केळ
मूसा जातिच्या झाडांना आणि त्याच्या फळास केळी असे म्हणतात. केळीचे मूळस्थान दक्षिण पूर्व आशिया मानल जात. सध्या संपूर्ण उष्णकटिबंधीय प्रदेशात याची लागवड केली जाते. प्रामुख्याने फळांच्या उत्पादनासाठीच याची लागवड करण्यात येते केळाच्या झाडाची उंची २ ते ८ मीटर तर पानाची लांबी हि साडेतीन मीटर असू शकते. केळी ची लागवड कंदापासून केली जाते. केळाच्या झाडाची उंची २ ते ८ मीटर तर याच्या पानाची लांबी हि साडेतीन मीटर असू शकते. केळीला येणारी फळे हि गुच्छामध्ये येतात याला घड किंवा लोंगर असे म्हणतात. एक घडामध्ये साधारणत:१० फण्या असतात तर एका फनीस १६-१८ फळ असते. याचे फुल/फुलोरा हे तपकिरी रंगाचे असते. कच्ची फळे हिरवी तर पिकलेली पिवळी किंवा लालसर दिसतात. [1]
अनुक्रमणिका
लागवड[संपादन]
क्षेत्राच्या व उत्पन्नाच्या दृष्टीने आंब्याच्या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळीच्या उत्पन्नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात अंदाजे दोन लाख वीस हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे. केळी उत्पादन करणा-या प्रांतात क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्राचा जरी तिसरा क्रमांक लागत असला तरी व्यापारी दृष्टीने किंवा परप्रांतात विक्रीच्या दृष्टीने होणा-या उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला उत्पादनापैकी सुमारे ५० टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. सध्या महाराष्ट्रात एकूण चौवेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली असून त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र जळगांव जिल्हयांत आहे. म्हणून जळगांव जिल्हाला केळीचे आगार मानले जाते. मुख्यतः उत्तर भारतात जळगाव भागातील बसराई केळी पाठविली जाते. त्याचप्रमाणे सौदी अरेबिया इराण, कुवेत, दुबई जपान व युरोपमधील बाजारपेठेत केळीची निर्यात केली जाते. त्यापासून मोठया प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते.केळीच्या ८६ टक्केहून अधिक उपयोग खाण्याकरीता होतो. पिकलेली केळी उत्तम पौष्टिक खाद्य असून केळफूले, कच्ची फळे व खोडाचा गाभा भाजीकरिता वापरतात. फळापासून टिकावू पूड, मुराब्बा, टॉफी, जेली इत्यादी पदार्थ बनवितात. वाळलेल्या पानाचा उपयोग आच्छादनासाठी करतात. केळीच्या खोडाची व कंदाचे तुकडे करुन ते जनावरांचा चारा म्हणून उपयोगात आणतात. केळीच्या झाडाचा धार्मिक कार्यात मंगलचिन्ह म्हणून उपयोग केला जातो.
लागवडीचा हंगाम[संपादन]
केळीच्या लागवडीचा मोसम हवामानानुसार बदलत असतो. कारण हवामनाचा परिणाम केळीच्या वाढीवर, फळे लागण्यास व तयार होण्यास लागणारा कालावधी या वरच होत असतो. जळगांव जिल्हयात लागवडीचा हंगाम पावसाळयाच्या सुरुवातीस सुरु होतो. यावेळी या भागातील हवामान उबदार व दमट असते. जून जुलै मध्ये लागवड केलेंडर बागेस मृगबाग म्हणतात. सप्टेबर ते जानेवारी पर्यात होणा-या लागवडीस कांदेबाग म्हणतात. जून जूलै पैकी लागवडीपेक्षा फेब्रूवारी मध्ये केलेंडर लागवडीपासून अधिक उत्पन्न मिळते. या लागवडी मुळे केळी १८ महिन्याऐवजी १५ महिन्यात काढणे योग्य होतात.
लागवड पध्दत[संपादन]
लागवड करताना ०.५*०.५*०.५ मीटर आकाराचे खडडे खोदून किंवा स-या पाडून लागवड करतात. दोन झाडातील अंतर बसराई जाती करिता १.२५ किंवा १.५० मीटर असते.
खते व वरखते[संपादन]
या झाडाची मुळे उथळ असतात. त्यांची अन्नद्रव्यांची मागणी जास्त असते. त्यामुळे वाढीच्या सुरुवातीच्या काळात (पहिले वार महिने) नत्रयुक्त जोरखताचा हप्ता देणे महत्वाचे ठरते. प्रत्येक झाडास २०० ग्रॅम नत्र ३ समान हप्त्यात लावणीपासून दुस-या तिस-या व चौथ्या महिन्यात द्यावे. प्रत्येक झाडास प्रत्येक वेळी ५०० ते ७०० ग्रॅम एरंडीची पेंड खतासोबत द्यावी. शेणखता बरोबर ४०० ग्रॅम ओमोनियम सल्फेट प्रत्येक झाडास लावणी करतांना देणे उपयुक्त ठरते.
