सोलापूरचा भुईकोट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोलापूरचा भुईकोट
नाव सोलापूरचा भुईकोट
उंची फूट
प्रकार भुईकोट किल्ला/भूदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण सोलापूर, महाराष्ट्र
जवळचे गाव सोलापूर
डोंगररांग सोलापूर
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


भौगोलिक स्थान[संपादन]

मुंबई-हैद्राबाद हा महामार्ग सोलापूर शहरातून जातो. सोलापूर शहरात भुईकोट प्रकारचा किल्ला आहे. हा किल्ला 'सोलापूरचा भुईकोट किल्ला' म्हणून ओळखला जातो. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक ४ डिसेंबर, इ.स. १९३० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]

मध्यकालीन इतिहासामध्ये सोलापूरच्या किल्ल्याला अतिशय महत्वाचे स्थान प्राप्त झाले होते. बहमनींच्या राज्याची शकले उडाल्यावर त्यातून पाच शाह्या निर्माण झाल्या. या पाच शाह्यांनी आपली वेगळी चूल मांडली. या पाचही राजवटीच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूरचे भौगोलिक स्थान होते. त्यामुळे सोलापूरचे महत्त्व वाढले.

इतिहास[संपादन]

सोलापूरचा किल्‍ला नेमका कोणी बांधला या बाबत अजूनही तज्‍ज्ञांमध्ये एकवाक्यता आढळत नाही. काहींच्या मते हिंदू राजांच्या काळात बांधलेल्या या किल्ल्याभोवती महमूद गावान याने दुसरी तटबंदी बाहेरून बांधून किल्ला अभेद्य केला. महमूद गावान हा बहमनी सुलतान महंमदशाह याचा दिवाण होता.

इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला सोलापूरचा किल्ल्या अनेक राजवटीचे आश्रय स्थान होता. या ऐतिहासिक घटनांमध्ये एक गमतीशीर मजाही आहे. ती म्हणजे 'सोलापूरचा किल्ल्‍ला' हा लग्नामध्ये हुंडा म्हणून दिल्याची नोंद आहे. ही नोंद एकदा नाही तर दोन वेळा आहे.

अहमदनगर येथे बुऱ्हाण निजामशहा गादीवर होता. तर, विजापूर येथे इस्माईल आदिलशहा सत्तेवर होता. त्यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने एक विवाह संबंध घडवून आणण्यात आला. आदिलशहाच्या कन्येला बुऱ्हाण निजामशहाला देऊन हा लग्नसमारंभ धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. हा विवाह सोलापूरच्या किल्ल्यामध्ये झाला. त्यावेळी म्हणजे, इ.स. १५२३ मध्ये हा किल्‍ला विजापूरच्या ताब्यात होता. जावयाला हुंडा म्हणून 'सोलापूरचा किल्‍ला' देण्याचे आदिलशहाने जाहीर केले होते. पण विवाहानंतर आदिलशहाने हा किल्‍ला देण्याचे नाकारले. त्यातून पुढे निजामशहा आणि आदिलशहा यांच्यात युद्धही झाले. या युद्धात जावई निजामशहाचा पराभव झाला. दुसऱ्यावेळी इ.स. १५५२ मध्ये अहमदनगरची राजकन्या चांदबिबी अली आदिलशहाला देण्यात आली. तर अली आदिलशहाची बहीण हदिया सुलताना हिचा विवाह मुतर्जा निजामशहाशी करण्यात आला. तेव्हा मात्र कबूल केल्याप्रमाणे निजामशहाने हा किल्‍ला विजापूरच्या सुलतानाला हुंडा म्हणून दिला.

सोलापूरचा किल्‍ला बहमनी, आदिलशाही, निजामशाही नंतर मोगल सत्तेत आला. औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याचा बराच काळ या किल्ल्याच्या परिसरात गेला. पुढे हैदराबादच्या निजामाच्या आणि नंतर मराठ्यांच्या ताब्यात हा किल्‍ला गेला.

पाहण्यासारखे[संपादन]

सोलापूरचा किल्‍ला दुहेरी तटबंदीचा आहे. खंदकाच्या आत असलेल्या या दुहेरी तटबंदीमुळे सोलापूरचा किल्‍ला अभेद्य आणि बलदंड झालेला आहे. याच्या बाहेरील तटबंदीमध्ये चार कोपऱ्यांवर चार बलदंड बुरूज आहेत. या बुरुजांना एकमेकांना जोडणाऱ्या तटबंदीमध्ये आणखी २२ बुरूज बांधून बुरुजांची एकभक्कम साखळीच निर्माण करण्यात आली. साधारण तीस फूट उंचीची तटबंदी असून त्यावर जागोजाग माऱ्यासाठी छिद्रे केलेली दिसतात. बुरुजांवर तोफा ठेवण्याची सोय करण्यात आली आहे.

बाहेरील भक्कम तटबंदीच्या आत असलेली दुसरी तटबंदी उंच आहे. याच्याही चार कोपऱ्यांवर चार बुरूज असून ते अधिकच उंच बांधण्यात आलेले आहेत. या बुरुजांवरून दूरवर टेहळणी करता येत असे. किल्ल्याच्या एका बाजूला सिद्धेश्वर तलावामुळे नैसर्गिकपणा आला आहे.

सोलापूरचा किल्‍ला हा पुरातत्त्वखात्याच्या अखत्यारीत आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. किल्‍ला आणि त्याचा परिसर सुशोभित केलेला आहे. किल्ल्याचे दरवाजे अतिशय भक्कम असून शहर दरवाजा, हत्ती दरवाजा, खाती दरवाजा अशा नावानी ते ओळखले जातात. किल्ल्यामध्ये ध्वस्त झालेले मंदिर तसेच अनेक इमारतीचे अवशेष पहायला मिळतात. नागबावडी विहीर आणि इंग्रजकालीन तोफा ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

इतिहास आणि भक्कम बांधकाम यामुळे सोलापूरचा किल्‍ला आपल्या स्मरणात राहतो.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "गॅझेट नोटिफिकेशन" (इंग्रजी मजकूर). आर्किओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल. ११ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. पहा: महाराष्ट्रातील किल्ले


बाहय दुवे[संपादन]