Jump to content

चंद्रगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चंद्रगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

सह्याद्रीतल्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले. त्यापैकी "चंद्रगड उर्फ ढवळगड उर्फ गहनगड" जावळीच्या खोऱ्यातील एका उंच पहाडावर बांधण्यात आला. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगळगड, चंद्रगड, प्रतापगड, कावळा किल्ला व पारघाटाचे प्रचंड पहाड यांच्या दाटीत जावळीच खोर वसलेल आहे. हा भाग उंच पहाड, घनदाट जंगल व खोल दऱ्यांनी नटलेला आहे. या जावळीच्या खोऱ्यावर मोरे घराण्याने पिढ्यान पिढ्या राज्य केल त्यांना ‘‘चंद्रराव’’ हा किताब मिळाला होता. त्यावरूनच या किल्ल्याचे नाव चंद्रगड ठेवले असावे.

महाबळेश्वरी ऊगम पावणारी सावित्री नदी अरबी समुद्राला बाणकोट जवळ मिळते. प्राचीन काळा पासून महाड गावातून वाहाणाऱ्या सावत्री नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (वरंधा, आंबेनळी, पार घाट, मढ्या घाट, ढवळ्या घाट इत्यादी) घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. त्यापैकी वरंधा घाट (महाड ते भोर) व आंबेनळी घाट (पोलादपूर ते महाबळेश्वर) यामार्गांवर रस्ते बनवल्यामुळे आजही वापरात आहेत. या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. सावित्री नदीच्या (खाडीच्या) मुखावर असलेला बाणकोटचा किल्ला, घाटमार्गाचे रक्षण करणारा कावळा, चंद्रगड, मंगळगड, प्रतापगड इत्यादी किल्ले आणि घाटमाथ्यावर असणारे कमळ, केंजळ इत्यादी किल्ले अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. या घाटवाटांपैकी पोलादपूरहून महाबळेश्वरच्या आर्थरसीटला (मढीमहाल) जाणाऱ्या "ढवळ्या घाटावर" नजर ठेवण्यासाठी चंद्रगडाची निर्मिती करण्यात आली होती.

चंद्रगड ते आर्थरसीट पॉईंट (मढी महल) हा सुद्धा प्राचीन ढवळे घाटमार्ग होता. चंद्रगड किल्ला, बहिरीची घुमटी, जोरचे पाणी हे प्राचीन अवशेष याची साक्ष देत आजही उभे आहेत. चंद्रगड ते आर्थरसीट पॉईंट (मढी महल) हा सह्याद्रीतील अतिकठीण ट्रेकपैकी एक आहे. या ट्रेक मध्ये कुठेही रोप लावून चढावे लागत नाही, तरीही आपण समुद्रसपाटी पासून (४७२१ फूट उंच) महाबळेश्वर पर्यंत एका दिवसात चढून जातो. त्यामुळे हा ट्रेक शरीराची व मनाची कसोटी पाहाणारा आहे.


चंद्रगड (CHANDRAGAD) (ढवळगड/ गहनगड)
नाव चंद्रगड (CHANDRAGAD) (ढवळगड/ गहनगड)
उंची २३३७ फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव ढवळे
डोंगररांग महाबळेश्वर
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


चंद्रगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

कसे जाल ?

[संपादन]

खाजगी वाहन किंवा एस. टी यापैकी कोणत्याही पर्यायी वाहनाद्वारे ढवळे या चंद्रगडाच्या पायथ्याच्या गावात पोहोचता येते.

१) ढवळे गावात पोहोचण्यासाठी प्रथम मुंबई किंवा पुणे येथून पोलादपूर गावी जावे. पोलादपूरवरून ढवळे गाव अथवा उमरठला येणारी एस.टी पकडावी. उमरठ गावाहून ढवळे गाव साधारण ७ कि.मी. अंतरावर आहे. (उमरठ हे तानाजी मालुसरे याचं जन्मस्थान. इथे तानाजी मालुसारेंचे स्मारक उभारण्यात आले आहे. गावात विचारणा केली असता आपणांस मराठा तलवारी व पट्टा पाहायला एका दुकानदाराकडे पहावयास मिळतील.) पोलादपूर/महाड बस स्थानकातून संध्याकाळी ढवळे गावासाठी थेट बस सुटते. ती बस मुक्कामी असून रात्री ढवळे गावात थांबून सकाळी परत जाते.

