनी ब्रिटिशांचे आधिनत्व स्वीकारल्याने पेशवा हे पद बाद झाले. बाजीरावाने याआधीच ३ जून, १८१८ रोजी शरणागती घेतली होती परंतु पेशवेपद काढून घेतल्यावर त्याने कायदेशीर आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण काहीही फायदा नव्हता. पेशव्यांना त्यांच्या लवाजम्यासकट उत्तर भारतातील कानपूर शहराजवळ बिठूर येथे रवाना केले गेले.[४७] बाजीरावाने वार्षिक ८,००,००० रुपयांचे निवृत्तीवेतन स्वीकारले.[४८] याशिवाय आपले सरदार, जहागिरदार, कुटुंब, आश्रित आणि देवस्थानांनाही वार्षिक उत्पन्न देण्याचे कबूल करून घेतले.[४८] उत्तरेकडे जाताना पेशव्यांनी आपला खजिना बरोबर नेला होता. त्या शिवाय ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात लूट करून प्रचंड संपत्ती नेली. यात नासक हिराही शामिल होता. बिठूरला गेल्यावर बाजीरावाने उरलेले आयुष्य धर्मकार्ये करण्यात, मद्यपानात आणि अजून लग्ने लावून घेण्यात घालवले.[४९] पेशव्यांच्या या विलासी जीवनशैलीमुळे त्यांच्याशी तह करणाऱ्या जॉन माल्कमवर टीका झाली.
मराठ्यांचा पराभव आणि पेशव्यांची हकालपट्टीने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात उत्तरेत सतलज नदीपासून दक्षिण भारतापर्यंत जवळजवळ अनिर्बंध सत्ता मिळाली. पेशवाईचा प्रदेश बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये शामिल केला गेला तर पेंढाऱ्यांकडून जिंकलेला प्रदेश सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस म्हणून नवीन प्रांत केला गेला. शिंदे आणि होळकरांची संस्थाने त्यांच्याकडेच राहिली आणि त्यांनी इंग्रजांचे सार्वभौमत्व स्वीकारले. राजपूतानामधील संस्थानिक नाममात्र राजे म्हणून ब्रिटिशांच्या सत्तेखाली आले. त्यांनी साताऱ्यामध्ये प्रतापसिंह भोसले यांना छत्रपती पदावर बसवले. होळकर कुटुंबातील अगदी लहान मुलाची नागपूरच्या सिंहासनावर वर्णी लागली. त्र्यंबकजी डेंगळे, ज्यांच्यावर गंगाधरशास्त्री यांच्या वधाचा आरोप होता व ज्याने हे प्रकरण हाताबाहेर चिघळले, यांना अटक करून बंगालमध्ये पाठवले गेले.
सत्तेवर आल्यानंतर माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टनने अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. नवीन कायद्यांबरोबरच त्याने प्रांतांची पुनर्रचना करून महसूल वसूलीसाठीची नवीन पद्धत आखली, ज्याने देशमुख, पाटील आणि देशपांडे यांचे महत्व कमी झाले. ब्रिटिशांना कळले होते की इतक्या मोठ्या प्रदेशावर सत्ता गाजविण्यासाठी स्थानिक रीतीरिवाज आणि भाषेचा अभ्यास आणि आदर करणे गरजेचे आहे. एल्फिन्स्टनने १८२०मध्ये मराठी भाषा प्रमाणीकरण करण्याचेही सुरू केले.
या युद्धानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धापर्यंत भारतावर अनिर्बंध सत्ता गाजवली.
हे सुद्धा पहा
[संपादन]- खडकीची लढाई[३]
- मराठा साम्राज्य
- आष्टीची लढाई
- भीमा कोरेगावची लढाई
- मराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी
- पहिले इंग्रज-मराठा युद्ध
- दुसरे इंग्रज-मराठा युद्ध
- ब्रिटिश साम्राज्य
- ब्रिटिश भारत
- भारताचा इतिहास
- शिवाजी महाराज
| मागील: दुसरे इंग्रज-मराठा युद्ध |
इंग्रज-मराठा युद्धे – |
पुढील: --- |
संदर्भ
[संपादन]- ^ http://www.britannica.com/EBchecked/topic/256745/Francis-Rawdon-Hastings-1st-marquess-of-Hastings
- ^ "संग्रहित प्रत". 2016-04-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-12-09 रोजी पाहिले.
- ^ a b http://www.sacred-texts.com/hin/odd/odd29.htm
- ^ a b c Chhabra 2005, पान. 39.
- ^ a b Naravane 2006, पाने. 79–80.
- ^ a b Chhabra 2005, पान. 17.
- ^ a b Naravane 2006, पाने. 86–87.
- ^ Naravane 2006, पान. 86.
- ^ Russell 1916, पान. 396.
- ^ a b c Naravane 2006, पान. 80.
- ^ Duff 1921, पाने. 468–469.
- ^ a b c Duff 1921, पान. 468.
- ^ Duff 1921, पान. 474.
- ^ a b Duff 1921, पान. 470.
- ^ a b c Duff 1921, पान. 471.
- ^ a b Burton 1908, पान. 153.
- ^ Bakshi & Ralhan 2007, पान. 261.
- ^ United Service Institution of India 1901, पान. 96.
- ^ a b c Burton, R.G. (1910). The Mahratta And Pindari War. Simla: Government Press.
- ^ Bakshi & Ralhan 2007, पान. 259.
- ^ a b Sinclair 1884, पाने. 194–195.
- ^ Black 2006, पाने. 77–78.
- ^ a b c d Sinclair 1884, पाने. 195–196.
- ^ a b Keightley 1847, पान. 165.
- ^ Travers 1919, पान. 19.
- ^ Sinclair 1884, पान. 196.
- ^ Hunter 1909, पान. 495.
- ^ Naravane, M. S. (2014). Battles of the Honorourable East India Company (Making of the Raj). New Delhi: A.P.H. Publishing Corporation. pp. 80–82. ISBN 9788131300343.
- ^ Murray 1901, पान. 324.
- ^ Chhabra 2005, पान. 19.
- ^ Duff 1921, पान. 482.
- ^ Naravane 2006, पान. 81.
- ^ a b Duff 1921, पान. 487.
- ^ Duff 1921, पान. 483.
- ^ a b Duff 1921, पान. 488.
- ^ a b Duff 1921, पान. 489.
- ^ a b Duff 1921, पान. 517.
- ^ a b Naravane 2006, पान. 82.
- ^ Burton 1908, पान. 159.
- ^ Burton 1908, पान. 160.
- ^ Naravane 2006, पान. 83.
- ^ Hough 1853, पान. 71.
- ^ Sarkar & Pati 2000, पान. 48.
- ^ a b Prakash 2002, पान. 136.
- ^ Deshpande, Arvind M., John Briggs in Maharashtra: A Study of District Administration Under Early British Rule (1987), Mittal Publications, साचा:Isbn, pg. 31
- ^ Cannon, Richard (1849). Historical Record of the 67th Foot. London: Parker, Furnivall & Parker.
- ^ Duff 1921, पाने. 513–514.
- ^ a b Duff 1921, पान. 513.
- ^ Chhabra 2005, पान. 21.