Jump to content

अखिल भारतीय मुस्लिम लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुस्लिम लीग या पानावरून पुनर्निर्देशित)

अखिल भारतीय मुस्लिम लीग हा ब्रिटीश भारतातील राजकीय पक्ष होता. या पक्षाची स्थापना ३० डिसेंबर १९०६ रोजी झाली.

लोकमान्य टिळकांच्या अखेरच्या काळात म्हणजे १९१५ च्या दरम्यान महात्मा गांधीचा भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर उदय झाला व टिळकांच्या निधनानंतर ते काँग्रेसचे सर्वेसर्वा झाले. १९२० ते १९४७ या कालखंडात भारतीय स्वातंत्र्याचा लढा त्यांनी चालविला, भारतीय राजकारणात काँग्रेस ही जशी प्रमुख शक्ती होती, त्याचप्रमाणे दुसरीही एका शक्ती होती. ती शक्ती म्हणजे मुस्लिम लीग होय.

१ ऑक्टोबर १९०६ रोजी आगाखान यांच्या नेतृत्वाखाली व्हाइसराॅय मिंटो यांना भेटले. या लहानशा घटनेतून मुस्लिम लीगच्या स्थापनेस चालना मिळाली व मुसलमानांच्या स्वतंत्र राजकीय जीवनाला संघटनेचे अधिष्ठान प्राप्त झाले. मुसलमानांच्या स्वतंत्र राजकीय संघटनेची स्थापना करण्यास ब्रिटिशही कारणीभूत होते. लॉर्ड मिंटो यांनी लावलेली फुटीरतेची व जातीयवादाची विषवल्ली फोफावण्यास वेळ लागला नाही. स्वतंत्र मतदार संघ व लोकसंखेच्या मानाने जास्तीचे प्रतिनिधित्व यासंदर्भात मिंटोचे आश्वासन मिळताच मुस्लिम नेत्यांनी आपल्या हालचाली वाढविल्या. १९०६ च्या डिसेंबर महिन्यात ' मोहमेडन एज्युकेशनल कॉन्फरन्स ' चे अधिवेशन भरले. यात डाक्क्याचे नवाब सलीमउलल्ला यांनी मुस्लिमांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यानुसार डाक्का येथे विकार- उल- मुल्क यांच्या ध्यक्षतेखाली मुस्लिम नेत्यांची बैठक झाली. नवाब सलीमउलल्ला यांनी मुस्लिमांची स्वतंत्र राजकीय संघटना उभारण्यासंबंधीचा ठराव मांडला. तर हकीम अजमलखान यांनी त्यास अनुमोदन दिले व अशाप्रकारे डिसेंबर १९०६मध्ये मुस्लिम लीगची विधिवत स्थापना झाली.