दादोजी कोंडदेव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे शिवाजी महाराजांचे बालपणाचे पालक, शिक्षक व मार्गदर्शक होते. यांचा जन्म १५७७ झाला व मृत्यू १६४९ साली झाली. हे १६३६ पासून ते वयाच्या ७२ व्या वर्षा पर्यंत म्हणजे साधारण १३ वर्षे शिवाजी महाराज जवळ होते.[ संदर्भ हवा ] त्याआधी त्यांनी पुणे परगणा वतन/जहागिरीची देखरेख करणारे सुभेदारपद घेऊन चाकरी केली होती..[१]. दादोजींचा मृत्यू झाला तेव्हा शिवाजी महाराजांचे वय १९ वर्षे होते.

दादोजी कोंडदेव शहाजी भोसले यांचे चाकर होते. शहाजी भोसले यांच्या जवळ नेमके काम केव्हापासून सुरू केले ते ऐतिहासिक उल्लेख आढळत नाही. ते तसे नसून ते आदिलशाहीच्या प्रशासन व्यवस्थेतील एक आदिलशहाने नेमलेले व नंतर सुभेदार झालेले एक हवालदार होते, असा विद्वानांना मान्य नसलेला नवीनतम प्रतिवाद आहे. [२]

सुरुवातीचे दिवस

इतिहासकार यदुनाथ सरकार आणि अन्य परंपरागत इतिहासकारांनी स्वीकारलेल्या मतानुसार दादोजी कोंडदेव महाराष्ट्रातील दौंड भागातील महाराष्ट्रीय देशस्थ ब्राह्मण कुटुंबातील आणि मौजे माळठण ता. शिरूर येथील होते.[३] यांचे मूळ आडनाव गोजिवडे असे होते.पाटस परगण्यातील मलठण गावचे ते कुलकर्णी होते. दादोजी आणि भोसले कुटुंबांचे संबध फार पूर्वीपासून होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी हिंगणी, बेरडी, देऊळगाव या गावांची पाटीलकी मिळविली होती. या गावांचा कुलकर्णी म्हणून दादोजी काम पहात असत. आदिलशाहीमार्फत ते सिंहगडाचे किल्लेदारही होते.[४]

त्या काळातील कुलकर्ण्यांचे काम नेमून दिलेल्या गावातील शेतसाऱ्याचा हिशेब ठेवण्याचे असे. काही वेळा शेतसारा जमा करण्याची जबाबदारीसुद्धा कुलकर्ण्यांना सांभाळावी लागे.

नवीन वादानुसार दादोजी गोजिवडे आणि दादोजी कोंडदेव या दोन स्वतंत्र व्यक्ती होत्या. दादोजी कोंडदेव हे मलठणचे नव्हे तर शिवथरचे होते.[५] दादोजी कोंडदेव विजापूरच्या आदिलशहांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होते. इ.स. १६३० मध्ये त्यांची हवालदारापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळली. त्याचे दायित्व आदिलशाही हवालदार म्हणून दादोजी कोंडदेवांकडे जाते. सन १६३२ ते १६३६ अखेर शहाजीराजे हे निजामशहाचे पूर्ण अखत्यार होते, त्यामुळे परिणामतः दादोजी कोंडदेव हे शहाजीचे चाकर होते.

सुभेदारीची कारकीर्द

शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली.

चाकणपासून शिरवळ, इंदापूर, सुपे, वाई, येथपर्यंतचा पुणे परगण्याचा मुलूख, पश्चिमेस घाट, उत्तरेस घोडनदी, पूर्वेस भीमा, दक्षिणेस नीरा अशा सरहद्दी असलेला प्रदेश शहाजीला आदिलशहाकडून जहागीर म्हणून मिळाला होता. पण प्रत्यक्षात शहाजी राजांना कर्नाटकात बंगलोर येथे काळ व्यतीत करावा लागल्यामुळे, त्यांना स्वतःस जहागिरीचा कारभार पहाण्यास उसंत नव्हती. म्हणून त्यांनी जहागिरीची व्यवस्था पहाण्याची जबाबदारी दादोजी कोंडदेवांकडे सुभेदार म्हणून सोपविली.

निजामशाहीकडून हा प्रदेश आदिलशाहीकडे आल्यानंतर इ.स.१६३० ते १६३१ च्या दरम्यान या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता.१६३४ ते १६३६ या काळात मोगलांनी आसपासच्या प्रदेशात बरीच आक्रमणेही केली होती.

सुभेदार नात्याने या पुणे परगणा परिसरात दादोजीने दक्ष कारभाराने परिस्थितीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणली. लोकांना सुरक्षित वाटण्यासाठी योग्य ते उपाय केले, निवाडे दिले, जमिनींचे मालकी हक्क निश्चित केले, जमिनींची प्रतवारी लावून मलिक अंबरची जमीन महसूल पद्धत आवश्यक त्या फेरबदलाने सर्व जहागिरीत लागू केली. सारा पिकांच्या उत्पन्नावर सारा निश्चित केला, शेती आणि बागाइतीला उत्तेजन दिले, तगाईच्या स्वरूपात शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आणि शेतीव्यसायात सुधारणा व्हावी म्हणून काही वर्षे शेतसारा माफ केला.

