चंद्रपूर जिल्हा
चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी 'चांदा' म्हणत असत. चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा गडचिरोली जिल्हा वेगळा बनवला गेला. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. चंद्रपूरात अनेक चुन्याच्या खाणीदेखिल आहेत.
जिल्ह्याच्या उत्तरेस नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा व वर्धा जिल्हा, पश्चिमेस यवतमाळ जिल्हा, पूर्वेस गडचिरोली जिल्हा, दक्षिणेस आदिलाबाद जिल्हा (आंध्र प्रदेश) आहे.हा जिल्हा वैनगंगा व वर्धा नदीच्या पात्रांदरम्यान वसला आहे, ह्या त्या जिल्ह्याच्या पूर्व व पश्चिम सीमा बनतात.
तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से.च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८ मि. मी. इतके आहे. जिल्ह्याचे हवामान उष्ण असून मुख्यत: तीन ऋतु आहेत-उन्हाळा पावसाळा व हिवाळा. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. मुख्य पीके तांदूळ (खरिप), कापूस, सोयाबीन, गहू, तूर, मूग, उडीद, मिरची ही आहेत.
जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी. आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे. मराठी भाषेबरोबरच गोंडी, कोलामी व हिंदी भाषा या भाषादेखिल प्रचलीत आहेत.
महत्त्वाचे उद्योग- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, कोळसा खाणी, महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे महत्त्वाचे उद्योग आहेत. बाबा आमटेंचा आनंदवन आश्रम याच जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्प हे या जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य आहे.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- रामाळा Archived 2020-08-13 at the Wayback Machine. व जुनोना तलाव, श्री महाकाली माता मंदीर (चंद्रपूर) Archived 2020-08-13 at the Wayback Machine., घोडाझरी प्रकल्प, सातबहिणी तपोवन (नागभीड), अड्याळ टेकडी (ब्रम्हपुरी), रामदेगी (चिमूर), आसोला मेंढा तलाव ( सावली), विंजासन लेणी, गवराळा गणपती ( दोन्ही भद्रावती ) व ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान प्रकल्प.
जिल्ह्या्तील तालुके[संपादन]
- चंद्रपूर,
- वरोरा,
- भद्रावती,
- चिमुर,
- नागभीड,
- ब्रम्हपूरी,
- सिंदेवाही,
- मूल,
- गोंडपिंपरी,
- पोंभुर्णा,
- सावली,
- राजुरा,
- कोरपना,
- जिवती व
- बल्लारपूर