दर हजार झाडास १०० कि नत्र ४० कि स्फूरद व १०० कि पालांश ( प्रत्येक खोडास) १०० ग्रॅम नत्र ४० ग्रॅम स्फूरद, ४० ग्रॅम पालाश म्हणजेच हेक्टरी ४४० कि. नत्र १७५ कि. स्फूरद आणि ४४० कि पालाश द्यावे.
उत्पादन[संपादन]

केळीच्या उत्पादनात जागतिक पातळीवर भारत प्रथम तर भारतात महाराष्ट्र राज्य प्रथम आहे. केळीच्या जागतिक उत्पादनापैकी भारतात २० टक्के उत्पादन होते तर भारतातील एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रात २५ उत्पादन होते. महाराष्ट्रात जळगाव जिल्हा तर जळगाव जिल्ह्यात रावेर, चोपडा व यावल हि तालुके केळी उत्पादनात अग्रेसर आहे.
जाती[संपादन]
बसराई, श्रीमंती, वेलची, सोनकेळी, लाल केळी, चक्रकेळी, कुन्नन, अमृतसागर, बोंथा, विरूपाक्षी, हरिसाल, सफेद वेलची, लाल वेलची, वामन केळी, ग्रोमिशेल, पिसांग लिलीन, जायंट गव्हर्नर, कॅव्हेन्डीशी, ग्रॅन्ड नैन, राजापुरी, बनकेळ, भुरकेल, मुधेली, राजेळी
उपयोग[संपादन]
पूर्वीपासून केळी फळाचा मुख्य उपयोग खाण्यासाठी केला जातो. सध्या केळी पासून केळीचे वेफर्स, केळीचा जॅम, केळीची भुकटी, केळीचे पीठ, केळीची प्युरी, सुकेळी, केळीचे पेठे, केळीची दारू, ब्रॅन्डी, शिरका, केळी बिस्कीट असे कीतरी पदार्थ बनवले जातात.
कच्या केळीची भाजी पूर्वीपासूनचा बनवतात. केळीच्या पानांचा उपयोग दक्षिण भारतात जेवण वाढण्यासाठी केला जातो. केळीच्या पानांचा उपयोग जनावरांना चारा म्हणून हि होतो तसेच वाळलेली पाने इंधन म्हणून वापरता येते. केळी हे फळ शरीरा साठी खूप उपयुक्त आहे. आणि याचा वापर नेहमी आहारात समावेश केल्यास आपले आरोग्य चांगले राहते.
केळी खाण्याचे फायदे[संपादन]
- दोन केळी खाल्ल्याने शरीराला पुढील ९० मिनिटांपर्यंत उर्जा मिळते. मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते.
- अधिक तणाव जाणवत असल्यास केळी खावीत.
- ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे. केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
- परीक्षा देण्यासाठी जात असाल तर जरुर केळे खा.
- केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. यामुळे हाडे मजबूत होतात.
- केळ्यांमध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो. यात पोटॅशियम, फॉलिक अॅसिड, व्हिटामिन ए, बी, बी६, आर्यन, कॅल्शियम असते.
- जुलाबाचा त्रास होत असल्यास केळे खाणे उत्तम.
- केळ्याच्या नियमित सेवनाने चयापचयाची क्रिया सुरळीत राहते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी राखण्यास मदत होते.
- रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम केळे करते.
- अधिक मद्यपान केल्याने हँगओव्हर झाल्यास केळ्याचा शेक प्यायल्याने लवकर आराम मिळतो.
सांस्कृतीक महत्त्व[संपादन]
हिंदू धर्मात केळीच्या खांबांना म्हणजे झाडाच्या खोडाला, आंब्याच्या पानांच्या तोरणाप्रमाणेच शुभसूचक, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. लग्न, मुंज अशा शुभकार्याच्या प्रसंगी प्रवेशद्वारावर दोन केळीचे उंच व पाने असलेले खांब रोवून त्याचे तोरण केले जाते.
बाह्य दुवे[संपादन]
1. [१]
- मांगल्याचे प्रतीक- ‘केळ’ - धार्मिक महत्त्व
- तणावमुक्तीसाठी केळे
- केळ्याचे रुचकर पदार्थ
- केळी[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
- आपण माहित असणे आवश्यक केळी दुष्परिणाम
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
केळ हे फळ शीत वर्धक आहे .