विशाळगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विशाळगड

विशाळगडावरील एक संरचना
नाव विशाळगड
उंची 1130 मीटर
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी.
ठिकाण कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव विशाळगड,कोल्हापूर
डोंगररांग सह्याद्री
सध्याची अवस्था बिकट*
स्थापना {{{स्थापना}}}


विशाळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७६ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे.

किल्ले विशाळगड हा नावाप्रमाणेच विशाल किल्ला आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या या किल्ल्याला नैसर्गिकरित्याच दुर्गमतेच कवच लाभल आहे. हा प्राचीन किल्ला अणुस्कुरा घाट व आंबा घाट, या कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला. अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी असलेला आणि राजधानीचा दर्जा लाभलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था उद्वीग्न करणारी आहे. इतिहास व किल्लेप्रेमींसाठी मात्र हा किल्ला संपूर्ण पाहणे म्हणजे निश्चितच एक पर्वणी आहे.

इतिहास[संपादन]

इ.स. ११९० च्या सुमारास दुसरा राजा भोज याने आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळ्यावर हलविली. त्यानंतर त्याने घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले. त्यापैकी 'किशागिला' हा एक किल्ला होता. (किशीगीला – भोजगड – खिलगिला – खेळणा उर्फ विशाळगड). नंतर हा किल्ला यादवांच्या हाती गेला. यादवांचा अस्त झाल्यावर दक्षिणेत बहामनींची सत्ता उदयाला आली.

इ.स. १४५३ मध्ये बहामनी सेनापती मलिक उतुजार किल्ले घेण्यासाठी कोकणात उतरला. त्याने शिर्क्यांचा प्रचितगड ताब्यात घेतला व शिर्क्यांना धर्मांतराची अट घातली. पण शिर्क्यांनी मलिक उतुजारला उलट अट घातली की, प्रथम माझा शत्रू व खेळणा किल्ल्याचा शंकरराव मोरे याला प्रथम मुसलमान करा, नंतरच मी मुसलमान होऊन सुलतानाची चाकरी करीन. एवढेच सांगून शिर्के थांबले नाहीत, तर त्यांनी खेळणा किल्ल्यापर्यंतची वाट दाखवण्याचे वचन दिले. या अमिषाला भुललेल्या मलिकने शिर्क्यांच्या सल्ल्याप्रमाणे जाण्याचे ठरविल्यावर प्रारंभीच काही दक्षिणी व हबशी सैनिकांनी पहाडात/जंगलात शिरण्याचे नाकारले. उरलेल्या फौजेला घेऊन मलिक सह्याद्रीच्या अंतरंगात शिरला. वचन दिल्याप्रमाणे शिर्क्यांनी पहिले दोन दिवस रुंद व चांगल्या वाटेने सैन्याला नेले. तिसऱ्या दिवशी मात्र शिर्क्यांनी त्यांना घनदाट अरण्यात नेले. मैदानी मुलुखात आयुष्य गेलेल्या मुसलमान सैनिकांची सह्याद्रीच्या वाटांनी दमछाक केली. या लोळागोळा घालेल्या सैन्याला शिर्क्यांनी अशा ठिकाणी आणले की, जेथे तिनही बाजूंनी उत्तुंग डोंगर व चौथ्या बाजूस खाडी होती. तेथून पुढे जाण्यास मार्ग नव्हता व परत फिरण्यासाठी पुन्हा ती खडतर परतीची वाट कापण्याचे सैन्यात त्राण नव्हते. त्यातच मलिक उतुजार आजारी पडून त्यास रक्ताची हगवण लागली. त्यामुळे त्याला सैन्याला हुकूमही देता येईना. अशा परिस्थितीत सैन्य दमून भागून झोपले असतांना शिर्क्यांनी खेळण्याच्या मोऱ्यांशी संधान बांधले व मलिकच्या सैन्यावर अचानक छापा घातला. त्यावेळी झालेल्या कत्तलीत मलिक उत्तुजारसह सर्व लोक मारले गेले. या प्रसंगाचे फेरिस्ताने केलेले तपशिलवार वर्णन मुळातूनच वाचायला हवे.

