Jump to content

बेडसे लेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेडसे लेणी ह्या महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील बेडसे गावातील आहेत. पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेतहून पवना धरणाकडे जातांना हे गाव लागते. भारत सरकारने या लेणीला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]

रचना

[संपादन]

सुमारे १५० मीटर लांबीच्या दगडात लेण्यांचा गट खोदला गेला आहे. येथे एक चैत्यगृह काही विहार, खोदीव स्तूप, आणि पाण्याची कुंडे आहेत. हे आद्य कोरीव काम इसवीसन पूर्व पहिल्या शतकातील आहे असे मानले जाते. या लेण्यांना मारकूड असे नाव प्राचीनकाळी होते असे येथील शिलालेखात कोरलेले दिसते.

स्वरूप

[संपादन]

येथील चैत्यगृह भव्य आहे. याची उंची सुमारे २८ फूट आहे. समोरील भागात चार खांबांवर आधारित व्हरांडा आहे. बाजूच्या भिंतींमध्ये खोल्या आहेत. यांच्यामागे खोलवर कोरलेले चैत्यगृह आहे.

कलात्मक अविष्कार

[संपादन]

चैत्यगृहा समोर मध्यभागी चार खांब आहेत. यातील दोन पूर्ण आणि बाजूला दोन अर्धव्यक्त आहेत. यांची रचना अशी अहे की त्यामुळे या खांबांनी हा तीस फूट लांब आणि १२ फूट रूंदीचा व्हरांडा तोलून धरला आहे असे दिसते. हे खांब लेण्यांच्या पायापासून थेट छतापर्यंत जातात. चैत्यगृहात हर्मिकेचा चौथरा आहे. त्यावर ते मोठे घट कोरलेले आहेत. या घटातून अष्टकोनी खांब बाहेर पडलेले दिसतात. याच खांबांच्या शिरोभागी जमिनीच्या दिशेने उमललेल्या कमळाची रचना केलेली आहे. त्यावर एक चौरंग कोरलेला आहे. छताकडे एकदा हर्मिकेच्या चौथऱ्यावर हत्ती, घोडा, बैल या पशूंवर स्वार स्त्री-पुरुषांच्या जोड्या दिसून येतात. अतिशय रेखीव, प्रमाणबद्ध आणि सुंदर असे हे शिल्पकाम केले दिसते. त्यांचे सौष्ठव, डोळ्यातील सौंदर्य, अंगावरील मोजकेच पण उठावदार दागिने, आगळी वेशभूषा हे बेडसे येथील वैशिष्ट्यच आहे. या खांबांच्या शीर्षभागावर उमलत्या कमळाचे कोरीवकाम आहे. यातील प्रत्येक दल हे स्वतंत्र अगदी त्याच्या त्या मधल्या फुगीर शिरेसह दाखवलेले दिसते. येथे कोरलेल्या हत्तींना सुळे दिसत नाहीत. त्याजागी खोबणी केलेल्या दिसून येतात. त्यावरून तिथे खरे हस्तीदंत बसविले जात असावेत असा अंदाज करता येतो. व्हरांड्याच्या अन्य भागावर चैत्यकमानी, वेदिकापट्टींचे नक्षीकाम केलेले आहे.

चैत्यगृह

[संपादन]

मुख्य चैत्यगृहाच्या दाराशी असलेल्या भिंतीच्या वरच्या बाजूस पिंपळपानाची मोठी कमान कोरलेली आहे. या कमानीखाली तीन चैत्यकमानी कोरलेल्या दिसोन येतात. यातील मधल्या आणि डावीकडील कमानी खालून चैत्यगृहात जाण्याचे मार्ग आहेत. उजवीकडच्या कमानीखाली जाळीदार छिद्रांच्या नक्षीतून सुंदर गवाक्ष कोरलेले आहे. यातील प्रत्येक चैत्यकमानीमध्ये फुला-पानांची नक्षी गुंफलेली दिसते. चैत्यगृहीचे छत गजपृष्ठाकृती आहे. या छतातून सव्वीस खांबांची निर्मिती झालेली दिसून येते. स्तूपावर त्यावेळेच्या लाकडी छत्रावलीचा खांब आणि त्यावरील कमळाचे छत्र व्यवस्थित स्वरूपात दिसते. या लेण्यात छताला लाकडी तुळया होत्या परंतु त्या चोरीस गेल्या असे सांगितले जाते. चैत्यगृहात सुंदर चित्रकामही होते. त्याचे काही अंश येथील भिंती-खांबांवर आजही दिसतात.

निर्माण

[संपादन]

बेडसे येथील स्तंभ मौर्य शैलीतील आहेत असे मानतात. तसेच त्यांना त्यांना पर्सिपोलिटन धर्तीचे स्तंभ असेही म्हंटले जाते. पर्सिपोलिस हे इराणमधील एक प्राचीन शहर होत. मौर्य साम्राज्याचा संबंध येथ पर्यंत होता असे हे स्तंभ दर्शवतात.

एका खोलीच्या द्वारपट्टीवर एक लेख आहे. ‘नासिकतो अनदस सेठीस पुतस पुसणकस दानं’ या कोरीव अक्षरांचा अर्थ - नाशिक येथील श्रेष्ठी आनंदच्या मुलाने या लेण्याचे दान दिले. या लेखात आजच्या नाशिक शहराचा प्राचीन उल्लेख मिळतो.

या लेण्यांच्या बाहेर पाण्याची कुंडे आहेत. यातील एका कुंडावर त्यासाठी दिलेल्या दानाचा लेख दिसून येतो.

चित्रदालन

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "गॅझेट नोटिफिकेशन" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-03-07 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]