श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे गणेशाला समर्पित असलेले पुण्यातील एक हिंदू मंदिर आहे.[१] मंदिराला दरवर्षी लाखांहून अधिक भाविक भेट देतात. [२] [३] या मंदिराच्या भक्तांमध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा समावेश होतो, जे वार्षिक दहा दिवसांच्या गणेशोत्सवासाठी येथे उपस्थित असतात. [४]

मंदिराच्या मुख्य गणेश मूर्तीचा 10 दशलक्ष (US$२,२२,०००) रकमेचा विमा उतरवला गेला आहे. [५] हे मंदिर १३० वर्षे जुने आहे. २०१७ मध्ये या मंदिराने आपल्या गणपतीची १२५ वर्षे साजरी केली. [६]

मंदिराचे ऑक्टोबर २०१२ मधील छायाचित्र

गणपतीच्या मूर्तीचा इतिहास[संपादन]

सन १८९३

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्‍ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्‍ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसह सर्व थरांतील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पूजा चालू असते.[७]

सन १८९६

सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते. सध्या ही मूर्ती आपल्या कोंढवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे.

सन १९६८

सन १८९६ साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. त्यामुळे सन १९६७ साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयुग तरुण मंडळाच्या प्रताप गोडसे आदींनी गणपतीची नवीन मूर्तीं बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली. बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्टरवरून मोठ्या पडद्यावर दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठया मूर्तींचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री. शिल्पी यांनी त्याकाळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली,. गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती, त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला, व त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पूजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले. त्याकाळी ही मूर्ती बनविण्याचा खर्च सुमारे ११२५/- इतका आला होता.

हा गणपती लोकमान्य टिळक यांचा काळात बसवला गेला.

ट्रस्ट[संपादन]

दगडूशेठ हलवाई गणपती गणेशोत्सव २०२२ पुणे,महाराष्ट्र

या गणपतीच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट स्थापन झाला. हा ट्रस्ट समाजोपयोगी कामांना मदत करण्यात अग्रेसर आहे.[८]

हे सुद्धा पहा[संपादन]

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ[संपादन]

प्रसिद्ध गणपती मंदिरे[संपादन]

बाहेरील दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा यंदाचाही गणेशोत्सव मंदिरामध्येच होणार – अशोक गोडसे". Loksatta. 2021-09-02. 2021-09-08 रोजी पाहिले.
  2. ^ Zore, Prasanna D (1997). "Pune's Dagedu Sheth Halwai dresses up for Ganeshotsva". Rediff. 4 December 2008 रोजी पाहिले.
  3. ^ Zelliot, Eleanor; Maxine Berntsen (1988). The Experience of Hinduism: Essays on Religion in Maharashtra. SUNY Press. p. 104. ISBN 978-0-88706-664-1.
  4. ^ Rabade, Parag (9 July 2007). "Pune leads the community". Deccan Herald. Archived from the original on 21 November 2008. 4 December 2008 रोजी पाहिले.
  5. ^ "Ganesh clears obstacles for women reciting Atharvasheersha". Hindustan Times. 4 सप्टेंबर 2008. Archived from the original on 31 May 2012. 5 December 2008 रोजी पाहिले.
  6. ^ "Dagdusheth Ganpati" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 25 November 2002.
  7. ^ "जाणून घ्या पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास". Loksatta. 2018-08-30. 2021-09-08 रोजी पाहिले.
  8. ^ "Dagdusheth Ganpati" (इंग्रजी भाषेत). 2022-09-04 रोजी पाहिले.