नरहर रघुनाथ फाटक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नरहर रघुनाथ फाटक

नरहर रघुनाथ फाटक (जन्म : जांभळी(भोर संस्थान), एप्रिल १५, १८९३ - - मुंबई, डिसेंबर २१, १९७९) हे मराठी प्राध्यापक, प्रकांड पंडित, पत्रकार, चरित्रलेखक, इतिहाससंशोधक, मराठी संत वाङ्‌मयाचे चिकित्सक व साहित्यसमीक्षक होते. न.र. फाटके हे १९३७ साली विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. हैदराबाद येथे १९४७ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.

फाटक स्वतंत्र प्रज्ञेचे समीक्षक होते तसेच प्रचलित विचारप्रवाहाविरुद्ध मतप्रदर्शन करून वाद निर्माण करणे हे त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचे वैशिष्ट्य होते.

जीवन[संपादन]

न. र. फाटकांचे घराणे मूळचे कोकणातील कमोद या गावातले आहे. तेथून त्यांचे पूर्वज भोर संस्थानातील जांभळी (जि. पुणे) येथे आले. त्यांचे आजोबा भोर संस्थानात कारभारी होते , तर वडील (रघुनाथ भिकाजी फाटक) सरकारी नोकरीत. त्यामुळे न. र. फाटकांचे शिक्षण भारतातील भोर, अबू, ग्वाल्हेर, अजमेर, लाहोर, नाबाड, पुणे आणि इंदूर अशावेगवेगळ्या गावांतून झाले. १९१५ मध्ये ते अलाहाबाद विद्यापीठातून तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन बी. ए. झाले त्यांनी चित्रकलेच्या परीक्षा दिल्या होत्या आणि पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडे त्यांनी संगीताचे शिक्षणही घेतले होते.

बी.ए. झाल्यानंतर नंतर त्यांनी भंडारा येथील सरकारी शाळेत एक वर्ष साहाय्यक शिक्षक म्हणून नोकरी केली. पुढे न.र.फाटक यांनी काही काळ विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नवा काळ ह्या नियतकालिकांच्या संपादनकार्यात भाग घेतला. सत्यान्वेषी आणि फरिश्ता ह्या टोपण नावांनी त्यांनी बरेच वृत्तपत्रीय लेखन केले आणि आपल्या निर्भीड पत्रकारीचा ठसा उमटविला. १९३५-३७ ह्या काळात श्रीमती नाथीबाई ठाकरसी विद्यापीठात आणि त्यानंतर १९३५ मध्ये मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजात ते मराठीचे प्राध्यापक होते. ह्याच कॉलेजातून १९५७ साली ते सेवानिवृत्त झाले.

इंदुप्रकाश या मुंबईच्या त्या काळच्या प्रसिद्ध दैनिकात वृत्तसंपादन करण्यापासून त्यांनी आपल्या वाङ्‌मयीन कारकिर्दीला प्रारंभ केला. १९२३ मध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नवाकाळ सुरू केले तेव्हा फाटक त्यातील संपादकीय विभागात काम करू लागले. वैचारिक शिस्त असणारा आणि अंतर्दृष्टी देणारा प्राध्यापक म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. विविधज्ञानविस्तार, चित्रमयजगत, विविधवृत्त, इंदुप्रकाश. Native Opinion इत्यादी वृत्तपत्रांमधून ते निरनिराळ्या विषयांवर लिहीत. प्रचलित विचारप्रवाहांविरुद्ध मतप्रदर्शन करून वाद निर्माण करणे हे त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी अंतर्भेदी या टोपणनावाने व्यक्तिचित्रेही लिहिली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे (१९२४) या ग्रंथापासून फाटकांनी चरित्र लेखनाला सुरुवात केली. चरित्रकार म्हणून त्यांचा पिंड इतिहासकाराचा होता. त्यांच्यापुढे गिबनचा आदर्श होता. व्यक्तीच्या कार्याला सामाजिक परिस्थिती आकार देत असते. व्यक्तीचे तिच्या काळाशी नाते असते ही जाणीव ठेवून फाटकांनी चरित्रे लिहिली. सामाजिक इतिहासाचे सम्यक आकलन ठेवून ते लेखन करतात.
फाटकांनी एकदा न.चिं. केळकर यांनी लिहिलेल्या टिळकचरित्राचे विस्तृत परीक्षण केले आहे. तपशिलाच्या अनेक बारीकसारीक चुका, अनावश्यक मजकूर, पाल्हाळ कार्यकारणभावाची समज नसणे, उपलब्ध असूनही साधनसामग्रीचा यथोचित उपयोग न करणे, टिळकांचे पक्षपाती समर्थन करीत राहणे असे आक्षेप फाटकांनी या चरित्रग्रंथावर घेतले आहेत. न.र. फाटक हे स्वतंत्र प्रज्ञेचे समीक्षक होते.[१]


