सप्तशृंगी
सप्तशृंगी | |
नाव | सप्तशृंगी |
उंची | ४५६९ फूट |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | |
ठिकाण | नाशिक, महाराष्ट्र |
जवळचे गाव | वणी |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था | |
स्थापना | {{{स्थापना}}} |
सप्तशृंगी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तो नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते[१]. आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभार्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते.
अलंकार[संपादन]
देवीची मूर्ती ८ फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला अकरा वार साडी लागते व चोळीला तीन खण लागतात डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे, असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात.
भौगोलिक स्थान[संपादन]
हे स्थान जिल्ह्यात नाशिकपासून उत्तरेस 55 किलोमीटर अंतरावरील दिंडोरी-कळवण तालुक्यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व - पश्चिम डोंगररांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे. येथे माकडांची भरपूर वस्ती आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते. मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूरी गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरूवात करतात.
इतिहास[संपादन]
[२]सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी करणारी देवी म्हणजेच सप्तशृंगी असे मानले आहे. दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय. नाथ संप्रदाय मध्ये नवनाथ भक्तीसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात वर्णन असे आहे कि दत्त गुरू व महादेव अरण्यात गमन करत असतात व अचानक पणे महादेव यांना कळत की कोणी तरी तपश्चर्या करत आहे ते बघण्या करिता ते दत्तगुरु याना पाठवता व दत्तगुरु त्यांना घेऊन महादेव कडे येतात आणि महादेव व दत्तगुरु म्हणतात की तुझी इच्छा आदिशक्ती सप्तश्रृंगी देवी पूर्ण करेल. ''शाबरी विद्या'' ची खरी सुरुवात सप्तश्रृंगी गडावरून होते. सविस्तर माहिती नवनाथ भक्तीसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात वर्णन केलेली आहे. निवृत्तिनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती. शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो. देवी भागवतातही देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे.
कथा[संपादन]
कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासुर नावाचा राक्षस माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासुर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले अशी कथा आहे
स्वरूप[संपादन]
देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने चढणीचा मार्ग असून, दर्शन घेतल्यानंतर दुसर्या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत. २०१७ पासून भक्तासाठी, माल चढवणे व उतरवणे यासाठी लिफ्टची सोय केली आहे.
पूजन[संपादन]
पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. सहा वाजता काकड आरती होते. आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साज-शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. तसेच पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. बारा वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी ७.३० वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष तर तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते यात भारतभरातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीच असतो. सोबतीला खुरासणीची चटणी, वरण, भात, भाजी पोळीही नैवेद्य म्हणून असते. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात. हा मान त्यांचा असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज ११ मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो. या देवीला साडेतीन पीठातील एक महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे.
गडावरील इतर ठिकाणे[संपादन]
- कालीकुंड
- सूर्यकुंड
- जलगुंफा
- शिवतीर्थ
- शितकडा
- गणपती मंदिर
- गुरुदेव आश्रम
गडावर जाण्याच्या सोई[संपादन]
गडावर जाण्यासाठी बसगाड्या नाशिक सी.बी.एस. (जुने) व दिंडोरी नाका येथून मिळतात. तसेच उत्सव काळात जास्तीच्या एस. टी. बसेसची सोय करण्यात आलेली असते. नवरात्र (घट) त्या काळात जळगाव, अंबळनेर, येथून कळवण मार्गे देवीचे भक्त पायवाटेने येतात. गडाच्या पायथ्याशी नांदुरी हे एक छोटेसे गाव गाव आहे.
अधिक वाचन[संपादन]
हेसुद्धा पहा[संपादन]
देवीची साडेतीन शक्तिपीठे
- श्री क्षेत्र माहूर देवी रेणुकामाता
- श्री क्षेत्र तुळजापूर तुळजाभवानी माता
- श्री क्षेत्र कोल्हापूर श्रीमहालक्ष्मी माता
- भारतातील किल्ले
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "सप्तशृंगी देवी", '
- ^ "सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला भाविकांची गर्दी". 24taas.com (इंग्रजी भाषेत). 2019-07-06 रोजी पाहिले.
बाह्य दुवे[संपादन]
- "सप्तशॄंगी देवी ट्रस्ट" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "सप्तशॄंगी गड" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on २५ ऑगस्ट २०१४.CS1 maint: unrecognized language (link)
- "सप्तशॄंगी माता". Archived from the original on २५ ऑगस्ट २०१४.
- "सप्तशॄंगी".