सह्याद्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
सह्याद्री पर्वत
सह्याद्री
Western-Ghats-Matheran.jpg
पश्चिम घाट
देश भारत
राज्य महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू
सर्वोच्च_शिखर अनाई मुदी शिखर
लांबी १६०० कि.मी.
रूंदी १०० कि.मी.
क्षेत्रफळ ६०,००० वर्ग कि.मी.
प्रकार बसाल्ट खडक
Indiahills.png
सह्याद्री पर्वतरांग ही भारताच्या पश्चिम तटाशेजारी उभी आहे.सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रकिनार्‍याशेजारी उभी असलेली डोंगराची रांगआहे. ही रांग तापी नदीच्या दक्षिणेकडून महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेशेजारी चालू होते आणि अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची ही पर्वतरांग महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाच्या जवळ पोचते. या पर्वतरांगेचा जवळजवळ ६०% भाग हा कर्नाटकात येतो.[१]

या पर्वतरांगेचे क्षेत्रफळ ६०,००० चौरस कि.मी. असून या पर्वतरांगेची सरासरी उंची १२०० मीटर आहे [२]. अनेक उंच शिखरे ही पर्वतरांग सामावून घेते, त्यामध्ये रांगेच्या उत्तरेकडे महाराष्ट्रात कळसूबाई शिखर (उंची १६४६ मी), महाबळेश्वर (उंची १४३८ मी) आणि हरिश्चंद्रगड(उंची १४२४ मी), कर्नाटकात १८६२ मी उंचीवर असलेले कुद्रेमुख शिखर आणि दक्षिणेकडे केरळमध्ये अनाई मुदी शिखर (उंची २६९५ मीटर). अनाई मुदी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. पर्वतरांगेत महत्त्वाचा खंडभाग पालघाट खिंडीच्या स्वरूपात आहे हा तमिळनाडू आणि केरळ यांना जोडतो.. इथे सह्याद्रीची सर्वात कमी उंची आहे (३०० मी).

पश्चिम घाट ही जगातील सर्वात जास्त जैवविविधता असणार्‍या आठ जागांपैकी एक आहे. इथे ५००० पेक्षा जास्त फुलझाडे, १३९ प्राण्यांच्या जाती, ५०८ पक्ष्यांच्या जाती व १७९ उभयचर प्राण्यांच्या जाती आढळतात.[३]

भौगोलिक रचना[संपादन]

भारतीय प्रस्तर (लाल रंगातील)
Kud sola.jpg

पश्चिम घाट ही पर्वतरांग नसून दख्खनच्या पठारातील अंतर्गत घडामोडींमुळे निर्माण झालेली कड आहे. सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यामुळे सह्याद्रीची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. या तुकड्याची पश्चिमेकडची बाजू साधारण १००० मी. उंचीचा कडा असावा असे शास्त्रज्ञांना वाटते [४].

Dud sagar.jpg

गोंडवन खंडाच्या तुकड्यातून वेगळी झालेली भारतीय उपखंडाची जमीन ही सरकत सरकत युरेशियन उपखंडाला जिथे येऊन मिळाली, तिथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीतून निघालेला लाव्हा सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी थंड होऊन दख्खनचे पठार निर्माण झाले. या लाव्हामुळे जे खडक निर्माण झाले त्यांना बसाल्ट खडक असे म्हणतात. त्याखालील खडक हे सुमारे २०० दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झालेले जुने खडक आहेत व ते निलगिरीच्या काही भागांमध्ये सापडतात..[५]

बसाल्ट दगडाचा नमुना

बसाल्ट खडक हा सह्याद्री पर्वतरांगेत सर्वात जास्त सापडणारा खडक आहे. सह्याद्रीमध्ये सापडणारे इतर खडक पुढीलप्रमाणे चार्नोकाईट, ग्रॅनाईट, खोंडालाईट, लेप्टिनाईट. लॅटराईट व बॉक्साईट खडक दक्षिणेकडील पर्वतरांगांमध्ये आढळतात.[६]

पर्वतशिखरे[संपादन]

सह्याद्री पर्वतरांग उत्तरेला सातपुडा पर्वतरांगेपासून सुरू होते. नंतर दक्षिणेला गोवा, कर्नाटक, केरळ व शेवटी तमिळनाडू राज्यामध्ये पसरलेली आहे. यातील मुख्य रांग म्हणजे सह्याद्री. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये माथेरान, महाबळेश्वर, पांचगणी, कुद्रेमुखकोडागू इत्यादी थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. निलगिरी पर्वतरांग, बिलिगिरिरंगन पर्वतरांग, सेल्व्हराजन पर्वतरांग आणि तिरुमला पर्वतरांग इत्यादी काही छोट्या पर्वतरांगा पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडतात.

