चापेकर बंधू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हुतात्मा दामोदर चापेकर
हुतात्मा बाळकृष्ण चापेकर
हुतात्मा वासुदेव चापेकर व महादेव रानडे व खंडो साठे

जन्म[संपादन]

चापेकर बंधू हे आद्यक्रांतिकारी होते. त्यांच्या मध्ये दामोदर (जन्म २४ जून १८६९), बाळकृष्ण (जन्म १८७३) आणि वासुदेव हरी चापेकर (जन्म १८७९) होते.

रॅंडचा खून[संपादन]

१९व्या शतकाअखेरीस पुण्यात प्लेगने थैमान घातले. प्लेगला आळा घालण्याच्या निमित्ताने विल्यम चार्ल्स रॅन्ड या बिटिश अधिकार्‍याने लोकांचा छळ केला. लोकांची घरे उपसून जाळणे, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली महिलांशी अभद्र वर्तन करणे, कर्त्या पुरुषांना नामर्दाप्रमाणे हीन वागवणे अशा त्याच्या क्रूर आणि अमानवी कृत्यांमुळे समाजाच्या सर्वच थरांमध्ये संतापाची लाट उसळली. चापेकर बंधूंच्या मनात या अन्यायामुळे मनात सूडाची ठिणगी पडली आणि आग धगधगू लागली..

राष्ट्र आणि धर्मप्रेमाच्या या जाज्वल्य भावनेतूनच चापेकरबंधू रॅंडच्या विरोधात पेटून उठले आणि २२ जून १८९७ला रॅंडवर पाळत ठेवून चापेकर बंधूंपैकी दामोदरने त्याच्यावर गोळी झाडली. २५ जूनला रॅंडचा मृत्यू झाला. आयर्स्ट तत्काल मृत्यू पावला.

दामोदर चापेकर यांना अटक होण्यासाठी बक्षिसाच्या लालचीने ब्रिटिश अधिकार्‍यांना मदत करणार्‍या द्रविड बंधुंना (रामचंद्र व गणेश शंकर द्रविड) वासुदेव चापेकर व महादेव रानडे यांनी गोळ्या घालून ठार केले.

शिक्षा[संपादन]

दामोदर १८ एप्रिल १८९८ला फाशी गेले. वासुदेव यांस ८ मे १८९९ रोजी, महादेव रानडे यांस १० मे आणि बाळकृष्ण चापेकर यांस १२ मे १८९९ रोजी येरवडा कारागृहामध्ये फाशी देण्यात आले.

चापेकरांचा फटका

दामोदर चापेकरांच्या फाशीपूर्व अंतिम इच्छेप्रमाणे त्यांची टिळकांशी भेट घडवून आणली गेली. टिळकांनी चापेकरांना भगवद्‌गीतेची एक प्रत दिली, ती हातात धरूनच दामोदर फासावर गेले. त्यांनंतर सावरकरांनी चापेकरांचा फटका नावाची काव्यकृती रचली. त्यातील दोन ओळी अशा :-

भक्ष्य रॅंड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥

ही कविता लिहिली त्यावेळी सावरकरांचे वय १५ वर्षे होते.

आत्मचरित्र[संपादन]

दामोदर चापेकर यांनी आत्मचरित्र लिहिले होते, ते पोलिसांनी त्यांच्या ताब्यात ठेवले होते. पुढे ‘हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त’ या नावाने विठ्ठल गोपाळ खोबरेकर यांनी संपादित करून ते प्रकाशित केले.

संदर्भ[संपादन]

[१]

दामोदर चापेकर यांचे आत्मचरित्र - मुंबई पोलिस रेकॉर्ड वरील