हरिश्चंद्रगड
हरिश्चंद्रगड | |
नाव | हरिश्चंद्रगड |
उंची | ४००० फूट |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | अहमदनगर जिल्हा[[[महाराष्ट्र]] |
जवळचे गाव | पाचनई,खिरेश्वर |
डोंगररांग | हरिश्चंद्राची रांग |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे.येठील शिखर अहमदनगर जिल्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.
स्थान
[संपादन]एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. बाकी सर्व किल्यांप्रमाणे हा देखील आदिवासी कोळी महादेव समाजाकडेच होता. या किल्याला या समाजाची इतिहासाची पार्श्वभूमी आहेच, परंतु त्याच प्रमाणे
पौराणिक महत्त्व
[संपादन]मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोघलांनी घेतला व त्यानंतर १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे (आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील ) होते. इंग्रजांनी 1818 मध्ये हा किल्ला जिंकला.
हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती.
गडाचे वर्णन
[संपादन]गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होते. पावसाळ्यात या गडाचे सौदर्य काही औरच असते. वनस्पतींची विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारवीच्या जाळी , धायटी , उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणिवैभव मात्र शिकारींमुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. तारामती य गडाचे सर्वोच्च शिखरावरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तहेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ’ट्रेकर्सची पंढरी’ ठरतो. हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंचीवर आहे.
गडावर जाण्याच्या वाटा
[संपादन]गडावर जाण्यासाठी सध्या तीन चार वाटा प्रचलित आहेत. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही फार आहेत.
खिरेश्वरकडील वाट
[संपादन]जुन्नर तालुका/पुणे जिल्हातुन खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने लोक हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी साधारणपणे ही वाट घेतात. मुंबई-जुन्नर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. पुण्याहून आळेफाटामार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबीफाट्यास उतरता येते. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर ५ कि.मी. अंतरावर खिरेश्वर गाव लागते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होऊ शकते. हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावातून अदमासे एक कि.मी. अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडप छताला शिल्प पट्टिका बसवलेली आहे. आतील गाभारा असलेल्या दाराच्या माथ्यावर शेषयायी विष्णू व परिवाराचे अप्रतिम कोरीव शिल्प आहे. मूषकवाहन मकर-रती, अशा अनेक कोरीव प्रतिमा येथील पाषाणावर आढळतात. या मंदिराला `नागेश्वराचे मंदिर' असेही म्हणतात. या गावातून दोन वाटा गडावर जातात. 1) एक वाट ही तोलार खिंडीतून सुमारे ३ तासात गडावरील्र मंदिरापर्यंत पोहचवते. 2) दुसरी वाट ही गडावरील जुन्नर दरवाजाला पोचते. ही वाट पूर्वी प्रचलित होती. आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घेतले पाहिजे कारण वाटेत कुठेच पाणी नाही.
नळीची वाट
[संपादन]नळीची वाट बेलपाड्यातून(मुरबाड तालुका, ठाणे जिल्हा) हरिशचंद्रगडावर जाते. या वाटेने जाताना तब्बल दहा-बारा तासांचा प्रस्तरारोहणाचा (रॉक क्लाइंब) समावेश असलेला खडतर मॅरेथॉन ट्रेक करावा लागतो.ही वाट अतिशय खडतर असून वाटेत भलेमोठे दगड आहेत नळीची वाट चढण्यासाठी सोबत दोर असणे आवश्यक आहे.चार किमीचा व १००० फूट उंच ४० अंश कोनात ट्रेेक करावा लागतो.
सावर्णे-बेलपाडा-सायले असा घाटमार्ग
[संपादन]गड सर करण्यासाठी एक सावर्णे-बेलपाडा-सायले असा घाटमार्ग आहे. परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा. या मार्गे येण्यासाठी कल्याण-मुरबाड मार्गे माळशेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गावात उतरावे. येथून `बेलपाडा' या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या साहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे दीड दिवस लागतो. या वाटेलाच `नळीची वाट' असेही म्हणतात.
पाचनईकडील वाट
[संपादन]हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट पाचनई मार्गे अहमदनगर जिल्ह्यातूनही आहे. यासाठी मुंबई-नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते.
- राजुर-पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे १.५ - २ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई गाव उंचावर असल्याने येथून गड गाठायला जास्त कष्ट पडत नाहीत. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे 4 कि.मी. आहे.