काही छोट्या पर्वतरांगा उदा. कार्डमम पर्वतरांग व निलगिरी पर्वतरांग या तमिळनाडू राज्याच्या उत्तर-पश्चिम क्षेत्रात आहेत. निलगिरी पर्वतरांगेमध्ये प्रसिद्ध उटकमंड हे थंड हवेचे ठिकाण आहे. या पर्वतरांगेमध्ये दोड्डाबेट्टा (२,६२३ मी) हे सर्वोच्च शिखर आहे. या पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे, अनामलाई पर्वतरांगे मध्ये अनाई मुदी (२,६९५ मी), चेंब्रा शिखर (२,१०० मी), बाणासुर शिखर (२,०७३ मी), वेल्लारीमाला शिखर (२,२०० मी) आणि अगस्त्यमाला शिखर (१,८६८ मी) इत्यादी पर्वतशिखरे आहेत. केरळ राज्यातील सर्व चहा व कॉफीचे मळे हे पश्चिम घाटातच आहेत. पश्चिम घाटात दोन मुख्य खिंडी आहेत. महाराष्ट्रकर्नाटक राज्यांच्या मध्ये असलेली गोवा खिंड आहे व दुसरी पालघाट खिंड. ही निलगिरी व अनामलाई पर्वतरांगांच्या मधे आहे.

निलगिरी पर्वतरांग

पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या मधल्या चिंचोळ्या पट्टीच्या उत्तरेकडील सपाट भागाला कोकण असे म्हणतात. तर दक्षिणेला मलबार म्हणतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी पूर्वेकडे असलेल्या भागाला महाराष्ट्रात देश असे म्हणतात तर मध्य कर्नाटकात मळनाड म्हणतात.

पश्चिम घाट मौसमी वार्‍यांना अडवतो, त्यामुळे ढग उंचीवर जातात आणि थंड होतात व पाउस पडतो. घनदाट जंगलेही पावसाला मदत करतात. तसेच जमिनीतील बाष्प पुन्हा वाफेच्या स्वरुपात हवेत सोडण्यास मदत करतात. यामुळेच घाटाच्या पश्चिम उताराकडे पूर्व उतारापेक्षा खूप जास्त पाउस पडतो. भरपूर पावसामुळेच पश्चिम घाटात अनेक नद्यांची उगमस्थाने आहेत. गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि त्यांच्या उपनद्या इथेच उगम पावतात.

नद्या व धबधबे[संपादन]

जोग धबधबा (कर्नाटक) हा भारतातील एक प्रेक्षणीय धबधबा आहे.

पश्चिम घाट हा अनेक लहान मोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे. या पैकी मुख्य नद्या म्हणजे गोदावरी, कृष्णाकावेरी. या तिन्ही नद्या पूर्ववाहिनी असून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. तसेच इतर अनेक नद्या ज्या पश्चिमवाहिन्या आहेत, त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. यापैकी मुख्य नद्या म्हणजे मांडवीझुआरी नदी. इतर अनेक नद्या या पश्चिम घाटात उगम पावतात. अन्य नद्यांमध्ये भीमा नदी, मलप्रभा नदी, कुंडली नदी, इत्यादी नद्या आहेत.

अनेक पश्चिमवाहिनी नद्या ह्या खूप उतारावरून वाहत असल्यामुळे जलविद्युत प्रकल्पांसाठी खूप उपयुक्त आहेत. पश्चिम घाटात जवळजवळ ५० धरणे बांधलेली आहेत व त्यापैकी सर्वात जुना जलविद्युत प्रकल्प खोपोली येथे १९०० साली बांधला गेला.[७] या सर्व धरणांपैकी मोठी धरणे म्हणजे महाराष्ट्रातील कोयना धरण, केरळमधील परांबीकुलम धरण व कर्नाटकातील लिंगणमक्की धरण.

पावसाळ्यात पश्चिम घाटाचे सौंदर्य वाढविण्यास कारणीभूत घटक म्हणजे धबधबे. पश्चिम घाटात अनेक प्रेक्षणीय धबधबे आहेत. उदा. जोग धबधबा, कुंचीकल धबधबा, शिवसमुद्रम धबधबाउंचाल्ली धबधबा. जोग धबधबा हा दक्षिण आशियातील सर्वात उंच नैसर्गिक धबधबा आहे व तो जगातील १००१ नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे.[८] तळकावेरी वन्यजीव अभयारण्य हे कावेरी नदीच्या उगमाजवळ असलेले एक मोठे अभयारण्य आहे. तसेच घनदाट जंगलांमुळे तुंगभद्रा नदीच्या उगमापाशी शरावती व सोमेश्वर ही दोन अभयारण्ये आहेत.