१४६९ साली बहामनी सुलतानाने बब्कीरे त्याचा सेनापती मलिक रेहान याला खेळणा किल्ला घेण्यासाठी पाठविले. सहावेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला घेता आला नाही. सातव्या प्रयत्नात ९ महिन्याच्या निकराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला घेता आला. या मलिक रेहानच्या नावाचा दर्गा या किल्ल्यावर आहे. त्यातील फारशी शिलालेखात वरील उल्लेख आढळतो. यानंतर जवळजवळ पावणेदोनशे वर्ष हा किल्ला बहामनी आदिलशाही या मुस्लिम सत्तांकडे होता. २८ नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव ‘विशाळगड’ ठेवले. ३ मार्च १६६०ला सिद्दी जौहारने पन्हाळ्याला वेढा घातला. त्याचवेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे विशाळगडाला वेढा घालून बसले होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून काढला व महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. त्याआधी पावनखिंडीत ३०० निवडक मावळ्यांसह बाजीप्रभूंनी सिद्दीचे सैन्य रोखून धरले व आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवरायांनी विशाळगडाच्या मजबूतीकरिता ५००० होन खर्च केल्याचा उल्लेख आहे.संभाजी महाराजांनी विशाळगडावर अनेक नवीन बांधकामे केली. १६८६ मध्ये शिर्क्यांचे बंड मोडून काढण्यासाठी संभाजी महाराजांनी कविकलशांना पाठविले, परंतु पराभूत होऊन त्याने विशाळगडाचा आसरा घेतला.

इ.स. १६८९ मध्ये संभाजी महाराज विशाळगडावरून रायगडाकडे जातांना संगमेश्वर येथे तुळापूरी पकडले गेले व त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळात विशाळगड मराठ्यांच्या हालचालींचे प्रमुख केंद्र होता. रामचंद्रपंत आमात्यांनी विशाळगडास आपले मुख्य ठिकाण केल्यामुळे त्यास राजधानीचा दर्जा प्राप्त झाला. १७०१ साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या. डिसेंबर १७०१ मध्ये औरंगजेब स्वतः मोठ्या फौजेनिशी विशाळगड घेण्यासाठी आला. पण विशाळगडाचे किल्लेदार परशुराम पंतप्रतिनिधी यांनी तब्बल सहा महिने किल्ला लढवून, ६ जून १७०२ रोजी अभयदान व स्वराज्य कार्यासाठी २ लाख रुपये घेऊन किल्ल्याचा ताबा औरंगजेबाला दिला. त्याने विशाळगडाचे नाव बदलून ‘सरवरलना’ असे ठेवले. विशाळगड जिंकून पन्हाळ्याला परत जाताना औरंगजेबाच्या सैन्याला सह्याद्रीने झुंजवले. तब्बल ३७ दिवसांनी पन्हाळ्याला पोहोचेपर्यंत मुघल सैन्याचे अपरिमित हाल व नुकसान झाले. त्याची वर्णने मुघल इतिहासकारांनी लिहिलेली आहेत.

इ.स. १७०७ मध्ये ताराराणीने विशाळगड पुन्हा जिंकून घेतला. पुढे विशाळगड करवीरकरांच्या ताब्यात गेला. त्यांनी तो पंतप्रतिनिधींना दिला. १८४४ साली इंग्रजांनी विशाळगड जिंकून त्यावरील बांधकामे पाडून टाकली.

विशाळगडाची उभारणी इ.स. १०५८मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. हा गड किल्ले खेळणा या नावाने देखील ओळखला जातो. साधारण इ.स.१४५३ च्या सुमारास बहामनी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला. हा सरदार म्हणजे मलिक उत्तुजार होय, त्याने प्रथम पन्हाळा किल्ल्यावरील शिर्क्यांना जेरीस आणले. शिर्क्यांनी मलिक उत्तुजाराला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलिक उत्तुजारची सात हजाराची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलिक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेल्या मलिक उत्तुजारला सात हजार सैन्यासकट त्यांच्या आक्रमणापासून मुक्त केला. या सैन्यातील एक सरदार मलिक रैहान होता. त्याचीच कबर विशाळगडावर आहे असे जाणकारांचे मत आहे.

