प्रतापराव गुजर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रतापराव गुर्जर
Prataprao Gujar.jpg
प्रतापराव गुर्जर यांचा पुतळा
जन्म १६१५
भोसरे (खटाव)
मृत्यू फेब्रुवारी २४, १६७४
नेसारी

प्रतापराव गुजर (जन्म:१६१५ - मृत्यू:२४ फेब्रुवारी, १६७४) हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सेनापती होते. साल्हेरच्या लढाईत त्यांनी मोठ्या मुघल सैन्याचा पराभव केला. साल्हेर येथील मराठ्यांचा विजय हा मुघलांच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध त्यांच्या लष्करी प्रक्रियेतील एक निर्णायक वळण म्हणून पाहिला जातो.

५ ऑगस्ट १६६८रोजी मोगलांशी झालेल्या तहानुसार शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना संभाजीनगरला (औरंगाबाद) पाठवले. त्यावेळेस प्रतापराव गुजरही संभाजी महाराजांसोबत होते, अशी जेधे शकावलीत नोंद आहे. [१]

प्रतापराव गुजर यांना आदिलशाही सरदार बहलोल खान यांच्या नेतृत्वाखालील आक्रमक सैन्याचा सामना करण्यासाठी पाठवण्यात आले. मराठा सैन्याने नेसरीच्या ठिकाणी बहलोल खानच्या छावणीला वेढा घातला. प्रतापरावांच्या सैन्याने लढाईत विरोधी सेनापतीचा पराभव करून पकडले. खानाने मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण न करण्याचे आश्वासन दिल्यावर प्रतापरावांनी बहलोल खानला सैन्यासह आणि जप्त केलेल्या युद्धसामुग्रीसह सोडले (१५ एप्रिल १६७३ च्या सुमारास)

महाराज फार रागावले. त्यांनी पत्र लिहिलें, खानाशी ‘सला काय निमित्य केला?’ असा करडा सवाल महाराजांनी केला.

काही महिन्यांनी बहलोलखान पुन्हा करवीरच्या आघाडीवर स्वराज्याच्या रोखाने येत आहे, तो सुटला आहे, तो स्वराज्याला तोशीस देणार, अशा बातम्या येऊन थडकल्या.प्रतापरावानेही इरेला पडून या बहलोलचा फन्ना उडवावा व झालेल्या चुकीची भरपाई करावी या हेतूने महाराजांनी प्रतापरावास लिहिलें होतें,‘…हा (बहलोलखान) घडोघडीं येतो. तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोलखान येतो, याची गाठ घालून, बुडवून फते करणें. नाही तर (पुन्हा आम्हांस) तोंड न दाखविणें.’[२]

२४ फेब्रुवारी १६७४ रोजी प्रतापराव गुजरांची बहलोलखानाशी गाठ पडली. कृष्णाजी अनंत सभासद यांनी केलेल्या वर्णनानुसार, 'त्यावरि प्रतापराव जाऊन बेलोलखानाशीं गाठले. नेसरीवरी नबाब आला. त्याने गाठीले. मोठे युद्ध झाले. अवकाल होऊन प्रतापराव सरनोबत तरवारीचे वाराने ठार झाले. रण बहुत पाडीले. रक्ताच्या नद्या चालिल्या.'[३]

या लढाईत प्रतापराव गुजर यांच्यासोबत आणखी सहा वीरांना वीरमरण आले, अशी इंग्रज दुभाषी नारायण शेणवी यांच्या ४ एप्रिल १६७४ रोजीच्या पत्रात नोंद आहे. कोणत्याही विश्वसनीय साधनात इतर सहा वीरांची नावे सापडत नाहीत.[४]

मराठ्यांच्या इतिहासात नवीन इतिहास घडला गेला होता. हे सर्व महाराजांच्या कानी पडल्यावर महाराज दुःखी झाले. ही नेसरीची लढाई २४ फेब्रुवारी १६७४ रोजी झाली. या प्रसंगावर "वेडात मराठे वीर दौडले सात" ही कविता गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजात प्रसिद्ध आहे. लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर यांनी 'वेडात मराठे वीर दौडले सात' याच नावाचे व्यवसायिक नाटक लिहिले[५] आणि नंतर त्याचे रूपांतर वगनाट्यात सुद्धा केले, जे विविध तमाशा फडांनी ग्रामीण महाराष्ट्रात सादर करून लोकप्रिय केले.

समाधी[संपादन]

प्रतापराव गुजर यांची समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी नावाच्या गावी (तालुका गडहिंग्लज) आहे.[ संदर्भ हवा ] तर जन्मगावी स्मारक आहे एका स्मारकाची सुरुवात भुईकोट किल्ला रूपाने सुरू झाली होती. परंतु ते काम अपूर्ण राहिले आहे. सध्या ते पडीक एक खंडहर अवस्थेत आहे.[ संदर्भ हवा ][६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ [१]
  2. ^ [२]
  3. ^ [३]
  4. ^ [४]
  5. ^ ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर काळाच्या पडद्याआड; साहित्य विश्वाला पन्नास वर्षांचे योगदान "दै.लोकमत”,पुणे, 12-Nov-2021
  6. ^ India, Mythak Tv. "Prataprao Gujar and Battle Of Salher [HIndi]". Mythak Tv (इंडोनेशियन भाषेत). 2019-03-02 रोजी पाहिले.