Jump to content

भैरवगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भैरवगड किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)
भैरवगड
नाव भैरवगड
उंची ३००० फूट
प्रकार वनदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण सातारा, महाराष्ट्र
जवळचे गाव दुर्गवाडी, गव्हारे
डोंगररांग महाबळेश्वर कोयना
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


भैरवगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे. भैरवगड या नावाचे एकूण पाच किल्ले महाराष्ट्रात आहेत, त्यांपैकी हा एक. बाकीचे असे : मोरोशीचा भैरवगड (ठाणे जिल्हा), कणकवलीजवळचा नरडव्याचा भैरवगड (सिंधुदुर्ग जिल्हा), कोथळ्याचा भैरवगड, शिरपुंजेचा भैरवगड (दोन्ही अहमदनगर जिल्हा).

स्थलवर्णन[संपादन]

हा किल्ला सह्याद्रीच्या सलग रांगेपासून बाहेर आलेल्या डोंगराच्या फाट्यावर वसलेला आहे, त्यामुळे दुरून हा किल्ला दिसत नाही. घनदाट जंगल हे येथील मुख्य आकर्षण आहे. हे अरण्य अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आल्याने येथील सर्व गावांचे स्थलांतर करून ती अरण्याबाहेर वसवण्यात आली आहेत, त्यामुळे या भागात माणसांचा वावर तसा कमीच आहे. २०१२ साली भैरवगडाच्या आजूबाजूचे अभयारण्य "टायगर रिझर्व" घोषित केल्यामुळे हेळवाकहून भैरवगड, पाथरपुंज (व प्रचितगड) कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर जंगल खात्याने चौकी बसवलेली आहे व वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या रस्त्याने जाता येत नाही.

इतिहास[संपादन]

इतिहासात या गडाचा उल्लेख कोठेही आढळत नाही. मात्र या गडाचा वापर केवळ टेहळणीसाठी असावा असे येथील बांधकामावरून दिसते.

गडावर पहाण्यासारखी ठिकाणे[संपादन]

भैरवगडाच्या समोरच्या डोंगरावरील मंदिरात भैरी देवी, तुळाई देवी, व वाघजाई देवी यांच्या २ ते ३ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात १०० जणांची झोपण्याची सोय होऊ शकते. मंदिरा समोरच्या प्रांगणात तुळशीवृंदावन व शंकराच्या पिंडीचा चबुतरा दिसतो. मंदिराच्या उजव्या बाजूला एका खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे.

भैरवगड किल्ल्याचा डोंगर[संपादन]

भैरवगड किल्ला मंदिरासमोरील डोंगरावर आहे. तेथे जाण्यासाठी मंदिराच्या डाव्या बाजूने खाली उतरणाऱ्या पायवाटेने जावे लागते. किल्ल्याच्या डोंगरावर पोहचल्यावर एक बांधीव बुरूज आणि येथेच वरच्या बाजूला कातळात कोरलेली मोठी चौकोनी गुहा आहे. पूर्वीच्या काळी टेहळणीसाठी बसणारे टेहळे येथे बसून लांबवर नजर ठेऊ शकत असले पाहिजेत. या गुहेमुळे पाऊस वाऱ्यापासून त्यांचे संरक्षण होत असावे.

गुहेपासून थोडे पुढे जाऊन डोंगराला वळसा मारल्यावर दरीच्या बाजूला बुरूज असलेला ढासळलेल्या अवस्थेतील दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे गेल्यावर समोरच्या टेकाडाच्या चढावावर दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. हा दरवाजाही ढासळलेला आहे.

गडमाथा तसा अरुंदच आहे, त्यामुळे २ तासात गड फिरून होतो. गडावरून लांबवर पसरलेले कोयनेचे दाट जंगल दिसते.

पाण्याची सोय[संपादन]

दक्षिणामुख दरवाजा असलेल्या टेकाडाला वळसा मारून गडाच्या मागील बाजूस गेल्यावर येथे पाण्याची दोन टाकी दिसतात. यातील पाणी पिण्यास उपयुक्त असून ते बारमाही असते. मंदिराकडे येणाऱ्या कच्च्या रस्त्याने चालत जाऊन डावीकडे दरीत उतरणाऱ्या वाटेने ५ मिनिटे खाली उतरल्यावर पाण्याचे एक टाके दिसते. मात्र हे पाणी मार्चपर्यंतच असते. मंदिराच्या मागच्या बाजूला कोकणातील पाते (गोवळ पाती) गावात उतरणारी वाट आहे. या वाटेने ५ मिनिटे खाली उतरल्यावर एक चौकोनी विहीर आहे. या विहिरीला बारमाही पाणी असते.

भैरवगडाला जाण्याच्या चार वाटा[संपादन]

१. हेळवाकची रामघळ मार्गे[संपादन]

चिपळूण-कऱ्हाड रस्त्यावर कुभांर्ली घाट पार केल्यावर, कोयनानगरच्या ५-६ किलोमीटर अलीकडे हेळवाक गाव आहे. तिथून मेंढेघरमार्गे कोंढावळे धनगरवाड्याला गेल्यावर, डोंगर उजवीकडे व ओढा डावीकडे ठेवून १ तासांत रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली "रामघळ" लागते. ( याच रामघळीत रामदास स्वामींना "आनंदवन भुवनी " हे काव्य सुचले अशी दंतकथा आहे.) या रामघळीतूनच वर जाणारा रस्ता पकडल्यास भैरवडावर पोचता येते.

