संतोषगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संतोषगड
नाव संतोषगड
उंची २९०० फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण फलटण सातारा, महाराष्ट्र
जवळचे गाव ताथवडे, ता.फलटण जि.सातारा
डोंगररांग शंभू महादेवाचे डोंगर
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


संतोषगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एक किल्ला आहे. संतोषगडाला ताथवड्याचा किल्ला असे ही म्हणतात.

सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे. शंभूमहादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग यापैकी म्हसोबा डोंगररंगेवर संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत. हा सर्व परिसर तसा कमी पावसाचाच मात्र उसाच्या शेतीमुळे सर्व परिसर सधन झालेला आहे. सर्व ठिकाणी वीज, दूरध्वनी अशा आधुनिक सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. फलटणमाण तालुक्‍यात असणाऱ्या या किल्ल्यांना पाहण्यासाठी दोन दिवस पुरतात.

कसे जाल?[संपादन]

नकाशा

किल्ल्यावर जाण्यासाठी फलटण आणि सातारा दोन्ही शहरातून जाता येते. ताथवडे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. ताथवडेला अनेक मार्गांनी पोहचता येते. फलटण ते ताथवडे अशी एस टी सेवा दर अर्ध्या तासाला उपलब्ध आहे. फलटण ते ताथवडे हे साधारण १९ कि.मीचे अंतर आहे.

साताऱ्याहून पुसेगाव मोळघाटमार्गे फलटणला जाणाऱ्या बसने ताथवडेला उतरता येते. पुसेगाव ते ताथवडे हे साधारण २३ कि.मीचे अंतर आहे.ताथवडे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित वाट आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो.

रचना[संपादन]

गड हा तीन भागात विभागला आहे. पहिल्या टप्प्यावर सरंक्षक तटबंदी तर दुसऱ्या टप्प्यावर माचीचा भाग आणि सर्वात वरचा बालेकिल्लाचा भाग आहे.

उपयोग[संपादन]

किल्ला सा छोटासाच आहे पण तटबंदी,बुरूज असे पाहण्यासाखे बरेच काही आहे. गडावरून फार दूरच्या प्रदेशावर नजर ठेवता येत असे. पश्‍चिमेस ताथवडा घाट, दक्षिणपूर्व पसरलेली डोंगररांग याच डोंगररांगेवर सीताबाईचा डोंगर व वारुगड आहे.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

ताथवडे गावात "बाळसिद्धनाथांचे जीर्णोद्धार" केलेले मंदिर आहे. मंदिराच्या पायरीवरून सन १७६२ मध्ये किल्ल्याचा जीर्णोद्धार केल्याचे समजते. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवर एक मठ आहे. या मठाच्याच बाजूला एक गुहा आहे. या गुहेत थंड पाण्याचा साठा आहे. एक वाल्मिकी ऋषींची मूर्ती आहे. मठाच्याच वरच्या बाजूला एक दरवाजा आहे, मात्र येथपर्यंत पोहचण्यासाठी वळसा घालून यावे लागते. मठाच्या डाव्या बाजूला जाणारी वाट तटबंदीला चिटकूनच पुढे जाते. पुढे वाटेतच एक छोटेसे देऊळ लागते. येथून वर थोडी उजवीकडे सरकत जाणारी वाट आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाज्यातच घेऊन जाते. आज किल्ल्याचा दरवाजा मात्र केवळ नाममात्रच शिल्लक राहिलेला आहे. दरवाज्यामधील पहारेकऱ्यांच्या देवड्या आजही सुस्थितीत आहेत. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच हनुमानाचे टाके आहे. त्याच्याच मागे वाड्यांचे व घरांचे अवशेष आहेत. धान्य कोठारांच्या भिंती उभ्या आहेत पण छप्पर उडालेले आहे. याच्याच मागच्या बाजूला एक मोठा खड्डा आहे.लांबवरून पाहिल्यास एखादी विहीरच वाटते मात्र जवळ गेल्यावर समजते की खाली पाण्याचं टाकं आहे आणि टाक्‍यात उतरण्यासाठी चक्क कातळभिंतीला भोक पाडून पायऱ्या केलेल्या आहेत. किल्ल्याची पहिल्या टप्प्यावर असणारी संरक्षक तटबंदी, बुरूज आजही चांगल्या परिस्थितीत उभे आहेत.आजमितीस अनेक किल्ल्यांची तटबंदी ढासळलेल्या आढळतात पण संतोषगड याला अपवाद आहे.

महत्त्व[संपादन]

विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा, तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी, यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे शिलेदार यांची डागडुजी केली. आग्रा मोहिमेच्या सुमारास वारुगडाचे ठाणे राजांनी जिंकल्याचेही सांगितले जाते. पुढे पेशवाईनंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. त्यांनी गडांच्या वाटा, महाद्वारांच्या कमानी पाडल्या. भग्न अवशेषांमध्ये इथला इतिहास आज विखुरला असला, तरी डोळसपणे पाहताच तो उलगडू लागतो. दोन्ही गडांवरून प्रचंड मोठा मैदानी प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. दुष्काळात आजही या दोन्ही गडांवरील पाणीसाठा गावकऱ्यांना उपयुक्त ठरतो आहे. ताथवडे गावात प्रसिद्ध श्री.बाळसिद्धनाथ देवतेचे भव्यदिव्य पेशवेकालीन स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेले मंदिर आजही उत्तम स्थिती मध्ये आहे. या मंदिराचे निर्माण श्री. विसाजीपंत सामनाथ देशपांडे यांनी सन १७६१ साली पूर्ण केले आहे अशी ऐतिहासिक नोंद मिळते. विसाजीपंत पेशवे दफ्तरी कार्यरत असत, पुढे ते होळकरांचे पदरी रूजू झाले. या काळात त्यांनी त्यांच्या मूळ गावी ताथवडा येथे दोन बारव व श्री काळेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. असाच एक ऐतिहासिक शिलालेख आपणास बाळसिद्धनाथ मंदिरामध्ये मूळ उंबरठ्यावर देखील कोरलेला आढळून येतो. गावातील बारा बलुतेदारांना योग्य तो मान सन्मान देऊन वार्षिक यात्रा महोत्सव सुरू केला, देवस्थानसाठी जमिनी दान दिल्या. आजही हा यात्रा उत्सव असाच मान मराबत राखून धडाक्यात सुरू आहे.