भाजे लेणी
महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक, प्राचीन बौद्ध लेणी | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान | पुणे जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत | ||||
| वारसा अभिधान |
| ||||
![]() | |||||
| |||||
भाजे लेणी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन बौद्ध लेणी आहेत.यामध्ये बौद्ध स्तूप आणि त्याचप्रमाणे यक्ष, गंधर्व, इंद्र व सूर्याची शिल्पे आहेत. गावाजवळ ४०० फूट उंचीवर ही लेणी आहेत. येथील चैत्यगृह महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या बाजूला भिक्खूंना राहण्यासाठी असलेल्या खोल्या आढळतात. या लेण्यांना २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]
हा लेण्यांचा समूह सुमारे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील असावा. येथे एकूण २२ लेणी आढळतात. त्यात एक चैत्यगृह व २१ विहार आहेत. या लेणी मुळे महाराष्ट्र राज्याला खूप पर्यटक मिळतात. येथे रोज एक लाख ते दोन लाख पर्यटक येतात.[ संदर्भ हवा ] भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण द्वारे अधिसूचना क्रमांक 2407-A द्वारे हे लेणे महत्वाचे राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित आहे. हे महाराष्ट्रातील लेणे बौद्ध हिनायन पंथाचे आहे.
कलात्मक आविष्कार
[संपादन]
येथे चैत्य गवाक्षांच्या माळा आहेत. त्यांना लागून कोरीव सज्जे बनवलेले आहेत. यातील काही सज्जांवर कोरीव कामातून जाळी आणि पडद्याचा भास निर्माण केलेला आहे. वेदिकापट्टीवर नक्षीदार कोरीव काम आहे. दगडात कोरून काढलेल्या कड्या आहेत. या ठिकाणी गवाक्षातून युगुले कोरलेलीही दिसून येतात. तसेच येथे एक यक्षिणी कोरलेली आहे. या यक्षिणीच्या हातात धरलेले झाड आजही स्पष्ट दिसते.
कातळात एक चैत्यकमान कोरली आहे. या कमानीला एकूण १७२ छिद्रे पाडलेली आहेत.
येथील चैत्य सुमारे १७ मीटर लांब, ८ मीटर रुंद आणि तितकेच मीटर उंच आहे. त्यात सत्तावीस अष्टकोनी खांब आणि मधोमध स्तूप आहे. या खांबांवर कमळ, चक्र अशी चिन्हेही कोरलेली आहेत. एका ठिकाणी एक खुंटी आणि तिला अडकवलेला फुलांचा हार कोरलेला आहे.
स्तूपापाठीमागील खांबांवर बुद्धाची पुसटशी चित्रे दिसून येतात. तर चैत्यस्तूपासमोरील जमिनीवर सारीपाट कोरलेला आढळतो.
चैत्यगृहाला लाकडी तुळ्यांचे छत आहे. या तुळ्यांवर ब्राह्मी लिपीतील लेख आहेत. लाकडी वास्तुकलेच्या संकेतांसाठी हे चैत्यगृह उल्लेखनीय आहे.
निर्माण
[संपादन]इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात भाजे लेणी कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते. त्यानंतर आठशे वर्षे म्हणजेच इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. जनतेच्या दानातून येथील विहार उभे राहिले आहेत व त्यांच्या दानाचे लेख तेथे दिसून येतात. चैत्यगृहाच्या दक्षिण दिशेस स्वच्छ पाण्याचा स्रोत आहे.
