Jump to content

वसईची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वसईची लढाई
पोतुगीज नकाशात दाखवलेला वसईचा वेढा, १७३९
पोतुगीज नकाशात दाखवलेला वसईचा वेढा, १७३९
दिनांक मार्च २८, इ.स. १७३७ - मे १६, इ.स. १७३९
स्थान वसई, महाराष्ट्र
परिणती मराठ्यांचा विजय
प्रादेशिक बदल वसईचा किल्ला व त्याच्या आजूबाजूचा पोर्तुगीजांचा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आला.
युद्धमान पक्ष
मराठा साम्राज्य वसईची पोर्तुगीज वसाहत
सेनापती
चिमाजी अप्पा
नारो शंकर दाणी
मानाजी आंग्रे
सिल्व्हेरा दि मेंझेस


वसईची लढाई मराठा साम्राज्य आणि पोर्तुगीज वसाहतकारांच्यात इ.स. १७३९ साली लढली गेलेली लढाई होती. यात मराठ्यांचे नेतृत्व थोरले बाजीराव पेशवे यांचा भाऊ चिमाजी अप्पा याने केले. यात मराठ्यांनी पोर्तुगीज वसाहतकारांवर विजय मिळवला.

वसई हे शहर व बंदर आताच्या महाराष्ट्राच्या वायव्य भागात आहे. येथे १५व्या शतकापासून पोर्तुगीजांचे राज्य होते. वसईमध्ये मुख्य ठाणे असलेल्या पोर्तुगीजांची सत्ता रेवदंडा, कल्याण, ठाणे आणि मुंबईच्या सात बेटांपर्यंत पसरलेली होती. येथील बंदरातून पोर्तुगीज धान्ये, मासे, लाकूड, बांधकामाचे दगड आणि घोडे युरोपात निर्यात करीत. येथील सत्ताधारकांनी आसपासच्या प्रदेशावर कडक अंमल ठेवलेला होता. देशात इतर ठिकाणी मुघल व इतर मुस्लिम सत्तांचा धुमाकूळ चालू असतानाही त्यांनी वसई व जवळच्या प्रदेशात आपली सत्ता कायम ठेवलेली होती.

लढाईची पार्श्वभूमी

[संपादन]

१७२०मध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून कल्याण काबीज केले आणि १७३० च्या दशकाच्या मध्यापर्यंत एकएक करीत ठाणे आणि साळशेत बेटावरील किल्ले घेतले. यात पारसिक, त्रांगिपारा, अर्नाळा (इल्हा दास व्हाकास), मनोर, आणि बेलापूर येथील किल्ले व तटबंद्यांचा समावेश होता.[] पोर्तुगीजांनी रेवदंडा, कर्नाळा, वांद्रे, वर्सोवा, माहीम, केळवे, डहाणू, संजाण (साओ जेन्स), अशेरीगड (असेरिम), तारापूर, खुद्द वसई आणि दमण टिकवून धरलेले होते.

वसईवर चाल

[संपादन]

शंकराजीपंत फडके या सरदाराने चिमाजी अप्पाला कळवले, की वसईतील पोर्तुगीजांवर चाल करायची असेल या मोहिमेच्या सुरुवातीलाच मराठ्यांनी अर्नाळा किल्ला काबीज करणे गरजेचे आहे. शंकराजीने स्थानिक लोकांशी मसलत करून अर्नाळा घेण्यासाठी त्यांची मदत मागितली. गोविंदजी कासार आणि गवराजी पाटील या बोलिंज गावाच्या रहिवाशांसह गंगाजी नाईक अंजूरकर, बाजीराव बेलोसे आणि रायाजीराव सुर्वे हे मराठा सरदार ४०० सैनिकांचे पथक घेऊन खुश्कीच्या मार्गाने निघाले, तर दर्यासारंग मानाजी आंग्रे याने गुराबा घेऊन समुद्रावरून अर्नाळ्यावर चाल केली.

