हरिश्चंद्रेश्वर मंदिर, हरिश्चंद्रगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरिश्चंद्रेश्वर मंदिर, हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड येथे असलेले मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच `मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत `चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केलेले आहे असे स्थानिक गावकरी सांगतात. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली घळ आहे. या घळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. सभोवती प्रदक्षिणा मारता येते.

इतिहास[संपादन]

दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक हे शिवालय आहे..

ती शिवालये अशी :

 1. गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर,
 2. वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय,
 3. धारणा नदीच्या उगमाशेजारचे -तऱ्हेळे येथे,
 4. बाम नदीच्या उगमाशेजारचे - बेलगावला,
 5. कडवा नदीच्या उगमाशेजारचे - टाकेद
 6. प्रवरा नदीच्या उगमाशेजारी - रतनवाडीतील अमृतेश्वर,
 7. मुळाउगमस्थानी असलेल्या - हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर,
 8. पुष्पावतीजवळ - खिरेश्वरातील नागेश्वर,
 9. कुकडीजवळच्या - पूरमधील कुकडेश्वर,
 10. मीना नदीच्या उगमाशेजारच्या - पारुंडेतील ब्रह्मनाथ,
 11. घोड नदीच्या उगमस्थानी - वचपे गावातील सिद्धेश्वर
 12. भीमा नदीजवळचे -भवरगिरी.

ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत. यांतच हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराचा समावेश होतो.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक[संपादन]

भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराला दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी महारष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले.[१]

चित्रदालन[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "नोटीफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्यूमेन्ट्स इन इंडिया" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2016-03-04. ८ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)