मराठी पत्रकार संघाचे ते पहिले अध्यक्ष होते. भारत इतिहास संशोधन मंडळ, प्राज्ञ पाठशाला मंडळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अशा विविध संस्थांचे ते सदस्य वा पदाधिकारी होते.

न.र. फाटक यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

 • अर्वाचीन महाराष्ट्रांतील सहा थोर पुरुष
 • अठराशे सत्तावनची शिपाईगर्दी (१९५८)
 • आदर्श भारत सेवक (गोपाळ कृष्ण गोखले यांचे चरित्र - १९६७)
 • श्री एकनाथ वाङ्‍मय आणि कार्य (१९५०)
 • कलावती (टोपणनावाने लिहिलेली कादंबरी)
 • थोरांच्या आठवणी (इंदुप्रकाशमध्ये लिहिलेली लेखमाला)
 • नाट्याचार्य कृ.प्र. खाडिलकर (चरित्र)
 • सार्थ दासबोध
 • पानिपतचा संग्राम भाग १, २
 • प्रेमपरीक्षा (टोपणनावाने लिहिलेली कादंबरी)
 • भारतीय राष्ट्रवादाचा विकास
 • मराठी व्याख्यानमाला १९७०-७१
 • मराठेशाहीचा अभ्यास (१९५०)
 • मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष
 • श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर खंड १ ते १०
 • मुंबई नगरी (मुंबई शहराचा इतिहास)
 • न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे (चरित्र - १९२४)
 • यशवंतराव होळकर यांचे चरित्र
 • रामदास : वाङ्‍मय आणि कार्य (१९५२)
 • श्रीरुक्मिणी स्वयंवर
 • लोकमान्य (टिळकांचे चरित्र)
 • श्री शाहू स्मारक व्याख्यानमाला- पुष्प १, २,३
 • श्री समर्थ चरित्र
 • श्री समर्थ चरित्र, वाङ्मय आणि कार्य
 • श्री समर्थ चरित्र, वाङ्मय आणि संप्रदाय
 • समुद्रमंथन
 • सुधारणेचा मनू (टोपणनावाने लिहिलेली कादंबरी)
 • स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश (अनेक खंडी)
 • श्रीमन्महाराज यशवंतराव होळकर : मराठेशाहीअखेरचा अद्वितीय स्वातंत्र्यवीर (चरित्र)
 • ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी (१९४८)
 • ज्ञानेश्वर : वाङ्‍मय आणि कार्य (१९५२)

चरित्र[संपादन]

 • न.र. फाटक यांचे ’ज्ञानतपस्वी रुद्र’ या नावाचे चरित्र, अचला जोशी यांनी लिहिले आहे.

पुरस्कार[संपादन]

 • साहित्य अकादमी पुरस्कार (१९७०) : ’आदर्श भारत सेवक’ (गोपाळ कृष्ण गोखल्यांचे चरित्र) या पुस्तकाला

संदर्भ[संपादन]

 1. ^ [ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2950961.cms म.टा दि.१४/०४/२००८]