मार्च २८, इ.स. १७३७ रोजी मराठा सैन्याने अर्नाळ्यात गाफील असलेल्या पोर्तुगीजांवर हल्ला केला आणि त्यांना हुसकावून लावून किल्ला काबीज केला. या विजयाची स्मृती म्हणून किल्ल्याच्या उत्तरेकडच्या तटबंदीमध्ये एक शिलालेख कोरण्यात आला; जो अजूनही शाबूत आहे. शंकराजीपंताने लगेचच किल्ल्याची डागडुजी सुरू केली व किल्ला पुन्हा भांडता केला. जानेवारी इ.स. १७३८पर्यंत तीन बुरूज बांधून तयार झाले. त्यांना भैरव बुरूज, भवानी बुरूज आणि बावा बुरूज अशी नावे देण्यात आली. मार्च महिन्यात किल्ला पूर्ण लढता झाल्यावर मराठा सैन्य आसपासच्या प्रदेशात पसरले व वर्सोवा तसेच धारावी या बेटांवर त्यांनी आपले बस्तान बसवले.

वेढा आणि लढाई

[संपादन]
वसई किल्ल्याचे अवशेष

फेब्रुवारी १७, इ.स. १७३९ रोजी मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. अत्यंत चिकाटीने चालवलेल्या वेढ्यासोबतच त्यांनी किल्ल्यावर गनिमी काव्याने हल्ले चालू ठेवले. अशाच एका हल्ल्यात पोर्तुगीजांचा सेनापती सिल्व्हेरा दि मेंझेस मृत्युमुखी पडला. तरीही पोर्तुगीजांनी हिमतीने लढा चालू ठेवला आणि चालून येणाऱ्या मराठ्यांच्या लाटांचा हातबाँब, बंदुका आणि उखळी तोफा वापरून प्रतिकार चालू ठेवला. आपल्या वरचढ तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्त्रांनी पोर्तुगीजांनी मराठ्यांचे बरेच नुकसान केले; परंतु मराठ्यांनी आपला वेढा सैल होऊ दिला नाही. इकडे आंग्र्यांच्या आरमाराने समुद्री मार्गही बंद केलेले होते आणि तेथूनही रसद मिळणे बंद केले होते.

शेवटी मे १६, इ.स. १७३९ रोजी वेढा धसास लागला आणि मराठ्यांनी किल्ल्यावर एल्गार केला. चिमाजी अप्पाने स्वतः पहिली तोफ डागली आणि नारो शंकर दाणी याच्या नेतृत्वाखालील घोडदळ आणि आंग्र्यांचे आरमार दोहो बाजूंनी पोर्तुगीजांवर तुटून पडले. तोफखान्याच्या सरदार गिरमाजी कानिटकराने किल्ला पुरता भाजून काढला आणि मानाजी आंग्र्याच्या बरकंदाजांनी गुराबांवरून पोर्तुगीज शिपाई टिपून काढणे सुरू ठेवले. या भडिमारापुढे पोर्तुगीज बचावाने नांगी टाकली आणि त्यांनी मराठ्यांकडे शरणागती मागितली. शरण आले असताही आपल्या सैन्यास मानानिशी वाट काढून द्यावी आणि त्यांना अभय द्यावे, अशी विनंती त्यांनी चिमाजी अप्पाकडे केली. मराठ्यांनी ही विनंती मंजूर केली आणि शरण आलेल्या सैन्याला त्यांनी वाट करून दिली.

हिंदू पुनरोत्थापन

[संपादन]

चिमाजी अप्पाने वसईचे नाव बदलून आपल्या थोरल्या भावाच्या मानाप्रीत्यर्थ बाजीपूर असे केले[ संदर्भ हवा ]. पोर्तुगीजांनी आपल्या अंमलादरम्यान स्थानिक जनतेवर अतोनात बळजबरी केलेली होती.[][][][][][] व तेथील जनतेला सक्तीने धर्मांतर करणे भाग पाडले होते. चिमाजी अप्पाने आसपासच्या वस्त्यांतून न बाटलेले हिंदू लोक तेथे बोलावले, त्यांना वसईत राहण्यास उद्युक्त केले. याशिवाय त्याने ब्राह्मणांचे एक पथकच बोलावून घेतले व त्यांच्याद्वारे जुलमाने बाटलेल्या व्यक्तींना हिंदू धर्मात परत येण्यास आवाहन केले. ज्यांनी आपण पत्करलेला ख्रिश्चन धर्म न सोडण्याची इच्छा दाखवली त्यांना, तसेच पोर्तुगीजांकरवी जन्म झालेल्या व्यक्तींना आपला कॅथोलिक धर्म पाळण्याची मुभा दिली व त्यांच्यावर धर्मांतरासाठी सक्ती न करण्याचे आश्वासन दिले. ज्यांनी मराठ्यांच्या सत्तेखाली न राहण्याचे पसंत केले, अशा नागरिकांना गोवा व इतर पोर्तुगीज वसाहतींकडे जाण्यास परवानगीही दिली[ संदर्भ हवा ].