गोतसभातून पुणे वतनातील तंट्यांचे निवाडे करताना दादोजी कोडदेवांच्या उपस्थितीचे, तसेच उजाड मुलूख लागवडीखाली आणण्याचे दाखले देणारे उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रांतून तसेच बखरीतून आढळतात.[१].निवाडे देताना ते निष्पक्ष आणि न्यायी होते. जरब बसवताना त्याने एका कुलकर्ण्यास मृत्युदंडही घडविल्याचे उल्लेख आहेत.

ऐतिहासिक साधनांतील उल्लेख

वाद गुरूचा

बखरींमध्ये उल्लेख असला तरी अन्य प्रमाण ऐतिहासिक साधनांच्या संदर्भाने दादोजी कोंडदेव हे नेमून दिलेले काम करणारे केवळ एक सुभेदारच होते, असे कहाीजण समजतात. बखरी ह्या इतिहासाची प्रमाण साधने मानली जात नाहीत. परंतु दुसरी काहीही कागदपत्रे मिळत नसताना बखरींचा इतिहास लिहिण्यास अवश्य उपयोग होतो. शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर, श्रीमंत महाराज भोसले (शेडगावकर भोसले बखर), शिवदिग्विजय बखर इत्यादीतून शिवाजीमहाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था लावणारा, या दृष्टीने शिक्षक म्हणून मानाने केलेल्या उल्लेखांचा आधार घेऊन शिवाजी विषयक ऐतिहासिक संशोधन आणि तदनंतरचे ललितलेखन, यामुळे शिवाजी महाराजांच्या बालपणी दादोजी कोडदेवांनी केलेल्या कारभारातून शिवाजीला मार्गदर्शन लाभले असावे असा कयास बऱ्याच ठिकाणी आणि बराच काळ शालेय इतिहासातून व्यक्त केला गेला. शिवाजीला मार्गदर्शन करणारे असल्याने त्यांना शिवाजीचे गुरू म्हणतात, दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा कोणतीही अधिकृत जबाबदारी किंवा तसा कागदोपत्री पुरावा नसताना छत्रपती शिवाजी महाराज दादोजी कोंडदेवांच्या मार्गदर्शनाने मोठे झाले असा समज पसरवणे, ही विशेषतः संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नेत्यांची इतिहासाविषयीची दिशाभूल असून, अशी दिशाभूल दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते व इतिहास लेखन करणारी मंडळी ब्राह्मण असल्यामुळे केली जात होती, असे ब्राह्मणेतर चळवळ [६] आणि संभाजी ब्रिगेड इत्यादी संस्थांनी, दादोजी कोंडदेव हे गुरू असल्याचे उल्लेख यापुढे वगळावेत, असा आग्रह धरल्याचे दिसून येते. यावर संशोधकांची समिती राज्य शासनाने केली होती. त्या समितीने संशोधन करून दादोजी कोंडदेव गुरू नसल्याचे जाहीर केले. शासनाचे त्यांच्या नावाने दिलेले पुरस्कार रद्द केले. संभाजी ब्रिगेडच्या काही समाजकंटकांनी पुण्यातल्या लालमहालातील शिवाजीसह असलेला दादोजींचा पुतळाही उखडून टाकला व गायब केला.[ संदर्भ हवा ]

संदर्भ/पुस्तके

  • शिवरायांचे शिलेदार : दादोजी कोंडदेव (प्रभाकर भावे)
  • हिंदवी स्वराज्याचे कारभारी : दादोजी कोंडदेव, खंडण आणि मंडण (२४१ पानी संशोधनात्मक ग्रंथ, लेखक : श्यामसुंदर मुळे)
  1. ^ a b अखिल भारतीय मराठी विकास परिषदेच्या अनियतकालिकातील पांडुरंग बलकवडे यांचा लेख "गुरूचा वाद कशाला"मधील संदर्भ
  2. ^ "दादाजीपंती उगीचच बल घाविले- अ‍ॅड.अनंत दारवटक, साप्ताहिक लोकप्रभा आंतरजाल आवृत्ती दिनांक ३० जाने.२०११ रोजी जशी दिसली". Archived from the original on 2011-01-31. 2011-01-30 रोजी पाहिले.
  3. ^ "Daund - Info". Pune Diary. Archived from the original on 2015-09-24. 2006-11-25 रोजी पाहिले.
  4. ^ प्रा. यदुनाथ सरकार यांचे [[शिवाजी[[ महाराज व शिवयुग या पुस्तकात लेखन प्रा. रा.ज्ञा. गायकवाड, प्रा. वा.शं.सूर्यवंशी, प्रा. विलास पाटील यांनी दिलेले संदर्भ (शिवयुगाचे निर्माते-पानक्रमांक ४० ते ४३) चे पुनःप्रकाशन. (जसे अखिल भारतीय मराठा विकास परिषदेच्या अनियतकालिकात पान क्र. ४२वर आढळले तसे
  5. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2011-01-31. 2011-01-30 रोजी पाहिले.
  6. ^ http://pravinraje.files.wordpress.com/2011/01/2_2.jpg महात्मा जोतिबा फुले यांना त्यांचे मामा नारायणराव परमानंद यांचे पत्र- महात्मा फुले समग्र वाङ्ममय पृ. ४२४-४२५ संकेतस्थळावर दिनांक ३० जानेवारी २०११ भाप्रवे ८.३० रात्रौ जसे दिसले.

नोंदी