२) खाजगी वाहानाने चंद्रगड पायथ्याशी असणाऱ्या ढवळे गावी पोलादपूर मार्गे जावे.

मुंबई- गोवा महामार्गावर मुंबई पासून १८३ कि.मी. अंतरावर पोलादपूर आहे. पोलादपूरहून महाबळेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावर पोलादपूरहून ८ कि.मी.वर कापडे फाटा आहे. या फाट्यावरून १८ कि.मी. अंतरावर चंद्रगडच्या पायथ्याचे ढवळे गाव आहे. पोलादपूरहून उमरठ आणि उमरठमार्गे ढवळेच्या दिशेने जावे. पोलादपूरपासून १६ कि.मी. आणि महाडपासून ३४ कि.मी. अंतरावर असलेल्या उमरठ गावातून उजव्या बाजूचा फाटा ढवळे गावाकडे जातो. येथून ढवळेकडे जाणारा रस्ता पकडावा. या खडबडीत डांबरी रस्त्याने ७ कि.मी. अंतरावर ढवळे गाव लागते.

इतिहास

[संपादन]

कांगोरी गड चंद्रराव मोऱ्यांनी जावळीच्या खोऱ्यात बांधला. त्याचा उपयोग घाटमार्गाच्या संरक्षणासाठी व टेहाळणीसाठी केला गेला. १५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला केला व जावळी ताब्यात घेतली. त्याबरोबर कांगोरी गड, ढवळगड, रायरी इत्यादी किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले. मुरारबाजी सारखा कसलेला योद्धा मिळाला. चंद्रगडाची डागडूजी करून त्याचे नाव बदलून ‘‘गहनगड’’ ठेवले. संभाजी महाराजांची क्रूर हत्या केल्यावर औरंगजेबाने इतकादरखान उर्फ जुल्फीकारखानास रायगड घेण्यास सांगितले. रायगडची नाकेबंदी करण्यासाठी मार्च १६८९ मध्ये खानाने आजूबाजूचे किल्ले व प्रदेश ताब्यात घेतला. त्यावेळी मंगळगड मोघलांच्या ताब्यात गेला. इ.स १६९० मध्ये छ. राजाराम महाराजांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी ‘मंगळगड’ जिंकून घेतला. इ.स १८१७ मध्ये सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजीमेंट मधील कर्नल हंटर व मॉरीसन या इंग्रज अधिकाऱ्यांना अटक करून मंगळगडावर तुरुंगवासात ठेवले होते. इ.स १८१८ मध्ये कनेल पॉथर या इंग्रजाने हा किल्ला जिंकला.

छायाचित्रे

[संपादन]

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

[संपादन]

ढवळे गावाच्या पूर्वेकडे चंद्रगड हा मध्यम श्रेणीतील किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. ढवळे गावातील मंदिर डावीकडे ठेवून चालायला सुरुवात करावी. शेतामधून जाणारी ही वाट पुढे शेलारवाडीला मिळते. या वाडीमधून दिसणाऱ्या डोंगराच्या दिशेने चालत जाऊन त्याला वळसा घालणाऱ्या वाटेने पुढे जावे. या डोंगराला वळसा घातल्यावर सुरुवातीला दरी डावीकडे आणि नंतर उजवीकडे ठेवत आपण चंद्रगडच्या पायथ्याशी पोहोचतो. येथे "चंद्रगड दर्शन" असा मोठा फलक (बोर्ड) लावला आहे. चंद्रगडाच्या चढावर थोडा घसारा (स्क्री) असून गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी मळलेली वाट आहे. चढाईच्या शेवटच्या टप्प्यात एक छोटा रॉक पॅच पार करून साधारण दिड तासांत आपण गडमाथ्यावर पोहोचतो.