पुढे शिवाजी महाराजांनी इ.स. १६५९मध्ये हा किल्ला जिंकला व याला विशाळगड हे नाव ठेवले. हा किल्ला मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार आहे. आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून शिवाजी राजांनी करून घॆतलेल्या सुटकेमुळे या किल्लयाचे नाव अजरामर झाले. आणि यासाठी अवघे ३०० मावळे घेऊन आठ तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणारे वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमामुळे या किल्लयाचे नाव झाले. पुढे शिवाजी राजांचा मृत्यूनंतर संभाजीराजांनी विशाळगडावर बराचसा काळ व्यतीत केला. त्यांनी या किल्ल्याची डागडुजी तसेच,पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष दिले.

कोल्हापूरच्या छत्रपतींचे पंतप्रधान पंत प्रतिनिधी हे विशाळगड येथे राहत असून, ते विशाळगडाचे जहागीरदार होते. त्यानंतर ते मलकापूर येथे राहावयास गेले.

पाहण्यायोग्य ठिकाणे[संपादन]

एस.टी. किंवा खाजगी वाहनाने विशाळगडासमोरील वाहनतळावर उतरल्यावर, वाहनतळात व विशाळगडामध्ये एक दरी दिसते. पूर्वी या दरीत उतरुनच विशाळगडावर जावे लागत असे. परंतु आता या दरीवर लोखंडी पूल बांधलेला आहे. या पुलावरून विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर दोन वाटा दिसतात. समोरची खड्या चढणीची शिडीची वाट, तर उजव्या बाजूची पायऱ्यांची फिरून जाणारी कमी चढणीची वाट. आपण वर जाताना शिडीच्या वाटेने जाऊन उतरताना पायऱ्यांच्या वाटेने उतरावे. म्हणजे किल्ल्यावरील सर्व ठिकाणे पाहून होतात. शिडीच्या वाटेने चढल्यावर दर्ग्याच्या अलीकडे डाव्या हाताला एक पायऱ्यांची वाट खाली उतरते. या वाटेने गेल्यावर दोन रस्ते फुटतात. उजव्या बाजूची नव्या पायऱ्यांची वाट भगवंतेश्वर मंदिर / राजवाडा / टकमक टोक येथे जाते. तर डाव्या हाताची जुनी फरसबंदी(दगडांची) वाट अमृतेश्वर मंदिर / बाजीप्रभुंची समाधी येथे जाते. आपण डाव्या बाजूच्या वाटेने गेल्यावर ५ मिनिटातच अमृतेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. मंदिरासमोरील कड्यावरून पडणारे पाणी कुंड बांधून डवलेले आहे. मंदिरात पंचाननाची मूर्ती आहे. मंदिरावरून तसेच पुढे जाऊन पाताळदरीत खाली उतरावे. या ठिकाणी एक ओढा आहे. या ओढ्याच्या पलीकडे उघड्यावर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे यांच्या समाध्या आहेत. या समाध्या पाहून उजव्या बाजूच्या टेकडीवर असलेले हनुमान मंदिर पाहावे. मंदिर पाहून पून्हा दर्ग्यापाशी दोन रस्ते फुटतात, त्या ठिकाणी यावे. तेथून उजव्या बाजूच्या सिमेंटने बांधलेल्या पायऱ्यांच्या वाटेने ५ मिनिटात आपण भगवंतेश्वर मंदिरापाशी येतो. या ठिकाणी भगवंतेश्वर मंदिर, विठ्ठलाचे मंदिर व नवीन बांधलेले गणपतीचे मंदिर अशी तीन मंदिरे आहेत. मंदिरासमोर चौकोनी पाण्याची विहिर आहे. श्री हर्डिकर हे मंदिराची देखभाल पाहातात. त्यांचे घर मंदिराच्या बाजूस आहे.

