भूपतगड किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भूपतगड किल्ला
नाव भूपतगड किल्ला
उंची
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण महाराष्ट्र
जवळचे गाव जव्हार
डोंगररांग
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


भूपतगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या जव्हारजवळचा एक किल्ला आहे. जव्हारपासून ह १६ किलोमीटरवर आहे. भूपतगडाची निर्मिती ही त्र्यंबक ते जव्हार या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी झाली असावी.

जव्हार ठाणे जिल्ह्यात आहे. तेथे पोहोचण्यासाठी जव्हारला जाण्यासाठी अनेक मार्ग असून त्यांतील दोन मार्ग प्रचलित आहेत. एक म्हणजे कल्याण -कसारा – विहीगाव – मोखाडा -जव्हार हा मार्ग, तर दुसरा ठाणे जिल्ह्यातून कल्याण – भिवंडी – वाडा – विक्रमगड – जव्हार असा मार्ग. भूपतला येण्यासाठी ठाणे जिल्ह्यातीलच कुर्लोट गावामार्गेही वाट आहे. मात्र ही वाट खडी चढाईची आहे.

जव्हारवरून चोथ्याचा पाडा, केळीचा पाडा, पवारपाडा अशी छोटी आदिवासी गावे पार करत माणूस १६ किलोमीटरवरील झाप गावात येऊन दाखल होतो. जव्हारहून झापला दर तासाभराने एस.टी. ची देखील व्यवस्था आहे. भूपतगडाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या अगदी जवळ जाईपर्यंत इथे किल्ला असल्याचे जाणवत नाही. जव्हार परिसरातील डोंगररचना अतिशय क्लिष्ट आहेत; ठळकपणे दाखवता येईल असा आकार इथल्या एकाही डोंगराला नाही. त्यामुळे झापवरून भूपतगडाच्या पायथ्याला वसलेल्या चिंचपाड्याची दिशा विचारून किल्ल्याकडे करण्याखेरील दुसरा पर्याय नाही. चिंचपाड्याहून भूपतगडाच्या पहिल्या पठारापर्यंत जीप जाईल असा कच्चा रस्ता तयार झाला असून इथे एक झेंडा लावलेला आहे. झेंड्याच्या शेजारी पाषाणात कोरलेली पावले आहेत. स्थानिक ग्रामस्थ या पावलांना नित्यनेमाप्रमाणे ‘सीतेची पावले’ म्हणतात.

‘सीतेची पावले’ असलेल्या या पठारावरून गर्द झाडीने भरलेला भूपतगड दिसतो. त्याच्या माथ्याच्या दिशेने सरकलेली ठसठशीत पायवाटही नजरेत भरते आणि फक्त वीस मिनिटांत भूपतगडाच्या पडलेल्या तटबंदीतून गडमाथ्यावर पोहोचता येते. किल्ल्याच्या माथ्यावर पाऊल ठेवले की उजवीकडे जाणार्‍या पायवाटेने गेल्यास किल्ल्याच्या भग्न दरवाजाचे अवशेष दिसतात. येथे किल्ल्याच्या माथ्याकडे येणाऱ्या पायऱ्या दृष्टीस पडतात. हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशमार्ग असून सध्या तो पडलेल्या अवस्थेत आहे.

भूपतगडाची दक्षिण बाजूच्या पठारावर जोडटाक्यांचा एक समूह असून पाणी अडवण्यासाठी त्याला भिंतही बांधलेली दिसते. या टाक्यांच्या खालच्याच बाजूला एक तलाव असून त्याच्या काठावरही पाणी अडवण्यासाठी भिंतीची रचना केलेली दिसते. मात्र या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसून टाकीसमूहातील एकाच टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. भूपतच्या दक्षिण कडय़ावर तुरळक तटबंदी सोडल्यास कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत.

हवा स्वच्छ असेल तर भूपतगडाच्या माथ्यावरून उत्तरेकडे असलेली त्र्यंबक रांग दृष्टीस पडते. पावसाळ्याच्या शेवटी शेवटी या भूपतगडाचे आणि आजूबाजूच्या आसमंताचे रूप देखणे असते. सोनकीच्या फुलांनी (Senecio grahamii, Graham's groundsel) सजलेले भूपतचे पठार आणि त्याच्या माथ्यावरून दिसणारा पिंजल नदीच्या खोऱ्याचा विस्तीर्ण मुलुख, सूर्यमाळचे पठार, खोडाळ्याचा प्रदेश हा भाग म्हणजे डोळ्यांसाठी जणू पर्वणीच वाटते.


संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]