हमीद दलवाई
हमीद दलवाई | |
---|---|
जन्म | सप्टेंबर २९, १९३२ |
मृत्यू | १९७७ |
धर्म | इस्लाम |
चळवळ | मुस्लिम समाजसुधारणा चळवळ |
संघटना | मुस्लिम सत्यशोधक मंडळ |
वडील | उमर |
पत्नी | मेहरुन्निसा |
हमीद उमर दलवाई (जन्म : सप्टेंबर २९, १९३२; मृत्यू : मे ३, १९७७) हे मुस्लिम समाजसुधारक व मराठी साहित्यिक होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील मिरजोळी या गावात झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण चिपळूणमध्ये तर पुढील शिक्षण मुंबईत रुपारेल व इस्माईल युसुफ या महाविद्यालयात झाले.
मुस्लिम समाजसुधारणेच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९७० मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापले. मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लिम समाजात आधुनिक विचार प्रसाराचे प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करते.[१]
हमीद दलवाई यांनी इ.स. १९६६ मध्ये सात मुसलमान महिला घेऊन मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढला. मुसलमानांधील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व आदींमुळे त्यांच्यामधील स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणावी हा या मोर्चाचा हेतू होता. मुसलमान स्त्रियांचा हा बहुधा पहिलाच मोर्चा असावा.
महंमद पैगंबरांचे जीवन, तसेच कुराण-हदीस यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लिम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लिम समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरू व्हावेत यासाठी हमीद दलवाईंनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या शेवटच्या आजारातही त्यांनी स्वस्थ न बसता ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ नावाचे पुस्तक लिहिले. हे लेखन प्रामुख्याने भारतीय मुसलमानांच्या धार्मिक प्रवृत्ती, राजकारण, त्यांचे राजकीय नेतृत्व, पाकिस्तानची चळवळ आणि उद्दिष्टे, हिंदुत्ववाद या विषयांवर आहे. त्यातील तपशील, तपशिलांमागील अर्थ, उद्याच्या भारतासाठी बदलाची गरज यांसंबंधीचे पुस्तकातील विवेचन वाचल्यावर हमीद दलवाईंच्या प्रबोधनविषयक दृष्टीची कल्पना यावी. समाजप्रबोधनाचे काम करणार्या कोणाही दृष्ट्या नेत्याला होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त विरोध दलवाईंना झाला.[२]
प्रकाशित साहित्य[२][संपादन]
- लाट (कथासंग्रह)
- इंधन (कादंबरी)
- भारतातील मुस्लिम राजकारण (प्रकाशन दिनांक - ९ जानेवारी, २०१७)
- मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया
- राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान
- इस्लामचे भारतीय चित्र
- मुस्लीम जातीयतेचे स्वरूप : कारणे व उपाय
पुरस्कार[संपादन]
मरणोपरान्त जीवनगौरव पुरस्कार : हमीद दलवाई यांची अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे. (जानेवारी २०१७). हमीद दलवाई यांच्या वतीने त्यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
लघुपट[संपादन]
'हमीद : द अनसंग ह्युमनिस्ट' हा हमीद दलवाई यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा लघुपट आहे.
हमीद दलवाई यांचे चरित्र[संपादन]
- हमीद दलवाई : क्रांतिकारी विचारवंत - लेखक प्रा. शमसुद्दीन तांबोळी
संदर्भ[संपादन]
- ^ "मुस्लिम सत्यशोधक मंडळ". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती (mr-IN मजकूर). 2019-07-04. 2019-07-24 रोजी पाहिले.
- ↑ a b "हमीद दलवाई यांच्या जीवन व वाङमयीन कर्तुत्वाचा आढावा". shodhganga.inflibnet.ac.in. २४ जुलै २०१९ रोजी पाहिले.