लेणी
[संपादन]लेणे क्र. ६
[संपादन]हे लेणे म्हणजे एक अनियमित आकाराचा विहार आहे. याचा आकार १४ फूट चौरस असून, याच्या दोन्ही बाजूंना दोन आणि मागच्या बाजूला तीन खोल्या आहेत. या खोल्यांच्या दारांवर चैत्य खिडक्यांची नक्षी कोरलेली आहे.[२] येथील एका खोलीच्या दरवाजावर असलेल्या कोरीव लेखानुसार बोधी नावाच्या एका शेतकऱ्याच्या पत्नीने हा विहार भेट म्हणून दिला होता.[३]
लेणे क्र. ९
[संपादन]या लेणीत रेघांची नक्षी आणि काही तुटलेल्या प्राण्यांच्या मूर्ती आहेत. लेणीच्या दर्शनी भागात व्हरांडा असून हे लेणे नाशिकच्या पांडवलेणी येथील लेणे क्र. ८ शी साधर्म्य दर्शवते.[२]
लेणे क्र. १२ (मुख्य चैत्यगृह)
[संपादन]भाजे लेण्यांतील हे चैत्यगृह इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात बांधलेले असून, ते भारतातील सर्वात प्राचीन चैत्यगृहांपैकी एक मानले जाते. यामध्ये एक स्तूप आणि अर्धवर्तुळाकार आकाराचा सभामंडप आहे. येथील स्तंभ आतल्या बाजूला झुकलेले आहेत. प्राचीन लाकडी बांधकामांत छप्पर पेलण्यासाठी लाकडी खांब असे झुकवून लावले जात असत. छताला पिंपळपाटीचा आकार असून त्यात प्राचीन लाकडी फासळ्या बसवल्या आहेत. भिंतींना मौर्यकालीन शैलीत चकाकी देण्यात आली आहे.[४] पूर्वी येथे एक मोठे लाकडी दर्शनी दालन (facade) होते, जे आता काळाच्या ओघात नष्ट झाले आहे. कमानीच्या दारावर घोड्याच्या नालाच्या आकाराची मोठी चैत्य-खिडकी आहे. या संपूर्ण भागाचे कोरीव काम एखाद्या बहुमजली इमारतीसारखे दिसते, ज्यामध्ये बाल्कनी, खिडक्या आणि खालील दृश्य पाहणारे स्त्री-पुरुषांचे पुतळे कोरलेले आहेत.[५]
हे चैत्यगृह २६ फूट ८ इंच रुंद आणि ५९ फूट लांब आहे. मध्यभागाला कक्षांपासून वेगळे करण्यासाठी २७ अष्टकोनी खांब आहेत, ज्यांची उंची ११ फूट ४ इंच आहे. स्तूपाचा व्यास जमिनीपाशी ११ फूट आहे. हे लेणे कोंढाणे लेण्यांशी मिळतेजुळते आहे. खांबांवर बुद्धांची ७ वेगवेगळी चिन्हे फुले, कळ्या आणि पानांच्या रूपात कोरलेली दिसतात.[२]
निवडक लेण्यांतील दृश्ये
[संपादन]सूर्यलेणे
[संपादन]येथील सूर्यलेणे प्रसिद्ध आहे. या लेण्यात पौराणिक प्रसंगांचे पट, सालंकृत-शस्त्रधारी द्वारपाल, वन्यप्राण्यांचे थर आणि चैत्य-स्तूपांचे नक्षीकाम कोरलेले आहे. यात सूर्य आणि इंद्राचा मानला जाणारा देखावा आहे. या पहिल्या शिल्पात चार घोड्यांच्या रथावर सूर्य स्वार होऊन चालला आहे, रथात त्याच्या मागे-पुढे त्याची पत्नी अथवा दासी आहे. त्यातील एकीने वर छत्र धरले आहे तर दुसरी चामर ढाळते आहे. त्यांच्या या रथाखाली काही असुर तुडवले जात आहेत. अनेकांच्या मते ही सूर्यदेवता, रथातील त्या दोघी त्याच्या पत्नी संज्ञा आणि छाया तर रथाखाली तुडवला जाणारा तो सूर्याचा शत्रू राहू आहे. एका मतानुसार रथारूढ असणारे हे शिल्प शक्राचे आहे. तर काहींना यामध्ये ग्रीकांच्या हेलिओस किंवा रोमनांच्या अपोलो देवतेचा भास होतो.
सांगीतिक महत्त्व
[संपादन]भारतीय संगीत कलेसंदर्भात हे लेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण येथे कोरलेल्या चित्रात एक तबला वाजवणारी स्त्री दिसते आहे. या शिवाय एक नर्तकी नृत्य करतांना येथे दिसत आहे. या कोरीव कामाने तबला हे वाद्य निश्चितपणे भारतात निर्माण झाले व किमान दोन हजार वर्षांपासून वापरात आहे हे निर्विवादपणे सिद्ध होते.

तसेच भारतीय नृत्य परंपरा ही किमान दोन हजार वर्षे पुरातन आहे याचा पुरावा ही दिसून येतो. तबला वादनाचे हे आदिम प्राचीन लेणे पाहण्यासाठी अनेक तबला वादक भाजे लेणी अगत्याने हजेरी लावतात.
चित्रदालन
[संपादन]- भाजे लेणी
- प्रवेशद्वार
- चैत्यगृह
- दुमजली कोरीव विहार
- तबला वाजवणारी स्त्री आणि नर्तिका
- स्तूपाची हर्मिका
- स्तूप
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "गॅझेट नोटिफिकेशन" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-03-07 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - 1 2 3 चुका उधृत करा:
<ref>चुकीचा कोड;JAMESनावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ↑ बर्गेस, जेम्स; Indrājī Bhagvānlal (1881). "Bhaja Caves and their inscriptions". Inscriptions from the Cave-temples of Western India: With Descriptive Notes &c Volume 10 of Archæological Survey of Western India. भारत सरकार मुद्रणालय. pp. २२–२५. 6 July 2013 रोजी पाहिले.
- ↑ "Bhaja Caves, Lonavala". Archaeological Survey of India, Mumbai Circle. 20 फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ [(http://asi.nic.in/asi_monu_tktd_maha_bhajacaves.asp) ASI, "Bhaja Caves"] Archived 10 August 2013 at the वेबॅक मशीन.; Michell, 352;Dehejia
बाह्य दुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
