पेब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेबचा किल्ला
नाव पेबचा किल्ला
उंची
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण नेरळ
जवळचे गाव
डोंगररांग
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


पेब (विकटगड) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पनवेलच्या ईशान्येला मुंबई-पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन-चार किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. हा किल्ला चढताना लागणारे जंगल घनदाट आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे.

इतिहास[संपादन]

या किल्ल्याचे नाव पेब हे नाव पायथ्याच्या असलेल्या पेबी देवीवरून पडले असावे. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता, असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो.

जाण्याच्या वाटा[संपादन]

मध्य रेल्वेने कर्जतजवळच्या नेरळ रेल्वे स्टेशनपासून थोडे बाहेर आल्यावर समोरच माथेरान आणि त्याच्या बाजूस पेबच्या किल्ल्याचे दर्शन होते. नेरळ स्टेशनला उतरल्यावर डावीकडची वाट माथेरानला व उजवीकडची वाट पेबला जाते. डोंगराच्या दिशेने जाताना मैदान, पोल्ट्रीफार्म व घरांची अर्धवट बांधकामे दिसतात. त्यानंतर समोर दिसणाऱ्या इलेक्ट्रिकच्या मोठमोठ्या टॉवरच्या दिशेने गेल्यावर सिमेंटचा एक मोठा पाया असलेला टॉवर येतो. तेथून थोडे पुढे गेल्यावर एक मोठा धबधबा लागतो. या धबधब्याजवळच तीन वाटा आहेत.

    तसेच पनवेल तालुक्यातील सतीची वाडी व कोंबल टेकडी येथून दोन तासात जंगल सफर करत व खडी चढण चढत किल्ल्यावर पोहोचता येते.

१) धबधब्याला लागून असलेली वाट. २) मधून गेलेली मुख्य वाट. ३) टॉवर्सला लागून असलेली वाट .

या तीन वाटांपैकी पहिल्या वाटेने पुढे गेल्यास जंगल लागते. पण पुढे या वाटेने जाणे अशक्यच आहे. तिसरी वाट म्हणजे मानेला वळसा घालून घास घेण्यासारखा प्रकार होय. तसेच या वाटेला पनवेलकडे जाणारे फाटे फुटत असल्याने वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे. मधली मुख्य वाट हीच किल्ल्याच्या गुहेपर्यंत नेणारी खरी वाट आहे. या वाटेने गणपतीचे चित्र काढलेला दगड येतो. या दगडाच्या उजव्या बाजूने वर चढल्यावर पुढे झऱ्यातून जावे लागते. तरीही वाट न सोडता याच वाटेने खिंडीच्या दिशेने वाटचाल करून खिंडीत पोहोचल्यावर तेथून डाव्या हाताला वळून पुढे जावे लागते. तेथून पुढे पांढरा दगड लागतो. पांढरा दगड चढण्यास अतिशय कठीण असून तो पार केल्यानंतर मात्र पुढे थोड्याच अंतरावर गुहा लागते. प्रथमच या किल्ल्यावर जाणाऱ्यांनी वाटाडया घेणे हितकारक आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]

नेरळ रेल्वे स्टेशनपासून पासून कार ने अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.

किल्ला चढायला लागणारा वेळ[संपादन]

किल्ला चढण्यास लागणारा वेळ दोन ते अडीच तास आहे. पेबवर जाण्यासाठी गिर्यारोहकांना आणखी एक वाट आहे. त्यासाठी माथेरानच्या पॅनोरमा पॉईंटवर यावे. येथून सुमारे ६ तासात पेबच्या गुहेत पोहचता येते. गुहेच्या पायथ्याशी गरुड कोरला आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे[संपादन]

पेबचा किल्ला चढताना वाटेत लागणारा धबधबा हे एक मोठे आकर्षण आहे. किल्ल्यावरील गुहेसमोरून पावसाळ्यात सुंदर देखावा दिसतो. गुहेसमोरून आपल्याला नवरा-नवरी, भटोबा असे सुळके दिसतात. या गडावर कोणत्याही ऋतूत जाता येते.

राहण्याची/पाण्याची सोय[संपादन]

किल्ल्यावर गुहेमध्ये स्वामी समर्थांचे शिष्यगण रहात असल्याने गुहेच्या बाहेर किंवा जवळच असलेल्या कपारीमध्ये १० जणांच्या रहाण्याची सोय होते. गुहेजवळच असलेले पाण्याचे टाके हीच पिण्याच्या पाण्याची सोय. जेवणाची सोय स्वतःच करावी लागते.


संदर्भ[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]