Jump to content

तळगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

इतिहास

[संपादन]

इ.स. १६४८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तळागड आदिलशहाकडून जिंकून घेतला. इ.स. १६५९ मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्दीने तळागडाला वेढा घातला होता. पण अफजलखानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यावर सिद्दीने वेढा उठवला. पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी १२ किल्ले स्वतःकडे ठेवले. त्यामध्ये तळगड हा एक होता. यावरूनच या किल्ल्याचे महत्त्व आपणास समजते.

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्दीकडे गेला. इ.स. १७३५ मध्ये पहील्या बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला.

पहाण्याची ठिकाणे

[संपादन]

तळगड हा किल्ला तसा लहान आहे. त्यामुळे याचा घेरापण लहान आहे. हा गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे. अनेक ठिकाणचे बुरुज आजही चांगल्या स्थितित आढळतात. किल्ल्यात शिरतांना पडझड झालेला दरवाजा लागतो तो म्हणजे हनुमान दरवाजा. या हनुमान दरवाजाच्या उजव्या कोपऱ्यात मारुतीची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. येथेच खडकात कोरलेले खांब टाके आहे. टाक्या जवळच प्रवेशद्वारावरील शरभाचे शिल्प आपल्याला दीसुन येतात. दरवाजातून आत गेल्यावर गडमाथ्यावर प्रवेश करण्यापूर्वी बांधीव पायऱ्या व प्रवेशद्वाराचे अवशेष पाहायला मिळतात. गडमाथ्यावर उजव्या बाजूला दोन मजली भक्कम बुरूज पाहायला मिळतो. थोड्याच अंतरावर मंदिराचे जोत व ३ पाण्याची टाकी आढळतात. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर कातळात खोदलेली सात पाण्याची टाकी त्याच्या पुढे लक्ष्मी कोठार नावाची वास्तू पाहायला मिळते. पुढे उत्तरेकडे चालत गेल्यावर टोकावर बुरुज आहे. गडावर अनेक ठिकाणी घरांचे आणि वाड्यांचे अवशेष आढळतात. किल्ल्यावरून घोसाळगड, मांदाड खाडी, कुडा लेण्यांचा डोंगर असा सर्व परिसर दिसतो.

पोहोचण्याच्या वाटा

[संपादन]

मुंबई - गोवा महामार्गावर मुंबई पासून १२८ कि. मी. अंतरावर इंदापूर गाव आहे. इंदापूर गावापासून तळागाव १५ कि. मी. अंतरावर आहे. इंदापूर गावातून रिक्षा किंवा बसने तळागावात जाता येते. तळागावातूनच किल्ल्यावर जाण्याची मुख्य वाट आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे. या वाटेने गडावर जातांना पहिल्या टप्प्यावर एक छोटीशी सपाटी लागते. दुसरा टप्पा म्हणजे गडाच्या माचीचा भाग आणि तिसरा भाग म्हणजे किल्ल्याच्या अंतर्भागात असणारे प्रशस्त पठारच होय. पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो.

इंदापूरला जाण्याचा दुसरा मार्ग म्हणजे कोकण रेल्वे. दिव्याहून सकाळी ६.०० वाजता सुटणारी दिवा - मडगाव पॅसेंजर ९.३० वाजता इंदापूरला पोहोचते. संध्याकाळी मडगाव - दिवा पॅसेंजर इंदापूरला १५.५५ वाजता आहे.

राहाण्याची सोय

[संपादन]

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.

जेवणाची सोय

[संपादन]

तळागावात हॉटेल्स आणि भोजनालये आहेत.

पाण्याची सोय

[संपादन]

किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याची टाकी आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ

[संपादन]

तळागावातून जाण्यासाठी अर्धा तास लागतो.

सूचना

[संपादन]

१) रोहा परिसरात ४ किल्ले येतात. नीट नियोजन केल्यास, स्वतःच्या वहानाने, तळागड, घोसाळगड, बिरवाडी व अवचितगड हे किल्ले व कुडाची लेणी व्यवस्थित पाहून होतात.

२) घोसाळगड, बिरवाडी व अवचितगड या किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.