हवामान[संपादन]

पश्चिम घाटातील वार्षिक पर्जन्यमान

पश्चिम घाटातील वातावरण हे उंचीनुसार बदलत जाते. कमी उंचीवर उष्ण व दमट हवामान असून जास्त उंचीवर (१५०० मीटरच्यावर) सरासरी १५ °से. तापमान असते. काही अति उंचीच्या भागांमध्ये कायम धुके असते व हिवाळ्यात तापमान ४-५ °से. पर्यंत खाली येते. पश्विम घाटातील सरासरी तापमान उत्तरेला २० °से व दक्षिणेला २४ °से आहे.[५]

पश्चिम घाटातील (कोकणात) सरासरी पर्जन्यमान हे ३०००-४००० मिलिमीटर तर देशावर १००० मिलिमीटर. पश्चिम घाटातील पावसाचे प्रमाण हे बदलत जाणारे आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेच्या पश्चिम घाटाच्या डोंगराळ भागात खूप पाऊस पडतो पण थोडेच दिवस पडतो तर विषुववृत्ताच्या जवळ असणार्‍या घाट प्रदेशांमध्ये थोडाच पाऊस पडतो पण वर्षभर पडतो.[५]

जैविक क्षेत्रे[संपादन]

पश्चिम घाटात चार प्रकारची वृत्तीय जंगले आढळतात. पश्चिम घाटाच्या उत्तरदक्षिण भागात पानगळीची व सदाहरित जंगले आढळतात. पश्चिम घाटाच्या उत्तरेला सामान्यत: दक्षिण भागापेक्षा कमी आर्द्रता असल्यामुळे, कमी उंचीवर उत्तर भागात पानगळीची जंगले आढळतात. यात मुख्यत: सागाचे वृक्ष आहेत. १,००० मी. पेक्षा जास्त उंचीवर आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे सदाहरित जंगले आढळतात.

केरळमधील वायनाड जंगले ही उत्तर व दक्षिणेकडील जैविक क्षेत्रांमधील जागेत मोडतात. दक्षिणेकडील जंगलांमध्ये जास्त जैवविविधता आहे. उत्तर भागाप्रमाणेच दक्षिण भागात सुद्धा कमी उंचीवर पानगळीची तर जास्त उंचीवर सदाहरित जंगले आढळतात. दक्षिण भागात १,००० मी. पेक्षा जास्त उंचीवर सर्वाधिक प्रमाणात जैवविविधता आढळते. येथे संपूर्ण पश्चिम घाटात आढळणार्‍या फुलझाडांपैकी ८०% पेक्षा जास्त जाती आढळतात.

जैविक सुरक्षा[संपादन]

राजपालयम येथील सह्याद्री पर्वतरांग

पश्चिम घाटातील दाट जंगले ही मुख्यत: आदिवासी लोकांसाठी खूप उपयुक्त आहेत. त्यांना लागणारे अन्न व निवारे या जंगलांमध्ये मुबलक प्रमाणात मिळतात. या दाट जंगलांमुळेच पठारावरील लोक इथे स्थायिक होऊ शकले नाहीत. भारतात आल्यावर इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर जंगले साफ करून जमीन शेतीयोग्य बनविली.

१९८८ मध्ये पश्चिम घाटाला पर्यावरणशास्त्रज्ञ नॉर्मन मायर्स यांच्या प्रयत्नांमुळे संरक्षित जैविक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. जरी पश्चिम घाट हा भारताच्या फक्त ५% क्षेत्रफळावर पसरलेला असला तरी भारतातील उंच वाढणार्‍या झाडांच्या १५,००० जातींपैकी सुमारे ४,००० जाती (२७%) या इथेच सापडतात. यापैकी सुमारे १,८०० जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. सह्याद्री पर्वतरांगेत जवळजवळ ८४ उभयचर प्राण्यांच्या जाती, १६ पक्ष्यांच्या जाती, ७ प्रकारचे सस्तन प्राणी व १,६०० प्रकारची फुलझाडे आढळतात जी जगात इतरत्र कोठेही आढळत नाहीत.