- हल्लीच राजूर ते तोलार खिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे. ही वाट राजूर, अंबीत, पाचनई, मुळा नदीचे खोरे, घनचक्कर या बाळेश्वर रांगेतील टेकडीस वळसा घालून सरळ एक तासात तोलारखिंडीत पोहचते. येथून वर जाणारा रस्ता हा दमछाक करणारा आहे. येथून २ तासात गडावरील मंदिरात पोहचता येते. पायथ्यापासून तोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड तोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. खिंडीतून चढणाऱ्या वाटेवर खडकात पायठण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो.
तोलार खिंड
[संपादन]हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पूर्व बाजूला इंग्रजी 'यू' आकाराची खिंड आहे. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध तोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमधील दुवा आहे. येथे आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा इतिहास आजही दैदिप्यमान आहे.
येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बऱ्याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या मार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो.
पाहण्यासारखी ठिकाणे
[संपादन]हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर
[संपादन]येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.
हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे.
मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये [केदारेश्वराची] लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते.
कोकणकडा
[संपादन]गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा हे या किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण आहे. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू 'U' या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो.
हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड, भैरवगड, (मोरोशी), तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.
गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे. कोकणकड्यावर १८३५ मध्ये कर्नल साईक्सला इंद्रवज्र दिसले होते.
कोकणकड्याला पडलेली धोकादायक भेग
[संपादन]हरिश्चंद्रगडावरील या प्रसिद्ध कोकणकड्याच्या माथ्यावर मोठी भेग पडली असून, त्यामुळे हा कडा धोकादायक बनला आहे. या भेगेची तातडीने दुरुस्ती न केल्यास कड्याचा वरचा काही भाग येत्या काही दिवसांत कोसळण्याची शक्यता आहे. पर्यटकांना कड्याच्या टोकाचा हा भाग लोंबणारा (पुढे आलेला) असल्याची कल्पना असतेच असे नाही. हा भाग कोसळल्यास कोकणकड्याच्या सौंदर्यालाच तडा जाणार आहे.
कड्याच्या टोकापासून सुमारे पाच ते दहा फूट अंतरावर भेग असून, येथील खडकाचा भाग आतून पोखरला गेला आहे. कोकणकड्यावर सरासरी पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. दरीतून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा वेगही प्रचंड असतो. ऊन, वारा, पाऊस यामुळे ही भेग रुंदावण्याची शक्यता आहे.
तारामती शिखर
[संपादन]तारामती शिखर गडावरील व पुणे जिल्हातील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची साधारणतः ४८५० फूट आहे. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत. त्यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखे लागतात. माथ्यावर दोन-तीन शिवलिंगे आहेत.
ऐतिहासिक महत्त्व
[संपादन]महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही.
(अहमदनगरचा 1818 मधील जिल्हाधिकारी हेन्री पाॅटींजर याने 14जुनला हरिश्चंद्रगड तोडला-सुधीर जोर्वेकर)[ संदर्भ हवा ]
या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत. तसेच सुमारे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. येथील मंदिर कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरूनच जमातीची ओळख आहे. संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्व महादेव मंदिरे ही या जमातीचे प्रतीक आहेत. तसेच महादेव कोळी समाजाचा निकरीचा असणारा इंग्रज, सावकार, जमीनदार यांच्या विरुद्ध असणाऱ्या लढ्याचे हे एक प्रतिक आहे.
१७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून महादेव कोळी समाजाचे कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.
मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो, ज्याला 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. तसेच गडाच्या दक्षिण बाजूने पुष्पावती व काळु या नद्यांचा उगम होतो. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.
- 'शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा ।
- मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥
- हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु ।
- सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥
- मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान ।
- ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥
- जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा॥'
हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर व भिंतींवर आढळतात. येथे तपश्चर्या करून झाल्यावर श्री चांगदेवांनी तत्त्वसार नावाचा ग्रंथ लिहिला.
छायाचित्रे
[संपादन]-
गडावरील मंदिर
-
तारामती कडा
-
मंदिरासमोरील पाण्याचे कुंड
-
मंदिरावरील नक्षीकाम
हे सुद्धा पहा
[संपादन]- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर
- भारतातील किल्ले