या मंदिरात राहण्याची व्यवस्था होऊ शकते. भगवंतेश्वर मंदिरातील कासव पाहाण्यासारखे आहे. या कासवापुढील देव्हाऱ्याकडील पायरीवर मोडीलिपीमध्ये शिलालेख कोरलेला आहे. त्यावरील ‘आबाजी जाधव शके१७०१, विशाळगड’ ही अक्षरे वाचता येतात. मंदिरात ब्रम्हदेवाची मूर्ती आहे. प्रदक्षिणामार्गावर भिंतीत दिवे लावण्यासाठी केलेले कोनाडे आहेत. विठ्ठल मंदिराच्या लाकडी दरवाजावर व महिरपीवर केलेले कोरीव काम पाहण्यासारखे आहे. मंदिर पाहून जवळच असलेल्या पंतप्रतिनिधींच्या वाड्याकडे(राजवाड्याकडे) जाताना वाटेत एक मोठी चौकोनी पायऱ्यांची विहिर लागते. राजवाड्याचे प्रवेशद्वार उध्वस्त झालेले आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या भिंतीत एक छोटेसे भुयार आहे. या भुयारातून (उंची ३ फूट) रांगत जाता येते. भुयाराचे दुसरे तोंड चौकोनी विहिरीजवळ आहे. राजवाड्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. राजवाड्याच्या दक्षिण दिशेला असलेल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर समोरच एक मोठी गोल विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी कमान असलेला, दिंडी दरवाजासारखा छोटा दरवाजा आहे. या विहिरीत महादेवाचे मंदिर आहे. राजवाड्याच्या मागच्या बाजूस एक कोरडी विहीर आहे. या विहिरीवरून पुढे चालत गेल्यावर ५ मिनिटात आपण टकमक टोकापाशी पोहोचतो. हे सर्व पाहून पुन्हा दर्ग्यापाशी यावे. येथे दुकानांची / हॉटेलांची गर्दी झाली आहे. त्यामुळे वाट विचारतच मुंढा दरवाजापाशी यावे. या दरवाजाचा एक बुरुज व कमान शाबूत आहे. दरवाजाच्या बाजूने एक वाट वर चढत टेकडीवर जाते त्यास ‘रणमंडळ’ टेकडी म्हणतात. येथेच खालच्या बाजूस एक ८ फुटी तोफ पडलेली आहे. ती पाहून पायऱ्यांच्या वाटेने गड उतरण्यास सुरुवात करावी. वाटेत एका चौथऱ्यावर दगडात राजाराम महाराजांची कोरलेली दोन पावले दिसतात. तेथे त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई यांची समाधी आहे. या शिवाय गडावर घोड्याच्या टापा, मुचकुंदाच्या गुहा, सती, तास टेकडी इत्यादी ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत. आदिलशाहीचा सेनापती मलिक रेहानच्या दर्ग्याला येणाऱ्या हिंदू मुस्लिम भक्तांनी या परिसराचा उकीरडा केलेला आहे. ज्याने आपल्या पूर्वजांचे रक्त काढले तो कसा काय तुमच्या ईच्छा पुर्ण करेल हा साधा विचार न करता लोक कोंबड्या बकरीचे मटण खाण्यास जातात. पुर्वजांनी हा गड राखण्यासाठी रक्ताचे पाणी केले, प्रसंगी बलिदानही केले याची जाणीव जेव्हा या भक्तांना होईल तोच सुदिन.

