सिंहगडाची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिंहगडाची लढाई
मराठे-मुघल युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक फेब्रुवारी ४ १६७०
स्थान सिंहगड, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
परिणती मराठ्यांचा विजय
प्रादेशिक बदल सिंहगडाचा हिंदवी स्वराज्यात समावेश
युद्धमान पक्ष
मराठा साम्राज्य मुघल
सेनापती
तानाजी मालुसरे उदयभान राठोड
सैन्यबळ
५०० मावळे १,२०० सैनिक व किल्यावरील शिबंदी, दारुगोळा
बळी आणि नुकसान
नोंद नाही अंदाजे ५००

सिंहगडाची लढाई ही शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटनांपैकी एक आहे. मुघलांशी तहात गमावलेले किल्ले परत घेण्यात शिवाजींनी मोहिमा आखल्या होत्या. त्या योजनेतच सिंहगड परत मिळवणे अतिशय महत्त्वाचे होते.सिंहगडावर झालेली ही लढाई तानाजी मालुसरेच्या बलिदानासाठी ओळखली जाते.

पार्श्वभूमी[संपादन]

पुरंदराच्या तहामध्ये शिवाजी महाराजांना २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले. त्यात कोंढाणा हा किल्ला प्रमुख होता. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलांकडे गेलेले किल्ले परत मिळवण्याचा सपाटा लावला. सिंहगड हा मुघलांना लष्करी दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण होते. शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी राजगड खूप जवळ होती. तसेच या ठिकाणावरून पुणे परिसरावर चांगलेच नियंत्रण मिळवता येत होते. म्हणून मुघलांनी या किल्यावर जास्त शिबंदी व सैन्य तैनात केले होते. या किल्याचे नेतृत्व राजपुतांकडे देण्यात आले होते.उदयभान राठोड हा मोघल सरदार किल्लेदार होता. शिवाजी महाराजांना देखील राजगडाच्या इतक्या जवळ मुघल अस्तित्व नको होते. म्हणून हा किल्ला परत घेणे अत्यंत गरजेचे होते.

लढाई[संपादन]

सिंहगड हा किल्ला पुण्याच्या पश्चिमेला २५ किमी अंतरावर १,४०० मी उंचीवर स्थित आहे. किल्याला चहुबाजूने खड्या उताराची नैसर्गिक तटबंदी आहे. सरळसरळ युद्ध करून हा किल्ला घ्यायचे असते तर मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले असते. म्हणून तानाजीने किल्या चढायची सर्वात कठीण बाजू निवडली. ही कड्याची बाजू असल्याने ह्या जागेवर फारसे सैनिक तैनात केले नव्हते. आज ही जागा तानाजी कडा म्हणून ओळखली जाते. तानाजी व काही मावळे हा ९० अंशाचा कडा चढून गेले. वर पोहोचल्यावर तानाजीचे मावळे व मुघल सेनेत जोरदार लढाई चालू झाली. तानाजी व उदयभानमध्ये द्वंद्व झाले. लढता लढता तानाजीची ढाल तुटली. तरीही डोक्यावरील शेला हाताला गुंडाळून तानाजी लढत होता. काही वेळानंतर मराठ्यांची सरशी होत होती तेवढ्यात जखमी तानाजी उदयभान कडून ठार झाला. परंतु जखमी उदयभानही फार काळ वाचू शकला नाही. तानाजी पडलेला पाहून लढाईचे उपसेनानी सूर्याजींनी सुत्रे ताब्यात घेतली. तानाजी पडल्याने मावळ्यांचा धीर सुटला व पळू काढू लागले. परंतु सुर्याजीने परतीचे मार्ग बंद केले व कड्याचे दोर कापून टाकले व मावळ्यांना जिंका किवा मरा असा आदेश दिला. प्रेरित झालेल्या मावळ्यांनी किल्ला सर केला.

अख्यायिका[संपादन]

सिंहगडाची लढाई ही मराठी इतिहासात एक अतिशय रोमांचक क्षण आहे. शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या घडामोडीत सिंहगडाची लढाई महत्त्वाची मानली जाते. या लढाईवरती अनेक लेख, अनेक गोष्टी, अनेक नाटकांमध्ये अनेक जणांनी आपपल्या परिने खुलवून सांगितल्या लिहिल्या इतक्या की कालांतराने त्या गोष्टी समाजमान्य झाल्या व त्या आख्यायिका बनल्या. त्यातील काही अख्यायिका खालील प्रमाणे.

  • तानाजी आपल्या मुलाचे लग्नाचे आमंत्रण शिवाजी महाराजांना देण्यास गेले असताना. शिवाजी महाराजांनी सिंहगडा ताब्यात घेण्याचा विचार सांगितला. परंतु तानाजीच्या घरी लग्न असल्याने शिवाजी महाराज बेत बदलणार होते. तानाजीने स्वतःहून प्रेरित होऊन शिवाजींना या लढाईचे नेतृत्व त्याला देण्यास सांगितले. तानाजी जिवंत असेपर्यंत शिवाजींना या मोहिमेवर जाण्याची गरज नाही. तानाजीने पहिले कोंढाण्याची मोहिम फत्ते करायची मगच मुलाचे लग्न करायचे. आधी लगीन कोंढाण्याचे, मगच रायबाचे असे तानाजीचे उद्गगार प्रसिद्ध आहे.
  • तानाजीने कडा चढण्यासाठी एका यशवंती नावाच्या घोरपडीला दोर लावला व तिला कडा वर चढून जाण्यास सांगितले व या दोराचा वापर करून मावळे कडा चढून गेले.
  • गड मराठ्यांच्या हातात पडल्यानंतर मावळ्यांनी किल्यावर मोठा जाळ करून राजगडावर शिवाजी महाराजांना किल्ला जिंकल्याचा संकेत पाठवला. शिवाजी महाराजांना जेव्हा कळले की तानाजी मालुसरे या युद्धात कामी आला तेव्हा महाराजांना याचे अतिव दुःख झाले. व शिवरायांच्या तोंडातून वाक्य बाहेर पडले साचा:''गड आला पण सिंह गेला'',आणि सिंहगड हे नाव आधीपासून नव्हते.

लढाईचे महत्त्व[संपादन]

या लढाईनंतर शिवाजी महाराजांचे मावळ प्रांतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले.

१९९९ च्या भारत पाक मधील कारगील युद्धात या लढाईपासून प्रेरणा घेत, अत्यंत अवघड कड्यांवर छुप्यारितीने चढून शत्रूवर आक्रमण केले व भारतीय सेनेने कारगीलची शिखरे पादाक्रांत केली व पाकिस्तानच्या ताब्यातील भाग परत मिळवला.

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]