गडमाथ्यावर बऱ्यापैकी सपाटी असून, चढ चढून गेल्यावर समोर दिसणाऱ्या पायवाटेने पुढे चालत राहावे. या पायवाटेच्या उजवीकडे वरच्या बाजूस एका चौकोनी खड्डयात दगडामध्ये कोरलेली, शिवलिंग आणि नंदीची अतिशय रेखीव मुर्ती आहे. गावकऱ्यांच्या ठायी हे श्रद्धेचे स्थान असून महाशिवरात्रीला येथे पूजा-अर्चा देखील करण्यात येते. पुढे याच पायवाटेने थोडा चढ चढून गेल्यावर आयताकृती पाण्याचे टाके लागते. ज्यामधील पाणी पिण्यायोग्य नाही. या टाक्याच्या वरच्या अंगाला असलेल्या चौथऱ्यामध्ये अजून एक शिवलिंग आढळून येते.

पायवाटेवरून चालत असताना दोन्ही बाजूने बरीचशी ढासळलेली पण तरी बऱ्यापैकी दर्शवणारी तटबंदी दिसून येते. डाव्याबाजूकडील तटबंदीवरून खाली बघितल्यास ५ पाण्याची टाकी दिसतात, पण तिथे पोचण्याची वाट अत्यंत कठीण आहे.(तेथे जाता येत नाही) त्यातील काही टाकी भरलेली तर काही सुकलेली आहेत. गडमाथ्यावर उत्तरेकडे पुढे चालत असताना उजव्या बाजूस काही चौथऱ्यांचे अवशेष देखील पाहावयास मिळतात. त्यातील एका चौथऱ्यावर पाटा-वरवंटा दिसतो. या चौथऱ्यांना उजवीकडे ठेवत पुढे गडाच्या उत्तर कड्याच्या दिशेने चालत जाऊन काही पायऱ्या उतरल्यावर उजवीकडे थंडगार पिण्यायोग्य पाण्याचे टाके आणि त्याच्या बाजूस असलेली तटबंदी बघायला मिळते. या टाक्याच्या पुढे अजून एक टाके असून त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. ही टाकी बघून झाल्यावर पायऱ्या चढण्याच्या आधी आपल्या उजवीकडे (म्हणजे पायऱ्या उतरल्यावर डावीकडे) थोड पुढे चालत गेल्यावर ५ टाकी आहेत. त्यातील ३ टाकीच नजरेस पडतात. या ३ मधील २ टाकं सुकलेली आहेत, तर एकामध्ये खराब पाणी आहे. ही टाकी बघून पायऱ्यांच्या वाटेवर परत येउन आलेल्या पायवाटेवरूनच परत जावे. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार किल्ल्यावर एकूण १४ टाकी आहेत, परंतु आपल्याला ११ टाकीच नजरेस पडतात. चंद्रगडावरून मंगळगडाचे दर्शन होते.

गडावरील राहायची सोय

[संपादन]

गडावर निश्चित राहण्याची सोय नाही, परंतु पायथ्याशी असलेल्या ढवळे गावात किंवा गावात असणाऱ्या मंदिरात एक रात्र राहण्याची सोय होऊ शकते.

गडावरील खाण्याची सोय

[संपादन]

गडावर खाण्याची सोय उपलब्द नाही, शक्यतो जेवण सोबत घेऊन येणे उत्तम.सर्वसाधारण पणे गड वर जाताना पाण्याची मुबलक साठा आवश्यक सोबत ठेवावा .गडावर टाक्यांमध्येपाणी पिण्यासाठी स्वच्छ नाही

गडावरील पाण्याची सोय

[संपादन]

गडावर असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांपैकी एका टाकीतले पाणी पिण्यायोग्य आहे, परंतु सतत कोणाचे येणे जाणे नसल्याकारणाने तेथील पाण्याची प्रत जाणून घेऊन ते पाणी पिण्यायोग्य आहे का ते तपासून घ्यावे. सोबत पिण्याचे पाणी घेऊन येणे उत्तम.

गडावर जाण्याच्या वाटा

[संपादन]

मार्ग

[संपादन]

जाण्यासाठी लागणारा वेळ

[संपादन]

ढवळे गावातून चंद्रगडच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी साधारण २ तास लागतात.

संदर्भ

[संपादन]

सांगाती सह्याद्रीचा

डोंगरयात्रा - आनंद पाळंदे

हे सुद्धा पहा

[संपादन]