वाहनतळावरून गडाकडे जाण्यासाठी दोन वाट आहेत. वाटेवरील लोखंडी पूल ओलांडल्यानंतर पायऱ्यांची चढण सुरू होते. तर दुसरी अलिकडे तयार केलेली नवीन वाट आहे.चढताना ढासळलेले बुरूज दिसतात. साधारण ३० मिनिटे चालल्यानंतर माणूस गडाच्या सपाटीवर येऊन पोहोचतो.डाव्या बाजूने खाली गेल्यावर गडावर "वीररत्न बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे" यांची समाधी आहे.याठिकाणी दरवर्षी लाखो लोक भेट देतात.सह्याद्री प्रतिष्ठानने सुंदर असे संवर्धन केले आहे काळाच्या ओघात किल्ल्याची बरीच पडझड झाली असून सध्या गडावर मोजके पण चांगले अवशेष शिल्लक आहेत. किल्क्यावर छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अहिल्याबाई यांचे स्मारक आहे. येथे "अमृतेश्वर मंदिर,सुंदर विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गडाची ग्रामदेवी वाघजाई मंदिर,गणेश मंदिर आणि घोड्याचा टाप" आहे."टकमक टोक" सुद्धा बघायला मिळते. गडावर आदिलशाही बहामणी चा सेनापती हजरत मलिक रिहान याचा दर्गा आहे.

गडावर राहायचीसोय :- अतिक्रमण करुण बांधलेले घरे आहेत तेथे नालायकासारखे दारू ढोसायची राहायची सोय केलेली आहे आणि आपलीच लोक तेथे ऊकीरडा आणि गडाचे पावित्र्य नष्ट करत आहेत. हे बघितले तर तळपायाची आग मस्तकात जाते.

कसे जाल?[संपादन]

http://fortsofshivrai.com/sites/default/files/u1/vishalgad1.jpg Archived 2013-12-19 at the Wayback Machine. पुण्याहुन कराडला गेल्यावर पुढे पाचवड फाटा, तेथून उजवीकडे वळल्यावर २० किमी वर शेडगेवाडी गाव लागते. डावीकडे वळल्यावर ४ किमीवर केकरुड गाव लागते. नंतर नदीवरील पूल ओलांडल्यावर लगेच उजवीकडे वळा. केकरुड घाट, मलकापुरला कोल्हापुर-रत्‍नागिरी हायवे वर आंबा गावातून डावीकडे विशाळगडाकडे वाट जाते.

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

लाज वाटली पाहिजे पण गडावर छोट्या मोठ्या भरपूर अतिक्रमण केलेली खानावळी व हॉटेले असून तिथे पर्यटकांच्या आवडीप्रमाणे पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जराही विचार न करता शाकाहारी किंवा मांसाहारी भोजन उपलब्ध करून दिले जाते.येथील दारू पिण्यास बंदी घातली पाहिजे आणि गडावर फक्त पर्यटनास परवानगी दिली पाहिजे.

गडावरील पाण्याची सोय[संपादन]

गडावर पिण्याच्या पाण्याची एकच विहीर असून ती देखील उन्हाळ्यात आटते. उन्हाळ्यात स्थानिक ग्रामस्थ पांढरेपाणी किंवा आंबा गावातून पाणी आयात करतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये इतर वापरासाठी मुबलक पाणी उपलब्ध नसते. परंतु पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष अडचण नाही. गडावरील बहुतेक दुकानांमध्ये किंवा हॉटेलात पिण्याचे पाणी मिळू शकते.

गडावर जाण्याच्या वाटा : देवडे गावातुन वडये वाडीमार्गे जाण्यासाठी मार्ग आहे. पावसाळ्यात हा मार्ग बंद असतो, पण वाडीतल्या माहितीगार माणसाशी ओळख काढलीत तर दुसऱ्या वाटतेने तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी.

मार्ग[संपादन]

शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथून गजापूर मार्गे थेट विशाळगड्याच्या पायथ्यापर्यंत खाजगी वाहनाने जाता येथे अथवा आंबा येथून विशाळगडावर जाण्यासाठी वेगळा घाट रस्ता आहे. कोल्हापूरामधून या मार्गे कर्नाटक परीवहन मंडळाच्या दिवसातून चार बसेस विशाळगडापर्यंत जातात. दिवसातून काही वेळेस मलकापुरातून गजापूरमार्गे देखील एस.टी. महामंडळाच्या काही बसेस विशाळगडावर जातात.

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]

कोल्हापूर वरून गाडीने 3 तास

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]