किल्ल्यातील नागकुंडाजवळ चिमाजी अप्पाने आपल्या शंकराजी केशव या सुभेदाराकरवी नागेश्वराचे मंदिर बांधवले. तेथे मंदिरावर बांधलेले चर्च जमीनदोस्त करून त्यावर हनुमानाचे मंदिर बांधवले. याशिवाय पुरातन त्रिविक्रम मंदिरावर बांधलेले चर्च तसेच अगाशीमधील वामन मंदिराचाही जीर्णोद्धार करविला. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या भवानीशंकराच्या मंदिराचा अवर लेडी ऑफ लाइट चर्चखालून तसेच क्षेत्रपालेश्वराच्या देवळाचा अवर लेडी ऑफ फातिमा चर्चखालून जीर्णोद्धार करविला. यापरीस चिमाजी अप्पाने जवळच्या निर्मळ गावातील पोर्तुगीजांनी नामशेष केलेल्या शंकराचार्यांच्या मंदिराची आणि पद्मनाभस्वामींच्या समाधीची पुनर्बांधणी करवली. पोर्तुगीजांनी युरोपातून आणलेल्या चर्चच्या घंटा चिमाजी अप्पाने आपल्याबरोबर पुण्यास नेण्याकरता घेतल्या. त्यातील एक भीमाशंकर येथील मंदिरात अजूनही आहे. यावर अव्हे मरिया ही ख्रिश्चन प्रार्थना कोरलेली दिसून येते. इतर एक घंटा नारो शंकर दाणी याने नाशिकला नेऊन तेथे गोदावरीकाठीच्या मंदिरास अर्पण केली.

पर्यवसान

[संपादन]

वसईच्या लढाईनंतर मराठ्यांनी उत्तर कोकणात आपला जम बसवला; तसेच आपल्या आरमाराला असलेले कायमचे भय घालवून टाकले. गोवा, वापीदीव यांच्यातील टप्पा असलेले बंदर व ठाणे नेस्तनाबूद झाल्याने पोर्तुगीजांची भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील पकड ढीली झाली. यात मराठ्यांबरोबरच इंग्रजांचेही फावले व त्यांनी आपले मुंबईतील ठाणे अधिकाधिक मजबूत करण्यास सुरुवात केली. वसई व मुंबईच्या आसपासच्या प्रदेशातील ख्रिश्चन प्रभाव कमी झाला व हिंदू धर्मीयांना आश्रय मिळाला. गोव्याप्रमाणे ख्रिश्चन धर्माचा पगडा येथील जनतेवर मोठ्या प्रमाणावर उरला नाही. मराठ्यांचे सैन्य उच्च तंत्रज्ञान असलेल्या पाश्चिमात्य सैन्यांशीही टक्कर घेऊ शकते, हे स्पष्ट झाले व बाजीरावाने सुरू केलेली मराठ्यांची आगेकूच चालू राहण्यास मदत झाली.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ ""belapur fort" in a sentence - belapur fort sentence examples - ichacha.net sentence maker". eng.ichacha.net (इंग्लिश भाषेत). 2018-03-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-12 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ न्यूमन, रॉबर्ट सॅम्युएल. ऑफ अंब्रेलाज, गॉडेसेस, अँड ड्रीम्स: एसेज ऑन गोअन कल्चर अँड सोसायटी (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ प्रियोळकर,अ.का. द गोवा इन्क्विझिशन (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ मेनन,कल्याणी देवकी. एव्हरीडे नॅशनॅलिझम: वूमेन ऑफ हिंदू राइट इन इंडिया (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी ऑफ बाँबे.
  6. ^ वेस्टर्न क्लोनियलिझम इन एशिया अँड ख्रिश्चॅनिटी (इंग्लिश भाषेत). p. १७.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ तंका बहादूर सुब्बा, सुजित सोम, के.सी. बराल. बिटवीन एथ्नोग्राफी अँड फिक्शन: वेरियर एल्विन अँड द ट्राय्बल क्वेश्चन इन इंडिया (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]