भारत सरकारने पश्चिम घाटातील अनेक जंगले संरक्षित केलेली आहेत. यामध्ये २ संरक्षित जैविक क्षेत्रे, १३ राष्ट्रीय उद्याने, अनेक अभयारण्ये वगैरेंचा समावेश होतो. ही सर्व संरक्षित वनक्षेत्रे जतन करण्यासाठी वेगळे वनखाते बनवून या जंगलांचे रक्षण करण्यात येत आहे. यापैकी अनेक राष्ट्रीय उद्याने ही पूर्वी अभयारण्ये होती. निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र हे जवळजवळ ५,५०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळावर पसरलेले सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. यामध्ये नागरहोलची सदाहरित जंगले, बांदीपूर राष्ट्रीय उद्यानातील पानगळीची जंगले, कर्नाटकातील नुगू जंगल व केरळ व तमिळनाडू मधील अनुक्रमे वायनाडमुदुमलाई राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश होतो.[९] केरळमधील पश्चिम घाटात अनेक थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. यामध्ये मुन्नार, पोन्मुदीवायनाड ही प्रमुख ठिकाणे आहेत. केरळमधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे भारतातील शिल्लक असलेल्या सदाहरित जंगलांपैकी एक आहे.[१०]

जागतिक वारसा[संपादन]

२००६ साली भारताने युनेस्कोकडे पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थानांमध्ये समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे.[११]. यामध्ये एकंदर सात उपक्षेत्रे असतील.

प्राणिजगत[संपादन]

पश्चिम घाटात हजारो प्रकारचे प्राणी आढळतात. यांमध्ये जवळजवळ ३२५ प्रजाती या जागतिक स्तरावर नष्ट व्हायला आलेल्या प्रजाती आहेत. तसेच उभयचरांमधील बर्‍याच प्रजाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात.


ही पर्वतरांग वन्यजीवांसाठी खूप उपयुक्त जागा आहे. निलगिरीचे जैविक क्षेत्रामध्ये आशियाई हत्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात. ब्रह्मगिरीपुष्पगिरी अभयारण्येसुद्धा हत्तींसाठी सुयोग्य निवासस्थान आहे. कर्नाटकातील पश्चिम घाटात ६,००० पेक्षा जास्त हत्ती आढळतात (२००४ सालातील गणनेप्रमाणे) व भारतात सापडणार्‍या वाघांपैकी १०% वाघ सुद्धा इथेच आहेत.[१८].

सुंदरबन नंतर भारतात सर्वात जास्त वाघ हे कर्नाटक, तमिळनाडू व केरळच्या जंगलातच आढळतात. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान व नागरहोल इथे ५,००० पेक्षा जास्त गौर (बैल) कळप करून राहतात.[१९] कोडागु जंगलांच्या पश्चिमेला निलगिरी माकडे मोठ्या प्रमाणावर आढळतात.

भद्रा अभयारण्यात हरणांची मोठी संख्या आढळते. बरेच हत्ती, गौर, सांबर, चित्ते, वाघ इ. प्राणी केरळमधील जंगलांमध्ये आढळतात.

 • सरपटणारे प्राणी:अजगराच्या काही जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात.


मुन्नार येथील चहाचे मळे

संदर्भ[संपादन]

 1. कर्नाटक जंगल खाते (जंगल-सांख्यिकी) [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
 2. एशिया पॅसिफिक माउंटन नेटवर्क
 3. मायर्स, एन., आर. ए. मिट्टरमेयर, सी.जी. मिट्टरमेयर, जी.ए.बी. दा फाँन्सेका, व जे. केंट. (२०००) बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स फॉर कॉन्जर्वेशन प्रायॉरिटीज. नेचर मासिक ४०३:८५३–८५८ मायर्स, एन.
 4. डेक्कन हेराल्ड ची बातमी [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
 5. ५.० ५.१ ५.२ "पश्चिमघाटातील जैवविविधता". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ३ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली).  Unknown parameter |कृती= ignored (सहाय्य); Unknown parameter |name= ignored (|author= suggested) (सहाय्य)
 6. खाणक्षेत्र. भूगोल व खाणकाम विभाग, गव्हर्नमेंट ऑफ तमिळनाडू.
 7. नद्या व राज्यांप्रमाणे भारतातील धरणे.
 8. मायकेल ब्राईट, जगातील १००१ नैसर्गिक आश्चर्ये, बॅरन्स एज्युकेशनल सीरीज २००५.
 9. निलगिरी सुरक्षित जैविक क्षेत्र. [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
 10. एलॅमॉन सुरेश(२००६) "केरळमधील ठेवा", यूट्यूब व्हिडियो,केरळमधील ठेवा
 11. युनेस्को, एमएबी, (२००७) जागतिक वारसा स्थान, तात्पुरती यादी, पश्चिम घाट
 12. नेय्यार अभयारण्य
 13. पेप्पारा अभयारण्य
 14. शेंदुर्णी अभयारण्य
 15. आचेनकोईल, केरळ
 16. कोन्नी, केरळ
 17. अगस्त्यवनम, केरळ
 18. कर्नाटक जंगल खाते [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
 19. कर्नाटकमधील वन्य प्राण्यांची संख्या

बाह्य दुवे[संपादन]