याऐवजी, पाथरपुंज ते जुना वाघोना या मार्गावरूनही भैरवगडावर जाता येते. मात्र हा पल्ला फारच लांबचा असल्याने गड गाठण्यास ६ तास लागतात. वाटेत खूप घनदाट जंगल लागते. वाट तशी मळलेली नसल्याने हरवण्याचा संभव खूपच आहे. या वाटेने जायचे असल्यास वाटाडया घेऊन जाणे आवश्यक आहे.

वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्यास पावसाळा सोडून इतर ऋतुत जीपने, कच्च्या रस्त्यावरून हेळवाक मार्गे भैरवगडापर्यंत जाता येते. (हेळवाक ते भैरवगड अंतर साधारणपणे २० किमी आहे.)

२. दुर्गवाडी मार्गे[संपादन]

सकाळी ८ वाजता चिपळूणवरून सुटणाऱ्या चिपळूण-डेरवण-दुर्गवाडी ही बस एका तासात दुर्गवाडीला पोहोचते. दुर्गवाडी गावाच्या वर असणाऱ्या जंगलातून वाट थेट गडावर जाते. या वाटेने गड गाठण्यास ३ तास लागतात. वाट तशी सरळच असली तरी दमछाक करणारी आहे. गव्हारे-गोवळपाती गावातून येणारी वाटसुद्धा या वाटेलाच येऊन मिळते. वाटेत कुठेही पाणी नाही. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास साडेतीन तास लागतात.

३ गव्हारे मार्गे[संपादन]

दुर्गवाडी गावाच्या आधी गव्हारे (गोवारे) गावाकडे जाणारा गाडीरस्ता लागतो. या गव्हारे गावातून गडावर जाण्यास तीन तास लागतात. ही वाट मध्येच दुर्गवाडी गावातून येणाऱ्या वाटेस मिळते. पावसाळा सोडून इतर ऋतूत जीपने, कच्च्या रस्त्यावरून कोयनानगर - गव्हारे (गोवारे) - पाथरपुंज मार्गे भैरवमंदिरापर्यंत जाता येते. तेथून भैरवगडापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास एकूण साडेतीन तास लागतात.

४. पाते (गोवळ पाती) मार्गे[संपादन]

चिपळूण पासून गोव्याच्या दिशेला जातांना २१ किलोमीटरवर "आसुर्डे फाटा" लागतो. तिथून डावीकडला रस्ता २२ किमीवरील पाते (गोवळ पाती) गावापर्यंत जातो. (यातील शेवटचे ५ कि.मी. कच्चा रस्ता आहे.) पाते (गोवळ पाती) गावातून गडावर जाण्यासाठी गावकऱ्यांनी पायऱ्या बांधलेल्य़ा आहेत. गावाच्या वर असलेल्या पठारापर्यंत या पायऱ्यांनी जाता येते. (येथे येण्यासाठी गावातून दीड तास लागतो). पुढे खड्या चढणीच्या वाटेने २ तासात भैरवगडावरील मंदिरात पोहोचता येते. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास साडेतीन तास लागतात.

राहण्याची सोय[संपादन]

भैरवगडाजवळच्या टेकडीवरील मंदिरात १०० जणांची राहण्याची सोय होऊ शकते.

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]

१. दुर्गवाडी किंवा गव्हारे मार्गांनी साडेतीन तास लागतात.

२. हेळवाकच्या रामघळी मार्गे ६ तास लागतात.

३. मोरोशी येथुन पाऊलवाटेने चालत १ ते १:३० तास लागतो

खास सूचना[संपादन]

१. हेळवाकहून भैरवगड, पाथरपुंज (व प्रचितगडा)कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर जंगल खात्याने चौकी बसवलेली आहे व वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या रस्त्याने जाता येत नाही. अभयारण्य क्षेत्रात चोरून प्रवेश केल्यास दंड आणि तुरुंगवासाची सजा होऊ शकते.

२. भैरवगडावर पावसाळ्यात जळवांचा त्रास फार मोठ्या प्रमाणात होतो. अंगाला चिकटलेल्या जळूवर मीठ वा हळद टाकल्यास ती अंगापासून सुटते.

३. भैरवगड ते प्रचितगड असा २ दिवसांचा ट्रेक करता येतो. या ट्रेकमध्ये रात्रीचा मुक्काम जंगलात तंबू ठोकून करता येतो. जंगलात वन्य पशूंचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. प्रचितगडच्या आजूबाजूचे अभयारण्य "टायगर रिझर्व" घोषित केल्यामुळे वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय गडावर जाता येत नाही, तसेच जंगल खात्याच्या कारवाईच्या भीतीने वाटाडेही प्रचितगडावर यायला तयार होत नाहीत.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]