Jump to content

कुर्डुगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुर्डूगड - विश्रामगड या पानावरून पुनर्निर्देशित)
कुर्डूगड किल्ला
नाव कुर्डूगड किल्ला
उंची
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण महाराष्ट्र
जवळचे गाव
डोंगररांग
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


कुर्डूगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

कुर्डूगड
कुर्डूगड

माणगाव तालुक्यामधे एका अनगड ठिकाणी कुर्डूगडाचा किल्ला दबा धरून बसलेला आहे. फारसा परिचित नसलेला कुर्डूगड मोसे खोऱ्यातील पासलकर या शिवकालीन घराण्याच्या अखत्यारीत होता. पासलकर घराण्यातील बाजी पासलकर हे शिवाजीराजांचे समकालीन आणि सहकारी होते. बाजी पासलकर कुर्डूगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत म्हणून या गडाला विश्रामगड असेही म्हणतात.

सुळक्याच्या आकाराचा माथा असलेला कुर्डूगड किल्ला सह्याद्रीच्या कोकणात उतरणाऱ्या एका धारेवर वसलेला आहे. या धारेवर कु्र्डूपेठ नावाची लहानशी वस्ती वसलेली आहे. या वस्तीमधे कुर्डाईदेवीचे मंदिर आहे. म्हणून किल्ल्याला कुर्डूगड असे नाव पडले आहे.

कुर्डूगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. त्यातील प्रचलित मार्ग म्हणजे माणगावकडून एस.टी बसने अथवा गाडी मार्गाने डोंगराच्या पायथ्याचे जिते गाव गाठावे लागते. माणगाव निजामपूर शिरवली जिते असा तासाभराचा प्रवास करावा लागतो. हा प्रवास एस.टी. अथवा खाजगी वाहनानेही करता येतो.

जिते गावातून गडावर जाणारी पायवाट २००६ साली झालेल्या प्रचंड पावसामुळे नष्ट झाली. डोंगराचा मोठा कडा ढासळल्यामुळे ही वाट बंद झाली. त्यामुळे जिते गावातून कुर्डूगडाचा डोगर उजव्या हाताला ठेवून दोन-तीन कि.मी. अंतरावरील उंबर्डी गाव गाठावे लागते. या उंबर्डीमधून सध्या गडावर जाणारी वाट आहे.

समुद्रसपाटीपासून ८८२ मीटर उंचीच्या कुर्डूगडास जाण्यासाठी मोसे खोऱ्यातूनही जाता येते. त्यासाठी पुणे-पानशेत मार्गे गाडीने जाऊन मोसे खोऱ्यातील धामणगाव गाठावे लागते. धामणगावाजवळून पायवाटेने लिंग्या घाटाच्या माथ्यावर पोहचून लिंग्या घाटाने खाली उतरावे लागते. अर्ध्या घाटातच कुर्डूगडाचा किल्ला आहे. यासाठी धामणगावापासून तीन-तासांची पायपीट करावी लागते. हा मार्ग जरी अडचणीचा असला तरी मार्गावरील निसर्गाची सोबत आणि त्याचे रौद्रत्व मनाला भुरळ पाडणारे आहे.

ताम्हिणी घाटातील सर्वात दक्षिणेकडील एका वळणावरून कुर्डूगड दिसतो. येथे उतरल्यास सर्वात सोयीचे आहे. येथून खिंडीतील वाटेने उंबर्डीला तासा-दीडतासात पोहचता येते. त्यामुळे वेळ, श्रम व अंतराची बचत होऊ शकते.

उंबर्डी मधील प्राचीन मंदिराचे अवशेष पाहून व समोरचा डोंगर चढून आपण कुर्डूपेठमधे दीड तासामधे पोहोचू शकतो. कुर्डुपेठेतील कुर्डाईदेवीचे दर्शन घेऊन दहा मिनिटांत किल्ल्यात पोहोचता येते. वाटेजवळ पाण्याचे टाके आहे. या टाक्यांतील पाण्याचा वापर उन्हाळ्यामधे गावकरी करतात.

हे टाके पाहून पुढे आल्यावर काही चढाई करून आपण सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या भागामधे बुरूज तसेच तटबंदी असे दुर्गावशेष पहायला मिळतात. कुर्डूगडाचे विशेष म्हणजे त्याच्या सुळक्याच्या पोटात असलेली नेसर्गिक गुहा. छताचा भाग हळूहळू कोसळून ही गुहा निर्माण झाली. मोठा विस्तार असलेली ही गुहा जमीन समतल नसल्याने वापरण्यायोग्य नाही. पण या प्रचंड गुहेच्या छताने माथ्यावरच्या सुळक्याचे वजन कसे पेलले असेल हे पाहून मात्र आश्चर्य वाटते.

येथून उत्तर कड्यावरील हनुमंत बुरुजावर जाता येते. येथे हनुमंताची मूर्ती आहे. ही देखणी मूर्ती मात्र सध्या एकसंघ राहिली नाही. येथून पूर्व बाजूला आल्यास खालच्या दरीचे उत्तम दर्शन घडते. या बुरुजाला कडेलोटाचा बुरुज असेही म्हणतात. गडावरच्या मुख्य अशा मोठय़ा सुळक्याजवळ एक लहान सुळकाही आहे. या दोन्ही सुळक्यामधे जाण्यासाठी असलेली वाट काहीशी अवघड आहे. छोटा पण आटोपशीर आकाराचा कुर्डूगड पहाण्यासाठी तासाभराचा अवधी पुरेसा आहे. मुक्कामासाठी कुर्डाई मंदिर सोयीचे आहे. वेळेच्या नियोजनाप्रमाणे परतीची वाट निवडता येते. मात्र कुर्डूगडाचा सुळका येथे येणाऱ्याच्या चांगल्याच स्मरणात राहतो.