वसईचा किल्ला
| वसई किल्ला | |
महादरवाजा | |
| नाव | वसई किल्ला |
| उंची | समुद्रसपाटीलगत |
| प्रकार | भुईकोट किल्ला |
| चढाईची श्रेणी | सोपी |
| ठिकाण | पालघर, महाराष्ट्र |
| जवळचे गाव | वसई |
| डोंगररांग | |
| सध्याची अवस्था | व्यवस्थित |
| स्थापना | {{{स्थापना}}} |
वसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]
रचना
[संपादन]तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे. किल्ल्याला दोन प्रमुख प्रवेशद्वारे असून एक जमिनीच्या दिशेने (गावाकडे) आणि दुसरे बंदराच्या दिशेने आहे. किल्ल्याच्या चोहीबाजूंनी पूर्वी तट होते आणि तटांची उंची ३० फुटांच्या वर होती.[२]
बुरूज
[संपादन]किल्ल्याला एकूण दहा बुरूज आहेत. नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, अशी या बुरुजांची नावे होती.[३] बुरुजांवर तोफा आणि बंदुका ठेवल्या जात. प्रत्येक बुरुजावर आठ सैनिक, त्यांचा एक कप्तान असे पथक तैनात असे. मराठ्यांशी झालेल्या वसईच्या लढाईत सेंट सेबस्तियन बुरूज सुरूंगाने उडवून मराठ्यांच्या फौजा आत शिरल्याचे सांगितले जाते.[३]
अंतर्गत रचना
[संपादन]
किल्ल्याच्या आतील भागात दोन मुख्य दरवाजे असून सेंट जॉन बुरुजाच्या बाजूला बंदराच्या दिशेने उघडणारा दर्या दरवाजा आहे.[२] किल्ल्यात न्यायालय, तीन चर्च, हॉस्पिटल, कारागृह, दारूचे कोठार वगैरे विशेष इमारती असून बाकी इमारतींचे अवशेषही दिसून येतात. किल्ल्यात चोर वाटा आणि काळोखी चक्री जिने आहेत. महादेवाचे आणि वज्रेश्वरीचे मंदिरही आहे. मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतल्यावर बुरुजांना मराठी नावे दिली होती.[३] कोकणातला बंदरावर स्थित असा हा किल्ला तत्कालीन राजवटींना समुद्रावर आणि व्यापारावर लक्ष ठेवण्याच्या कामी अतिशय उपयुक्त असावा असा अंदाज बांधता येतो. तरीही पेशव्यांच्या हातात असताना या किल्ल्याचा म्हणावा तसा वापर झालेला दिसत नाही.
हा मूळचा किल्ला मुसलमानी पद्धतीने बांधलेला असला तरी पोर्तुगीजांनी त्याची बरीचशी मोडतोड करून युरोपीय पद्धतीच्या स्थापत्यशास्त्राचा वापर करून किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे दिसते. अर्धगोलाकार कमानींचे दरवाजे, खिडक्या, सज्जे, बुरूज रोमन स्थापत्यशास्त्राचा वापर करून बांधल्याचे दिसते. इंग्रजांच्या हाती लागल्यावर किल्ल्याची व्यवस्था चांगली राखली गेली नाही. दलदल आणि त्यात माजणारे रान यामुळे किल्ल्याची पडझड होत होती. त्यात सन १८६० मध्ये इंग्रजांनी हा किल्ला एका इंग्रज अधिकाऱ्याला, कर्नल लिटलवूडला भाड्याने दिला. त्याने किल्ल्यात उसाची शेती केली आणि साखर कारखाना उभारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्याने किल्ल्यातील दगड लोकांना विकण्यास सुरुवात केली. यामुळे किल्ल्याला अधिक हानी पोहोचली.[२]
सद्यस्थिती
[संपादन]
किल्ल्याचे अवशेष आणि किल्ल्याची व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळातही फारशी राखली गेली नाही. अनेक वर्षे हा किल्ला दुर्लक्षितच राहिला. सुयोग्य व्यवस्था राखली न गेल्याने जागोजागी माजलेले रान, तट फोडून बाहेर आलेली झाडांची मुळे, दलदल यामुळे किल्ल्याची आणखीनच दुर्दशा होत गेली. १५-२० वर्षांपूर्वी किल्ल्याच्या बऱ्याचशा परिसरात मानवी संचार शक्य नव्हता. गेल्या काही वर्षांत उभारला गेलेला चिमाजी आप्पांचा पुतळा व स्मारक आणि भारतीय पुरातत्त्व खात्याने या किल्ल्याची व्यवस्था हाती घेऊन थोडी डागडुजी आणि रानाची साफसफाई केल्याने या उपेक्षित किल्ल्याकडे लोकांचे थोडेफार लक्ष वळले आहे.[४] तरीही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मुंबईजवळच्या या किल्ल्याला पर्यटन स्थळ बनवावे या दृष्टीने भक्कम प्रयत्न होणे आवश्यक आहेत. किल्ल्याच्या राहिलेल्या अवशेषांची डागडुजी करून, भिंती, बुरूज, तट यांची साफसफाई करून, जागोजागी ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पाट्या लावून, पर्यटकांसाठी विश्रांती व्यवस्था करून या किल्ल्याकडे लोकांचे लक्ष वेधणे आणि एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा जपणे शक्य आहे.
चित्रदालन
[संपादन]- वसईच्या किल्ल्याचे भग्नावशेष
- टेहळणीचा मनोरा
- प्रवेशद्वार
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "गॅझेट नोटिफिकेशन" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-03-07 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ११ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - 1 2 3 Thana District Gazetteer. Gazetteer of India. Government of Maharashtra.
- 1 2 3 मराठे, प्रमोद (२००८). किल्ले वसई. डायमंड पब्लिकेशन्स. ISBN 9788184830880.
- ↑ "Fort Bassein (Vasai Fort)". Archaeological Survey of India - Mumbai Circle.[permanent dead link]
अधिक वाचन
[संपादन]- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर
- वसई परिसरातील दुर्ग - श्रीदत्त राऊत