Jump to content

अंतूर किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अंतुर किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)
अंतूर
नाव अंतूर
उंची २७०० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
जवळचे गाव नागापूर गाव, कन्नड, खोलापूर
डोंगररांग अजंठा-सातमाळा
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


अंतूर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

अजंठा-सातमाळा या सह्याद्रीच्या पूर्वपश्चिम उपरांगेवर मोक्याच्या ठिकाणी अंतुरगड ठाण मांडून बसलेला आहे. हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुकामध्ये आहे. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे.

कसे जाल?

[संपादन]

अंतूरच्या किल्ल्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक कन्नड कडून गौताळा अभयारण्यामधून एक रस्ता नागदकडे जातो. या रस्त्याला पुढे सिल्लोडकडे जाणारा एक उपरस्ता आहे. या रस्त्यावर आठ नऊ कि.मी. वर नागापूर नावाचे लहानसे गाव आहे. या गावातून अंतुरगडाकडे कच्चा रस्ता जातो. या मार्गावर खोलापूर म्हणून लहानशी वस्तीही वाटेत आहे. खोलापूरच्या पुढे असलेला रस्ता पावसाळ्यात खराब होतो. खोलापूरपासून सहा कि.मी. अंतरावर अंतुरगड आहे. हा मैलाचा चौकोनी दगड आहे. त्यावर काही शहरांच्या दिशा सांगितल्या असून हा इ.स. १६०८ मध्ये बसविल्याचा उल्लेख आहे. साधारण सपाटी असलेल्या या मार्गावरून चालत पाच एक किलोमीटर गेल्यावर अंतुरगडाचे दर्शन होते. अजंठा सातमाळा रांगेचे एक शृंग थोडे उत्तरेकडे घुसले आहे. या शृंगावरच अंतुरगड आहे. दुसरा मार्ग जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामधून आहे. नागोद गावाकडून म्हैसघाटमार्गे दस्तापूरला पोहोचून तेथून अंतूरचा पायथा गाठता येतो. नंतर डोंगर चढल्यावर किल्ला येतो. हे दोन्ही मार्ग अंतूरच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येतात. अंतूरच्या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. डोंगर उतारावर भरपूर झाडी आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

[संपादन]

अंतूरच्या पूर्व अंगाला असणाऱ्या कड्याच्या पोटात दक्षिणेकडे तोंड करून एक प्रेक्षणीय दरवाजा आहे. अरुंद जागेत दरवाजा असल्यामुळे तो समोर गेल्याशिवाय चटकन दिसत नाही. येथे दरवाजाच्या बाहेर पहारेकऱ्यांच्या जागा आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत (१९९० पर्यंत) या दरवाजाला लाकडी दारे होती. ती आता बेपत्ता झाली आहेत. या दारातून आत गेल्यावर आतील मार्ग तटबंदीने बंदिस्त केलेला असून तो अरुंद आहे. या मार्गावर वरून खूपच दगड पडलेली आहेत. पुढचा दरवाजा मात्र पूर्व दिशेला तोंड करून आहे. हा भव्य दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर तिसरा दरवाजा आहे. दुसऱ्या दरवाजाच्या आतील बाजूच्या कमानीवर शिल्पे आहेत. अशी शिल्पे अनेक ठिकाणी पहायला मिळतात. पण येथे या शिल्पाबरोबर सजावटीसाठी तोफेचे चार गोळे वापरले आहेत. अशा प्रकारे केलेली सजावट महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेरही आढळत नाही. ही वैशिष्ट्यपूर्ण सजावट पाहून आपण तिसऱ्या दारावरील भव्य असा फारशी शिलालेख अवलोकन करून गडप्रवेश करायचा. हा प्रवेश गडाच्या मध्यभागीच होतो.

गड दक्षिणोत्तर पसरलेला असून तटबंदीने वेष्टित आहे. या तटबंदीच्या कडेने उत्तर टोकाकडे चालू लागल्यास उजवीकडील तटबंदीमधील काही बुरुज लागतात. डावीकडे एक टेकडी असून टेकडीच्या दक्षिण बाजूला भलामोठा तलाव आहे. टेकडीच्या उतारावर भव्य इमारत आहे. इमारतीच्या गच्चीवर जाता येते. त्यासाठी पायऱ्या आहेत. टेकडीच्या माथ्यावर टेहाळणीकरिता भलामोठा चौथरा बांधलेला असून त्यावर चढण्यासाठी उत्तरेकडून पायऱ्या आहेत. या चौथऱ्यावरून संपूर्णगडावर लक्ष ठेवता येते तसेच येथून अंजठा-सातमाळा रांगेचे उत्तम दर्शन होते; उत्तरेकडील खानदेशाचा परिसर न्याहाळता येतो. गडाचा दक्षिण भाग एका तटबंदीने वेगळा केलेला आहे. या तटबंदीमध्ये तीन दरवाजे आहेत. त्यापैकी मध्यभागी मोठा दरवाजा असून त्याला दक्षिण बाजूला दोन मोठे बुरूज आहेत. मधल्या टेकडीच्या पश्चिम उतारावर तटबंदीजवळ पाण्याचे टाके कोरलेले आहे. गडाचा उत्तर भाग बालेकिल्ल्यासारखा असून तो अधिकच भक्कम करण्यात आला आहे. या बाजूला किल्ला हा डोंगर रांगेशी जोडला गेला असल्यामुळे या बाजूला मोठा खंदक कोरलेला आहे. खंदकाच्या माथ्यावर भक्कम तटबंदी असून या तटबंदीला चिलखती बांधणी आहे. इथे एक तोफ पडलेली आहे.

इतिहास

[संपादन]

या भक्कम आणि बलदंड किल्ल्याची उभारणी एका मराठा सरदाराने केली होती. पुढे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला. मलीक अंबरच्या काळात येथे काही बांधकामे झाली. पुढे मोगली वावटळीत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी इतर किल्ल्याबरोबर याचाही ताबा मिळवला.

हे सुद्धा पहा

[संपादन]